अंगारवाटा...शोध शरद जोशींचा
_
अंगारवाटा... शोध शरद जोशींचा लेखक भानू काळे चलभाष : ९८५०८१००९१ इमेल : bhanukale@gmail.com प्रकाशक ऊर्मी प्रकाशन सी २, गार्डन इस्टेट, नागरस रस्ता, औंध, पुणे ४११ ०६७ स्थिरभाष : (०२०) २५८८३७२६ या पुस्तकाच्या प्रती मागवण्यासाठी कृपया पुढील पत्त्यावर संपर्क साधावा : प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे शेतकरी संघटना, मध्यवर्ती कार्यालय, अंगारमळा, आंबेठाण, तालुका खेड, जिल्हा पुणे ४१०५०१ चलभाष : ९८२२३००३४८ अथवा श्री. अनंतराव देशपांडे चलभाष : ९४०३५४१८४१, ८६६८३२६९६२ मुद्रक कॉम्प-प्रिंट कल्पना प्रा. लि. अक्षरजुळणी अमोघ आर्ट्स मुखपृष्ठ श्याम देशपांडे सर्व हक्क सुरक्षित © भानू काळे आवृत्ती पहिली : ५ डिसेंबर २०१६ आवृत्ती दुसरी : ३ सप्टेंबर २०१७ किंमत : ६०० रुपये या पुस्तकासाठी प्राज फाउंडेशनकडून आंशिक अर्थसहाय्य मिळाले आहे.
जिवाची बाजी लावून लढलेल्या
असंख्य ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांस कृतज्ञतापूर्वक
जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे. प्रकृती आणि
मनुष्य एकत्र आल्यानंतर तो निर्माण झाला.
पंचमहाभूतांच्या लक्षावधी वर्षांच्या साठलेल्या ऊर्जा
माणसाच्या श्रमांचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला येतात.
एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीतच होतो.
ज्या दिवशी हे लक्षात आले, त्या दिवसापासून शेतीमध्ये तयार
झालेली ही बचत लुटून न्यायला सुरुवात झाली. आजपर्यंतच्या
इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार लुटण्याची
आहे.
प्रास्ताविक | ११ | |
१. | शिक्षणयात्रा | १७ |
सातारा येथे ३ सप्टेंबर १९३५ रोजी जन्म... वडील व त्यांची पोस्टातील नोकरी... आईचे व्यक्तिमत्त्व... बेळगाव, नाशिक, मुंबई... भावंडे... संस्कृतची आवड... सिडनम कॉलेजात प्रवेश... 'हरियाली' सोडून 'पथरीला' रस्ता निवडणे... तेथील प्राध्यापक... एमकॉम उत्तीर्ण... दोन स्वभाववैशिष्ट्ये. | ||
२. | व्यावसायिक जगात | ४० |
कोल्हापूरच्या कॉलेजातील अध्यापन... स्पर्धापरीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी यश... ऑगस्ट १९५८, पोस्टात नोकरी सुरू... २५ जून १९६१, लीला कोनकर यांच्याशी लग्न... श्रेया व गौरी यांचा जन्म... फ्रान्सला जायची शिष्यवृत्ती... सरकारी नोकरीचा राजीनामा... १ मे १९६८, स्वित्झर्लंड येथील नोकरी सुरू. | ||
३. | डोंगरकुशीतल्या नंदनवनात | ५९ |
स्वित्झर्लंडमधील ऐश्वर्यपूर्ण जीवन... शेजारी व कार्यालयातील सहकारी टोनी डेर होवसेपियां... तेथील दिनक्रम... युपीयुमधील आठ वर्षांच्या नोकरीतले अनुभव व एकूण असमाधान... युएनच्या कामातील वैयर्थ्य... स्वित्झर्लंडचे संस्कार... भारतात परतायचा निर्धार. | ||
४. | मातीत पाय रोवताना | ८४ |
१ मे १९७६. भारतात परत... पुण्यात घर... चाकणजवळ कोरडवाहू शेतीला सुरुवात... अकरा भूमीपुत्र संघटना... काकडीची पहिली शेती... 'उलटी पट्टी'चा अनुभव... सगळी पुंजी पणाला... शेतीमालाला अत्यल्प भाव... लीला जोशींची पोल्ट्री... असंख्य अडचणी... इंडिया विरुद्ध भारत. | ||
५. | चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी | १११ |
बाजारपेठेचा अभ्यास... कांद्याचा भाव कोसळला... चिडलेले शेतकरी... नाफेडतर्फे खरेदी सुरू...८ ऑगस्ट १९७९, शेतकरी संघटना सुरू... वारकरी साप्ताहिक... चाकण ते वांद्रे रस्त्यासाठी २६ जानेवारीचा मोर्चा... पहिले रास्ता रोको... पहिले उपोषण... पहिली अटक... कांदा आंदोलनाचे महत्त्व. |
६. | उसाचे रणकंदन | १४२ |
आळंदी शिबिर... मोरे-कराड-जोशी, ऊस आंदोलनातील त्रिमूर्ती... १० नोव्हेंबर १९८०, रास्ता रोको सुरू... रेल रोको... पोलिसांचा अघोरी लाठीमार... खेरवाडी गोळीबार... तीनशेचा भाव मंजूर... घुमरेवकिलांचे सहाय्य... एकूण ३१,००० शेतकऱ्यांना अटक... एक ऐतिहासिक विक्रम. | ||
७. | धुमसता तंबाखू | १६६ |
निपाणीतील तंबाखू लागवड... व्यापाऱ्यांची दहशत... महिला कामगार... शरद जोशी निपाणीत... बीबीसीची टीम दाखल... रास्ता रोको सुरू...आंदोलननगरी... गुढी पाडवा साजरा... ६ एप्रिल १९८१... पोलिसांचा गोळीबार... मराठी-कानडी शेतकऱ्यांची एकजूट... महाराष्ट्राबाहेर प्रथमच. | ||
८. | पांढरे सोने, लाल कापूस | १८९ |
कापसाची विदर्भातील शेती... १९८१मधला विदर्भातील पहिला दौरा... एकाधिकार योजना... राजीवस्त्रविरोधी आंदोलन... सुरेगाव गोळीबार... १२ डिसेंबर १९८६. सेवाग्राम रेल रोको... १४ डिसेंबर १९९५, कापूस झोन बंदीविरुद्ध आंदोलन... शेतकरी आत्महत्या... संघटनेला भरपूर पाठिंबा. | ||
९. | शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी | २१८ |
आळंदी, वर्धा व अंबाजोगाई येथील प्रशिक्षण शिबिरे... पूर्वसुरींचे ऋण... शेतीचा इतिहास... रामदेवरायाचे कोडे... औद्योगिक क्रांती... वसाहती स्वतंत्र. पण लूट चालूच... एक-कलमी कार्यक्रम... क्षुद्रवाद नको... प्रतिष्ठेसाठी आंदोलन नाही... भीक नको, हवे घामाचे दाम... भक्कम विचार हा पाया. | ||
१०. | अटकेपार | २५१ |
शरद पवारांच्या हस्ते मुंबईतील सत्कार... पंजाबमधील लोकप्रियता... भूपिंदर सिंग मान... हरित क्रांतीच्या मर्यादा... खन्ना येथील बैठक... १२ मार्च १९८४, चंडीगढ़ आंदोलन... हिंदू-शीख ऐक्य...राजभवनला घातलेला वेढा... स्वामिनाथन अय्यर... अटकेपार घेतलेली उडी. |
११. | किसानांच्या बाया आम्ही | २७९ |
स्त्री-प्रश्नाचा शोध... १९८६ चांदवड अधिवेशन... तीन लाख स्त्रिया हजर... दारूदुकानबंदी आंदोलन... स्थानिक निवडणुकांमध्ये १००% महिला पॅनेल... लक्ष्मीमुक्ती अभियान... सांता मंदिर...दोन लाख महिलांचे नाव सात बाराच्या उताऱ्यावर प्रथमच... विचारवंतांनी फारशी दखल न घेतलेले यश. | ||
१२. | राजकारणाच्या पटावर | ३१३ |
राजकारणविरहितता... भूमिकेत हळूहळू फरक... टेहेरे सभा... राजकीय भूमिकेची पाच सूत्रे.... पुणे बैठक... शरद पवार यांना पाठिंबा... पण पुढे ते काँग्रेसमध्ये... दत्ता सामंत... प्रकाश आंबेडकर... व्ही. पी. सिंग यांच्याशी मैत्री... १९९० निवडणुका, पाच उमेदवार विजयी... पराभवाचे विश्लेषण. | ||
१३. | राष्ट्रीय मंचावर जाताना | ३४६ |
भारतीय किसान युनियन... महेंद्र सिंग टिकैत. २ ऑक्टोबर १९८९, बोट क्लबवरचा मेळावा... गुजरातमधील काम... शेतकरीनेते एकत्र येण्यातल्या अडचणी... कृषी सल्लागार समिती.... कर्जमुक्ती आंदोलन... कृषी कार्य बलाचे अध्यक्षपद... राज्यसभा सदस्यत्व...जागतिक कृषी मंच. | ||
१४. | सहकारी आणि टीकाकार | ३७४ |
चाकण... उस आंदोलन... निपाणी... कापूस आंदोलन... महिला आंदोलन... लीलाताई जोशींचे निधन... शेवटच्या दिवसांतील सहकारी ... टीकाकार... वेगळी मांडणी नाही... वैयक्तिक चारित्र्य अविवाद्य... 'साहेबांनी आम्हाला त्यांचे अर्जुन मानले नाही, पण आम्ही त्यांचे एकलव्य जरूर आहोत.' | ||
१५. | अंगाराकडून ज्योतीकडे : शोध नव्या दिशांचा | ४०८ |
जुलै १९९१... डंकेल प्रस्ताव... खुल्या अर्थव्यवस्थेला पाठिंबा... खुंटलेल्या जुन्या वाटा... ठिणगीने काम केले, आता ज्योत हवी... चतुरंग शेती... शेतकरी सॉल्व्हंट... शिवार ॲग्रो... भामा कन्स्ट्रक्शन... ६.११.१९९४ स्वतंत्र भारत पक्ष स्थापन... जाहीरनाम्यातील मूलगामी मांडणी... घरातला राजाजींचा फोटो. |
१६. | साहित्य आणि विचार | ४३२ |
वाचनाची आवड... स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव... वाचनाला चिंतनाची जोड... शेतीचे उदात्तीकरण नाही... जग बदलणारी पुस्तके... अंगारमळा... विचारविश्व ... पाच वैशिष्ट्ये... जातिधर्मप्रांतनिरपेक्षता... अर्थवाद, शेती एक व्यवसाय... खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन ... तंत्रज्ञानस्वीकार... स्वाभिमान. | ||
१७. | सांजपर्व | ४६२ |
नर्मदा परिक्रमा... या चरित्रात रुची कशामुळे होती... 'संघटक'मध्ये मदतीचे आवाहन... सिंहावलोकन करताना... सत्तेच्या फायद्यांपासून वंचित... 'सलगी दाखवणे मला कधीच जमले नाही.'... श्रेयविहीनतेचे भान... मूलत: विचारवंत... १२ डिसेंबरला २०१५ रोजी निधन... स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वाधिक लोकसहभाग लाभलेले आंदोलन... जोशींनी आम्हांला काय दिले? |
परिशिष्ट १ : शरद जोशी जीवनपट : शंभर प्रमुख घटना | ४९७ |
परिशिष्ट २ : शेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम | ५०३ |
परिशिष्ट ३ : शरद जोशी यांची ग्रंथसंपदा | ५०५ |
परिशिष्ट ४ : शेतकरी आंदोलनातील हुतात्मे | ५०७ |
परिशिष्ट ५ : शेतकरी संघटनेची शपथ | ५०९ |
शरद जोशी आणि त्यांनी उभारलेली शेतकरी चळवळ हा एक अभूतपूर्व झंझावात होता.
१९८० सालच्या ऊस आंदोलनात एकट्या नाशिक जिल्ह्यात ३०,००० शेतकरी एका वेळी तुरुंगात होते, तर १९८६ सालच्या कापूस आंदोलनात विदर्भ व मराठवाड्यात मिळून ९०,००० शेतकरी एका वेळी तुरुंगात होते. लोकांचा इतका प्रचंड सहभाग लाभलेली चळवळ स्वातंत्र्योत्तर भारतात दुसरी कुठलीच झालेली नाही.
असे असूनही ह्या झंझावाताची योग्य ती नोंद बुद्धिजीवींच्या वर्तुळात घेतली गेलेली नाही. जोशींचे समग्र असे जीवनचरित्रही उपलब्ध नाही. ती उणीव भरून काढण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे ही ह्या चरित्रामागची पहिली प्रेरणा आहे.
त्याचबरोबर जोशींनी मांडणी केलेले अनेक प्रश्न आजही आपल्यासमोर उभे आहेत; मग तो प्रश्न शेतीच्या भवितव्याचा प्रश्न असो अथवा समाजातील वाढती विषमता अधोरेखित करणाऱ्या 'इंडिया' विरुद्ध 'भारत' या द्वंद्वाचा असो. जोशींचा वैचारिक वारसा आणि त्यांचा एकूणच जीवनसंघर्ष या प्रश्नांना सामोरे जाताना आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकेल व म्हणून तो वाचकांपुढे आणणे ही ह्या चरित्रलेखनामागची दुसरी प्रेरणा आहे.
शरद जोशी व त्यांचे शेतकरी आंदोलन यांच्याशी माझा परिचय तसा उशिरा झाला. आयुष्यातील पहिली ४१ वर्षे माझे वास्तव्य मुंबईत झाले आणि आचार्य अत्रे, जॉर्ज फर्नाडिस किंवा बाळासाहेब ठाकरे हे ज्या अर्थाने मुंबईकरांचे 'हिरो' बनले, त्या अर्थाने कधी मुंबईने जोशींची कदर केली नव्हती. जेव्हा माणूस साप्ताहिकामधून विजय परुळकरांची योद्धा शेतकरी ही मालिका प्रकाशित होत होती, तेव्हा ती आम्ही वाचत असू, नाही असे नाही; पण त्यापूर्वी काही वर्षे वि. ग. कानिटकर यांची नाझी भस्मासुराचा उदयास्त ही मालिका जेव्हा 'माणूस'मधून प्रकाशित होत होती, तेव्हा तिची आम्ही जशी विलक्षण आतुरतेने वाट बघायचो, तसे 'योद्धा शेतकरी'च्या बाबतीत होत नव्हते. जवळच्या जोशींपेक्षा दूरचा हिटलर शहरी मध्यमवर्गाला अधिक रोचक वाटत होता हे दुर्दैवी असले तरी सत्य होते. वृत्तपत्रे वाचून मनावर ठसणारी जोशींची अधीमुर्धी प्रतिमाही ते बड्या शेतकऱ्यांचे, म्हणजेच कुलक या वर्गाचे नेते आहेत अशी व म्हणून बहूंशी नकारात्मकच होती.
पुढे पुण्यात आल्यावर आणि अंतर्नाद मासिक सुरू केल्यावर आमची पहिली भेट झाली व तेव्हाच ती प्रतिमा हळूहळू बदलू लागली. त्या भेटीचे कारण होते १९९९च्या अंतर्नाद दिवाळी अंकातील बस करा हे समाजसेवेचे ढोंग! हा त्यांचा प्रक्षोभक ठरलेला प्रदीर्घ लेख. पुण्यातल्या सेनापती बापट रोडवरील बिना अपार्टमेंट्स'मध्ये ते तेव्हा राहत होते. तिथेच आमच्या दोन-तीन प्रदीर्घ मुलाखती झाल्या. त्यांच्या आधारे, व त्यांनी दिलेल्या त्यांच्या इतर साहित्याच्या आधारे, मी त्या लेखाचे शब्दांकन केले होते - विचार अर्थातच त्यांचेच होते व लेख छापण्यापूर्वी त्यांनी तो तपासून आणि थोडाफार बदलूनही दिला होता. पुढे फेब्रुवारी २००७च्या अंतर्नादमध्ये 'समाजसेवेची दुकानदारी नको!' या शीर्षकाखाली, त्यांनी केलेल्या आणखी काही बदलांसह व टीका थोडीशी सौम्य करून, तो पुनर्मुद्रितही झाला.
त्यानंतरही आमच्या भेटी अधूनमधून होत राहिल्या – प्रत्येक भेट पुनर्भेटीची ओढ लावणारी होती. त्यांच्यावर काहीतरी लिहावे असे खूपदा वाटले; पण प्रत्येक वेळी जाणवले, की हा तर एखाद्या कादंबरीचा विषय आहे; लेखात तो कसा हाताळणार? पण एखाद्या जीवित व्यक्तीवर कादंबरी लिहिणे तसे अवघडच! चरित्र लिहावे म्हटले तर त्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकेन असे वाटत नव्हते. ३ सप्टेंबर २००९ रोजी ते पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करणार होते व त्याचा उल्लेख त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या बोलण्यात झाला होता. त्या निमित्ताने मग त्यांच्यावर अंतर्नादचा एखादा विशेषांकच काढावा असे ठरले व मग त्या अंकासाठी मीही एक लेख लिहायचे ठरवले.
त्या अंकाच्या पूर्वतयारीसाठी म्हणून मुद्दाम आंबेठाण येथील अंगारमळ्यात जाऊन आलो. ते जोशींचे अधिकृत निवासस्थान आणि शेतकरी संघटनेचे मुख्य कार्यालय. तिथे जायचा तो पहिलाच प्रसंग. आंबेठाणला जाण्यासाठी चाकण बसस्टँडवर उतरावे लागते. संघटनेचे पहिले आंदोलन तीस वर्षांपूर्वी इथेच लढवले गेले. त्या दिवशी मात्र त्या क्रांतिकारी आंदोलनाची कुठलीही खूण त्या परिसरात दिसली नाही.
अंगारमळ्यात पोहोचल्यावर बघितले तर अगदी शुकशुकाट होता – जिथे शूटिंग होणे केव्हाच बंद झाले आहे अशा एखाद्या मुंबईतल्या जुनाट स्टुडिओत असावा तसा. राज्यसभा सदस्य असल्याने जोशींचा मुक्काम तेव्हा बहुतेक वेळ दिल्लीतच असायचा. त्यांचे एक निकटचे सहकारी प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे तिथेच एका खोलीत राहत होते; आजही तीच परिस्थिती आहे. बबन शेलार हे जोशींचे सारथी-सचिव-सहकारीदेखील तिथेच एका आउटहाउससारख्या जागेत आपल्या कुटुंबीयांसह राहत होते; पण मी गेलो तेव्हा ते तिथे नव्हते. एका नि:शब्द उदासीचे सावट अंगारमळ्यावर जाणवत होते. एकेकाळी इथून सुरू झालेल्या आणि बघता बघता लक्षावधी लोकांना आपल्या कवेत घेणाऱ्या शरद जोशी नामक वादळाचे ते विस्मृतीच्या अथांग पोकळीत विरून जायच्या आत शब्दांकन व्हायला हवे, ही जाणीव त्या क्षणी मला प्रकर्षाने झाली.
आंदोलनाच्या साऱ्या मंतरलेल्या दिवसांचे म्हात्रे साक्षीदार होते व जोशींची निवासाची खोली, त्यांचा ग्रंथसंग्रह, एकेकाळच्या लीलाताईंच्या पोल्ट्रीत थाटलेली प्रबोधिनीची शिबिरे घ्यायची जागा, भिंतींवरची पोस्टर्स, फोटो वगैरे सगळा इतिहास - खरे तर अवशेष - ते दाखवत होते; भूतकाळ जिवंत करत होते. अंतर्नादसाठी कोणाकोणाकडून लेख मागवावे याचीही नंतर चर्चा झाली. म्हात्रेनी सुचवलेली नावेच नक्की केली. विद्युत भागवत आणि इंद्रजित भालेराव यांनी लगेच होकार दिला व त्यांचे लेखही लौकरच मिळाले. विनय हर्डीकर यांनी मात्र नकार दिला; स्वतःऐवजी राजीव बसर्गेकर यांचे नाव त्यांनी सुचवले व पुढे बसर्गेकरांचा लेख मिळालाही.
२७ जून २००९ रोजी त्या लेखाला अंतिम रूप देण्यापूर्वी काही शंकांचे निरसन करावे, म्हणून जोशींची एक विशेष भेट घेतली. माझ्याच विनंतीला मान देऊन ते आमच्या घरी आले होते. सकाळी त्यांच्या एका शाळकरी मित्राच्या घरचे लग्नकार्य होते आणि संध्याकाळी डॉक्टरची अपॉइंटमेंट, "आता हे मधले पाच-सहा तास मी अगदी पूर्ण मोकळा आहे. विचारा काय ते," औपचारिक गप्पा संपताच त्यांनी सुरुवात केली. त्या प्रदीर्घ भेटीत आम्ही खरे जवळ आलो. परिणामतः तो राजहंस एक या शीर्षकाचा तो लेख बराच मोठा झाला.
ऑक्टोबर २००९च्या त्या शरद जोशी विशेषांकाचे प्रकाशन २५ सप्टेंबर रोजी पुण्यातल्या एसेम जोशी हॉलमध्ये पार पडले. सभागृह तुडुंब भरले होते. त्या प्रसंगी रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही केला गेला. (आमचे शेजारी बद्रीनाथ देवकर म्हणजे रावसाहेब शिंदे यांचे जावई आणि शरद जोशींचे अगदी राम-हनुमान शोभावे इतके परमभक्त - ह्या दोन मोठ्या व्यक्तींशी आम्हांला जोडणारा हा दुवा.) समारंभाच्या शेवटी शेतकरी आंदोलनाचे प्रथमपासून साक्षीदार असलेले व 'साप्ताहिक सकाळ'चे संपादक म्हणून नुकतेच निवृत्त झालेले सदा डुंबरे यांनी त्यांची प्रकट मुलाखतही घेतली. मुलाखतीच्या शेवटी जोशींनी काहीसा दुःखद सूर लावला होता. त्यांचे शेवटचे वाक्य होते – “This is my private hell. But I must tell you, I am so proud of my private hell.” त्या एका प्रसिद्ध अमेरिकन गाण्यातील ओळींत त्यांची त्यावेळची एकूण मनःस्थिती प्रतिबिंबित झाली असावी. मुलाखतीचा तो शेवट मनाला चटका लावून गेला.
अंतर्नादने काढलेल्या विशेषांकाबद्दल जोशींना समाधान वाटले होते. अंकाबद्दलच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्यापाशी येत होत्या. “यामुळे मी चांगल्या वाचकांच्या एका वर्तुळात गेलो. तुमच्यासारख्या राजवाड्यांची आम्ही वाटच पाहत होतो," असे ते मला म्हणाले. ते ऐकून खरे तर मला धक्काच बसला. कारण त्यापूर्वी कधीही त्यांनी माझी किंवा अंतर्नादची एका शब्दानेही स्तुती केली नव्हती; कधीच काही कुतूहलही दाखवले नव्हते. योगायोगाने त्याच वर्षी त्यांच्या अंगारमळा पुस्तकाला राज्यशासनाचा आत्मकथन विभागासाठीचा प्रथम पुरस्कार मिळाला. इतरही काही पुरस्कार लगोलग मिळाले. पुढच्याच वर्षी त्यांना चतुरंग ह्या मुंबईतील प्रख्यात सांस्कृतिक संस्थेचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला.
दरम्यान त्यांचे चरित्र लिहायचा विचार पिच्छा सोडेना. त्यांच्या स्वत:च्या लेखनात त्यांचे अथपासून इतिपर्यंतचे चरित्र असे कुठेच उभे राहत नव्हते; इतरही कोणी तसे चरित्र लिहिलेले नसल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांनी जे कार्य केले, ते खूप ऐतिहासिक महत्त्वाचे आहे याची एव्हाना खात्री पटली होती, पण तरीही त्यांच्याविषयी पुरेशी माहिती अनेक विचारवंतांना नाही हेही जाणवत होते. Everybody loves a good drought हे मॅगसेसे पुरस्कारप्राप्त पी. साईनाथ यांचे गाजलेले पुस्तक मुख्यतः भारतीय शेतकऱ्याच्या दुर्दशेबद्दल आहे. पण १९९६ साली प्रकाशित झालेल्या या ४७० पानी पुस्तकात याच क्षेत्रात आपले सर्वस्व ओतून अनेक वर्षे काम करणारे शरद जोशी आणि शेतकरी आंदोलन यांच्याविषयी काहीही नाही. India after Gandhi या रामचंद्र गुहा यांच्या सुप्रसिद्ध पुस्तकातही जोशी व त्यांचे शेतकरी आंदोलन यांची अवघ्या आठ ओळींत बोळवण केलेली आहे व तीही महेंद्रसिंग टिकैत यांच्यासह त्यांना एकत्र गुंफून. ती अगदी अन्यायकारक आहे असे मला वाटले. आपल्या या बहुचर्चित ८९८ पानी ग्रंथात गुहांनी काढलेला निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे : जोशी आणि टिकैत या दोघांचाही आपण ग्रामीण जनतेसाठी बोलत आहोत असा दावा होता. वस्तुतः ते दोघेही ट्रॅक्टर आणि विजेचे पंप वापरणाऱ्या मध्यम व सधन शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते. गरीब शेतकरी त्यांच्या कक्षेत नव्हतेच. (गांधीनंतरचा भारत, मराठी अनुवाद : शारदा साठे, मॅजेस्टिक प्रकाशन, मार्च २०११, पृष्ठ ६८४) शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या असंख्य शेतकऱ्यांना मी स्वतः भेटलो होतो. त्यांच्यापैकी अगदी क्वचितच कोणी टॅक्टर बाळगणारे होते. गहांच्या पुस्तकातील मजकूर उघड उघड चुकीचा होता. अशाच स्वरूपाच्या उल्लेखांनी, किंवा अनुल्लेखांनी, जर भावी पिढ्यांसाठी इतिहास लिहिला जाणार असेल, तर तो सत्याचा मोठा विपर्यास असणार होता.
अशा गैरसमजांची कारणे अनेक असणार, पण त्यांतील एक मोठे कारण म्हणजे शरद जोशींच्या जीवनाचे व एकूणच शेतकरी संघटनेच्या इतिहासाचे समग्र व विश्वासार्ह दस्तावेजीकरण करणाऱ्या पुस्तकाचा अभाव. त्यांचे चरित्र जाणून घ्यावे असे ज्यांना वाटेल त्यांच्यासाठी तो पर्याय उपलब्ध व्हायला हवा या भूमिकेतून मी हे चरित्र लिहायला प्रवृत्त झालो.
यावर चार-पाच वेळा झालेल्या चर्चेत जोशींनी सुचवल्याप्रमाणे मी त्यांना २१ मे २०१२ रोजी चरित्रलेखनाचा एक तीन-पानी प्रस्ताव दिला व त्यावर विस्ताराने चर्चा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या देवी ऑर्किंडमधल्या फ्लॅटवर प्रमुख सहकाऱ्यांची बैठकही बोलावली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली बैठक जेवणानंतर संपली. शैलजा देशपांडे, गुणवंत पाटील हंगरगेकर, अजित नरदे, श्रीकांत अनंत उमरीकर, डॉ. मानवेंद्र काचोळे, अनंत गणेश देशपांडे, संजय सुरेंद्र कोले, वामनराव चटप, रवी देवांग, जगदीश ज. बोंडे, अनिल ज. धनवट, सुरेशचंद्र म्हात्रे, दर्शिनी भट्टजी, बद्रीनाथ देवकर (ज्यांचे नाव पुढे प्रकल्प समन्वयक म्हणून छापले गेले) आणि इतरही काही प्रमुख सहकारी हजर होते. जोशींच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येकाला प्रस्तावाची प्रत दिली व बैठकीत चर्चाही झाली. ह्या प्रकल्पात त्या सगळ्यांचा सहभाग जोशींना हवा होता. जोशींनी आणखी एक केले. शेतकरी संघटक या संघटनेच्या मुखपत्राच्या पुढच्याच, म्हणजे, ६ जून २०१२च्या अंकात ह्या संकल्पित चरित्राविषयी एक पूर्ण पान निवेदन त्यांनी प्रसिद्ध करवले. त्यात एकूण चरित्रप्रकल्पाची माहिती होती व सर्वांनी त्यात सहकार्य द्यावे असे कार्यकारिणीसदस्यांच्या नावाने एक आवाहनही होते. त्यामुळे उपरोक्त सहकाऱ्यांप्रमाणे जागोजागी विखुरलेल्या त्यांच्या इतरही सहकाऱ्यांचे हार्दिक सहकार्य मिळाले. अनेकांनी त्यानंतर माझ्याशी संपर्क साधला व स्वतःजवळची शक्य ती माहिती पुरवली.
ह्या चरित्रासाठी जोशींनी खूप वेळदेखील दिला. यापूर्वीच्या धावपळीच्या आयुष्यात ते जमले असते असे वाटत नाही. त्या काळात शेतकरी लढ्यांमध्ये जोशींचा प्रत्यक्ष सहभाग असा फारसा राहिला नव्हता; महत्त्वाच्या सभांना ते हजर राहत, आपले विचार मांडत, मार्गदर्शन करत, एवढेच. बहुधा त्यामुळेच ते चरित्रासाठी पुरेसा वेळ देऊ शकले, न कंटाळता निवांतपणे जुन्या आठवणी सांगू शकले, शक्य तेव्हा मी बरोबर प्रवासात यावे अशी व्यवस्था करू शकले. तसे करताना शेतकरी चळवळीच्या बाहेरचा एक माणूस म्हणून मला खूपदा अवघडल्यासारखे वाटे, कारण आमच्यातील तशा प्रकारच्या जवळीकीमुळे त्यांच्या जुन्या निष्ठावान सहकाऱ्यांना काय वाटू शकेल असा विचार मनात यायचा; पण जोशींचे आमंत्रण आग्रहाचे असे.
दर शुक्रवारी सकाळी दहा वाजता आम्ही भेटायचो. दोन-तीन तास बोलणे व्हायचे. प्रत्यक्षात काम खूपच लांबत गेले. एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे फारशी काही मूळ कागदपत्रे नव्हती आणि पूर्ण शहानिशा करून घेतल्याशिवाय कुठलाही मजकूर मला चरित्रात घ्यायचा नव्हता. 'एकदा उद्वेगाच्या भरात त्यांनी त्यांचे बरेचसे व्यक्तिगत कागदपत्र नष्ट केले,' असे नंतर मला म्हात्रेनी सांगितले. अशा परिस्थितीत चाकणपासून स्वित्झर्लंडपर्यंत आणि निपाणीपासून चंडीगढपर्यंत विखुरलेल्या त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी माझे आपल्या घरात आणि भावविश्वात स्वागत केले, आपला किमती वेळ दिला, आपल्याजवळचे कागदपत्र दिले, कडूगोड आठवणी सांगितल्या व या साऱ्या अमूल्य सहकार्यामुळेच पूर्वी कधीच लोकांसमोर न आलेली बरीच माहिती उजेडात आली आणि एकूणच ह्या लेखनाला स्मरणरंजनाच्या पलीकडे जाणाऱ्या दस्तावेजाचे स्वरूप देता आले.
शरद जोशींनी ज्यांना ह्या चरित्रासाठी प्रकल्प समन्वयक म्हणून नेमले होते त्या बद्रीनाथ देवकर यांचाही उल्लेख इथे करणे अपरिहार्य आहे; त्यांच्याबरोबर इतक्या ठिकाणी फिरलो आणि इतक्या साऱ्या लोकांशी त्यांनी माझी भेट घडवून आणली, की त्या साऱ्यांचा उल्लेख करणेही अवघड आहे. आपली सगळी इतर व्यक्तिगत कामे बाजूला सारून त्यांनी यासाठी वेळ दिला. अनंतराव देशपांडे यांचेही इथे आभार मानायला हवेत; अनेक भेटींचे आयोजन त्यांनी केले होते. महाराष्ट्राबाहेरील सहकाऱ्यांबद्दल लिहायचे तर स्वित्झर्लंड येथील बर्नमधले जोशींचे एकेकाळचे शेजारी आणि कार्यालयातील सहकारी टोनी डेर होवसेपियां, पंजाबातील बटाला येथील शेतकरीनेते व जोशींचे निकटचे स्नेही भूपिंदर सिंग मान, कर्नाटकातल्या निपाणी येथील तंबाखू आंदोलनातील सहकारी प्रा. सुभाष जोशी, कर्नाटक रयत संघाचे बंगलोरस्थित हेमंत कुमार पांचाल आणि सुरतमधील बांधकाम व्यावसायिक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते परिमल देसाई यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. शरद जोशी यांच्या कॅनडास्थित कन्या सौ. श्रेया शहाणे यांचेही आभार. आमच्या दोन भेटींमध्ये त्यांनी दिलेली माहिती बरीच उपयुक्त होती. पुस्तकासाठी ज्यांनी आर्थिक सहाय्य दिले त्या प्रमोद चौधरी यांचे व त्यांच्या प्राज फाऊंडेशनचे आभार मानतो.
पुस्तकाची सर्व मुद्रिते, वयपरत्वे येणाऱ्या अडचणींवर मात करून, ज्यांनी खूप आपलकीने तपासन दिली त्या अंतर्नादच्या व्याकरण सल्लागार प्रा. यास्मिन शेख यांनाही मनापासून धन्यवाद. अक्षरजुळणीकार हरिश घाटपांडे, मुखपृष्ठकार श्याम देशपांडे, मुद्रक आनंद लाटकर आणि या साऱ्यांचे कुशल सहकारी यांचेही आभार मानायला हवेत.
ऋणनिर्देशाची ही यादी खरे तर खूपच लांब होईल. कितीही नावे घेतली तरी काही वगळली जायची शक्यता आहेच. प्रत्यक्ष नामोल्लेख केला नाही तरीही त्या साऱ्यांविषयी मनात कृतज्ञभाव आहेच. त्यांच्याविना हे चरित्र लिहूनच झाले नसते असे म्हटले, तरी त्यात अतिशयोक्ती होणार नाही.
वाचकांच्या हाती हे चरित्र देताना लेखकाची मनःस्थिती काहीशी संमिश्र आहे. हे काम व्हावे अशी ज्यांची खूप इच्छा होती, ते चरित्रनायक शरद जोशी आज आपल्यात नाहीत याची बोचरी खंत मनात आहे आणि त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांतील बहुतेक वेळ ज्या प्रकल्पासाठी दिला त्याला मूर्त रूप लाभले याचे समाधानही आहे.
शरद जोशींसारखा एक अनन्यसाधारण कृतिशील विचारवंत आपल्यात होऊन गेला. त्यांचा जीवनपट आणि त्यांचा वैचारिक वारसा ह्या चरित्रातून वाचकांपुढे अल्पस्वल्प जरी साकार झाला तरी हे श्रम सार्थकी लागले असे म्हणता येईल. आपल्या टेबलावरचे रोजचे जेवणाचे ताट ज्याच्या श्रमांतून येते त्या शेतकऱ्याचे विश्न, त्याच्या अडचणी, त्याचे संघर्ष, त्याच्या आशा, त्याच्या निराशा ह्यांची थोडीफार ओळख ह्या चरित्रलेखनातून लेखकाला झाली आणि तशीच ती या चरित्रवाचनातून वाचकालाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो.
- भानू काळे
◼
'शेतकऱ्यांचे पंचप्राण' म्हणून ज्यांची पुढे ख्याती झाली त्या शरद अनंत जोशी यांचा जन्म ३ सप्टेंबर १९३५ रोजी झाला. शनिवार पेठ, सातारा येथे. पण एक आश्चर्य म्हणजे त्यांच्या, किंवा त्यांच्याविषयीच्या, प्रकाशित लेखनात ते सातारा येथे जन्मले ह्याची कुठेच नोंद नाही. खूप वर्षांनंतर, ९ जानेवारी २०१० रोजी, त्यांना तेथील रा. ना. गोडबोले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साताऱ्यात जन्मलेल्या व लोकोत्तर कार्य केलेल्या एखाद्या व्यक्तीला दिला जाणारा साताराभूषण पुरस्कार मिळाला, तेव्हाच बहुतेकांना कळले, की साताऱ्याशी त्यांचे असे काही जवळचे नाते आहे. याचे एक कारण कदाचित हे असावे, की त्यांचे वडील अनंत नारायण जोशी हे पोस्टात नोकरीला होते व त्यामुळे त्यांच्या बऱ्याच बदल्या होत असत. विशेषतः सुरुवातीच्या काळात. पुढे ह्या बदल्यांची वारंवारिता कमी झाली.
अनंतरावांचा जन्म १९०५ सालचा. ते चार-पाच वर्षांचे असतानाच त्यांचे आईवडील वारले. घरची आत्यंतिक गरिबी होतीच, त्यात आता आणखी अनाथाचे जिणे नशिबी आले. आधार कोणाचाच नव्हता. माधुकरी मागून आणि घरोघर वारावर जेवूनच त्यांचे शिक्षण झाले. कोल्हापूर येथील एका ख्रिश्चन मिशनरी शाळेत. त्यामुळे त्यांच्या मनावर ख्रिस्ती शिकवणुकीचा बराच प्रभाव पडला होता. पुढे शरद जोशी यांच्या एका कथेवर त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती, तिच्यावरून त्यांच्या स्वभावावर थोडासा प्रकाश पडतो.
कॉलेजात शिकत असताना शरद जोशींनी ती कथा लिहिली होती व त्यावेळच्या एका चांगल्या मासिकात ती प्रसिद्धही झाली होती. त्या कथेत मुंबईतला एक तरुण लोकल गाडीखाली सापडून मरतो व त्याचे प्रेत त्याच्या घरी आणले जाते. चाळीतली सर्व मंडळी अवतीभवती गोळा होतात. त्यांच्यात एक विधवा असते. त्या तरुणाच्या शेजारीच राहणारी. प्रेत बघितल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर काय काय प्रतिक्रिया उमटल्या व विशेषतः त्या विधवेच्या चेहऱ्यावर काय भाव उमटला याचे वर्णन करताना त्यांनी लिहिले होते, की एखाद्या विधवा बाईला दुसऱ्या बाईचा नवरा मेल्यावर जे समाधान वाटेल, तसे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते! हे मी माझ्या खवचट स्वभावाने लिहिले होते' असेही त्यांनी नंतर नमूद केले आहे. सॉमरसेट मॉम हा त्यांचा त्यावेळचा आणि नंतरचाही आवडता लेखक. त्यावेळी जोशींनी नुकतीच कथा लिहायला सुरुवात केली होती व मॉमच्या काही कथांचा त्यांनी अनुवादही केला होता. मॉम त्याच्या इतर वैशिष्ट्यांबरोबरच मनुष्यस्वभावातील विसंगतीच्या चित्रणासाठी, चर्च व मिशनऱ्यांच्या थट्टेसाठी आणि एकूणच तुच्छतावादासाठी (सिनिसिझमसाठी) प्रसिद्ध. त्याच्याच प्रभावाखाली लिहिलेले हे वाक्य असावे. वडलांच्या वाचनात ती कथा आली व ते वाक्य त्यांना अजिबात आवडले नाही. त्यांच्या त्या वेळच्या प्रतिक्रियेविषयी जोशींनी बऱ्याच वर्षांनी (अंगारमळा, पृष्ठ ११४) लिहिले आहे,
माझे वडील अगदीच वेगळ्या पठडीतले. राग आला तर दुष्ट, कपटी, अभद्रेश्वर व राक्षस यापलीकडे पाचवी शिवी त्यांना माहीत नव्हती. माझी गोष्ट वाचून ते रागाने म्हणाले, 'मनुष्य जितका दुष्ट आहे, तितकं सगळं कागदावर लिहिण्याची काही आवश्यकता नाही.' मी मोठ्या पंचायतीत सापडलो. जे आहे, जे मला दिसतंय ते लिहायचं नाही, म्हणजे मग काय लिहायचं? मग मी हळूहळू साहित्यापासून दूर जायला लागलो.
अनंतराव पोस्टात साधे कारकून म्हणूनच लागले होते. 'एकदा माणूस पोस्टात लागला की निवृत्त होईपर्यंत तिथेच चिकटतो' असे गमतीने म्हटले जाई. अनंतरावांच्या बाबतीतही ते खरेच ठरले. ह्या नोकरीत पगार तसा बेताचाच असायचा; शिवाय पदरी चार मुलगे व दोन मुली. त्यामुळे तसा ओढाताणीचाच संसार. वडलांना खास आवडीनिवडी अशा फारशा नव्हत्या. सामाजिक जीवनातही त्यांचा काही सहभाग नसे. त्या काळातील बहुसंख्य सरकारी नोकरांप्रमाणे आपण बरे की आपली नोकरी बरी अशीच एकूण त्यांची वृत्ती असावी.
जोशींच्या आईचे नाव इंदिरा. त्यांचा जन्म १ जुलै १९११ रोजी झाला. त्या मूळच्या पंढरपूरच्या. माहेरच्या आपटे. वर देशस्थ-वधू कोकणस्थ असा, आज काहीच विशेष नसलेला पण पाऊणशे वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रात पुरोगामी मानला जाणारा त्यांचा विवाह. वडलांना मुले 'काका' म्हणत, तर आईला 'माई'.
आपल्या वडलांबद्दल जोशींनी फारसे कुठे लिहिलेले नाही, ते वारलेही तसे लौकर; पण आईबद्दल मात्र त्यांनी काही ठिकाणी उत्कटतेने लिहिले आहे. त्या पंढरपूरच्या असूनही त्यांच्या घरची मंडळी वागण्यात फारशी धार्मिक वा कर्मकांड पाळणारी नव्हती. शिवाय, इंदिराबाई कायम तेथील बडव्यांच्या विरोधात असत. ते बडवे अनीतीने वागतात, भाविकांना लुटतात, आणि विशेष म्हणजे गावात येणाऱ्या परित्यक्तांशी गैरवर्तन करतात असे बोलले जाई व त्याचा इंदिराबाईंना खूप राग असायचा. त्यांचे वडील विष्णुपंत विठ्ठल आपटे समाजसुधारक होते. १९१४ साली त्यांनी पंढरपुरात आपटे प्रशाला सुरू केली होती. पुढे उपलब हे पंढरपुरातील प्रसिद्ध उद्योजक कुटुंबही तिच्यात सहभागी झाले व आपटे-उपलब प्रशाला ह्या नावाने आजही ती शाळा चालू आहे.
आश्चर्य म्हणजे घरची शाळा असूनही इंदिराबाईंचे औपचारिक असे शालेय शिक्षण झाले नव्हते. दोन बालविधवा बहिणी घरात; त्यामुळे घरकाम खूप. घरच्या सुसंस्कृत वातावरणामुळे इंदिराबाईंना लहानपणापासूनच वाचनाचे वेड मात्र होते. अनेक कविता त्यांना पाठ होत्या. संगीताचीही आवड होती व पाठ केलेल्या कविता त्या नेहमी सुरेल आवाजात मोठ्याने म्हणत असत. पेटीही छान वाजवायच्या. त्यांची दृष्टी लहानपणापासून अधू होती; एका डोळ्याने काहीच दिसत नसे व पुढे पुढे तर दुसऱ्या डोळ्यानेही खूप पुसट दिसायला लागले. त्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी व त्यामुळे कदाचित अधिक चांगले दिसू लागेल, असे अनेकांनी सुचवूनही त्या तयार झाल्या नाहीत. “शस्त्रक्रिया करायचीच तर लहानपणीच आंधळ्या झालेल्या डोळ्यावर करा. सुधारला तर तो सुधारेल. नाहीतर मी दोन्ही डोळ्यांनी आंधळी होईन," त्या म्हणत.
हो-नाही करता करता अनेक वर्षे गेली. पुढे वय झाल्यावर मग शेवटी डॉक्टरांचेही मत 'ह्या वयात आता ऑपरेशनचा धोका नकोच' असे झाले. त्यामुळे मग ऑपरेशन टळले, पण जवळजवळ काहीच दिसेनासेही झाले. तशाही परिस्थितीत त्यांची वाचनाची आवड कायम होती. रोजचे वर्तमानपत्र अगदी डोळ्याशी नेऊन वाचायला लागले तरीही त्या वाचत. त्यांनी दोन नाटके आणि काही कथाही लिहिल्या होत्या; वृत्तपत्रांकडे त्या पत्रेही पाठवत.
अधूनमधून त्यांना कविता स्फुरायच्या व जे कोणी मूल जवळपास असेल त्याला ती कविता सुवाच्य अक्षरात लिहून द्यायचा त्या आग्रह करायच्या. बालसुलभ वृत्तीनुसार मुले ती लिहून घेण्यात टंगळमंगळ करत असत. तरीही त्या मुलांना पुनःपुन्हा विनंती करत, मुलांच्या मागे लागत. त्यांच्या काही कविता कुठे कुठे छापूनही आल्या होत्या. आपल्या कवितांचे पुस्तक निघावे अशी त्यांची इच्छा होती. 'माझं एखादं पुस्तक प्रसिद्ध कर, असा लकडा त्यांनी नंतर जोशींचे एक निकटचे सहकारी प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांच्यामागे लावला होता. आपल्या अखेरच्या दुखण्याच्या वेळी इस्पितळात असतानासुद्धा त्यांनी म्हात्रेंना त्याची आठवण करून दिली होती. पण काही ना काही कारणांनी योग येत नव्हता. त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी म्हात्रे यांच्या पुढाकारातून ती इच्छा पूर्ण झाली; त्यांच्या कवितांचा एक संग्रह ३ सप्टेंबर २०१५ रोजी, शरद जोशी यांच्या ऐंशीव्या वाढदिवशी, श्रीकांत उमरीकर यांच्या औरंगाबाद येथील जनशक्ती वाचक चळवळीने माईंच्या कविता या नावाने प्रसिद्ध केला. एक वेगळेपण म्हणजे त्या वृत्तबद्ध आहेत व त्यांतील अनेकांना इंदिराबाईंनी त्यावेळच्या प्रसिद्ध गीतांनुसार चालीही लावल्या होत्या.
१९८२ ते १९९२ या कालावधीत म्हात्रेनी इंदिराबाईंशी शक्य तेवढा संपर्क ठेवला. त्या काळात चळवळीमुळे जोशी बहुतांशी प्रवासात असत, पुण्यात येणे कारणपरत्वेच होई. म्हात्रे अधिक वरचेवर येत. आई, कशाला ग पुनः दुष्ट पावसाळा आला? या शीर्षकाची इंदिराबाईंची एक कविता कित्येक वर्षांपूर्वी साधना साप्ताहिकात प्रकाशित झाली होती. जोराच्या पावसामुळे गरिबाच्या घरात पाणी कसे शिरते, सगळ्यांचे किती हाल होतात, तो प्रश्न विचारणाऱ्या मुलाचे वडीलही अशाच पावसाळ्यात कसे वारलेले असतात वगैरे अनेक आठवणींचे चित्रण करणारी. म्हात्रेनी ती त्याचवेळी वाचली होती व प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांनी एकदा इंदिराबाईंना तिची आठवण करून दिली. इंदिराबाईंना त्याचे फार कौतुक वाटले होते. म्हात्रे पेटीही चांगली वाजवत. दोघांना जोडणारा तो आणखी एक दुवा. म्हात्रेंना त्या आपला मुलगाच मानत. म्हात्रे सांगत होते, "आपल्या शरदला हा सांभाळेल, असा विश्वास बहुधा त्यांना वाटत होता."
इंदिराबाई खूप कर्तृत्ववान व कामसू होत्या; सतत काही ना काही चालूच असायचे. बागेतला पालापाचोळा गोळा करणे, घरचे केरवारे, भांडी-धुणी, स्वैपाक वगैरे सगळी कामे त्या स्वतःच करायच्या. लहानसहान दुरुस्तीची कामेही. अधूनमधून मोलकरीण मिळायची, पण त्यांच्या कडक शिस्तीला कंटाळून ती लगेचच काम सोडून द्यायची. त्यामुळेही कदाचित त्यांना सर्व कामे स्वतः करायची सवय लागली असेल. शिवाय कुठलेही काम कसे करायचे ह्याची त्यांची एक पद्धत ठरलेली असायची व तीच पद्धत सर्वोत्तम आहे याविषयी त्यांची खात्री असायची. तसे त्या इतरांना पटवूनही द्यायच्या. कुठलेही काम दुसऱ्या कुठल्या पद्धतीने केलेले त्यांना पसंत पडत नसे. साहजिकच त्यांच्याकडे कोणी नोकर टिकत नसत. पुढे जोशींनी लिहिले आहे, "तिच्याकडे कामाला राहिलेल्या बाया, मोलकरणी यांच्याच कथा लिहायच्या म्हटल्या, तरी तो एक वाचनीय ग्रंथ होऊन जाईल."
त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्या अगदी करारी व स्वतंत्र बाण्याच्या होत्या. "शिकली असती तर माझी आई एखाद्या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टरही सहज झाली असती," असे त्यांचे सध्या नाशिकला राहणारे एक चिरंजीव प्रभाकर ऊर्फ येशू प्रस्तुत लेखकाला म्हणाले होते.
यजमान वारल्यानंतरही कुठल्याच मुलाकडे न जाता त्यांनी स्वतःच्या घरात एकट्याने राहणेच पसंत केले होते. पुण्यात प्रभात रोडवर, आताच्या आयकर कार्यालयाजवळ पतीने बांधलेल्या 'सदिच्छा' ह्या छोट्या बंगल्यात. आपल्या खासगीपणाची (पर्सनल स्पेसची) कटाक्षाने केलेली जपणूक हे एकूणच जोशी कुटुंबीयांचे एक वेगळेपण असल्याचे जाणवते. जोशी जेव्हा स्वित्झर्लंडहून सहकुटुंब भारतात परतले, तेव्हादेखील स्वतःचे वेगळे घर विकत घेईपर्यंतचे सहाएक आठवडे आईकडे न राहता ते सहकुटुंब डेक्कनवर श्रेयस हॉटेलात राहिले होते. थोरल्या भगिनी नमाताई पुढे म्हातारपणी जबलपूरहून महाराष्ट्रात स्थायिक झाल्या, तेव्हा त्यांनीही चाकणला आपले स्वतंत्र बिहाड थाटले; त्या पुण्यात भावाकडे म्हणजे शरदकडे राहायला आल्या नाहीत.
१९७० साली अनंतराव वारले. वयाच्या पासष्टाव्या वर्षी. त्यावेळी सुट्टी घेऊन जोशी स्वित्झर्लंडहून पुण्याला आले होते. परत गेल्यावर त्यांनी आईला एका पत्रात लिहिले होते : "काका गेले म्हणजे आता उरलेले आयुष्य कसेबसे काढून संपवायचे आहे, असा विचारही मनात आणू नकोस. अशातही जिद्दीने उभे राहून आयुष्याला एक नवा अर्थ दिला पाहिजे." नंतर या संदर्भात लिहिताना “मी तिला असे लिहिण्याची गरज होती असे नाही; मी न लिहिताही तिचा निर्णय असाच झाला असता," असेही जोशींनी लिहिले आहे. परंतु माई मात्र त्या पत्राचा वरचेवर उल्लेख करत. पतिपश्चात आपल्या आयुष्याची घडी त्यांनी पुन्हा एकदा बसवली; पण तरीही पतीमागे तब्बल बावीस वर्षे एकट्याने राहण्याची वेळ येईल अशी त्यांची अपेक्षा नसावी. "मला घेऊन जायचं देव विसरून गेला," त्या कधीकधी म्हणत. दिवस जात राहिले; त्या ब्याऐंशी वर्षाच्या झाल्या. डॉक्टरकडे त्या अगदी क्वचितच जात. लिंबाचे सरबत किंवा आल्याचे पाचक किंवा एखादे आयुर्वेदातले चूर्ण यावर त्यांचे दुखणे बहुतेकदा बरे होई. पण एक दिवस अगदी गंभीर प्रसंग ओढवला. घरी स्वयंपाक करता करता पदर पेटून भाजल्याने त्यांना पुण्यात जवळच असलेल्या जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. हॉस्पिटलमध्ये असतानाच माई गेल्या. तो दिवस होता ३ मार्च १९९२.
शरदचा जन्म पंचांगाप्रमाणे ऋषिपंचमीचा. शरद हे नाव मोठ्या बहिणीने, नमाताईने, ठेवले. शरद इतर भावंडांच्या तुलनेत सावळा पण अंगाने गुटगुटीत होता. 'सुदृढ बालक स्पर्धेत त्याला नक्की बक्षीस मिळालं असतं,' असे आई म्हणायची. घरी सगळे त्याला गबदुलशेठ म्हणत. बोलणे थोडे बोबडे; त्यामुळे बोबडकांदा म्हणूनही चिडवत. साताऱ्यात दोन-तीनदा वडलांनी घरे बदलली व पुढे लवकरच त्यांची बेळगावला बदली झाली.
बेळगावात ठळकवाडीत लोकूर म्हणून एका डॉक्टरांचा बंगला होता. त्याच्या आउटहाउसमध्ये जोशी परिवार राहू लागला. जवळच एक शाळा होती. 'रजपूत बंधूंची शाळा' असेच तिला म्हणत. इथले माध्यम कन्नड नव्हते, तर मराठीच होते. ह्या खासगी शाळेत महिन्याला एक रुपया फी होती, इतर सरकारी शाळा फुकट होत्या; पण घरच्यांना शिक्षणाचे महत्त्व असल्याने सगळी मुले ह्याच शाळेत जाऊ लागली. 'आपण सरकारी शाळेत नव्हे, तर खासगी शाळेत जातो' ह्याचा आजच्याप्रमाणे त्या काळीही काहीसा अभिमान बाळगला जाई. मास्तरांनी घेतलेल्या प्रवेशपूर्व चाचणीत चांगली उत्तरे दिल्यामुळे धाकट्या शरदला एकदम दुसरीत प्रवेश दिला गेला. लहानपणापासून शरद खूप हुशार. पाठांतर उत्तम. मोठा भाऊ बाळ एक यत्ता पुढे होता, पण त्याच्याबरोबरच वावरत असल्याने ऐकून ऐकून त्याचेही धडे शरदला पाठ असत. त्यामुळे खरेतर शरदला एकदम तिसरीत बसवायलाही रजपूत मास्तर तयार होते. पण 'शरदला माझ्याच वर्गात बसवलं तर मी शाळा सोडून देईन' अशी धमकी बाळने दिल्यामुळे नाइलाजाने शरदला दुसरीतच बसावे लागले. त्याची जीभ थोडीशी जड होती; तरीही कष्टपूर्वक त्याने आपले उच्चार सुधारले. बऱ्याच वर्षांनी बेळगाव येथील एका जाहीर सभेत जोशींनी केलेल्या अस्खलित भाषणाचे रजपूत मास्तरांना त्यामुळे खूपच कौतुक वाटले होते.
बेळगावचा एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. पाटकर नावाच्या एका शिक्षकांची शिकवणी आईने बाळला ठेवली व त्याच्याबरोबर तूही बसत जा' असे शरदला सांगितले. शरदला तो अपमान वाटला. शिकवणी लावणे म्हणजे कुठेतरी आपण अभ्यासात कमी आहोत, मठ्ठ आहोत, हे मान्य करणे असे त्याला वाटले. त्याची समजूत घालताना आई म्हणाली,
“गरीब बिचारे पाटकर मास्तर! महिना एक रुपयात रोज तासभर घरी येऊन शिकवणी घ्यायला तयार आहेत आणि तुम्ही दोघंही बसणार असलात तर ते आपल्यालाही परवडेल. तुला शिकवणीची कदाचित गरज नसेल, पण बाळला तिचा उपयोग होणार आहे. त्याच्याशेजारी नुसतं बसायला तुला काय एवढा त्रास आहे? तेवढंच काही कानावर पडेल. पुढच्या वर्षी तुला कदाचित बाळबरोबर एकदम चौथीतच बसवू. शिवाय ह्या एक रुपयाची पाटकर मास्तरांना मोठी मदत होणार आहे. अरे, तुझ्या वडलांना महिना चाळीस रुपये पगार
आहे आणि तरी त्यात भागवताना आपली किती ओढाताण होते तुला ठाऊकच आहे. पाटकर मास्तरांना तर फक्त महिना आठ रुपये पगार आहे! त्यांची किती ओढाताण होत असेल?"
त्यानंतर शरद शिकवणीला बसायला तयार झाला. कदाचित मोठ्या भावाबरोबर एकदम चौथीत बसायच्या आमिषाने! शिकवणीचा त्याला किती फायदा झाला असेल कोण जाणे, पण आईने ज्या प्रकारे त्याची समजूत काढली, त्याची मात्र त्याला आयुष्यभर आठवण राहिली. आपली परिस्थिती चांगली नसली, तरी आपण आपल्यापेक्षाही दुर्बळ अशा कोणालातरी मदत करू शकतो ही शिकवण फार महत्त्वाची होती. 'लहानपणी आम्ही गरीब असतानाही आमच्याकडे कायम कोणीतरी विद्यार्थी वारकरी म्हणून रोज जेवायला असायचा, याचा उल्लेख त्यांनी एकदा काहीशा अभिमानाने केला होता. गरजू विद्यार्थ्याला वारावर जेवायला घालून मदत करायची, तर गरजू मास्तरांना शिकवणी देऊन मदत करायची, हा इंदिराबाईंचा मनोदय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगणारा आहे.
बेळगावची जोशींनी सांगितलेली आणखी एक आठवण म्हणजे ते तिथे जिन्यावरून खाली पडले होते ती. ते म्हणाले,
“मला फ्लॅट फूटचा, सपाट तळपायाचा, थोडा त्रास होता. साहजिकच तोल सांभाळणं इतर सर्वसामान्य मुलांपेक्षा मला किंचित अवघड व्हायचं. अशा मुलांना लष्करात प्रवेश मिळत नसे. साताऱ्याला असताना एकदा मी व बाळ डोंबाऱ्याचा खेळ खेळत होतो व तेव्हाही मी असाच दोरीवरून पडलो होतो आणि पायही मुरगळला होता."
पुढील आयुष्यात जोशी भरपूर चालत, अगदी गिर्यारोहणही करू लागले. बोबडेपणाप्रमाणे ह्या फ्लॅट फूटवरही त्यांनी मात केली. या सगळ्यामागे, जन्मजात शारीरिक कमतरतेवर मात करण्यामागे, त्यांची जिद्द दिसून येते.
त्यांची आणखीही एक लहानपणची साताऱ्यातली आठवण ह्या गिर्यारोहणप्रेमाशी असलेला बालपणाचा संबंध सुचवणारी आहे. ते सांगत होते,
"लहानपणी मला प्लुरसी झाली होती - फुफ्फुसांचा हा एक न्युमोनियासारखा विकार. त्याचा परिणाम म्हणून कदाचित असेल, पण मला बंदिस्त जागेत खूप कोंदटल्यासारखं (claustrophobic) होई. डोंगरावर फिरायला गेलं, की मात्र तिथल्या मोकळ्या हवेमुळे बरं वाटायचं. साताऱ्याला अजिंक्यतारा किल्ल्यामागे खूप डोंगर होते. आमच्या गड्याच्या किंवा कधी वडलांच्या खांद्यावर मी बसलेला असायचो. तिथून लांबवरचं दृश्य दिसायचं. ते बघणं मला खूप आवडायचं. पुढे मला डोंगर चढायची जी आवड लागली, तिचं मूळ कुठेतरी ह्या शारीरिक कमतरतेत असावं."
१९४२च्या फेब्रुवारीत वडलांची नाशिकला बदली झाली. यावेळी बढतीही मिळाली होती. पोस्टाच्या एका खात्यांतर्गत परीक्षेत पहिला क्रमांक मिळाल्याने त्यांना इन्स्पेक्टर म्हणून नेमले गेले. पगारही थोडा वाढला. गंगापूर रोडवर कुलकर्णी नावाच्या एका गृहस्थांच्या बंगल्यात ते राहू लागले. तिसरी व चौथी यत्ता शरदने इथल्या प्राथमिक विद्यामंदिर ह्या शाळेत काढल्या व नंतर पाचवी ते नववी त्याच शाळेशी संबधित असलेल्या रुंगठा हायस्कूलमध्ये. तेच सध्याचे न्यू हायस्कूल. इथे असताना शरदला वाचनाचे जे वेड लागले ते पुढे आयुष्यभरासाठी. त्या दिवसांविषयी बोलताना जोशी म्हणत होते,
"मला वाचनाकडे वळवण्यात मोठा सहभाग होता तो तेथील एक शिक्षक अकोलकर ह्यांचा. त्याच सुमारास मी शेजारपाजारच्या इतर मुलांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही जाऊ लागलो. संघात जाण्यामागे फारसं काही वैचारिक कारण होतं असं नाही, पण संध्याकाळचे शाखेतले मैदानी खेळ मला आवडायचे. त्यावेळी टीव्ही वगैरे नव्हते. आमच्या घरासमोरच्या रस्त्यावरून कधी कधी संघाची संचलनं होत. गणवेषातले ते सगळे शिस्तीत चालणारे तरुण बघायला मजा यायची. आम्ही मुलंही मग घरातल्या घरात जमिनीवर चिंचोके मांडून संचलनाचा असा एक खेळ खेळायचो. संघाप्रमाणेच राष्ट्रसेवादलातही आम्ही जायचो. तेही मला आवडायचं. सानेगुरुजी त्यावेळी सेवादलात येत. सुंदर, भावुक गाणी तालासुरात म्हणत व त्यांच्यामागे आम्हालाही मोठ्याने म्हणायला लावत. त्यावेळचे सानेगुरुजी खूप ओजस्वी अशी भाषणंही करत. आमचा ते अगदी आदर्श होते."
१९४२चा ऑगस्ट महिना. गांधीजींच्या आदेशानुसार चले जाव आंदोलन सुरू झाले. प्रभातफेऱ्या वगैरे सुरू झाल्या होत्या. शरद तेव्हा सात-आठ वर्षांचाच होता, त्यामुळे प्रत्यक्ष
आंदोलनात तो सहभागी व्हायचा प्रश्नच नव्हता. पण विशेष म्हणजे सेवादलातील अन्य मुलांना होती त्याप्रमाणे त्याला किंवा घरच्यांना एकूण त्या आंदोलनाबद्दल फारशी सहानुभूतीदेखील नव्हती. ह्याचे कारण सांगताना जोशी म्हणाले,
“सरकारी नोकरीत असल्याने वडलांना चळवळीत कुठल्याही प्रकारे सहभागी होणं शक्य नव्हतं. दुसरं म्हणजे, गांधीजी जरी अहिंसेचे पाठीराखे होते, तरी प्रत्यक्षातलं आंदोलन अहिंसक नव्हतं. आंदोलक खूपदा जाळपोळदेखील करत. माझे वडील तेव्हा देवळाली पोस्ट ऑफिसात होते. पत्राची एक पेटी आंदोलकांनी जाळली होती. वडलांनी ती कशीबशी उघडली व आतली अर्धवट जळलेली पत्रं ते घरी घेऊन आले. घरीच मग आम्ही सगळ्यांनी त्यांचं सॉर्टिंग केलं व ती योग्य त्या ठिकाणी रवाना केली. त्यातली अनेक पत्रं महत्त्वाची असू शकतील. अहिंसात्मक मानल्या गेलेल्या चळवळीची ही दुसरीही बाजू होती हे त्या लहान वयातही माझ्या लक्षात आलं त्या विशिष्ट दिवशी एक अमेरिकन लष्करी अधिकारी आमच्या घरी आला होता. असे अनेक अमेरिकन तेव्हा इतर इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर भारतात होते. दुसरं महायुद्ध चालू असल्याने. सॉर्टिंगच्या वेळी आम्हाला सापडलेली काही महत्त्वाची पत्रं ताब्यात घेण्यासाठी तो आला होता. तो गेला तेव्हा आईने सगळं घर पाण्याने धुऊन काढलं होतं. तसं आमच्याकडे कोणीच कसली अस्पृश्यता पाळत नव्हतं, पण ह्या गोऱ्या सोजिरामुळे मात्र आपलं घर बाटलं असं तिला वाटलं असावं; किंवा कदाचित त्याच्या बुटाला माती लागलेली असेल व बुटांबरोबर तीही घरात आली असेल." 'बेचाळीसचे गौडबंगाल' या त्यांनी बऱ्याच वर्षांनी लिहिलेल्या लेखाला (शेतकरी संघटक, २१ नोव्हेंबर १९९३) नाशिकमधील त्यावेळच्या अनुभवाची पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाने बेचाळीसच्या आंदोलनाचे सर्व श्रेय आवर्जून स्वतःकडे घेतले आहे; पण प्रत्यक्षात जोशीच्या मते त्या आंदोलनात गांधी-नेहरूंचा विरोध असलेला हिंसाचारही खूप झाला होता. टपाल कचेऱ्या जाळणे, विजेच्या व संदेश वाहतुकीच्या तारा तोडणे, रेल्वेचे रूळ उखडणे, सरकारच्या साऱ्या नाड्याच आखडल्या जातील व सेनेच्या हालचालींमध्ये अडचणी येतील असे संप जागोजाग घडवून आणणे; हे सारे झाले होते. 'बेचाळीसच्या चळवळीतील काँग्रेसची जबाबदारी' या विषयावर लंडन येथे एक श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात आली होती व या हिंसाचारातील काँग्रेसच्या सहभागाचे अनेक पुरावे त्यात देण्यात आले होते.
तशी इंग्रज सरकारला बेचाळीसच्या आंदोलनाची फारशी फिकीर नव्हती; त्यांनी ते पोलिसांचे बळ वापरून महिन्याभरातच दाबूनही टाकले होते. त्याचप्रमाणे महायुद्ध चालू असताना व स्वतःचे सगळे सैन्य तिथे गुंतलेले असतानाच भारतात झालेल्या या आंदोलनामुळे ते दबले व म्हणून त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिले, या म्हणण्यातही जोशींच्या मते काही तथ्य नव्हते; कारण अमेरिका युद्धात उतरल्यावर दुसरे महायुद्ध आपण जिंकणार ह्याविषयी इंग्रजांना कधीच शंका नव्हती; पण जर्मनीवर आपण निर्णायक प्रतिहल्ला करण्यापूर्वी रशियावर स्वारी करून गेलेल्या जर्मन फौजांनी साम्यवादी रशियाचे जास्तीत जास्त नुकसान केले, तर ते त्यांना हवेच होते. म्हणूनच केवळ ते जर्मनीवर घणाघाती हल्ला करणे शक्य तितके लांबणीवर टाकत होते. पण रशियाने हिटलरला अनपेक्षितपणे जबरदस्त प्रतिकार केला व शेवटी जर्मनीला रशियातून काढता पाय घ्यावा लागला; उलट्या रशियन फौजा जर्मनीच्या रोखाने पुढे सरकू लागल्या. आता हिटलरच्या पाडावाचे सारे श्रेय रशियालाच मिळेल अशी धास्ती वाटून, शेवटी इंग्रजांनी ६ जून १९४४ रोजी फ्रान्समधल्या नॉर्मंडी इथे सर्वशक्तीनिशी दोस्तांची मोठी फौज अंतिम हल्ल्यासाठी उतरवली. लेखाच्या शेवटी जोशी या साऱ्या निवेदनाला एक अगदी आगळे असे वळण देतात. ते लिहितात,
१९४४-४५च्या सुमारास भारतातील तरुणांवर जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन यांचा मोठा प्रभाव होता. युद्ध संपले, स्वातंत्र्यदानाची प्रक्रिया सुरू झाली. स्वातंत्र्य जर लवकर आले नाही, तर अहिंसावादी स्वराज्य आंदोलन संपून बेचाळीसच्या जहालांच्या हाती आंदोलनाचे नेतृत्व जाईल, अशी धास्ती नेहरूपटेल यांनासुद्धा पडली होती. घाईत त्यांनी फाळणीदेखील कबूल करून टाकली. त्याचे एक कारण बेचाळीसच्या क्रांतिकारकांबद्दलची काँग्रेसनेतृत्वाची धास्ती, हे उघड आहे.
काँग्रेसनेत्यांनी फाळणीला शेवटी पाठिंबा का दिला, याची अनेक संभाव्य कारणे पूर्वी वाचनात आली होती; पण चळवळीचे नेतृत्व आपल्या हातून निसटेल व ते जहालांच्या हाती जाईल, आणि पर्यायाने हातातोंडाशी आलेला स्वातंत्र्योत्तर सत्तेचा आपला घासही हिरावला जाईल ही काँग्रेसनेत्यांची भीती हे एक कारण होते, हे मात्र कधी वाचनात आले नव्हते. एखाद्या घटनेचे इतरांपेक्षा अगदी वेगळे असे विश्लेषण जोशी कसे करू शकायचे याचे हे एक चांगले उदाहरण आहे.
अनंतरावांचे नाशिकनंतरचे पोस्टिंग मुंबई इथे होते. राहायला त्यांनी भाड्याने घर घेतले होते. (६०, लक्ष्मी निवास, अंधेरी पूर्व) त्यावेळी वाजवी भाड्याने मुंबईत सर्वत्र जागा उपलब्ध होत्या. त्यावेळचा पार्ले-अंधेरी परिसर आतासारखा गजबजलेला नव्हता. खूप मोकळी जागा असायची, झाडे मुबलक होती, लोकवस्ती अगदी तुरळक व बरीचशी माणसे एकमेकांना ओळखतही असत. पुढे अनंतरावांची बदली प्रमोशनवर बडोद्याला झाली, पण कुटुंब मात्र त्यांनी याच घरात ठेवले.
इथे जोशींच्या अन्य भावंडांविषयी लिहायला हवे. एकूण ती सहा भावंडे. सगळ्यात मोठ्या निर्मला ऊर्फ नमाताई. यांचा जन्म १९३०चा. म्हणजे शरदहन पाच वर्षांनी मोठ्या. त्यांचे यजमान चंद्रकांत देशपांडे जबलपूरला सरकारच्या दारूगोळा कारखान्यात होते व आयुष्याची पन्नास वर्षे त्या तिथेच राहिल्या. नंतर सिंधूताई वसंतराव जोशी. मुंबईत गोवंडीला राहायच्या. त्या रसायनशास्त्र विषय घेऊन एम्.एस्सी. झाल्या होत्या व टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नोकरी करत. त्यांचे यजमान वसंतराव टेक्स्टाइल इंजिनिअर होते. आता दोघेही हयात नाहीत. त्यांचे जवळचे वर्गमित्र गोपाळराव परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार वसंतराव मुंबईच्या व्हीजेटीआयमधून पदवी मिळवणाऱ्या पहिल्याच बॅचचे विद्यार्थी; तत्पूर्वी तिथून फक्त डिप्लोमा मिळायची सोय होती. पुढे ते एका कापडगिरणीत मॅनेजिंग डायरेक्टरही बनले. त्यांच्या व सिंधूताईंच्या लग्नात परांजपेंचा बराच पुढाकार होता. तिसरा क्रमांक मनोहर ऊर्फ बाळासाहेब जोशी यांचा. त्यांनी आधी बी.एस्सी. केले व नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा घेतला. पुढे त्यांनी दिल्लीजवळ फरीदाबाद येथे इलेक्ट्रिक स्विचेस बनवायचा कारखाना सुरू केला. २०१३ मध्ये ते वारले. चौथे भावंड म्हणजे शरद. पाचवे प्रभाकर ऊर्फ येशू. ते मेकॅनिकल इंजिनिअर होते व पुढे जर्मनीत जाऊन त्यांनी उच्चशिक्षणही घेतले होते. हुबळी, अहमदाबाद, मुंबई, पुणे वगैरे ठिकाणी नोकरी करून शेवटी त्यांनी कर्नाटकात स्वतःचा कारखानाही काढला होता. पुढे वृद्धापकाळी सेवानिवृत्ती घेऊन शेवटची दोन वर्षे ते सपत्नीक नाशिकला राहत होते. १ नोव्हेंबर २०१६ मध्ये ते निवर्तले. सहावे व सर्वांत धाकटे भावंड म्हणजे मधुकर जोशी. त्यांनीही टेक्स्टाइल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा घेतला होता. ते नोकरीसाठी अमेरिकेत गेले व नंतर तिथेच स्थायिक झाले; आता हयात नाहीत. आता फक्त निर्मला ऊर्फ नमाताई हयात आहेत.
वडलांची नोकरी बदलीची असल्याने या सर्वच सहा भावंडांना मुख्यतः माईंनी वाढवले. आईचे संगीतप्रेम पुढे सर्व सहा मुलांमधेही आले. त्यांच्यातला तो एक समान धागा. शाळेत असतानाच नमा व सिंधू गाणे शिकल्या, तर बाळ तबला शिकला. सर्वांत मोठ्या नमाताई जबलपूरला हार्मोनियम व तबल्याचे क्लासेसदेखील घ्यायच्या, तर त्यानंतरच्या मुंबईत स्थायिक झालेल्या सिंधूताई व्हायोलिन शिकवायच्या. शरद जोशींनी संगीतात प्रावीण्य असे मिळवले नाही; पण त्यांची गाण्यांची आवड कायम राहिली; मोठेपणीही फावल्या वेळात सैगल व मुकेश यांची अनेक गाणी ते गुणगुणत असत. विशेषतः दर्दभरी. प्रवासात गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या, तर त्यातही उत्साहाने भाग घेत. त्यांना कविता आवडत आणि त्या मोठ्याने चालीवर म्हणायलाही आवडे. ही आईकडूनच आलेली आवड.
शाळेची दहावी व अकरावी (त्यावेळचे मॅट्रिक) ही शेवटची दोन वर्षे शरदने जवळच असलेल्या विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक विद्यालयातून केली. इथे काही विषय इंग्रजी माध्यमातून होते.
शाळेत शिकत असतानाच मुंबई सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकलेच्या एलेमेंटरी व इंटरमिजिएट या दोन परीक्षाही शरदने १९४७ व १९४८ साली यशस्वीपणे दिल्या होत्या. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या हिंदीच्या, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृतच्या व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठीच्या परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता.
शाळेत असताना शरदने 'मौजे अकरावी' नावाचे एक हस्तलिखित काही दिवस चालवले होते. पेंढारकर नावाचे एक कर्तबगार शिक्षक तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्याशी कशावरून तरी शरदचा एकदा वाद झाला. त्यावेळी ह्या हस्तलिखितातून त्याने शिक्षकांवर टीका केली होती. ह्यावर मुख्याध्यापकांनी त्याला आपल्या कार्यालयात बोलावून घेतले व त्याची चांगलीच हजेरी घेतली. शिवाय, त्या हस्तलिखितावर बंदीही घातली. शरद खूप नाराज झाला, पण त्याचे काही चालले नाही. ह्या सगळ्या घडामोडी होत असताना आपल्या अभ्यासाकडे मात्र शरदने दुर्लक्ष केले नव्हते. ६ जून १९५१ रोजी अकरावीच्या परीक्षेचा निकाल लागला. ८००पैकी ५६२, म्हणजे सत्तर टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. त्याकाळी आजच्याइतकी गुणांची खैरात केली जात नसे.
शरद जोशी आता सोळा वर्षांचे झाले होते. हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. ह्या टप्प्यावर घ्यायचा सर्वांत मोठा निर्णय म्हणजे अकरावीनंतर काय करायचे. इतर मित्रांप्रमाणे सायन्स वा आर्टसला न जाता जोशींनी मुंबईतील सिडनम (Sydenham, सिडनेहम हा उच्चारही आपल्याकडे रूढ आहे) ह्या वाणिज्य (कॉमर्स) कॉलेजात प्रवेश घेतला.
त्यामागेही रोचक पार्श्वभूमी आहे. खरे तर जोशी कॉमर्सला जातील असे कोणालाच कधी वाटले नव्हते; त्यांना स्वतःलाही नाही. शाळेत असताना संस्कृत हा त्यांचा आवडता विषय होता. असंख्य श्लोक, स्तोत्रे, सुभाषिते; रघुवंश-मेघदूतसारखी काव्येही त्यांना तोंडपाठ होती. भावी आयुष्यात लिहिलेल्या त्यांच्या अनेक उत्तम लेखांची शीर्षके संस्कृत आहेत. उदाहरणार्थ, इति एकाध्याय, मुहुर्तम् ज्वलितम् श्रेयम् वगैरे. “लहानपणी मला कधी अस्वस्थ वाटू लागलं, की मी गीता म्हणायचो," असे ते एकदा म्हणाले होते. त्या वयात गीतेचा अर्थ कितपत उलगडत होता, हा भाग वेगळा; पण बरीचशी भगवद्गीता त्यांना तोंडपाठ होती हे नक्की. गीताधर्म मंडळ, पुणे, या संस्थेने घेतलेली गीतासार परीक्षा ते डिसेंबर १९४८मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. सुदैवाने संस्कृतसाठी त्यांना सतत चांगले शिक्षकदेखील लाभले. नाशिकच्या शाळेतील गुरुजी विषय सोपा करून शिकवत. पाठांतराऐवजी प्रत्यक्ष बोलण्यावर त्यांचा भर होता. वर्गात ते सर्वांना संस्कृतातच बोलायला लावत. ही आवड मुंबईला आल्यावर अधिकच वाढली. स्वतः मुख्याध्यापक पेंढारकर संस्कृतच शिकवायचे.
आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे नारायण अभ्यंकर नावाचे शिक्षक, अभ्यंकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. संस्कृत, गणित, संगीत व कुंडली ज्योतिष ह्या चारही विभिन्न क्षेत्रांत त्यांनी असामान्य प्रावीण्य मिळवले होते. लोकमान्य टिळकांच्या प्रभावामुळे इतर उत्तम नोकऱ्या मिळत असूनही त्यांनी शिक्षकाचा पेशा पत्करला होता. गिरगावच्या विल्सन स्कूलमध्ये ते संस्कृत व गणित शिकवत. राहायचे शिवाजी पार्कला. दिसायला ते काहीसे जे. कृष्णमूर्तीसारखे दिसत. मूळचे ते कोल्हापूरचे व म्हणून अनंतरावांच्या लहानपणापासून ओळखीचे. ते भविष्य सांगत व ते बहुतेकदा खरे ठरते, असा त्यांचा लौकिक होता. अनंतराव अनेकदा त्यांच्याकडे पत्रिका दाखवायला, मुहूर्त काढायला वगैरे जात असत. वडलांच्या सांगण्यानुसार जोशी अभ्यंकरांकडे संस्कृतच्या शिकवणीसाठी जाऊ लागले. मोठे बंधू बाळासाहेबदेखील त्यांच्याकडे यायचे; पण ते गणिताच्या शिकवणीसाठी. त्यांच्या घरी जेव्हा जोशी प्रथम गेले. तेव्हा त्यांची जणू परीक्षा घेण्यासाठी अभ्यंकरांनी त्यांना एका इंग्लिश परिच्छेदाचे संस्कृतात भाषांतर करायला सांगितले व ते जरावेळासाठी म्हणून घराबाहेर गेले.ते परत आले तेव्हा जोशींचे भाषांतर पूर्ण झाले होते. विशेष म्हणजे गद्यापेक्षा पद्यातले संस्कृत अधिक गोड वाटते, म्हणून जोशींनी त्या उताऱ्याचा चक्क पद्यात अनुवाद केला होता. अभ्यंकर खूष झाले व जोशींना त्यांनी आपला शिष्य म्हणून स्वीकारले.
आपल्या शिष्यांच्या जीवनात अभ्यंकर अगदी समरस होऊन जात. एकदा त्यांनी बाळासाहेबांना भूमितीच्या एका पुस्तकातील एक अवघड प्रमेय घातले होते व आश्चर्य म्हणजे ते दोघांनाही तासभर खटपट करूनही सोडवता येईना. दिवसभर अभ्यंकर अगदी बैचेन होते. संध्याकाळी अचानक त्यांना उत्तर सापडले. त्यांना इतका आनंद झाला, की लगेच त्यांनी आपल्या घरून लांब अंधेरीला जोशींच्या घरी धाव घेतली व बाळासाहेबांना ते प्रमेय कसे सोडवायचे ते सांगितले! जोशींना अभ्यंकरांविषयी फार आदर वाटायचा. अभ्यंकरांच्या शिकवणीचा शालेय अभ्यासातही फायदा होतच होता. त्यामुळे जेव्हा 'अकरावीनंतर पुढे काय करायचं?' ह्याची चर्चा मुलांमध्ये सुरू झाली तेव्हा जोशी संस्कृतच घेणार व पुढे संस्कृतचे प्राध्यापक होणार हे साऱ्यांनी गृहीतच धरले होते.
मित्रांमधल्या त्या चर्चेच्या संदर्भात पुढे जोशींनी लिहिले आहे,
आकंठ जेवून तृप्त झालेल्याला रस्त्याकाठी बसलेल्या माणसाच्या पोटातील भुकेची जाणीव नसावी तसा, काहीशा आढ्यतेने मी मित्रांना म्हणालो, 'यात एवढा विचार
करण्यासारखं काय आहे? कोणताही शिक्षणक्रम घेतला तरी फरक काहीच पडत नाही.' चिंतामणराव देशमुख, त्यावेळचे आमचे दुसरे चरित्रनायक म्हणत, आवडणारी गोष्ट कोणीही करेल; पण करावी लागणारी गोष्ट आवडीने करणे यात पुरुषार्थ आहे. आपल्या लोकोत्तरतेच्या धुंदीत, आपल्या हातानेच आपले आयुष्य कडू करून घेण्यात गोडी मानणारे कितीतरी खांडेकरी नायक डोक्यात बिळे करून बसले होते.
(अंगारमळा, पृष्ठ ५१)
जोशींना त्यांचा एक जवळचा मित्र म्हणाला, "तुझ्या बाबतीत काही प्रश्नच नाही रे. तू संस्कृत घेणार हे आम्हाला ठाऊकच आहे."
खरे तर ह्यात जोशींनी नाराज व्हावे असे काहीच नव्हते, कारण शेवटी तो त्यांचा एक जवळचा मित्रच होता; पण कुठल्यातरी एका सर्वसामान्य विद्यार्थ्याने आपण भविष्यात काय करणार हे ठामपणे सांगावे हे त्यांना अजिबात आवडले नाही. काहीशा रागाने व त्याचे म्हणणे खोडून काढत “मी कॉमर्सला जाऊन अर्थशास्त्राचा अभ्यास करणार," असे जोशींनी जाहीर केले.
घरी आल्यावर जोशींनी आपला निर्णय घरच्यांनाही सांगितला. सगळ्यांना आश्चर्य वाटले. शरदने प्राध्यापक बनावे आणि ते करायचे नसेल, तर इतर सगळ्या भावांप्रमाणे सायन्सला तरी जावे व इंजिनिअर बनावे असे घरच्यांचे म्हणणे पडले. कॉमर्सला जाऊन हा मुलगा पुढे करणार काय, हाच घरच्यांना प्रश्न पडला होता. स्वतः जोशींनाही आपण असे करणे कदाचित चुकीचे ठरेल हे विचारांती जाणवलेदेखील; पण एकदा सगळ्यांसमोर आपला निर्णय जाहीर केल्यानंतर आता तो फिरवणे त्यांना कमीपणाचे वाटले. जिद्दीने त्यांनी कॉमर्सला प्रवेश घेतला. तोही पुन्हा सिडनम कॉलेजात.
त्याकाळी महाराष्ट्रात अगदी थोडी वाणिज्य महाविद्यालये होती. मुंबईत बोरीबंदरचे सिडनम व माटुंग्याचे पोद्दार होते. बहुतेक मराठी विद्यार्थी पोदार कॉलेजात जात. तिथले एकूण वातावरणही मध्यमवर्गीय होते. ह्याउलट सिडनममध्ये उच्चभ्रू विद्यार्थ्यांचा भरणा होता. पारशी, गुजराती, मारवाडी मुले तिथे बहुसंख्य होती. साहजिकच जोशी पोद्दारमध्ये अधिक सहजगत्या सामावून जाऊ शकले असते. घरापासून ते तुलनेने जवळही होते. मोठे बंधू बाळासाहेबही पोद्दारलगतच असलेल्या रुइयामध्ये सायन्सला होते. पण का कोण जाणे, नेहमी इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करायचे, त्यांना अवघड वाटणारी वाटच आपण स्वीकारायची असा जणू त्यांनी निश्चयच केला होता!
१९१३ साली स्थापन झालेले सिडनम हे केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात, किंबहुना परदेशातही नामांकित होते. आशिया खंडातील हे सर्वांत पहिले वाणिज्य महाविद्यालय. त्यावर्षी, म्हणजे १९५१ साली, महाविद्यालयाच्या वार्षिकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर (व नंतरचे केंद्रीय अर्थमंत्री) चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख आले होते. आपल्या भाषणात ते म्हणाले होते, “देशात जमा होणाऱ्या एकूण आयकरापैकी २५% आयकर हा सिडनममधील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जमा होतो." आपण ज्या कॉलेजात प्रवेश घेतला आहे, ते किती प्रतिष्ठित आहे ह्याची त्या क्षणी जोशींना कल्पना आली. अनेक बड्या उद्योगपतींची मुले इथेच शिकायला येत. कांतीकुमार पोद्दार तर जोशींच्या वर्गातच होते. बिर्ला उद्योग चे कुमारमंगलम बिर्ला, एच.डी.एफ.सी.चे दीपक पारेख, लंडनमधील ऐतिहासिक इस्ट इंडिया कंपनी ज्यांनी मध्यंतरी विकत घेतली ते संजीव मेहता वगैरे उद्योगक्षेत्रातील आजची अनेक बडी मंडळी एकेकाळी ह्याच कॉलेजात शिकलेली आहेत. अनेक मुले स्वतःच्या मोटारीतून कॉलेजात येत. पदवीनंतर पुढे काय हा त्यांच्यापुढे प्रश्नच नसायचा. आजवर ज्या मराठमोळ्या वातावरणात जोशी वाढले होते त्यापेक्षा इथले वातावरण अगदी वेगळे होते. इथे मराठी विद्यार्थ्याला 'घाटी' म्हणून हिणवले जाई. कपडे, बोलणे, वागणे ह्या सर्वच बाबतींत मराठी विद्यार्थी मागासलेला दिसायचा. वर्गात मराठी मुले जेमतेम दहाबारा होती. सुरुवातीला हे सगळे जोशींना जडच गेले, पण हळूहळू या
अवघडलेपणावर त्यांनी मात केली.
इथले प्राध्यापक कॉलेजच्या लौकिकाला शोभेल असेच नावाजलेले होते. त्यातील ग. र. ऊर्फ जी. आर. दीक्षित यांच्याशी जोशींचा पुढेही बराच संबंध आला. पण जोशींवर सर्वाधिक प्रभाव पडला तो कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुमंत ऊर्फ एस. के. मुरंजन यांचा. एक नाणेतज्ज्ञ म्हणून ते विख्यात होते. नुकतेच अमेरिकेहून परतले होते. त्यांनी नाणेव्यवस्थेवर दोन उत्तम पुस्तके लिहिली होती व विशेष म्हणजे दोन्ही मराठीत लिहिली होती. ती इंग्रजीत लिहायला हवी होती असे म्हणणाऱ्या टीकाकारांना उद्देशून ते म्हणत, "ज्याला या विषयाचा खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे आणि ह्या विषयावर मला काय म्हणायचे आहे हे जाणून घ्यायचे आहे, त्याला त्यासाठी मराठी शिकायला काय हरकत आहे?" ह्यापूर्वी बरीच वर्षे सुप्रसिद्ध इतिहासकार राजवाडे यांनी असेच फक्त मराठीतच लेखन केले होते व त्याच्या समर्थनार्थ असेच काहीसे उत्तर दिले होते. स्वतः जोशींना पुढे एका-दोघांनी 'मराठीत लिहिण्याऐवजी तुम्ही इंग्रजीत लिहा, म्हणजे सगळीकडे पोचाल' अशी सूचना केली होती, तेव्हा त्यांनीही असेच उत्तर दिले होते.
प्राचार्यांबद्दल जोशी लिहितात,
बस्स! या एकाच उत्तरावर आम्ही लट्टू होतो. त्या एकाच वाक्याने पदोपदी जाणवणारे, टोचणारे मराठी माणसाचे दैन्य धुतले गेल्यासारखे वाटत होते. मुरंजन यांनी आम्हाला बँकिंगमधले काही शिकवल्याचे मला आठवत नाही. पण त्यांनी कान्टशी ओळख करून दिली. “I think, therefore, I am.' या कान्टच्या उक्तीतील सगळा उल्हास आणि आवेग आम्ही मुरंजनांच्या चेहऱ्यावर अनुभवला.
(अंगारमळा, पृष्ठ ५९)
गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या एका मुंगीचे महाभारत ह्या आत्मकथनात डॉ. मुरंजन यांचे सुरेख व्यक्तिचित्र रेखाटले आहे. भारताच्या नियोजन मंडळाने नेमलेल्या अर्थशास्त्र्यांच्या सल्लागार मंडळात डॉ. मुरंजन यांचाही समावेश होता. प्राचार्यांनी आपल्याला मदत करण्यासाठी एक रिसर्च ग्रुप स्थापन केला होता व त्यात घेतल्या गेलेल्या दोन विद्यार्थ्यांमधले एक जोशी होते. १९५५-५६ सालात 'बेरोजगारांचा अंदाज' (एस्टिमेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट) ह्या विषयाच्या नियोजन मंडळासाठी केलेल्या अभ्यासासाठी जोशींनी बरेच संख्याशास्त्रीय काम केले होते व त्याचे प्राचार्यांनी कौतुक केले होते.
सुप्रसिद्ध कवी व कादंबरीकार पु. शि. रेगे त्यांना वाहतुकीचे अर्थशास्त्र शिकवायचे. मुंबईतील साहित्यिक वर्तुळात त्यावेळी रेगे यांना मानाचे स्थान होते. पण तरीही साहित्याची खूप आवड असलेल्या जोशींनी त्यांच्याविषयी काही लिहिलेले नाही. मराठी साहित्यापासून जोशी त्यावेळी बरेच दूर गेले होते, असा याचा अर्थ लावायचा का? रेगे यांचा जोशींनी निदान नामोल्लेखतरी केला आहे, पण गंगाधर गाडगीळ ह्यांच्या बाबतीत तसा नामोल्लेखही झालेला नाही. गाडगीळ त्यांना अर्थशास्त्र शिकवत असत. ते मराठी नवकथेचे प्रवर्तक म्हणून त्यावेळी ऐन भरात होते. विशेष म्हणजे पुढे जोशी यांच्याचप्रमाणे गाडगीळांनीही मुक्त अर्थव्यवस्थेचा जोरदार पुरस्कार केला होता; त्यांच्यात तो समान असा एक वैचारिक दुवाही होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे असूनही जोशींच्या लेखनात गाडगीळांचा उल्लेख कुठेच आढळत नाही. किंबहना पुढे एकदा मी त्यांच्यापाशी गाडगीळांबद्दल विचारणा केली असताना त्यांची एकही आठवण जोशी सांगू शकले नाहीत. खरेतर नंतरच्या आयुष्यात एक-दोनदा हे दोघे एकाच व्यासपीठावर वक्ते म्हणून हजरही होते, पण त्यातलेही काही जोशींना त्यावेळीतरी आठवत नव्हते.
इथल्या विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व जोशींपेक्षा कसे वेगळे होते त्याची ही एक झलक. केंद्रीय अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांच्यावर आयुर्विमा महामंडळाचे पैसे एका भ्रष्ट उद्योगात गंतवून स्वतः कमिशन मिळवल्याचा एक गंभीर आरोप त्यावेळी केला गेला होता व त्याची चर्चा एकदा कॉलेजात सुरू होती. त्यावेळी जोशी म्हणाले, "सुदैवाने आपली न्याययंत्रणातरी अजून प्रामाणिक राहिली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शासन होऊ शकतं." त्यावर एक उद्योगपतिपुत्र फटकन म्हणाला, “घाटी लोकांची भाषा सोडून दे! कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने फिरवायचा असेल, तर कोणाला काय काय पुरवावं लागतं ते मला विचार!" आणि हे बोलताना त्याने असे काही डोळे मिचकावले, की हा करावा लागणारा पुरवठा वस्तूंचा नाही हे उघड व्हावे!
गर्भश्रीमंत विद्यार्थ्यांप्रमाणे इथे काही अतिशय बुद्धिमान विद्यार्थीदेखील होते. त्यांतील एक म्हणजे जगदीश भगवती. भगवती जोशींच्या एक वर्ष पुढे होते. दोघेही संस्कृतप्रेमी व योगायोगाने दोघेही अभ्यंकरांचे विद्यार्थी. तिथेच त्यांचा प्रथम परिचय झाला होता. अर्थात दोघांमधले साम्य बहुधा इथेच संपत होते. भगवतींचे वडील सुप्रीम कोर्टात एक नामांकित वकील होते. रोज सकाळी चिरंजीवांना कॉलेजात सोडायला एक मोटार येई व संध्याकाळी दुसऱ्या एका मोटारीतून ते घरी परतत. सगळा वेळ कॉलेज आणि ग्रंथालय ह्यातच घालवत. सगळीकडे त्यांचा दबदबा असे. एसएससीला ते संपूर्ण बोर्डात काही लाख विद्यार्थ्यांमध्ये पहिले आले होते. भगवती नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स करायला गेले. तिथले शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत गेले. आज ते अर्थशास्त्रासाठी जगप्रसिद्ध अशा कोलंबिया विद्यापीठात शिकवतात. बहुतेक सर्व बड्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे व भारत सरकारनेही २००० साली पद्मविभूषण हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला आहे. आज ना उद्या त्यांना नोबेल पुरस्कारही मिळेल असे म्हटले जाते. त्यांचे एक बंधू प्रफुल्लचंद्र ऊर्फ पी. एन. भगवती हेही वडलांप्रमाणेच नामांकित वकील होते व पुढे भारताचे सरन्यायाधीशही बनले. जनहितयाचिका (Public Interest Litigation) हा प्रकार सुरू करण्याचे श्रेय त्यांचेच. त्यांनाही पद्मविभूषण मिळाले आहे. दोन भावांनी पद्मविभूषण मिळवायचे हे बहुधा एकमेव उदाहरण असावे. जगदीश भगवती हा त्या काळात जोशी यांचा आदर्श होता.
रोज सकाळी शक्य तितक्या लवकर अंधेरीतील आपल्या घरून जोशी निघत व आगगाडीने मरीन लाइन्सला येत. तिथून पुढे चालत बोरीबंदरला कॉलेजात. एकदा कॉलेजात आले की दिवसभर तिथेच. आधी लेक्चर्स आणि ती संपल्यावर मग ग्रंथालय, सगळा अभ्यास, सगळे वाचन तिथेच. घरी रात्री उशिरा, फक्त झोपायला. नाशिकला असताना त्यांना क्रिकेट खेळायची गोडी लागली होती; पण इथे क्रिकेट अगदी पूर्ण बंद. इतर मित्र असेही त्यांना इथे फारसे नव्हते; त्यावेळी तरी ते बऱ्यापैकी एकांतप्रिय होते. इतर मुलांप्रमाणे त्यांच्याकडे चित्रपट बघायला, हॉटेलात उडवायला पैसेही नसत. घरून जो काही चार-पाच रुपये पॉकेटमनी मिळायचा तो आठवड्याहून जास्त टिकायचा नाही. त्यामुळे सगळा वेळ फक्त अभ्यास एक अभ्यास. त्यांची पहिली चार वर्षे, म्हणजे १९५५ साली ते बी.कॉम. होईपर्यंत, सिडनम कॉलेज बोरीबंदरला व्हीटी स्टेशनसमोर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या आवारातच होते, पण त्यानंतर ते स्वतःच्या आधुनिक इमारतीत, चर्चगेट स्टेशनलगतच्या बी रोडवर गेले. ह्या इमारतीतील सर्वच सोयी अधिक प्रशस्त होत्या. विशेषतः ग्रंथालय, अर्थशास्त्राशी संबंधित जगातील बहुतेक सारी महत्त्वाची पुस्तके कॉलेजच्या ग्रंथालयात होती, जगभरची आर्थिक नियतकालिकेदेखील येत. जमेल तेवढे सगळे जोशी बारकाईने वाचून काढत, टिपणे काढत.
१९५४मध्ये दि न्यूयॉर्क हेरल्ड ट्रिब्युन या जगप्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका देशव्यापी निबंधस्पर्धेत जोशींनी भाग घेतला होता. मुंबई विद्यापीठाकडे आलेल्या सर्व निबंधांत तो सर्वोत्कृष्ट ठरल्याने पुढे तो दिल्लीला शिक्षण मंत्रालयाकडे पाठवला गेला. कारण हेच मंत्रालय स्पर्धेचे व्यवस्थापन करत होते. ही स्पर्धा खूप प्रतिष्ठेची होती व विजेत्याला त्याकाळी अप्रूप असलेल्या अमेरिकेलाही पाठवले जाणार होते. देशभरातील वेगवेगळ्या विद्यापीठांकडून सादर केल्या गेलेल्या निबंधांची छाननी झाल्यावर जोशींचा अंतिम फेरीत समावेश केला गेला. त्यासाठी द्यायच्या एका चाचणीसाठी व प्रत्यक्ष मुलाखतीसाठी त्यांना दिल्लीला यायचे आमंत्रण दिले गेले. जायचे-यायचे इंटर क्लासचे भाडेही मिळणार होते. येताना अमेरिकेला जाण्यासाठी त्याकाळी आवश्यक असलेले वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्रही घेऊन यावे असे आमंत्रणपत्रात लिहिले होते. देशभरातील अगदी मूठभर विद्यार्थ्यांनाच ही संधी मिळाली होती. जोशींना खूप आनंद झाला, कारण ह्या निबंधासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. सगळी पूर्वतयारी करून ते उत्साहाने दिल्लीला गेले त्या काळी दिल्लीही खूप दूरची समजली जाई व दिल्लीला जाणारे घरातले ते पहिलेच होते. सगळ्यांनी कौतुकाने त्यांना निरोप दिला. पण दुर्दैवाने तेथील चाचणीत व मुलाखतीत त्यांची पुरेशी छाप पडली नाही. दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजातील एका विद्यार्थ्याची अंतिम फेरीत निवड झाली. जोशी अगदी निराश झाले. आपल्या हातातोंडाशी आलेला यशाचा घास शेवटच्या क्षणी गेला असे त्यांना वाटले; शिवाय, घरच्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही याचा अपमानही वाटलाच.
पुढे १९५६ मध्ये मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एका महत्त्वाच्या शोधनिबंधस्पर्धेत त्यांनी भाग घेतला. त्यासाठी कसून मेहनत केली व एक बराच मोठा शोधनिबंध लिहिला. शीर्षक होते, River Valley Projects and their Role in the Agricultural Development of India (नदी खोरे प्रकल्प आणि भारतीय शेतीच्या विकासातील त्यांचे योगदान). त्याला मात्र यश मिळाले. होमजी कुरसेटजी डॅडी यांच्या नावे असलेला प्रथम पुरस्कार मिळाला. ह्या पुरस्काराची रक्कम ३०० रुपये होती; त्या काळाच्या मानाने बरीच जास्त. जोशींना खूप आनंद झाला. निबंधलेखनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या खोरे प्रकल्पांचा देशातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती आर्थिक लाभ झाला याचा त्यांनी संख्याशास्त्रीय अभ्यास केला. या अभ्यासात खडकवासला वॉटर अँड पॉवर रीसर्च सेंटरचे अच्युतराव आपटे, त्यावेळी पुण्यात असलेले सुपरिटेंडिंग इंजिनिअर एन. एस. जोशी आणि साखरवाडीत इस्टेट मॅनेजर असलेले त्यांच्या मोठ्या बहिणीचे सासरे श्रीधर गोपाळ देशपांडे यांची खूप मदत झाली होती. मोठी धरणे उभारताना धरणक्षेत्रातील पावसाचे जास्तीत जास्त प्रमाण नियोजनासाठी पकडले जाते, दरवर्षी तसा पाऊस पडेल व धरण पूर्ण भरेल असे गृहीत धरून प्रस्तावित बागायती क्षेत्राचे अतिशयोक्त आकडे कागदोपत्री दाखवले जातात; प्रत्यक्षात मात्र ते चुकीचेच ठरतात; ह्या मोठ्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचा फारसा आर्थिक लाभ झालेला नाही; उलट जे शेतकरी त्या पाण्यावर शेती करत राहिले त्यांच्यापेक्षा जे विस्थापित होऊन मुंबईसारख्या मोठ्या शहरात येऊन स्थायिक झाले व अन्य काही व्यवसाय करू लागले त्यांची आर्थिक स्थिती अधिक सुधारली असा त्यांचा निष्कर्ष होता.
पुढे ज्या शेतीक्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले त्या क्षेत्रातील त्यांचे हे पहिले वैचारिक पदार्पण होते. इतर कुठल्याही शेतीविषयक सुधारणेपेक्षा, शेतीमालाला चांगला भाव मिळणे हे शेतकऱ्यांसाठी अधिक गरजेचे आहे, ह्या त्यांनी भविष्यात केलेल्या मांडणीची सुरुवातही कुठेतरी ह्या अभ्यासात होती असेही म्हणता येईल. व्यक्तिशः जोशींना हा अभ्यास महत्त्वाचा वाटला होता. १ मार्च १९७६ रोजी स्वित्झर्लंडला असताना जोशींनी आपला एक बायोडेटा तयार केला होता व त्यात ह्या निबंधाचा त्यांनी उल्लेख केला आहे.
या निबंधस्पर्धेतील जोशींच्या यशालाही एक गालबोट लागले होते. विद्यापीठाचे कामकाज कसे चालायचे ह्याचे निदर्शक अशी ह्या स्पर्धेबाबत घडलेली ती घटना इथे नमूद करायला हरकत नाही. पूर्वी जाहीर झालेले पारितोषिकाचे तीनशे रुपये प्रत्यक्षात जोशींच्या हाती पडले नव्हते. नेमकी काय अडचण होती ते कळायला आज काही मार्ग नाही, पण जोशींच्या कागदपत्रांत मुंबई विद्यापीठाच्या रजिस्ट्रारच्या सहीचे एक पत्र म्हात्रे यांना सापडले. त्या पत्रात 'जोशी यांनी पुरस्काराच्या रकमेएवढी, म्हणजे तीनशे रुपयांची, पुस्तके खरेदी करावीत' असे लिहिले आहे. त्यातही तीन अटी आहेत! एक म्हणजे, ही पुस्तके एकाच दुकानातून व एकाच वेळी खरेदी केलेली असावीत; दोन, त्यांच्यावर विद्यापीठाचे नामांकन करण्यासाठी (for stamping the University Coat of Arms in gold') ती सर्व पुस्तके पुस्तकविक्रेत्याने आपल्या बिलासकट विद्यापीठाकडे पाठवावीत; आणि तीन, त्या नामांकनाचा खर्च म्हणून प्रत्येक पुस्तकामागे सहा आणे विद्यापीठ कापेल व तीनशे रुपयांतून ती रक्कम वजा करून उर्वरित रकमेच्या बिलाचे पैसे विद्यापीठाकडून दिले जातील! हा निबंध प्रकाशित करण्यासाठी विद्यापीठाने अनुमती द्यावी अशी विनंती जोशींनी तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाकडे केली होती. उपरोक्त पत्रातच त्या अर्जाला उद्देशून रजिस्ट्रारसाहेबांनी कळवले आहे की, "तुमची विनंती विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर विचारार्थ ठेवली जाईल व त्यांचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल."
हे पत्र जोशींना मिळाले तेव्हा ते पोस्टखात्यात नोकरीलाही लागले होते व बडोदा येथे कार्यरत होते! प्रत्यक्षात त्या रकमेची पुस्तके जोशींनी घेतली का, त्यांचे अपेक्षित तेवढे पैसे मिळाले का याची कुठेच नोंद नाही. दुर्दैवाने आज त्या निबंधाचीही प्रत उपलब्ध नाही. सर्वांत आश्चर्यजनक भाग म्हणजे या पत्रावरची तारीख आहे, २३ जानेवारी, १९५९. म्हणजेच निबंधस्पर्धेचा निकाल लागला त्याला तब्बल तीन वर्षे उलटून गेल्यानंतरची! या अविश्वसनीय विलंबाचे कारण काय असू शकेल? नोकरशाहीतील दिरंगाई की आणखी काही?
जोशींच्या कॉलेजजीवनातील एका वेधक प्रसंगाची माहिती जी. आर. दीक्षित या त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना १९ जानेवारी २००२ रोजी लिहिलेल्या एका पत्रात वाचायला मिळाली. प्रा. दीक्षित पुढे स्टेट बँकेत खूप वरच्या पदावर गेले व बँकिंग क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. हे सहा पानी स्वहस्ते लिहिलेले पत्र अतिशय वाचनीय असून जोशींचे कागदपत्र चाळताना ते मिळाले. त्यात प्रा. दीक्षित लिहितात,
सिडनम कॉलेजच्या दिवसांत तुमचं माझं जे काही बोलणं होत असे, त्याचे तुकडे तुकडे मला अजून आठवतात. त्याच्या गोड आठवणी मनात रेंगाळतात. अशीच एक आठवण. तुम्ही आणि मी चायनीज कॉन्स्युलेटमध्ये हो चि मिन्हला भेटायला गेलो होतो त्याची. मुंबईतल्या काही तरुण प्राध्यापकांना भेटायची इच्छा हो चि
मिन्हने प्रदर्शित केली होती. आम्हा सगळ्यांना बोलावणं केलेलं होतं पण प्रा. रणदिवे, प्रा. गाडगीळ वगैरे कोणी आले नाहीत. त्यांना असा सल्ला दिला गेला होता की 'तुम्ही जर हो चि मिन्हला भेटलात, तर सरकारदप्तरी त्याची नोंद होईल व मग तुम्हाला अमेरिका किंवा इंग्लंडला जायची स्कॉलरशिप मिळणं अडचणीचं होईल.' मला अमेरिका किंवा इंग्लंड या देशांच्या वारीचं इतकं कौतुक नव्हतं. मी मनाशी म्हटलं, की हो चि मिन्हसारखा जगविख्यात माणूस आपल्याला भेटू इच्छितो आहे, तेव्हा ही संघी काही आपण सोडायची नाही. त्याची ती मूर्ती व राहणी पाहून मला खूपच बरं वाटलं. बोटीवरच्या वेटरचा ड्रेसच त्याने घातला होता व बोलताना तो म्हणाला, की अशा कपड्यांचाही फक्त एकच जोड त्याच्याकडे आहे. तो असंही म्हणाला, 'आमचा देश गरीब आहे. त्यामुळे आमच्या हातात राजसत्ता जरी असली, तरी आम्ही गरिबीतच राहिलं पाहिजे. तसं राहिलो, तरच आम्ही त्यांच्यातले आहोत असं लोकांना वाटेल.' Acceptance through identification' या मूलतत्त्वाचाच त्याने पुनरुच्चार केला होता. त्यानी गांधी व औरंगझेब यांच्या साधेपणे राहण्याची वाखाणणी केली. उठता उठता तो म्हणाला, माझ्या आयुष्याची सुरुवात मी बोटीवरचा वेटर म्हणून केली व नंतर बरीच वर्षे मी तीच नोकरी केली. त्यामुळे माझी राहण्याची पद्धत ठरून गेली आहे. त्यात बदल करावा असं मला कधी वाटलं नाही. पुढच्या आयुष्यात अनेक नामवंत लोकांना मी भेटलो; पण हो चि मिन्हची ही आठवण माझ्या मनात चिरंतन राहिलेली आहे.
व्हिएतनामच्या या क्रांतिकारक भाग्यविधात्याला भेटणे, विशेषतः त्या काळात, हा नक्कीच एक रोमांचकारक अनुभव असला पाहिजे. जोशींच्या लेखनात किंवा बोलण्यात या भेटीचा कुठेच कसा उल्लेख झाला नाही, याचे काहीसे नवल वाटते. हो चि मिन्ह यांचे बलाढ्य अमेरिकेविरुद्ध जिद्दीने उभे ठाकलेले एक कडवे साम्यवादी म्हणून दीक्षित यांना खूप कौतुक वाटले होते, पण वैचारिक पातळीवर दीक्षित कायमच खुल्या अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. याच पत्रात त्यांनी विद्यार्थिदशेत असतानापासूनच जोशींवर अ ॅडम स्मिथ वगैरे अभिजात (क्लासिकल) अर्थशास्त्र्यांचा प्रभाव कसा होता व तेव्हापासूनच जोशीही मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक कसे होते याचाही कौतुकाने उल्लेख केला आहे. जगदीश भगवती व अशोक देसाई यांच्यासारख्या मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक राहिलेल्या त्यांच्या काही इतर विद्यार्थ्यांचाही ते उल्लेख करतात. हा सगळा १९५२ ते १९५८ हा कालखंड आहे; जेव्हा उदारीकरण वगैरे शब्दही भारतात फारसे वापरात नव्हते व सोव्हिएतप्रणीत समाजवादी विचारांचा पगडा सर्वव्यापी होता. पण नवल म्हणजे त्या विद्यार्थिदशेपासूनच जोशी यांच्यावर खुल्या (लिबरल) विचारसरणीचा प्रभाव होता. त्या पत्रात दीक्षित लिहितात,
"आज जेव्हा मी माझे बहुसंख्य विद्यार्थी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन व ग्लोबलायझेशनचा पुरस्कार करताना बघतो, तेव्हा मी जे काही त्या काळात आग्रहाने शिकवलं, त्याचं फळ मिळाल्याचं समाधान मला मिळतं.
"जास्त काय लिहू? पुन्हा काही लिहायची वेळ येणार नाही. आता माझे डोळे पैलतीरी लागले आहेत. वैतरणा नदीत घोट्याइतक्या पाण्यात उभा आहे, नदी केव्हा पार होते आहे याची मला उत्कंठा लागलेली आहे, घाई लागली आहे."
असा या आठ-पानी हस्तलिखित पत्राचा शेवट आहे. दीक्षित यांचे हे जणू अखेरचे पत्र असावे असे वाटते व म्हणूनच त्याचे मोल अधिक वाटते.
१९५२-५३ या वर्षात जोशी कॉलेजातल्या मराठी वाङ्मय मंडळाचे सदस्य होते; १९५३-५४ या वर्षात विकास या कॉलेजात निघणाऱ्या भित्तिपत्रकाचे संपादक होते. १९५४-५५ सालात कॉलेजातील जनरल बँकिंग असोसिएशनचे ते सरचिटणीस होते. मात्र त्या सहा वर्षांत कॉलेजबाहेरच्या जीवनात त्यांनी काय काय केले, कुठल्या उपक्रमांत भाग घेतला, कुठले सिनेमे बघितले, कुठले छंद जोपासले, कोणाशी त्यांची मैत्री झाली वगैरेबद्दलच्या काही आठवणी उपलब्ध नाहीत. ना त्यांनी स्वतः त्याबद्दल काही लिहिले आहे. ना संभाषणात कधी त्यांनी त्याचा उल्लेख केला. अपवाद म्हणजे आपल्या कॉलेजात एकदा त्यांनी दुर्गाबाई भागवत यांना कसे आमंत्रित केले होते याविषयी त्यांनी लिहिले आहे. दुर्गाबाईंविषयी ते बरेच ऐकून होते. फोर्टमधील प्रसिद्ध एशियाटिक लायब्ररीत कधी जाणे झाले तर तिथे आपल्या व्यासंगात कायम गढलेल्या दुर्गाबाई दिसत; पण त्यांच्या समाधीचा भंग करून त्यांच्याशी काही बोलायचा जोशींना धीर होत नसे. एकदा मात्र त्यांनी दुर्गाबाईंना आपल्या कॉलेजात व्याख्यानासाठी बोलावले होते. मध्यप्रदेशच्या एका जिल्ह्यातील आदिवासींचे जीवन, इतिहास, संस्कृती, राहणीमान यांविषयी त्या बोलल्या. बहुसंख्य विद्यार्थ्यांना आदिवासी जीवनाचा काहीच परिचय नव्हता व दुर्गाबाईंच्या भाषणाने एक नवेच जग त्यांना दिसले. सारे सभागृह भारावून गेले होते.
बऱ्याच वर्षांनी आणीबाणीविरुद्ध ज्या धाडसाने दुर्गाबाईंनी आवाज उठवला त्याचे जोशींनी कौतुक केले होते. पण त्यांना त्याहूनही अधिक कौतुक होते ते आणीबाणीच्या काळात मिळालेल्या तेजोवलयाचा आणि लोकप्रियतेचा हव्यास दुर्गाबाईंनी जराही ठेवला नाही; निवडणुका संपताच त्या साऱ्यातुन निःसंगपणे मोकळ्या झाल्या, आपल्या व्यासंगाच्या विषयाकडे वळल्या आणि अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यातच रमल्या; या गोष्टीचे.
मे १९५५ मध्ये जोशी बीकॉम झाले. १००० पैकी ५२८ गुण मिळवून; म्हणजे द्वितीय वर्गात. कॉमर्समधील गुणांची टक्केवारी त्याकाळी कमीच असे. पुढील दोन वर्षे त्यांना विद्यापीठातर्फे दिली जाणारी महिना रुपये तीसची मेरिट स्कॉलरशिप मिळाली. अॅडव्हॉन्स्ड बँकिंग या विषयात कॉलेजात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला सी. ई. रँडल (Randle) सुवर्णपदक कॉलेजतर्फे दिले जाई. त्यावर्षी ते जोशींना मिळाले.
त्या सुवर्णपदकाचीही एक गंमत आहे. हे सुवर्णपदक मिळाल्याचे कळवणाऱ्या प्राचार्यांच्या २८ नोव्हेंबर १९५५च्या इंग्रजी पत्रातले शेवटचे वाक्य आहे, “सोन्याचा भाव अतिशय वाढलेला असल्याने ह्या पदकाच्या मूल्याइतकी रक्कम जोशी यांना रोख दिली जाईल." त्याप्रमाणे त्यांना सुवर्णपदकाऐवजी रुपये १०५ रोख दिले गेले!
१९५७ साली जोशी एमकॉम झाले. पुन्हा द्वितीय वर्गात; ८०० पैकी ४१३ गुण मिळवून. इंटरनॅशनल बँकिंग व स्टॅटिस्टिक्स हे विषय घेऊन. सहा वर्षांपूर्वी अनपेक्षितरीत्या सुरू केलेली व त्यावेळी खूप अवघड वाटलेली कॉमर्स कॉलेजची यात्रा सुफळ संपूर्ण झाली.
जडणघडणीच्या ह्या कालखंडाकडे आज मागे वळून बघताना जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोन वैशिष्ट्ये त्या काळातही प्रकर्षाने जाणवतात.
एक म्हणजे त्यांची प्रखर बुद्धिनिष्ठा - प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या निकषावर पडताळून पाहायची आणि पटली तरच स्वीकारायची वृत्ती. दुसऱ्याने सांगितले म्हणून त्यांनी ऐकले, मानले असे सहसा कधी होत नसे.
ते बारा-तेरा वर्षांचे असतानाचा एक प्रसंग. बसल्याबसल्या त्यांच्या मनात एक विचार आला. 'आपण किती नशीबवान आहोत! भारतासारख्या श्रेष्ठ देशात जन्मलो, त्यात पुन्हा शिवरायांच्या आणि ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात जन्मलो, त्यातही सर्वश्रेष्ठ अशा हिंदू धर्मात आणि त्याहून विशेष म्हणजे ब्राह्मण कुलात जन्मलो! जन्मतःच ह्या साऱ्या दुर्लभ गोष्टी आपल्याला लाभल्या; किती आपण भाग्यवान!'
पण मग लगेच त्यांनी त्या विचाराचे स्वतःच्याच मनाशी विश्लेषण करायला सुरुवात केली. अनेक प्रश्न मग त्यांच्या मनात निर्माण झाले. 'भारत देश सर्वश्रेष्ठ कसा? जगातील अत्यंत गरीब, दुष्काळाने गांजलेल्या देशांत भारत मोडतो. मग असे राष्ट्र सर्वश्रेष्ठ कसे असेल? महाराष्ट्रात शिवराय आणि ज्ञानेश्वर जन्मले, पण इतर प्रांतांतही अशी नररत्ने जन्मलीच आहेत व त्या-त्या प्रदेशातील लोकांना त्यांच्या-त्यांच्या प्रदेशात जन्मलेल्या नररत्नांचा अभिमान असतोच. आपणही त्या प्रदेशात जन्मलो असतो तर आपल्यालाही त्यांच्याविषयी तेवढाच अभिमान वाटला असता. हिंदू धर्मातही सर्वश्रेष्ठ असे काय आहे? जगात जास्तीत जास्त उपासक असलेले धर्म बुद्ध आणि ख्रिस्त यांचे आहेत. इस्लामही अनेक देशांत पसरला आहे. मग एकाच भूखंडात मर्यादित असलेल्या या हिंदू धर्माला सर्वोत्तम म्हणणे म्हणजे खोट्या अभिमानाचे लक्षण नाही का? आणि ब्राह्मण श्रेष्ठ मानणे तर किती मुर्खपणाचे! ब्राह्मणांत काय सगळे महापुरुषच जन्मले? अपकृत्य करणारे कुणी झालेच नाहीत? आणि इतर जातींत जन्मूनही अलौकिक कृत्ये करणारेही अनेक असतातच!'
या कठोर उलटतपासणीने ते अगदी हादरून गेले. जन्माच्या अपघाताने मिळालेल्या गोष्टींचा वृथा अभिमान बाळगण्याची आपल्यात प्रवृत्ती आहे आणि ती मोडून काढली पाहिजे, याची त्यांना मोठ्या प्रकर्षाने जाणीव झाली. त्या दिवसापासून त्यांनी एक निश्चय केला. जन्माच्या अपघाताने आपल्याला जे जे मिळाले असेल, ते अती कनिष्ठ आहे, असे समजून विचाराची सुरुवात करायची आणि जेथे सज्जड पुरावा मिळेल, तेथेच आणि त्या पुराव्याने सिद्ध होईल तेवढेच, जन्मसिद्ध गोष्टींचे बरेपण मान्य करायचे. अशी शिस्त त्यांनी आयुष्यभरासाठी बाणवून घेतली.
रूढ अर्थाने त्यांचे परीक्षेतील गुणांच्या स्वरूपात प्रकट झालेले यश फारसे नेत्रदीपक नसेल; पण त्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन विचार करताना त्यांची प्रखर बुद्धिमत्ता आणि बुद्धिप्रामाण्य सतत जाणवते. स्वतःच्या वागण्याचे, स्वतःच्या स्वभावाचे ते पुनःपुन्हा विश्लेषण करताना आढळतात. जे ऐकले किंवा बघितले तेही सारे त्यांनी जसेच्या तसे कधीच स्वीकारले नाही, तर प्रत्येक गोष्टीचा स्वतः विचार करून त्यातून काय बोध घ्यायचा तो ते घेत गेले.
तीव्र आत्मभान हा जोशी ह्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बालपणापासून ठळकपणे जाणवणारा दुसरा विशेष म्हणता येईल. तसे हे आत्मभान किंवा स्वत्वाची जाणीव प्रत्येकातच असते, पण जोशींमधे त्याची तीव्रता खूप अधिक असल्याचे जाणवते.
ह्या तीव्र आत्मभानाचे अनेक तरल पदर ह्या कालखंडात आढळतात. इतरांच्या तुलनेतले आपले वेगळेपण (exclusivity) अधोरेखित करण्याची प्रवृत्ती किंवा मानसिक गरज, महत्त्वाकांक्षा, मनस्वीपणा, मानीपणा, अहंकार, आत्मविश्वास, आत्मकेंद्रितता, हेकटपणा, आत्मभानाला धक्का पोहोचल्यास उफाळून येणारी असुरक्षिततेची भावना इत्यादी – पण मूलतः हे त्या आत्मभानाचे विविध आविष्कार असावेत.
पूर्वी लिहिल्याप्रमाणे काही शारीरिक कमतरतांमुळे न्यूनगंड निर्माण होऊ न देता त्यांच्यावर मात करायची जिद्दही ह्या आत्मभानातूनच आली असावी. शिकवणीला असलेला विरोधही तसाच.
विलेपार्ल्याला शिकत असताना मोठ्या भावाशी, म्हणजे बाळशी, धाकट्या शरदचे एकदा कशावरून तरी जोरदार भांडण झाले. त्यावेळी माईंना मधे पडावे लागले. चूक शरदची आहे असे बहुधा त्यांना वाटले. शब्दाने शब्द वाढत गेला. रागाच्या भरात त्या शरदला खूप रागावल्या, थोडे मारलेही. आपण काहीच चूक केलेली नाही असे शरदचे म्हणणे; ते काही त्याने शेवटपर्यंत सोडले नाही. तरीही आई आपल्यालाच ओरडली व आपल्याला तिने मारलेही, यात आपला मोठा अपमान झाला असे वाटून शरद रागाने घरातून निघून गेला. कुठे जायचे काहीच नक्की नव्हते. खिशात फारसे पैसे नाहीत, वय अवघे १३-१४. रात्र झाली तरी तो घरी परतला नाही, तशी घरची सगळी मंडळी प्रचंड काळजीत पडली. त्याचे जोशी याच आडनावाचे एक मावसभाऊ पोलीस इन्स्पेक्टर होते, त्यांची यात खूप मदत झाली. त्यांच्याच संपर्कातल्या कोणीतरी तब्बल दहा दिवसांनी शरदला इगतपुरीला बघितले व मग तिथे जाऊन वडलांनी त्याला ताब्यात घेतले. पायीच चालत चालत, इकडे तिकडे भ्रमंती करत तो इतक्या लांबवर पोचला होता.
त्यांच्या मोठ्या भगिनी सिंधूताई जोशींनी एके ठिकाणी लिहिले आहे, "तो प्रसंग आठवला,को हृदयात अजून कालवाकालव होते." हाही एक जोशीच्या आत्मभानाचा किवा मनस्वीपणाचा नमुना.
या आत्मभानाचाच एक आविष्कार म्हणजे आपले वेगळेपण अधोरेखित करत राहणे. उपरोक्त लेखातच सिंधूताई लिहितात,
शरदचे एक वैशिष्ट्य असे, की इतरांपेक्षा आपले काही वेगळे असावे असे त्याला वाटते. नमाताई व मी गाणे शिकू लागलो व बाळ तबला शिकू लागला. शरदनेही काही शिकावे अशी आईची इच्छा होती. आईला पेटी वाजवता येई. शरदचा आवाज गोड. म्हणून आईने एकदा पेटी वाजवून 'शुभं करोति' म्हणायचे म्हटले, तर शरदने नकार दिला. तेच शिक्षणाचे. 'सर्वांनी काय सायन्स आणि आर्ट्स करायचे, मी कॉमर्स घेणार' असे म्हणून त्याने एमकॉम केले.
(चतुरंग, दैनंदिनी २०१२, पृष्ठ ७५)
इतरांना खूप अवघड व भावी करिअरच्या दृष्टीने अनपयुक्त वाटणारा संस्कृत विषय त्यांनी घेतला, ज्यांचा अर्थही सगळ्यांना नीट समजत नाही अशा संस्कृत साहित्यात त्यांनी रस घेतला, या साऱ्या संस्कृतप्रेमामागेही निखळ आवडीपेक्षा इतरांपासून काहीतरी हटके, काहीतरी वेगळे करायची इच्छा असावी. "ती एक धुंदीच होती, मस्ती होती. इतरांना ज्या क्षेत्रात रस नाही, त्या क्षेत्रात आपण आकंठ आनंदात बुडून जात आहोत याचा अहंकारही मोठा असावा, असे त्यांनीही स्वतःच्या संस्कृतप्रेमाच्या संदर्भात लिहिले आहे.
"तू काय, संस्कृतचा प्राध्यापक बनणार," असे एका जवळच्या मित्राने सुचवल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया खूप तीव्र होती. ते लिहितात,
मी? विश्वाच्या निर्मितीतील एक प्रमुख प्रमेय असलेले माझे आयुष्य आणि हा कसेबसे ५४ टक्के मार्क मिळालेला मित्र मला माझी वाट सांगतो आहे? शब्दाशब्दाने वाद वाढला... मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा निश्चय जाहीर केला. केला म्हणजे केला. 'शेंडी तुटो वा पारंबी तुटो', आता माघार घेणे नाही. तोंडातून निघालेला शब्द मागे घेणे भाग पडून, होणाऱ्या अपमानाने मलिन झालेले जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे?
आपण पुढे काय करणार हे त्या मित्राने गृहीत धरावे याचा त्यांना राग आला होता. पुढे मोठेपणीही आपल्याला गृहीत धरले जाणे (being taken for granted) त्यांना मुळीच आवडत नसे.
दुसरे विशेष नोंद घेण्याजोगे म्हणजे, आपला निर्णय चुकीचा आहे हे जाणवूनसुद्धा त्यांनी आपल्या निवडीचा पुनर्विचार केला नाही. त्यातही पुन्हा पोद्दार कॉलेजसारखे सर्वसामान्य मराठी मुलाने निवडले असते ते कॉलेज न निवडता, त्यांनी सिडनमसारखे उच्चभ्रू व आपल्या घरापासून दुप्पट अंतरावर असलेले कॉलेज निवडले. ह्या साऱ्यातील हेकटपणा हाही त्या आत्मभानाचा किंवा आत्मविश्वासाचा एक आविष्कार वाटतो.
पुढे कॉमर्स कॉलेजचे वर्ग सुरू झाले आणि, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, 'हरियाली' सोडून 'पथरीला' रस्ता स्वीकारणाऱ्याच्या वेदना क्षणाक्षणाला जाणवू लागल्या. पण तरीही ते त्याच वाटेने पुढे जात राहिले. आपण जे करायचे ठरवतो, त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट उपसायची त्यांची तयारी असायची असेही दिसते. 'की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने' ही सावरकरांची ओळ त्यांची आवडती होती. ही कष्ट सहन करण्याची आत्यंतिक क्षमता हीदेखील त्या तीव्र आत्मभानातून किंवा मनस्वीपणातून येत असावी.
बऱ्याच वर्षांनी ह्या निर्णयाबद्दल जोशींनी लिहिले आहे,
प्राणापेक्षा प्रिय असलेल्या सीतेचाही, राजधर्माचे परिपालन करण्याकरिता, त्याग करायला मी मागेपुढे पाहणार नाही, अशा रामचंद्री अभिनिवेशात मी संस्कृत अभ्यासक्रम न घेण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. वर्षानुवर्षे ज्या आयुष्यक्रमाची तयारी केली, तो क्षणार्धात हेकटपणे लाथाडला. आता पुढे काय? आईवर रागावलेले बाळ हट्ट करून जेवायला नकार देते; त्यामुळे आईचे हृदय पिळवटते आहे, या जाणिवेत त्याला काय आनंद होतो? लव-कुशांनी रामाच्या साऱ्या सैन्याचा पराभव केला, सीतेचे निष्कलंकत्व सिद्ध झाले. तिला कोणी पतिता म्हटले असते, तर लव-कुशांचे पराक्रमसिद्ध धनुष्यबाण आकर्ण ताणून सिद्ध झाले असते. तरीही 'सीतेने पुन्हा एकदा अग्निदिव्य करावे' असा आग्रह धरून रामाने मनातल्या मनात कोणत्या असीम कडूजहर सुखाचा अनुभव घेतला?
(अंगारमळा, पृष्ठ ५१)
हा परिच्छेद जोशींच्या मनस्वी स्वभावाची व असामान्य भाषाप्रभुत्वाची साक्ष पटवतोच; पण त्यातील अर्थबाहुल्य त्यापलीकडे जाणारे आहे असे जाणवते. 'आईचे हृदय पिळवटते आहे, या जाणीवेत त्याला काय आनंद होतो?' किंवा कोणत्या असीम कडूजहर सुखाचा अनुभव घेतला?' यांसारख्या शब्दरचना काहीशा गूढ वाटतात. 'आपल्या लोकत्तरतेच्या धुंदीत, आपल्या हातानेच आपले आयुष्य कडू करून घेण्यात गोडी मानणारे' हे पृष्ठ २८वर उद्धृत केलेले त्यांचे शब्दही काहीतरी वेगळे सूचित करत आहेत असे जाणवते. पण जोशींनी स्वतः त्याचे नेमके स्पष्टीकरण त्यांच्या लेखनात कुठेच दिलेले नाही.
प्रखर बुद्धिनिष्ठा आणि तीव्र आत्मभान ही पूर्वायुष्यात जाणवणारी जोशींची दोन व्यक्तिवैशिष्ट्ये व त्यांचे विविधांगी आविष्कार भावी वाटचालीचा मागोवा घेतानाही आपल्याला पुनःपुन्हा जाणवत राहतात.
◼
संस्कृतकडे पाठ फिरवून शरद जोशी कॉमर्सला गेले व जिद्दीने अभ्यास करून जून १९५७मध्ये चांगल्या प्रकारे एमकॉम झाले. अर्थशास्त्राची त्यांना खूप गोडीही वाटू लागली हे खरे, पण ते शिक्षण चालू असतानाच 'एमकॉमनंतर पुढे काय' हा प्रश्न समोर उभा राहिला होता. कॉलेजात त्यांना दोन वर्षांसाठी मिळालेली महिना तीस रुपयांची स्कॉलरशिप सोडली तर बाकी काहीच कमाई नव्हती. आजवर वडलांनीच राहण्याचा, प्रवासाचा, पुस्तकांचा व शिक्षणाचा सारा खर्च केला होता, त्यासाठी त्यांनी मुलाला अर्धवेळ नोकरी वा शिकवणी करून वा अन्य कुठल्याही प्रकारे घरखर्चाचा भार उचलायला लावले नव्हते हे खरे; पण त्याचबरोबर वडलांच्या व नुकत्याच नोकरीला लागलेल्या मोठ्या भावाच्या पगारात आपले आठ जणांचे कुटुंब कसेबसे गुजराण करत आहे ह्याची जाणीव जोशींना होती. त्यामुळे शिकत असतानाच एकीकडे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पूर्वतयारी सुरू केली होती. ज्यांचा तत्कालीन आर्थिक विश्वात खूप दबदबा होता ते डॉ. सी. डी. देशमुखदेखील मूळचे आयसीएस होते. जोशींचे वडील सरकारी नोकरीत असल्याने तशा पदाचे त्यांना, नाही म्हटले तरी, लहानपणापासून थोडेफार आकर्षण होतेच. त्याकाळी ही स्पर्धापरीक्षा देणे, तिचा निकाल जाहीर होणे, त्यानंतर मुलाखत, तिचा निकाल आणि हे सगळे सोपस्कार यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर प्रत्यक्ष नेमणूक होणे ह्यात वर्षभराहून अधिक काळ सहज जात असे. दरम्यानच्या या कालावधीत अर्थार्जन करणे आणि निदान स्वतःचा खर्चतरी भागवणे बावीस वर्षांच्या जोशींच्या दृष्टीने अपरिहार्यच होते.
त्या दृष्टीने त्यांनी मुंबई विद्यापीठाकडे व्याख्यातेपदासाठी अर्ज केला तत्कालीन नियमांनुसार हे अर्ज त्या-त्या विषयासाठी स्वतंत्ररीत्या करावे लागत असत; म्हणून अर्थशास्त्र, संख्याशास्त्र व व्यापार अशा तीन विषयांसाठी तीन स्वतंत्र अर्ज त्यांनी केले होते. पण बरेच दिवस थांबूनही विद्यापीठाकडून काहीच उत्तर आले नाही. दरम्यान त्यांना एक आमंत्रण आले; कोल्हापूरला एका नव्या कॉमर्स कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून दाखल व्हायचे.
त्याकाळी मुंबई आणि पुण्यापलीकडच्या ग्रामीण महाराष्ट्रात उच्चशिक्षणाचे प्रमाण कमीच होते; वाणिज्य शाखेला तसाही वाव कमीच असायचा. त्यामुळे कोल्हापूरसारख्या ठिकाणी एखादे कॉमर्स कॉलेज सुरू करणे ही कल्पनाच जोशींना हास्यास्पद वाटली. पण ज्यांनी हे आमंत्रण दिले होते ते प्रा. भालचंद्र शंकर भणगे स्वतःच पूर्वी सिडनममध्ये शिकवत होते व जोशी त्यांचेच एक विद्यार्थी होते. केवळ हे नवे कॉलेज सुरू करण्यासाठी म्हणून प्रा. भणगे यांनी सिडनममधील मानाची नोकरी सोडली होती. आपल्या ह्या गुरूंबद्दल, त्यांच्या ज्ञानाबद्दल जोशींना बराच आदर होता. आता ह्या नव्या कॉलेजच्या उपक्रमात त्यांना जोशींसारख्या त्यांच्या हुशार विद्यार्थ्यांचा सहभाग हवा होता. त्यांना नकार देणे जोशींना जड झाले. शिवाय, प्रत्यक्ष भेटीत चर्चा करताना भणगे यांनी अगदी गळच घातली. त्यांचा मुद्दा असा होता, की नाहीतरी जोशी काही व्याख्याता म्हणून कायम नोकरी करणार नाहीएत, स्पर्धापरीक्षा व नंतरच्या मुलाखती पार पडेस्तोवरच त्यांना अध्यापन करायचे आहे; तेव्हा ते मुंबईत केले काय किंवा कोल्हापुरात केले काय, काहीच फरक पडणार नाही. याशिवाय, अतिरिक्त आकर्षण म्हणून तीन वर्षांनंतर मिळू शकणारे वेतन भणगे यांनी जोशींना पहिल्या महिन्यापासूनच द्यायचे कबूल केले. त्या दिवसापर्यंत मुंबई विद्यापीठाकडून काहीच उत्तर आलेले नसल्याने व कॉलेज सुरू व्हायची वेळ अगदी जवळ येऊन ठेपल्यामुळे जोशींनाही नोकरीची घाई होती. शेवटी जोशींनी भणगे यांना होकार दिला व लगेचच ते कामावर हजर झाले.
कोल्हापूर येथील एक प्रसिद्ध काँग्रेसनेते रत्नाप्पाअण्णा कुंभार यांच्या आधिपत्याखालील लीगल एज्युकेशन सोसायटीने हे महाविद्यालय सुरू केले होते. रत्नाप्पा कुंभार यांनी कॉलेज सुरू करण्याची सर्व व्यावहारिक जबाबदारी प्राचार्य या नात्याने भणगे यांच्यावर सोपवली होती. जो कोणी येईल त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला गेला. कारण कॉमर्स कॉलेज हा प्रकारच कोल्हापुरात प्रथम सुरू होत होता. साधारण शे-सव्वाशे विद्यार्थी दाखल झाले होते. त्यातले काही वयाने बरेच मोठे व बारीकसारीक नोकऱ्या करणारे होते. त्या सगळ्यांना सोयीचे व्हावे म्हणून कॉलेजची वेळ सकाळी साडेसात ते साडेदहा अशी ठेवली गेली. कॉलेज प्रत्यक्ष सुरू होईस्तोवर ऑगस्ट महिना उजाडला. कोल्हापुरातील बिंदू चौकात तोफखाना बिल्डिंग नावाची एक जुनाट लांबलचक कौलारू इमारत होती. तिथेच हे कॉलेज भरू लागले. इमारतीच्या आवारातच एक भले मोठे, डेरेदार वडाचे झाड होते व त्याची सावली सगळे कॉलेज कवेत घेणारी होती. त्या भव्य वृक्षामुळे एखाद्या प्राचीन आश्रमाप्रमाणे तेथील वातावरण वाटायचे.
अशा नव्या कॉलेजसाठी कोल्हापुरात प्राध्यापक मिळणे अवघड होते. कशीबशी भणगे यांनी सगळी जुळवाजुळव केली. एन. व्ही. शिवांगी नावाचे एक बेळगावला व्यवसाय करणारे चार्टर्ड अकौंटंट त्याच कॉलेजात लागले होते. विद्यापीठाच्या नियमानुसार अकाउंटिंग व ऑडिटिंग हा विषय शिकवणारी व्यक्ती स्वतः चार्टर्ड अकौंटंट असणे आवश्यक होते; पण तशी कोणी व्यक्ती कोल्हापुरात उपलब्ध होईना. त्यामुळे मग खास सवलत म्हणून शिवांगी यांना बेळगावहून कोल्हापूरला यायचे-जायचे टॅक्सीभाडे द्यायचे कॉलेजने कबूल केले व त्यानंतरच शिवांगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेही स्वतः पूर्वी सिडनमचेच विद्यार्थी होते. त्यांनी लिहिलेल्या In the making of a personality या आत्मचरित्रानुसार पहिल्या वर्षी ते स्वतः, प्राचार्य भणगे, शरद जोशी व एम. व्ही. कुलकर्णी असे चारच जण ह्या कॉलेजात शिकवत. शेवटचे दोघे भणगे यांचेच माजी विद्यार्थी होते. त्यातले कुलकर्णी पुढे अलाहाबाद बँकेचे जनरल मॅनेजर बनले. भणगे स्वतः पुढे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
एक निष्णात प्राध्यापक म्हणून भणगेंचा लौकिक मोठा होता आणि म्हणूनच रत्नाप्पाअण्णांनी सगळी भिस्त त्यांच्यावर सोपवली होती. होते ते तसे काहीसे बुटके व स्थूल; पण त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा ध्येयवाद, टापटीप यांमुळे त्यांची एकदम छाप पडत असे. नेहमी ते सुटाबुटात वावरत. कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज काढणे म्हणजे मोठे आव्हान आहे ह्याची त्यांना जाणीव होती; किंबहुना म्हणूनच त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम त्याकाळी इंग्रजी असूनही वर्गात ते अधूनमधून मराठीतही बोलत; विद्यार्थ्यांना सगळे नीट समजावे म्हणून. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही ते आपलेसे वाटत. त्यांचा स्वभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा, सहकाऱ्यांना प्रेरित करण्याचा होता. शिवाय, संस्थाप्रमुख रत्नाप्पा कुंभार हेदेखील सदैव त्यांच्या मदतीला तयार असत. कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज सुरू करणे हा त्यांच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेचा प्रश्न होता.
स्वतः जोशींच्या बाबतीत सुरुवातीलाच एक पेच निर्माण झाला. इथले कॉलेज सुरू होऊन जेमतेम तीन दिवस झाले आणि अचानक मुंबई विद्यापीठातील तीनही व्याख्यातेपदांसाठी निवड झाल्याच्या तीन तारा त्यांना एकाच दिवशी मिळाल्या! कुठले पद स्वीकारायचे हा निर्णय विद्यापीठाने त्यांच्यावरच सोपवला होता. जोशी ह्यांची पुन्हा एकदा द्विधा मनःस्थिती झाली. भणगे यांना सोडून जायचा बराच मोह झाला; पण भणगेंनी पन्हा काकुळतीने मनधरणी केली. 'मुंबई विद्यापीठाला तुमच्यासारखे इतर अनेक व्याख्याते मिळतील, पण आम्हाला इथे माणसं मिळवणं खूप अवघड आहे. एकदा तुम्ही इथे यायचं कबूल केल्यावर व त्या भरवश्यावर आम्ही कॉलेज सुरू केल्यावर तुम्ही आम्हाला असं मध्येच सोडून जाणं अन्यायाचं होईल, वगैरे ते सांगू लागले. नैतिकदृष्ट्या त्यांचे म्हणणे बरोबरही होते. शेवटी जोशींनी कोल्हापुरातच राहायचा निर्णय कायम केला. इथे राहूनच ते लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणार होते.
कोल्हापूर येथील पद्मा गेस्टहाउसमध्ये जोशी राहू लागले. मुंबईतील कॉलेजात इतर सर्व धनिक मुलांमध्ये त्यांची गणना गरीब विद्यार्थ्यांमध्येच होत होती; इथे मात्र ते एकदम धनवानांत गणले जाऊ लागले. त्याकाळी त्यांचा मासिक पगार प्राचार्यांच्या औदार्यामुळे महिना २१० रुपये होता व त्या परिस्थितीत एकट्या माणसासाठी तो खूप वाटत होता. कोल्हापुरातल्या अगदी सर्वोत्तम लॉजमध्येही महिन्याभराच्या शाकाहारी जेवणाचे फक्त तीस रुपये होत होते; मांसाहारी जेवणाचे पाच रुपये जास्त.
जोशींचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार होते. सहा फूट एक इंच उंची, भरदार शरीरयष्टी, चेहऱ्यावर बुद्धीचे तेज आणि मुंबईतील वास्तव्यात अंगी बाणलेला चटपटीतपणा याचे नाही म्हटले तरी ग्रामीण विद्यार्थ्यांवर एक दडपण यायचे. कॉलेजात इंग्रजीतून शिकवताना जोशी एकही मराठी शब्द वापरत नसत. इतर कॉलेजांतील मुलेही केवळ जोशींचे इंग्रजी ऐकण्यासाठी म्हणून वर्गात येऊन बसायची. पण इतक्या अस्खलित इंग्रजीची तिथल्या मुलांना अजिबात सवय नव्हती. ती सगळी मराठी माध्यमातली; अगदी अचंबित होऊन 'अजि म्यां ब्रह्म पाहिले' असा चेहरा करून नुसते ऐकत राहायची. जोशींची एकूण देहबोलीही अशी असायची, की हात वर करून काही शंका विचारायचीदेखील मुलांना भीती वाटायची. कधी कोणी धाडस करून काही विचारलेच तर जोशी 'एवढं कसं कळत नाही तुम्हाला?' असेच जणू सुचवणाऱ्या नजरेने बघायचे.
कधी कधी जोशींना वाटायचेदेखील, की मुलांना सगळे समजेल अशा सोप्या भाषेत शिकवावे. पण मग सिडनममधले प्राध्यापक त्यांच्या डोळ्यापुढे येत – मुरंजन, दीक्षित वगैरे. आपण शिकवतो ते सारे विद्यार्थ्यांना समजते आहे की नाही ह्याची काळजी तेही करत नसत. आपल्याच नादात, आपल्याच गतीने ते शिकवत जायचे. जोशींसारख्ने विद्यार्थी जीव मुठीत धरून त्यांच्यामागे धावायचे; पुरती दमछाक व्हायची; पण मग हळूहळू जोशींचा दम वाढत गेला, स्वतःच झेप घ्यायची ताकद आली आणि काही दिवसांनी सगळे प्रयत्नांती समजू लागले. 'मग मीतरी विद्यार्थ्यांच्याच गतीने कशासाठी जायचे? त्यांचे त्यांनाच नाही का हळहळू समजू लागणार?' - जोशी स्वतःला विचारत.
त्याचबरोबर आणखीही एक होते; आपल्या इंग्रजीवरील प्रभुत्वाचा व सिडनमसारख्या कॉलेजातील उच्चभ्रू वातावरणात सहा वर्षे काढल्याचा जोशींना, नाही म्हटले तरी, अभिमान होताच. त्यांच्या शिकवण्यातही त्यामुळे थोडासा डामडौल, थोडासा मिरवण्याचा भाग यायचा. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, "मोराने आपलाच पिसारा खुलवून नाचावं आणि त्यातच समाधान मानावं तसा हा प्रकार होता."
शरद देशपांडे यांनी पुढे पुण्यात सेतू नावाची एक जाहिरात एजन्सी काढली, ती उत्तमप्रकारे वाढवली व अनेक वर्षांनी शेतकरी संघटनेशी त्यांचा व्यावसायिक पातळीवरही संबंध आला. याच लेखात त्याबद्दल देशपांडे लिहितात,जोशीसर अतिशय कमी बोलायचे. एकूण प्रकृती गंभीर. त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त भीती वाटायची. विद्यार्थ्यांत मिसळणं, त्यांच्याशी गप्पा मारणं वगैरे दूरची बात. एकच वर्ष ते आम्हाला शिकवायला होते. निरोप समारंभात ते म्हणाले, 'माझ्या पहिल्या प्रयोगाचे बेडूक तुम्ही झालात.' आज मी म्हणेन – तुमच्या प्रयोगातून एकतरी बेडूक आज सुखरूप सुटला आहे; तो महासागर तरून गेला आहे. महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा त्याने फार काही मिळवलंय. तुम्ही शिकवलेल्या विषयातच-सेल्समनशिप आणि पब्लिसिटी. मराठी जाहिराती वाचायच्या असतात हे पुणेकरांना त्याने दाखवून दिलंय. कोल्हापूरच्या तांबड्या मातीत बीज पेरलं, पण पुण्याच्या सुपीक भूमीत ते बीज रुजलंय. (चतुरंग दैनंदिनी २०१२, पृष्ठ ८७-८८)
पहिल्यांदा शरद जोशींना मी पत्र लिहिलं. 'मी नोकरी सोडली आहे. शेतकरी संघटनेच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचा पहिला हक्क, तुमचा एक विद्यार्थी म्हणून, माझा आहे. मला तो द्यावा ही आग्रहाची विनंती.' लगेच चार-पाचदा त्यांचा मला फोन आला. फोन दुसरीकडे असल्याने मला निरोप मिळायला उशीर झाला. जेव्हा मिळाला तेव्हा धावतपळत त्यांच्याकडे गेलो. ते म्हणाले, 'अरे, तू मोठा झालास. तीन-चार निरोप पाठवायला लागतात.' मी सत्य परिस्थिती सांगितली. जाहिरातींचं एस्टिमेट दिलं आणि सांगितलं, 'मी नुकतीच एजन्सी सुरू केली आहे, त्यामुळे काही ठिकाणी आधी पैसे द्यावे लागतील.' तेव्हा ते म्हणाले, 'जर आम्ही तुला पैसे दिले नाहीत, तर आम्ही सगळे तुझ्या घरी भांडी घासायला येऊ.' मी म्हणालो, 'पण सर, माझ्या घरी घासायला भांडी असली पाहिजेत ना!' त्यावर ते मंदसं हसले आणि त्यांनी मला आपल्या वैयक्तिक खात्यातून काही रकमेचा चेक दिला. माझ्या डोळ्यात पाणी तरारलं.
सुरुवातीला वर्गात शिकवण्यापलीकडे जोशींनी आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात फारसे कधी डोकावून बघितले नव्हते. दुसऱ्याच्या जीवनात फार दखल घेण्याचा त्यांचा स्वभावही नव्हता. पण नंतरच्या एका अनुभवाने त्यांना एक वेगळी दृष्टी दिली. एकदा गेस्टहाउसवर रात्रीचे जेवताना त्यांना वाढणाऱ्या मुलाने चाचरत चाचरत विचारले. "सर, मला ओळखलंत का?" त्यांनी मुलाकडे नीट मान वर करून बघितले, पण त्यांना काहीच ओळख पटेना. त्यांच्या कोऱ्या चेहऱ्याकडे बघून मुलानेच खुलासा केला. म्हणाला, "सर, मी तुमच्या वर्गातलाच एक विद्यार्थी आहे. खांडेकर माझं नाव." आपल्याच कॉलेजातला एक गरीब विद्यार्थी इथे चक्क वाढप्याचे काम करतो आहे, हे लक्षात येताच जोशी काहीसे हादरलेच. त्यांना एकदम आपल्या वडलांची आठवण झाली. एकेकाळी तेही ह्याच कोल्हापुरात वाढले होते; एक अनाथ विद्यार्थी म्हणून. कसेबसे माधुकरी मागून, वार लावून इकडेतिकडे जेवत. लहानपणी वडलांकडून ऐकलेले ते दिवस अचानक आठवले आणि जेवता जेवता जोशींना गलबलून आले, घासही गिळवेना. आपल्या वर्गातल्या इतर मुलांचे चेहरे त्यांच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. त्यांचीही परिस्थिती काही फारशी वेगळी असणार नव्हती. ते म्हणतात, “मी, माझी परीक्षा, माझे भविष्य, माझी स्वप्ने यांच्यापलीकडे असलेल्या एका जगाचा पडदा खांडेकरने उघडून दाखवला होता." यानंतर काही दिवसांनी ते कॉलेजच्या वसतिगृहावरच राहू लागले; कारण वसतिगृह सांभाळणे ही अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. त्याकाळी ग्रामीण तरुणांनी शहरातील कॉलेजात शिकायला यायचे प्रमाण तसे कमी होते; पुढे सरकारने सर्वांच्या फीची व्यवस्था केल्यावर व इतरही सवलती उपलब्ध झाल्यावर ते वाढले. त्यावेळी जी मुले शहरात शिकायला येत, त्यांना वसतिगृहात किंवा अशीच कुठेतरी स्वतःची सोय करावी लागे. आता संपूर्ण दिवस जोशी या विद्यार्थ्याबरोबरच घालवू लागले; त्यांचे वागणे-बोलणे, उठणे-बसणे जवळून पाहू लागले. वर्गातील बहुतेक विद्यार्थी छोट्या छोट्या गावांतील शेतकरी कुटुंबातील होते. ते बहुसंख्य विद्यार्थी आणि सुशिक्षित कुटुंबातील मूठभर शहरी विद्यार्थी यांच्यातली दरी अनुल्लंघनीय वाटावी इतकी प्रचंड होती. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणाची काहीच परंपरा नव्हती, इंग्रजीचा गंधही नव्हता, आर्थिक ऐपतही नव्हती. ते कुपोषित आहेत हे त्यांच्याकडे बघितल्याबरोबरच कळत असे. ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकून ती मुले आता एकदम कोल्हापूरच्या कॉलेजात दाखल झाली होती. अत्यंत मागासलेले त्यांचे कुठलेतरी आडगाव आणि कोल्हापूरसारखे तुलनेने समृद्ध असलेले शहर यांच्यातील फरकच इतका होता, की हे विद्यार्थी अतिशय बुजरे, न्यूनगंडाने ग्रस्त, आपसातच कोंडाळे करून राहणारे असे बनले होते. इतके दिवस कधी जोशींनी त्यांच्याबद्दल असा बारकाईने विचारच केला नव्हता. पण त्या दिवशी खांडेकरबरोबर भेट झाल्यावर त्यांचे डोळे एकाएकी उघडल्यासारखे झाले. दिवसभरात जेव्हा कधी मोकळा वेळ मिळे, तेव्हा जोशी आपल्या विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी करू लागले. शहरात आल्यावर कुठल्या कुठल्या अडचणींशी त्यांना झगडावे लागते, कुठले विचार त्यांच्या मनात घोळत असतात ह्याची जोशींना चांगलीच कल्पना आली. जोशी लिहितात,
पुढे अनेक वर्षांनंतर जोशींनी लिहिलेल्या 'महाविद्यालयातील विद्यार्थ्यास पत्र' ह्या हृदयस्पर्शी लेखात त्यांचे स्वतःचे त्यावेळचे निरीक्षण व त्यातून स्फुरलेले चिंतन उत्तम प्रतिबिंबित झाले आहे. त्यात जोशी लिहितात :त्यावेळी माझ्या लक्षात आले नव्हते, की माझ्याबरोबरचे विद्यार्थी आणि माझे विद्यार्थी यांत महदंतर होते. आर्थिक चणचण असली तरी, सिङनममधला विद्यार्थी जात्याच आणि संस्काराने सर्वांगपरिपूर्ण होता. त्याच्या अवयवांत दोष नव्हता; व्यायाम केल्यास आणि खुराक मिळाल्यास तो बलभीम बनू शकत होता. पण कोल्हापुरात माझ्यासमोर भक्तिभावाने ऐकणारे विद्यार्थी अपंग होते. एका अर्थाने मतिमंद होते. प्राध्यापकाला उड्डाण करताना पाहता पाहता स्वतःही पंख उभारून उडण्याचा प्रयत्न करण्याचेही सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. पिढ्यान्पिढ्यांची गरिबी आणि निरक्षरता यांनी त्यांना सर्वार्थाने खच्ची केले होते. तसे ते शिक्षणासाठीही आलेले नव्हते. महाविद्यालयाचा परीस अंगाला लागला तर शेतीच्या खातेऱ्यातून सुटू या आशेने ते आलेले होते. महाविद्यालय, शिक्षण, प्राध्यापक ही त्यांच्या दृष्टीने प्रगतीची साधने नव्हती, अपरिहार्यपणे उल्लंघण्याचे अडथळे होते. आणि हे अडथळे ओलांडत खेड्याच्या जीवनातून जिवंत कसे सुटता येईल हे ते घाबऱ्या डोळ्यांनी निरखत होते.
... एखाद्या पुढाऱ्याची मुलं सोडल्यास वसतिगृहात मुलांना ठेवण्याची शेतकरी आईबापांची परिस्थिती कधीच नसते. बिचारे इकडेतिकडे उसनवार करून आणि अक्षरशः आपलं पोट आवळून घेऊन पोरांना वसतिगृहात ठेवतात; पण त्यांच्या मुलांची वसतिगृहात काही कमी कुचंबणा होत नाही. पुढाऱ्यांच्या आणि शहरातल्या मुलांच्या सामानाचा झगमगाट पाहून त्यांचे डोळे दिपूनच जातात. थंडी वाजू नये म्हणून आईने बळेच दोन गोधड्या दिलेल्या असतात; घरी एक कमी पडत असूनसुद्धा. पण इतर पोरांच्या रंगीबेरंगी फुलांची नक्षी असलेल्या गाद्या, उशा, चादरी पाहिल्या म्हणजे आईची प्रेमाची गोधडीसुद्धा लपवून ठेवावीशी वाटते.
या भाग्यशाली, झुळझुळीत कपड्यांत फिरणाऱ्या, दररोज नवीन घडीच्या रुमालावर सुगंध शिंपडणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर राहावं, त्यांच्यासारखं वागावं-दिसावं, मित्रमैत्रिणींच्या नजरेतील कौतुकाचा नजराणा गोळा करत फिरावं असं वाटणं अगदी नैसर्गिक आहे. विडी-सिगरेट पिणं, प्रसंगी अपेयपान करणं, सिनेमा, नाटक, तमाशा पाहणं हे सगळं वाईट असं हजारदा मनावर ठसवलेलं असलं, तरी नव्या मित्रांना ह्या भानगडी करताना पाहून राग तर येत नाहीच; पण आजपर्यंतची सर्व मूल्यं आणि कल्पना भुरूभुरू उडून जातात आणि एकदा का होईना त्यांच्यासारखं करावं, मग त्यासाठी लागेल त्या मार्गाने पैसे उभे करावे, आवश्यक तर खऱ्याखोट्या सबबी सांगून आणखी पैसे मागवून घ्यावे असं वाटणं साहजिकच आहे....
महाविद्यालयातील, वर्गातील, वसतिगृहातील विद्यार्थिमित्रांचं वैभव हे मन पोळणारं. याउलट, शहरात बाजारपेठेत फिरताना होणाऱ्या वैभवाच्या दर्शनाने काहीच क्लेश वाटत नाहीत. दुकानांतील वस्तूंची विविधता, आकर्षक मांडणी, ग्राहकांची गर्दी, सुबक डौलदार घरांत राहणारी गोंडस कुटुंबं, आखीव बागबगीचे, त्यात आनंदाने विहरणारे तरुणतरुणी, हे सारं पाहिल्यानंतर खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्याला आश्चर्य वाटतं. हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळालं याचा आनंद वाटतो आणि आता गावातील ते भयानक आयुष्य मागे टाकून या नवीन विश्वात सुखी होऊन जाऊ, या कल्पनेने उत्साह उसळू लागतो....
पण या नवीन जगात स्थान मिळवणं सोपं नाही. अपरिमित कष्ट करूनही ते जमेल किंवा नाही, शंकाच आहे. शहरातली पोरं आणि पुढाऱ्यांची पोरं नुसतीच श्रीमंत नाहीत; इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आली आहेत. एकमेकांतसुद्धा फाडफाड इंग्रजी बोलतात. आपल्याला इंग्रजी बोलणं तर सोडूनच द्या, बोललेलं समजणंसुद्धा कठीण, त्या पोरांना इंग्रजी सिनेमाच्या नायिकासद्धा काय बोलतात ते समजतं. आपल्याला प्राध्यापक काय बोलतात तेसुद्धा कळणं मुश्किल! अभ्यास करायचा कसा? आणि पास व्हायचं तरी कसं?...
शेतकरी संघटनेच्या उभारणीच्या दिवसांत ग्रामीण भागातील नव्याने शिकू लागलेला तरुणवर्ग ह्या पत्ररूपी लेखाने अक्षरश: भारावून गेला होता. अनेकांनी आपापल्या खोलीच्या भिंतीवर पत्राची प्रत चिकटवली होती. हे संपूर्ण पत्र वाचल्यानंतर गावोगावी शिकणाऱ्या हजारो शेतकरी कुटुंबातील मुलांच्या डोळ्यात पाणी उभे राहायचे; पण त्याचवेळी त्यांची मनेही आपल्यावर पिढ्यान्पिढ्या होत असलेल्या अन्यायाच्या जाणिवेने पेटून उठायची. पुढे शेतकरी संघटनेचा विचार एखाद्या वणव्याप्रमाणे ग्रामीण तरुणांमध्ये पसरला, ह्याचे थोडेफार श्रेय ह्या काळजाला हात घालणाऱ्या पत्रालाही नक्कीच द्यावे लागेल.हे कठीण आहे. महाकठीण आहे. आज शहराच्या नवलाईच्या दर्शनाने आपण सुखावलो आहोत; आपल्या विद्येकरिता गावाकडे मायबाप काय उस्तवारी करत आहेत, याचासुद्धा विसर पडतो. त्यांची इच्छा एकच – पोराने परीक्षा द्यावी, पास व्हावं, नोकरी धरावा, घरशेता कर्जातून सोडवावा आणि हे पाहून त्यांना सुखानं डोळे मिटावेत. पण शेतकऱ्यांच्या पोरांना शहरातील परीक्षा द्यायला सांगणं म्हणजे हत्तीला दोरीवरच्या उड्या मारायला सांगणं आहे. जमावं कसं?...
लाखात एखाद्याच शेतकऱ्याच्या पोराला मिळणारी विचार करण्याची, अभ्यास करण्याची संधी तुला मिळाली आहे. ती किमान या एका प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यासाठी वापर. माझ्या आईबापांनी असं कोणतं पाप केलं होतं, की त्यांना असं चिखलात झिजत राबावं लागतं? त्यांच्या श्रमाचं मोल त्यांना का मिळालं नाही? त्यांच्या घामाचं दाम कोणत्या हरामानं हिरावून नेलं?'...
मोहनदास करमचंद गांधी इंग्लंडच्या ऐश्वर्याला भुलून काही काळ साहेब बनण्याच्या प्रयत्नाला लागले; पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि स्वातंत्र्याचे प्रणेते, राष्ट्रपिता झाले. ते स्वतः इंग्लंडमधल्या सुखात रममाण झाले नाहीत. तुझ्या मायबापांना लुटणाऱ्यांच्या वैभवात बोटं घालून त्यात धन्यता मानण्याचा मोह पडू देऊ नकोस.... आजची तुझी स्थिती सीतेच्या शोधासाठी गेलेल्या हनुमानासारखी आहे. लंकेचे वैभव, प्रासाद, तलाव, बागबगीचे पाहून हनुमानही विस्मयचकित झाला. पण त्या भिकारड्या रामाची कसली भक्ती करता; या अजिंक्य, महाबलाढ्य रावणाच्या ऐश्वर्याचा उपभोग घेऊ, असा विचार त्याच्या मनाला शिवलाही नाही. अशोकवनातील विरहदुःखी सीतेचा शोध त्याने चालू ठेवला म्हणून रामायण घडले.
आज भूमिकन्या सीता पुन्हा वनवासात आहे. आम्ही भूमिपुत्र तिच्या विमोचनाच्या कामाला लागणार, का लंकेश्वर रावणाच्या वैभवाचे वाटेकरी व्हायला बघणार, हा प्रश्न तुझ्यापुढे ठेवण्यासाठी हा पत्राचा प्रपंच. (प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश, भाग-२, प्रथमावृत्ती, डिसेंबर १९८५, पृष्ठ ११४-१२०)
जसजसे दिवस जात गेले, तसतसा जोशींचा या ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पाहायचा दृष्टिकोन बदलत गेला. 'पिढ्यान्पिढ्यांची गरिबी आणि निरक्षरता यांनी त्यांना सर्वार्थाने खच्ची केले होते.' किंवा 'शेतकऱ्यांच्या पोरांना शहरातील परीक्षा द्यायला सांगणं म्हणजे हत्तीला दोरीवरच्या उड्या मारायला सांगणं आहे.' यांसारख्या उपरोक्त वाक्यांवरून त्यांची प्रगल्भ झालेली जाण स्पष्ट होते.
त्यांच्या अध्यापनावरही त्यांच्या या बदललेल्या दृष्टिकोनाचा परिणाम होत गेला. आपण जे शिकवतो आहोत, ते विद्यार्थ्यांना नीट समजेल अशा प्रकारे ते शिकवू लागले. अध्यापनाचा हा अनुभव पुढे त्यांच्या खूप उपयोगी पडणारा होता. क्लिष्ट अशी अर्थशास्त्रीय तत्त्वे ते सर्वसामान्य शेतकऱ्यालाही सहज समजेल अशा भाषेत कशी मांडतात, अगदी निरक्षर ग्रामीण बायकांनाही त्यांचे क्रांतिकारक विचार कसे समजतात, डंकेल प्रस्तावासारख्या विषयावरही संघटनेचा सामान्य कार्यकर्ता मोठ्या मोठ्या अर्थशास्त्र्यांना व पत्रकारांना निरुत्तर कसा करू शकतो, याचे एक रहस्य कोल्हापुरातील अनुभवात दडलेले असावे.
इथल्या वास्तव्यात वेळात वेळ काढून प्राचार्य भणगे यांच्याबरोबर जोशींनी एका प्रकल्पासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रवास करून एक सर्वेक्षण करायचे कामही केले. 'ग्रामीण विद्युतीकरणाचा कोल्हापूर जिल्ह्यात झालेला परिणाम ह्या विषयावरचा हा अभ्यासप्रकल्प होता. विजेसारख्या वैज्ञानिक शोधांमळे समाजात फार मोठे बदल कसे घडन येतात. हे मनावर ठसवणारा हा अभ्यास होता. विदेशात असताना तयार केलेल्या आपल्या बायोडेटात जोशींनी या प्रकल्पाचा उल्लेख केला आहे.
ह्या सगळ्या घडामोडींत स्वतःच्या स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासासाठी मात्र जोशींना अजिबात वेळ मिळेना. त्यातच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. लेखी परीक्षेसाठी एकूण पाच पेपर्स होते. सगळ्या परीक्षा मुंबईतच द्यायच्या होत्या. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सलग पंधरा-वीस दिवस रजा सोडाच, प्रत्यक्ष परीक्षेसाठीसुद्धा एका दिवसाहून जास्त रजा घेणे शक्य झाले नाही. प्रत्येक पेपराच्या वेळी अतोनात धावपळ झाली. कोल्हापूरला कॉलेज संपल्यावर संध्याकाळची एसटी पकडायची, पुण्याला यायचे, त्याच रात्रीची पुण्याहून मुंबईला जाणारी पॅसेंजर पकडायची, पहाटे कुर्ल्याला उतरायचे, सकाळी सहापर्यंत अंधेरीला त्या काळी मोठा भाऊ राहत असलेल्या घरी जायचे, तिथे अंघोळ वगैरे उरकून दहा वाजेपर्यंत फोर्टमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रावर जायचे, परीक्षा झाली, की तसेच बोरीबंदर स्टेशनवर जाऊन रात्रीची कोल्हापूरला जाणारी ट्रेन पकडायची, कोल्हापूरला भल्या सकाळी पोचायचे आणि अंघोळ उरकून पुन्हा नेहमीसारखे साडेसातपर्यंत कॉलेजवर शिकवण्यासाठी हजर राहायचे, असा सगळा द्राविडी प्राणायाम करावा लागला. पाचही पेपरांच्या बाबतीत अगदी हाच प्रकार घडला.
परिणामतः सगळे पेपर्स अगदी भिकार गेले. जोशी खचून गेले. आपले उच्च सनदी नोकर बनण्याचे स्वप्न इथे कोल्हापुरात आल्याने धुळीला मिळाले, ह्या विचाराने खूप घालमेल होऊ लागली. मुंबईतच मिळालेली नोकरी स्वीकारली असती, तर दोन-तीन लेक्चर्स घेतल्यानंतर उरलेला सगळा दिवस अभ्यासासाठी मिळाला असता आणि शिवाय, ऐन परीक्षेच्या वेळची ही सगळी धावपळ टळली असती, पेपर्स उत्तम गेले असते; उगाचच आपण भणगेंच्या विनंतीला बळी पडलो असे त्यांना वाटू लागले. शेवटी त्यांनी ठरवले, की भणगे यांच्या स्नेहापोटी एक वर्ष गेले असे समजायचे, परीक्षा संपल्या, की ही नोकरी सोडायची, पूर्ण वेळ झट्न अभ्यास करायचा आणि पुढच्या वर्षी पुन्हा ही स्पर्धापरीक्षा द्यायची.
पण प्रत्यक्षात तसे घडायचे नव्हते. जोशींना अगदी कमी गुण मिळाले असले, तरी ते उत्तीर्ण झाले असल्याने नियमानुसार त्यांना तोंडी परीक्षेचे आमंत्रण आले. तोंडी परीक्षेत त्यांना घवघवीत यश मिळाले, पहिल्या तिघांत क्रमांक लागला. शासकीय सेवेत निवड करताना तोंडी व लेखी अशा दोन्ही परीक्षांतील गुणांचा एकत्रित विचार केला जातो. सर्वसामान्यतः प्राधान्याने निवडले जाणारे इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS), इंडियन पोलीस सर्व्हिस (IPS) अथवा इंडियन फॉरिन सर्व्हिस (IFS) हे तीन पर्याय त्यांना उपलब्ध होऊ शकले नाहीत. (IAS झालेले हा त्यांचा खुपदा करून दिला गेलेला परिचय तितकासा बरोबर नव्हता; पण त्या काळी या आयोगाच्या परीक्षेला 'आयएसची परीक्षा' असेच म्हटले जाई.) त्यांना उपलब्ध झालेल्या पर्यायांमधील ऑडिट अँड अकाउंट्स ही त्यांची पहिली पसंती होती; पण ते क्षेत्रही त्यांना मिळाले नाही. तोंडी परीक्षेत ज्याचा पहिला क्रमांक आला होता, त्याला ती जागा मिळाली. शेवटी इंडियन पोस्टल सर्व्हिसमधली (IPOS) जागा जोशींना स्वीकारावी लागली.
दरम्यान आणखी एक शक्यता निर्माण झाली होती. पुण्यातील सुप्रसिद्ध गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये त्यांना संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळत होती. तो पर्याय तसा मोहात पाडणारा होता. अर्थशास्त्राशी संबंधित काही संशोधन करणे त्यांच्या वृत्तीला भावणारे होते. पण त्याबद्दल अधिक चर्चा करताना संस्थाप्रमुख डॉक्टर धनंजयराव गाडगीळ त्यांना म्हणाले, "इथे असं संशोधन करून शेवटी तुम्ही एक प्राध्यापकच बनणार. पण प्राध्यापकापेक्षा उच्च सनदी नोकरीचं महत्त्व अधिक आहे. प्रत्यक्ष धोरणं आखणं, त्यांची अंमलबजावणी करणं हे सारं शेवटी सनदी नोकरांच्याच हातात असतं. शासन हे परिवर्तन घडवून आणण्याचं खूप प्रभावी माध्यम आहे. तुम्ही सनदी नोकर बनून त्या प्रत्यक्ष परिवर्तनात सहभागी व्हा." गाडगीळांचा सल्ला जोशींना पटला; किंवा कदाचित असेही असेल की जोशींना स्वतःलाही विचारान्ती हेच करावेसे वाटले असेल.
मागे वळून बघताना या संदर्भात काही प्रश्न मनात येतात.
कॉलेजात शिकवण्यासाठी कोल्हापूरला गेल्याचा पश्चात्ताप होतो, असे जोशी यांनी लिहिले आहे; पण त्या पश्चात्तापाचे नेमके कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही. तिथे राहून मुंबईतल्या स्पर्धापरीक्षा दिल्यामुळे अभ्यास नीट झाला नाही एवढे ते लिहितात, पण त्यामुळे आयएएसला आपली निवड झाली नाही, ही त्यांची नेमकी खंत होती का? पोस्टल सर्व्हिससारख्या तुलनेने दुय्यम पर्यायाऐवजी आयएएसमध्ये किंवा आयएफएसमध्ये नोकरी करणे त्यांना अधिक अर्थपूर्ण वाटले असते का? पोस्टाचा पर्याय नाकारून पुढच्या वर्षी पुन्हा एकदा स्पर्धापरीक्षा देण्याचा स्वतःचा आधीचा विचार त्यांनी का अमलात आणला नाही? आईवडलांवर आणखी वर्षभर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर शक्य तितक्या लौकर उभे राहणे त्यांना व्यक्तिशः प्राधान्याचे वाटत होते का?
आणखी एक प्रश्न म्हणजे. सरकारी नोकरीत जाण्याऐवजी इंग्लंड-अमेरिकेत जाऊन पीएच.डी. केली असती, तर ते भविष्यात अधिक श्रेयस्कर ठरले असते का? जगदीश भगवतीप्रमाणे? नाही म्हटले तरी, परदेशी विद्यापीठातल्या डॉक्टरेटला भारतीय विद्वानांच्या वर्तुळात कायम सर्वोच्च स्थान होते; जोशींना तर कुठलीच डॉक्टरेट नव्हती. आणि एकदा ते परदेशी उच्चशिक्षण घेतले, तोच प्रबंध इंग्रजी पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध केला, की मग आयुष्यभरासाठी तो एक मानबिंदू ठरला असता; व्यावसायिक प्रगतीचे अनेक दरवाजे त्यामुळे उघडले गेले असते. कदाचित भगवतीप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताही मिळाली असती. त्यात त्यांना अधिक सार्थकता वाटली असती का?
यावर आमची फक्त एकदाच चर्चा होऊ शकली. त्यावेळी जोशी म्हणाले होते,
"तसं झालं असतं. तर पढे बर्नमधल्या नोकरीत मला जे अनुभवता आलं. त्याला मी मुकलो असतो. शेतीतही पडलो नसतो आणि हा सगळा आंदोलनाचा अविस्मरणीय अनुभवही मिळाला नसता. जर-तरचा विचार आपण आज करू शकतो, पण त्यावेळी जे काही घडायचं होतं ते घडून गेलं. कोठल्या अपघाताने कोणाच्या आयुष्याला कसं वळण लागेल, हे कोणालाही सांगता येणं शक्य नाही. 'माझ्या टर्मसवरच मी जगेन,' असा माझा कायम आग्रह असायचा व तसं जगायचा मी आयुष्यभर प्रयत्नही केला; पण नियती म्हणूनही काही प्रकार आहे हे मला आज पटतं. ज्यावर माझं काहीच कंट्रोल नव्हतं, अशाही काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या."
आपल्या पोस्टातील नोकरीबद्दल जोशी सांगतात.
"पोस्टखात्यातील जागा खरं तर मला स्वीकारायची नव्हती. पण मला तिथे नोकरी मिळाली ह्याचा माझ्या वडलांना इतका आनंद झाला, की विचारायची सोय नाही. साध्या कारकुनापासून सुरुवात करून ते इतक्या वर्षांनी सुपरिंटेंडंट ह्या पदावर पोचले होते व आता नुकताच नोकरीला लागणारा त्यांचा मुलगा एकदम त्याच पदावर रुजू होणार होता. त्यांना होणारा तो आनंद बघून मग शेवटी मी पोस्टखात्यातील पद स्वीकारायचं ठरवलं."
जोशी यांच्या ज्येष्ठ भगिनी नमाताई यांनीही साधारण अशीच आठवण प्रस्तुत लेखकाला सांगितली आहे. त्या म्हणाल्या,
"शरद रुजू झाला, त्याच कचेरीत माझ्या वडलांचे मराठे नावाचे एक मित्र काम करत होते. त्यांनी लगेच वडलांना फोन करून 'तुमचा मुलगा आता ह्या खुर्चीत बसतो आहे ही बातमी कौतुकाने सांगितली. वडलांना अत्यानंद झाला. घरी आल्या आल्या त्यांनी ही बातमी आम्हाला दिली. आम्हा सगळ्यांनाच त्यावेळी शरदचा खूप अभिमान वाटला." ही घटना ऑगस्ट १९५८मधली.पोस्टाच्या कार्यपद्धतीनुसार पहिली दोन वर्षे ते प्रोबेशनवर होते. ह्या दोन वर्षांत त्यांनी गुजरातेत बडोदे व सुरेंद्रनगर येथे, उत्तर प्रदेशात सहरनपूर येथे आणि महाराष्ट्रात रत्नागिरी व मंबई येथे काम केले. प्रत्येक ठिकाणी साधारण चार-पाच महिने. पत्रांचे वितरण करणे हा पोस्टाच्या कामाचा केवळ एक भाग झाला. पण पोस्टखाते इतरही अनेक गोष्टी सांभाळत असते. मनीऑर्डरद्वारे देशभरात कुठेही पैसे पोचवणे, अल्पबचत विभाग, बचतखाते, खूप मोठा कर्मचारी वर्ग, जागोजागी असलेली प्रॉपर्टी. त्याकाळी तार (टेलेग्राफ) खातेही महत्त्वाचे होते व तेही पोस्टखात्याचाच भाग असायचे. एकूणच पोस्टाचा व्याप अफाट असतो. इथल्या कामाशी त्यांचा तसा साधारण परिचय होताच, पण प्रोबेशनवर असताना अधिक बारकाईने ओळख झाली. विशेष म्हणजे, एकूण देशाचीही व्यापक ओळख झाली.
प्रोबेशन संपल्यावर जलै १९६० मध्ये त्यांची पहिली नेमणक झाली ती मंबईत डेप्युटी डायरेक्टर, फॉरिन पोस्ट या पदावर. डॉकयार्ड रोड येथे त्यांचे हे पहिले ऑफिस होते. नोकरीत रुबाब खूप होता. मोठे थोरले ऑफिस. पहिल्या नेमणुकीतच हाताखाली ५०० कर्मचारी. बेल दाबली की कोणीतरी लगेच हजर होणार. मर्जी सांभाळण्यासाठी सगळे कनिष्ठ अहमहमिकेने झटणार. आपल्या देशात उच्च शासकीय सत्तेचे एक वलय असतेच; त्या काळात तर ते खूपच अधिक होते. ते वलयांकित अस्तित्व कोणालाही त्या तरुण, उमेदीच्या वयात सुखावणारे होते.
सर्वसामान्य कुटंबीयांप्रमाणे त्यांच्याही घरी नोकरीपश्चात लग्नाचा विषय आपोआपच निघू लागला. २५ जून १९६१ रोजी त्यांचे लग्न झाले. १९४३मध्ये जन्मलेल्या लीला कोनकर दिसायला देखण्या, सडपातळ, हुशार होत्या. दाखवण्याचा पारंपरिक कार्यक्रम झाला त्याचवेळी जोशींनी त्यांना पसंत केले होते; पण तेव्हा त्यांचे वय अवघे १७ होते. त्यामुळे एक वर्ष थांबायचे ठरले. प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी त्या ज्युनिअर बीएच्या वर्गात होत्या. पतीपेक्षा आठ वर्षांनी लहान, म्हणजे जेमतेम अठरा वर्षांच्या. मुंबईत शिवाजीपार्क-माहीम येथील लेडी जमशेदजी रोडवरच्या रामबागमध्ये आईवडलांसह राहत होत्या. कॅम्लिन ह्या शाई, रंग व इतर स्टेशनरी बनवणाऱ्या प्रख्यात कंपनीचे मालक दांडेकर ह्यांच्यामुळे प्रसिद्ध असलेली ती इमारत. जोशी म्हणतात, "चारचौघांप्रमाणेच रीतसर दाखवून, ठरवून झालेले हे लग्न. माझ्या निरीश्वरवादामुळे विवाह कोणताही धार्मिक विधी न करता झाला एवढेच काय ते तत्कालीन समाजापेक्षा वेगळेपण."
दोघांनी मधुचंद्र उत्तर प्रदेशात मसूरी येथे साजरा केला. तिथून जोशी पुण्याला परत आले व कामावर रुजू झाले. मार्च महिन्यातच त्यांची इथे बदली झाली होती. सिनिअर सुपरिटेंडंट ऑफ रेल्वे मेल सर्व्हिस, बी डिव्हिजन, पुणे, या पदावर. ते मसूरीहून परतले आणि लगेचच १२ जुलै १९६१ रोजी, पुण्यात पानशेत धरण फुटून प्रचंड हाहाकार उडाला. पोस्टखातेही त्याला अपवाद नव्हते. अनेक पोस्ट ऑफिसेसमध्ये पाणी घुसले होते, हजारो पत्रे भिजून त्यांचा लगदा झाला होता. बहुतेक ठिकाणी कर्मचारी कामावर यायच्या परिस्थितीतही नव्हते. जोशी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी अतिशय जिद्दीने सगळ्याला तोंड दिले.ही सुरुवातीची आपत्तिग्रस्त परिस्थिती सोडली तर एरव्ही त्यांचे पुण्यातील वास्तव्य सुखकर होते. लग्नानंतरचे हे गुलाबी दिवस. जीपीओच्या निवांत परिसरातील ज्या बंगल्यात दोघांचे वास्तव्य होते, त्या बंगल्याच्या बागेतही २८ प्रकारचे गुलाब फुलले होते.
पुण्यानंतर नोव्हेंबर १९६१ ते मार्च १९६५ ते मुंबईत होते. आधी सिनिअर सुपरिटेंडंट ऑफ पोस्टल सर्व्हिसेस, बाँबे वेस्ट म्हणून आणि मग सिनिअर सुपरिटेंडंट, बाँबे सॉर्टिंग डिव्हिजन म्हणून.
मार्च १९६५ मध्ये बढती मिळून जोशींची दिल्लीला बदली झाली; असिस्टंट डायरेक्टर जनरल, पोस्ट अँड टेलिग्राफ डायरेक्टोरेट या पदावर. ही दोन्ही खाती तशी एकाच मंत्रालयात असत. इथे टेलेग्राफ खाते प्रथमच त्यांच्या हाताखाली आले. त्याकाळी बिनतारी संदेशवहन फार महत्त्वाचे मानले जाई. टेलेप्रिंटर, संगणक, सॅटेलाइट वगैरेच्या आधीचे हे दिवस. परदेशात टपाल व बिनतारी संदेशवहन ह्या क्षेत्रात जे जे अभ्यास केले जातात, त्यांचे संकलन करायचे, त्यातील काय काय आपल्या देशासाठी योग्य अस शकेल ह्याची छाननी करायची व त्य अनुषंगाने टिपणे करून वरिष्ठांकडे पाठवायची असे ह्या कामाचे स्वरूप होते.
लाल बहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथील अकल्पित निधन याच काळातले. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. शपथविधीनंतरचा त्यांचा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम जोशींचे कार्यालय ज्या इमारतीत होते तिथे झाला. शास्त्रीजींच्या स्मरणार्थ काढलेल्या टपाल तिकिटाचे तेव्हा अनावरण झाले. त्यावेळी इंदिराजींना काहीसे जवळून पाहण्याची संधी मिळाली. पुढे जोशी यांनी लिहिले आहे.
इंदिराबाई माझ्या आदराचा विषय कधीच नव्हत्या. पैतृक वारशाने अंगावर आलेले प्रचंड जबाबदारीचे ओझे सावरण्याची आपली कुवत आहे किंवा नाही याबद्दल त्यांच्या मनात असलेली जबरदस्त शंका आणि त्यातून निघणारी असुरक्षिततेची भावना यांतून देशाला मोठा धोका संभवतो याची जाणीव त्यांच्या त्या वेळच्या भाषणातूनच झाली.
(अन्वयार्थ - २, पृष्ठ ५५)
ह्या कालखंडाविषयी बोलताना जोशी म्हणाले,
"माझ्या सर्वांत जास्त स्मरणात राहिले आहेत ते म्हणजे श्री. भि. वेलणकर. त्यांच्यासारखा बॉस मला लाभला हे नशीबच म्हणायचं. ते डायरेक्टर, पोस्टल सर्व्हिसेस ह्या वरिष्ठ पदावर होते. देशातील प्रत्येक भागाला एक विशिष्ट पिनकोड द्यायचा खूप मोठा प्रकल्प त्या काळात पोस्टखात्याने राबवला. त्यासाठी प्रत्येक राज्याचं जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार वर्गीकरण करायचं होतं. सारखी नावं असलेली अनेक गावं देशात असतात. अशा प्रत्येक गावाला वेगळे वेगळे पिनकोड मिळतील ह्याची दक्षता घ्यायची होती. भावी काळात त्या परिसरात किती पोस्ट ऑफिसेस निघू शकतील, ह्याचाही ह्या प्रकल्पासाठी अंदाज बांधणं आवश्यक होतं. कारण जसा जसा शहरांचा विकास होतो, तसे तसे नवे विभाग विकसित होत जातात व त्यांना नवे पिनकोड द्यावे लागतात; पण त्यांची तजवीज मूळ नियोजनातच करून ठेवावी लागते. प्रत्येक विभागाला किती कर्मचारी लागतील, याचाही अंदाज घ्यायचा असतो. असे मोठे देशव्यापी प्रकल्प कधीच एखाददुसऱ्या व्यक्तीच्या हातात नसतात, त्यामुळे त्यांचं श्रेय कोणाही एका व्यक्तीला देणं चकीचं ठरेल; पण यात वेलणकरांचा नक्कीच मोठा हिस्सा होता व मी त्यांच्या हाताखाली काम करत होतो. माझे ते दिवस आनंदात गेले. त्या काळातलं माझं एक निरीक्षण मला पुढे खूप महत्त्वाचं वाटलं होतं. शहरातील वेगवेगळ्या टपाल पेट्यांमध्ये टाकली जाणारी बहुतेक पत्रं त्या किंवा अन्य मोठ्या शहरातच जायची; जेमतेम १०% पत्रं ग्रामीण भागात जात. अन्य विकसित जगापेक्षा भारताचं हे एक वेगळेपण होतं. ग्रामीण भारताचं तुटलेपण दाखवणारं. वेलणकर एक उत्तम बॉस होते. कामाव्यतिरिक्तही आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो. ते संस्कृतचे जाणकार होते. माझाही तो आवडीचा विषय. एकूणच आम्हा दोघांचं चांगलं जळायचं. माझ्या नोकरीच्या काळात भेटलेल्या ज्या फार थोड्या व्यक्तींविषयी माझ्या मनात आदर आहे, त्यांच्यापैकी ते एक आहेत."
दिल्लीतील नेमणुकीचा एक फायदा म्हणजे अनेकदा विदेशप्रवास करायची जोशींना संधी मिळाली. युनिव्हर्सल पोस्टल युनियन (ऊर्फ युपीय) ही युनायटेड नेशन्सची (संयुक्त राष्ट्रसंघाची) एक घटकसंस्था. भारतही अर्थातच युपीयुचा एक सदस्य आहे. युपीयुच्या परिषदांसाठी दोन-तीन वेळा ते परदेशी गेले. इतरही दोन-तीन विदेशफेऱ्या झाल्या. सरकारी अधिकारी म्हणून परदेशी जाणे म्हणजे तशी चैनच असायची. पंचतारांकित हॉटेल्स. मेजवान्या. बड्या लोकांशी ओळखी. हा सगळा भाग म्हणजे अशा नोकरीतील 'पस'. शिवाय हे विदेशभ्रमण वैचारिक क्षितिज रुंदावणारेही होते.
ह्या पोस्टिंगमध्ये २० ऑगस्ट १९६७ ते ३० मार्च १९६८ अशा सात महिन्यांसाठी त्यांना फ्रान्सला जायची संधी मिळाली. तेथील टपालयंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी. त्यासाठी फ्रान्स सरकारने त्यांना स्कॉलरशिप दिली होती. ते एकटेच गेले होते की सहकुटुंब गेले होते याची नोंद मात्र उपलब्ध कागदपत्रांत दिसली नाही.
पहिले चौदा आठवडे फक्त फ्रेंच भाषा शिकण्यासाठी विशी येथील जगप्रसिद्ध फ्रेंच भाषा अध्ययन केंद्रात ते जात होते. त्यांच्या बॅचमध्ये एकूण २१ देशांतील ४२ प्रशिक्षणार्थी होते व सगळ्यांचेच त्या प्रशिक्षणाबद्दल अतिशय चांगले मत झाले. ह्या फ्रेंचचा पुढे त्यांना खूप उपयोग होणार होता. त्यापूर्वी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातर्फे दिल्लीत चालवल्या जाणाऱ्या स्कूल ऑफ फॉरिन लँग्वेजेस या संस्थेत जोशी एक वर्ष रोज संध्याकाळी जात होते, पण तिथे वर्षभर जाऊनही त्यांचे फ्रेंचचे ज्ञान अगदीच तकलादू होते. याउलट विशीतल्या संस्थेत मात्र चौदा आठवड्यांत ते उत्तम फ्रेंच बोलू लागले. त्यानंतर आयुष्यात कधीच त्यांना फ्रेंच भाषेत आपले विचार व्यक्त करण्यात अडचण आली नाही. त्यांच्या मते याचे कारण म्हणजे विशी येथे वापरात असलेली प्रशिक्षणाची दृक्-श्राव्य (audio-visual) यंत्रणा. खरे तर ऑलियान्स फ्रान्सेज् या फ्रेंच संस्थेमध्ये दिल्लीतही ती सोय होती, पण भारत सरकार तिचा उपयोग न करता स्वतःचेच धेडगुजरी प्रशिक्षण देत असे. त्यात सरकारचा पैसा व शिकणाऱ्यांचा वेळ अक्षरशः फुकट जात असे, पण कोणालाच त्याची काही पर्वा नव्हती. जेव्हा गरज पडेल, तेव्हा फ्रेंच दुभाषी मागवायची सरकारी सोय होतीच!
नंतरचे चार महिने जोशींनी प्रत्यक्ष फ्रेंच पोस्टात अभ्यास करण्यासाठी घालवला. अभ्यासासाठी त्यांना पुढील चार क्षेत्रे दिली गेली होती :
- टपाल वर्गीकरणाचे यांत्रिकीकरण (Mechanization of sorting)
- पोस्ट ऑफिसातील खिडक्यांमधून होणाऱ्या कामाचे यांत्रिकीकरण (Mechanization of Window operations)
- टपालाची एका विभागातून दुसऱ्या विभागात देवाणघेवाण होते अशा कार्यालयांचे कामकाज (Working of exchange offices)
- संख्याशास्त्रीय सेवा. (Statistical services)
फ्रेंच पोस्ट खात्यातील ह्या प्रशिक्षणात त्यांची अनेक वैशिष्ट्ये जोशींना जाणवली व भारतात परतल्यावर वरिष्ठांना दिलेल्या आपल्या ३२-पानी अहवालात त्यांनी ती नमूद केली आहेत. उदाहरणार्थ, फ्रान्सची लोकवस्ती भारताच्या एक दशांश असूनही त्यांचे सेवेचे जाळे भारतापेक्षा अधिक विस्तृत आहे. एकूण तीन लाख कर्मचारी तिथे नोकरी करतात. प्रत्येक फ्रेंच नागरिकाला दरवर्षी सरासरी २०० पत्रे पोचवली जातात. हा आकडा भारतापेक्षा खूपच अधिक आहे. फ्रेंच पोस्ट खात्याच्या स्वतःच्या मालकीच्या ५,५०० इमारती असून अतिरिक्त १३,६०० इमारती त्यांनी भाड्याने घेतलेल्या आहेत. टपाल वितरणासाठी सुमारे ३०,००० वाहने व २० विमाने वापरली जातात. सेवेचा दर्जा सतत उच्च राखला जातो. पॅरिस शहरात सकाळी दहा वाजता टाकलेले स्थानिक पत्र संध्याकाळी सहाच्या आत पोचले पाहिजे हे बंधन पाळले जाते. देशात इतरत्र जाणारे पत्र असेल, तर तेही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहापर्यंत पोचवणे टपालखात्याला बंधनकारक आहे. एक कर्मचारी एका तासाला २४०० पत्रांचे वर्गीकरण (सॉर्टिंग) करतो. (भारतात हेच प्रमाण एका तासाला सुमारे १००० पत्रे आहे.)
एके ठिकाणी जोशी नमूद करतात, "त्यांच्या वितरणातील कमालीचा नियमितपणा हा आश्चर्यकारक आहे. एखाद्या विशिष्ट इमारतीत पोस्टमनने जायची वेळ ही ठरलेली असते व ती नेहमीच पाळली जाते. मी पॅरिसमध्ये ज्या हॉटेलात राहत होतो तिथे रोज सकाळी बरोबर आठ वाजायला तीन मिनिटे असताना पोस्टमन प्रवेश करायचा व माझ्या तेथील संपूर्ण चार महिन्यांच्या वास्तव्यात त्याने यायची ही वेळ एकदाही चुकली नाही."
त्यांनी पॅरिस सोडले त्याच्या पुढच्याच महिन्यात, एप्रिल १९६८ मध्ये, लोकांमधील धुमसत असलेल्या असंतोषाचा स्फोट झाला होता; ज्याला 'पॅरिस स्प्रिंग' म्हटले जाते. विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आधीचे काही महिनेही सतत निदर्शने होतच होती. जोशी तिथे होते तो कालखंड त्यामुळे फ्रान्सच्या इतिहासात बराच धामधुमीचा मानला जातो. या सगळ्याचे पडसाद जोशींसारख्या विचारी स्वभावाच्या व्यक्तीवर नक्कीच उमटले असणार, पण त्याची नोंद अशी आपल्याला कुठे सापडत नाही.
तत्कालीन निदर्शनांचा एक भाग म्हणजे फ्रान्समधील शेतकरी आपल्या मागण्या रेटण्यासाठी वारंवार करत असलेले 'रास्ता रोको' आंदोलन. प्रा. जी. आर. दीक्षित यांच्या एका पत्राचा उल्लेख मागील प्रकरणात झाला आहे. शरद जोशींनी आपल्या आंदोलनात ज्या 'रास्ता रोको' तंत्राचा वापर केला याचा उल्लेख करताना ते लिहितात, “कधी कधी मला असं वाटतं, की तुम्ही शेतकऱ्यांच्या चळवळीचा 'रास्ता रोको' पद्धतीचा जो अनुभव घेतला, तो तुमच्या फ्रान्समधील वास्तव्यात."
ह्यात थोडेफार तथ्य असावे. कारण अशा प्रकारचे 'रास्ता रोको' हे फ्रान्समधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे एक वैशिष्ट्य होते. जोशींच्या भावी आयुष्यातील काही कृत्यांचा धागा फ्रान्समधील त्या वास्तव्यात बघितलेल्या अशा काही प्रसंगांशी जोडलेला असणे अशक्य नाही. किंबहुना, अन्यथा त्यांच्यासारखा एखादा माजी सनदी अधिकारी, विदेशात उच्चपदी राहिलेला विचारवंत, एकाएकी एका छोट्या गावातील, छोट्या आंदोलनात भर रस्त्यावर मांडी ठोकून वाहने अडवायला बसतो हे समजून घेणे तसे अवघडच आहे.
एक लक्षणीय बाब म्हणजे, त्यांनी पॅरिसमध्ये असताना हिरव्या शाईत लिहिलेली सोळा A4 आकाराची हस्तलिखित पाने उपलब्ध आहेत. डाव्या कोपऱ्यात 'पॅरिस, १९६७, फेब्रुवारी' असे लिहिलेले आहे. म्हणजे ह्या भेटीच्या आधी पॅरिसला दिलेल्या एखाद्या भेटीत हे लेखन केलेले असावे. पहिल्याच पानावरील मजकुरात "Theory of Revolutions' हे शब्द आहेत. म्हणजे बहुधा ह्याच शीर्षकाचे जे एक पुस्तक त्यांना लिहायचे होते व सोळाव्या प्रकरणात ज्या पुस्तकाचा उल्लेख आहे त्याचीच हे लेखन म्हणजे सुरुवात असावी. वाचताना हा मजकूर खूप मूलगामी स्वरूपाचा आहे हे जाणवते. त्यात जोशी लिहितात :
इतिहासात वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या, अनेक प्रकारे उत्क्रांती होत गेली, अनेक संस्था निर्माण झाल्या. हे सारे बदल कोणा महापुरुषांमुळे घडून आले, की कुठल्यातरी अनाकलनीय अशा वैश्विक प्रेरणांमुळे? विशिष्ट कालखंडात एखादा बुद्ध, एखादा जिझस, एखादा अॅडम स्मिथ, एखादा मार्क्स, एखादा फोर्ड, एखादा गांधी का निर्माण होतो? हे महापुरुषांचे जन्म हा केवळ एक ऐतिहासिक अपघात असतो का? त्यांच्यामुळे परिस्थिती बदलते, का त्यांचा जन्म त्या परिस्थितीत अपरिहार्य असतो? या साऱ्यांना जोडणारे एखादे मूलतत्त्व असेल का? सगळेच मूलतत्त्ववादी (fanatics) म्हणजे फसलेले प्रेषित (prophets) असतात का? आणि सगळेच प्रेषित हे फसलेले मूलतत्त्ववादी असतात का? एखाद्या महात्म्याला समाजमान्यता मिळते आणि एखाद्याला ती मिळत नाही, हे कशामुळे घडते?
पहिला मानव परग्रहावरून आला असेल का?
पिंड आणि ब्रह्मांड यांचे नाते काय आहे? त्यांची रचना इतकी सारखी कशी काय? विचार करण्याचे सामर्थ्य फक्त एकेका व्यक्तीलाच का असते; समूहाला का नसते? जडामध्येसुद्धा चैतन्य असते व चैतन्यालाही जडाचे स्वरूप धारण करावेच लागते. मग त्यातले आधी काय आले? जड आणि चैतन्य यांचे नाते काय आहे? व्यक्तीला जसे संवेदनापटल असते, तसे वैश्विक संवेदनापटल म्हणून काही प्रकार असतो का?'
या व अशा अनेक गहन प्रश्नांवरील चर्चेची ही सोळा पाने म्हणजे केवळ सुरुवात आहे. पण हे लेखन जोशींनी पुढे केलेले नाही व त्यामुळे त्यातून त्यांना नेमके काय सांगायचे आहे हे कुतूहल शमत नाही.
३० मार्च १९६८ रोजी प्रशिक्षण संपवून जोशी भारतात परतले.
हे सारे घडत असताना एकीकडे वैवाहिक जीवनाची वाटचालही चालूच होती. लग्नानंतरच लीलाताईंनी बीएचे द्वितीय वर्ष पूर्ण केले. मोठी मुलगी श्रेया जन्मली ७ एप्रिल १९६२ रोजी; म्हणजे लग्नानंतर लगेचच. मुंबई येथे. धाकट्या गौरीचा जन्म २३ नोव्हेंबर १९६३ रोजी झाला.
जोशी म्हणत होते, "गौरीची जन्मतारीख माझ्या चांगली लक्षात आहे, कारण तेव्हाच अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी ह्यांची डलास येथे हत्या झाल्याची बातमी मुंबईत आली होती. अर्थात प्रत्यक्ष हत्या अमेरिकन वेळेप्रमाणे २२ नोव्हेंबर रोजी झाली होती. शिवाय त्याच दिवशी भारतीय सेनेचे चार अधिकारी एका दुर्दैवी विमानअपघातात दगावले होते."
जोशी पुढे सांगत होते, “गौरीचा आपल्या आईवर फार जीव होता; पण तिला झोपवताना मीच लागायचो. मी वेगवेगळ्या कविता तालासुरात म्हणायचो आणि त्या ऐकता ऐकता ती झोपी जायची."
जोशींच्या कविताप्रेमाचे एक द्योतक म्हणजे मोठ्या मुलीचे श्रेया हे नाव 'जेथे ओढे वनराई, तेथे वृत्ती रमे माझी, कारण काही साक्ष तिथे, मज त्या श्रेयाची पटते' या केशवसुतांच्या ओळींवरून सुचले आहे. धाकट्या मुलीचे नाव 'गौरी' ठेवण्यापूर्वीही त्यांनी बरीच चर्चा केली होती असे त्यांच्या बोलण्यात आले होते, पण ते नेमके कसे सुचले, हे सांगायचे गप्पांच्या ओघात राहूनच गेले होते.
इथे एक स्पष्ट करायला हवे. आपल्या वैवाहिक जीवनाविषयी, तसेच देशातील व विदेशातील नोकरीविषयी, जोशींनी फारसे काही लिहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाची १९५८ ते १९६८ ही दहा वर्षे व नंतरची स्वित्झर्लंडमधली आठ वर्षे असा एकूण अठरा वर्षांचा प्रदीर्घ कालखंड हा काहीसा गुलदस्त्यात राहिल्यासारखा झाला आहे. ह्याविषयी त्यांना विचारले असताना सुरुवातीला ते मला म्हणाले, "आपल्या भूतकाळाचा फारसा कधी कुठे उल्लेख करायचा नाही, असं मी भारतात परतल्यावर जाणीवपूर्वकच ठरवलं होतं. नव्यानेच जगायला आपण आता सुरुवात केली आहे, तेव्हा उगाच त्या जुन्या आयुष्याची आठवण तरी कशाला? नाहीतरी ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ पाहू नये असं आपल्याकडे म्हणतातच. मागे परतायचे सगळे दोर आपण कापूनच टाकले आहेत. तेव्हा यापुढे विचार करायचा तो फक्त भविष्याचाच. There is nothing sweeter than the smell of the burnt bridges (जाळून टाकलेल्या पुलांच्या वासापेक्षा अधिक मधुर काहीच नसतं) असं मी अनेकदा म्हणालो आहे व त्या विधानाचा आनंद मी आयुष्यभर उपभोगत आलो आहे!"
"हे सगळं तसं ऐकायला छान वाटतं, पण तुमचं चरित्र लिहिताना एवढा मोठा कालखंड एखाद्या अंधाऱ्या बोगद्याप्रमाणे सोडून कसा द्यायचा? आयुष्यातील वेगवेगळे टप्पे एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असेच उलगडत जातात ना? पूर्णतः कोऱ्या पाटीवरून अशी आपण कधीच सुरुवात करू शकत नाही; एकत्रितरीत्याच व्यक्ती समजून घेता येते," असे त्यावरचे माझे मत काहीशा विस्ताराने मी मांडले.
त्यांना त्यात थोडेफार तथ्य जाणवले. बऱ्याच गोष्टी तशा विस्मरणात गेल्या होत्या, पण त्यानंतरच्या चार-पाच भेटीत त्यांनी ह्या कालखंडाबद्दल आठवेल तेवढी माहिती दिली आणि तिच्याच आधारे ह्या चरित्रातला संदर्भित भाग लिहिता आला.
लौकिकदृष्ट्या सगळे काही उत्तम चाललेले असूनही कुठेतरी जोशी पोस्टातल्या नोकरीत खूप असमाधानी होते. 'आहे मनोहर तरी गमते उदास...' अशीच काहीशी त्यांची मनःस्थिती होती.
व्यावसायिक पातळीवर विचार केला तर पोस्टातील व एकूणच सरकारी कार्यसंस्कृती त्यांनी दहा वर्षांत खूप जवळून बघितली. इथे मनुष्यबळ अतिरिक्त आहे, आपल्याला नोकरीवरून कोणीही काढून टाकू शकणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, परिवर्तनाची तीव्र आस इथे कोणालाच नाही व त्यामुळे तसे परिवर्तन भविष्यात घडून यायची काही शक्यताही नाही असे काहीसे त्यांचे मत बनले होते. १९९६ साली भारतातील पोस्ट कर्मचाऱ्यांचा एक देशव्यापी संप झाला होता. त्यावेळी त्यांनी शेतकरी संघटक'च्या अंकात (२१ डिसेंबर १९९६) लिहिले होते,
ह्या उताऱ्यावरूनही त्यांचे एकूण पोस्टाबद्दलचे मत स्पष्ट होते.आजच्या तुलनेत फक्त निम्मा नोकरवर्ग घेऊन आणि आजच्या तुलनेने त्यांना निम्मा पगार देऊन मी टपालखाते चालवायला घ्यायला तयार आहे. आज कोणत्याही महत्त्वाच्या शहरामध्ये पाच दिवसांच्या आत टपाल पोहोचत नाही, तेथे चोवीस तासांच्या आत बटवड्याची हमी द्यायला मी तयार आहे. पण असले आव्हान सरकारच्याही कानी पडत नाही आणि नोकरदारांनाही त्याची नोंद घेण्याची गरज वाटत नाही. नोकर मालक बनले, की मूळ धन्याची अवस्था अशीच होणार.
व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर, या नोकरीत सुरक्षा होती, पगार व सर्व सोयी चांगल्या होत्या, हाती अधिकार होता, समाजात मान होता; पण तरीही अधिकारपदाची नवलाई सुरुवातीच्या तीन-चार वर्षांत ओसरल्यानंतर ह्या नोकरीत त्यांचा जीव रमेनासा झाला होता. एक प्रकारचे साचलेपण जाणव लागले होते. आपल्या हातून काहीतरी भव्यदिव्य व्हावे, ही लहानपणापासूनची तीव्र आस अपुरीच राहिली होती; भविष्यातही ती पूर्ण व्हायची इथे काही शक्यतादेखील दिसत नव्हती. ह्या नोकरीचा राजीनामा द्यावा असा विचार त्यांच्या मनात साधारण १९६४-६५नंतर येऊ लागला; पण समोरचा रस्ता दिसत नव्हता.
तो रस्ता सात महिन्यांच्या पॅरिसभेटीत दिसू लागला. भारत सोडून परदेशात कुठेतरी नोकरी धरावी, तिथल्या नोकरीत कदाचित आपल्याला काहीतरी आव्हानात्मक जाणवेल, आपल्या कर्तृत्वाला काही नवे धुमारे फुटतील असे वाटू लागले.
या काळात जगभरच्या पोस्टखात्यांतील इतरही अनेक अधिकारी जोशींना भेटले. त्यांच्यातल्याच एकाकडून त्यांच्या बर्न येथील मुख्य कार्यालयात एक नवीन पोस्ट तयार होते आहे व ती आपल्याला मिळण्यासारखी आहे असे त्यांना कळले. त्यासाठी जोशींनी तिथे असतानाच प्रयत्न केला व ती नोकरी त्यांना मिळेल हे साधारण ठरले.
हे आयटीच्या खूप आधीचे दिवस होते. परदेशात नोकरी करणे तितकेसे सोपे वा रूढ नव्हते. त्याचबरोबर भारतातली कायमस्वरूपी, दहा वर्षे पूर्ण झालेली, उत्तम सरकारी नोकरी सोडणे धाडसाचेच होते. आत्ता राजीनामा दिला तर फंड व ग्रॅच्युइटी मिळेल, पण पेन्शनवर पाणी सोडावे लागेल, तसेच या सरकारी नोकरीत क्लेमदेखील राहणार नाही, हे त्यांना ठाऊक होते. शिवाय आधी भारतातल्या नोकरीचा राजीनामा दिल्याशिवाय तिथली नोकरी मिळणार नाही हेही त्यांना स्पष्ट सांगण्यात आले होते.
पण 'बिकट वाट हीच वहिवाट' बनवण्याचे धाडस जोशींनी पूर्वीही आपल्या आयुष्यात केले होतेच, त्यांचे ते पराकोटीचे आत्मभान - मनात येईल ते बिनदिक्कत कुठल्याही अडचणींवर मात करून आपण करू शकतो ही जिद्द, पुन्हा एकदा उसळी खाऊ लागली.
भारतात ते परतले त्याच आठवड्यात त्यांनी इथल्या सरकारी नोकरीचा तडकाफडकी राजीनामा देऊनही टाकला. सगळी कार्यालयीन औपचारिकता पूर्ण होईस्तोवर महिना गेला. त्यांचा राजीनामा हा तसा धक्कादायकच होता; पण जोशींचा निर्धार पक्का होता.
३० एप्रिल १९६८ हा त्यांच्या भारतातील नोकरीचा शेवटचा दिवस. त्याच रात्री युपीयुमधील नोकरी स्वीकारण्यासाठी त्यांनी स्वित्झर्लंडला प्रयाण केले.
◼
१ मे, १९६८.
स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा इंटरनॅशनल विमानतळावर ३३ वर्षांच्या शरद जोशींनी पाऊल ठेवले. तसे ते पूर्वी दोन वेळा ह्या देशात आले होते, पण ते भारतीय पोस्टखात्यातील एक अधिकारी म्हणून - चारआठ दिवसांसाठी आणि अधिकृत कामासाठी. इथेच नोकरी पत्करून सहकुटुंब वास्तव्यासाठी येणे उत्कंठा वाढवणारे होते आणि रोमांचकही. सोबत २५ वर्षांची पत्नी लीला व अनुक्रमे सहा व साडेचार वर्षांच्या श्रेया व गौरी ह्या दोन मुली. लगेचच स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथील युनिव्हर्सल पोस्टल युनियन ऊर्फ युपीयुच्या मुख्यालयात ते दाखल झाले.
आंतरराष्ट्रीय पोस्टव्यवहाराचे नियमन करणारी संस्था म्हणजे युनिव्हर्सल पोस्टल युनियन (युपीयु). १८७४मध्ये ही स्थापन झाली. जगातली ही दुसरी आंतरराष्ट्रीय संस्था. पहिली आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे इंटरनॅशनल टेलेग्राफ युनियन. ती १८६५मध्ये स्थापन झाली. परस्परांतील संदेशवहन हा परस्परसंबंधांचा पायाच आहे आणि त्यासाठी आधी पोस्ट व नंतर टेलेग्राफ ही दोनच साधने त्या काळात उपलब्ध होती; साहजिकच त्यांचे महत्त्व खुप होते. सुरुवातीची अनेक वर्षे दोन्ही संस्थांचे मुख्य कार्यालय बर्न हेच होते.
पुढे १९४७ साली ह्या युनायटेड नेशन्सच्या (संयुक्त राष्ट्रसंघाच्या) घटक संस्था बनल्या. त्यानंतर इंटरनॅशनल टेलेग्राफ युनियनचे नाव बदलून इंटरनॅशनल टेलेकम्युनिकेशन्स युनियन ठेवले गेले व तिचे मुख्यालय बर्नहून जिनिव्हा येथे नेण्यात आले; युपीयु मात्र बर्नमध्येच राहिली.
युपीयुमध्ये एक संख्याशास्त्राचा विभाग असावा अशी कल्पना मांडण्यात आली होती. जोशी यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि भारतातील दहा वर्षांचा अनुभव ही पात्रता ह्या पदासाठी अगदी योग्य अशीच होती. त्यामुळे पूर्वी ओळख झालेल्या युपीयुच्या एका असिस्टंट डायरेक्टर जनरलने 'ह्या संस्थेत तुम्ही नोकरी स्वीकाराल का?' अशी विचारणा जोशी यांच्याकडे ते प्रशिक्षणार्थ फ्रान्समध्ये गेले असताना केली होती.
जोशी यांनाही त्यावेळी असा बदल अगदी हवाच होता. त्यांनी लगेच होकार दिला. मागील प्रकरणात हा भाग आलाच आहे. “Please sit down. Be comfortable. What drink can I offer you?" आपल्या कार्यालयात त्यांचे हस्तांदोलन करून स्वागत करताना असिस्टंट डायरेक्टर जनरलनी आपुलकीने विचारले आणि त्या पहिल्या प्रश्नातच आपण आता एका अगदी नव्या विश्वात प्रवेश केला आहे हे जोशींना जाणवले. भारतीय पोस्टखात्यातील दहा वर्षांच्या नोकरीत कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचे असे मित्रत्वाच्या व बरोबरीच्या नात्याने स्वागत केले नव्हते.
समोरासमोर असलेल्या कोचावर बसून दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला अनौपचारिक पण दोन-चार मिनिटांतच प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपाविषयी.
त्याच दिवशी जोशींनी कामाला सुरुवात केली. राहायला घर घेणे, मुलींसाठी शाळेत प्रवेश घेणे वगैरे सर्व सोपस्कारही थोड्याच दिवसांत पार पडले.
इंटरनॅशनल ब्युरो (आयबी) हा युपीयुचा एक विभाग होता व ह्याच विभागात जोशींची नेमणूक झाली होती. त्यांचे अधिकृत पद होते 'थर्ड सेक्रेटरी'. आपण वापरतो त्या अर्थाने इथे सेक्रेटरी हा शब्द नाही. युपीयुतील अधिकाऱ्यांच्या एकूण सात श्रेणी होत्या - सुरुवातीची श्रेणी 'थर्ड सेक्रेटरी', मग 'सेकंड सेक्रेटरी', त्यानंतर 'सेक्रेटरी', त्यानंतर 'काउन्सेलर', त्यानंतर 'डायरेक्टर' व त्यानंतर 'असिस्टंट डायरेक्टर जनरल'. शेवटी मग अशा वेगवेगळ्या विभागांच्या असिस्टंट डायरेक्टर जनरल्समधून एकाची नेमणूक डायरेक्टर जनरल म्हणून होत असे. एकूण कर्मचाऱ्यांचा विचार केला तर अर्थातच स्विस नागरिक हे तिथे बहुसंख्य होते, पण अधिकारीवर्ग मात्र जगातल्या वेगवेगळ्या देशांतून आलेला असे.
आल्प्स पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला स्वित्झर्लंड हा छोटासा देश पृथ्वीतलावरील नंदनवन म्हणूनच जगभर ओळखला जातो. लांबवर पसरत गेलेल्या गगनस्पर्शी बर्फाच्छादित पर्वतरांगा, उंच उंच वृक्ष, हिरवीगार कुरणे, त्यात मनसोक्त चरणाऱ्या धष्टपुष्ट गायी, त्यांच्या गळ्यातील घंटांचा खुळावून टाकणारा मंजूळ नाद, निळेभोर आकाश, स्वच्छ गुळगुळीत रस्ते, प्रत्येक घरासमोर व गॅलरीत बहरलेली रंगीबेरंगी फुले. सगळे अगदी एखाद्या पिक्चर पोस्टकार्डाप्रमाणे!
पण निसर्गसौंदर्यापलीकडेही ह्या देशात खूप काही आहे. दरडोई उत्पन्नामध्ये ह्या देशाचा क्रमांक सातत्याने जगात जवळजवळ पहिला असतो. ही संपत्तीदेखील हक्काने शोषण करायला उपलब्ध होईल अशी स्वतःची कुठलीही वसाहत नसताना. रोश वा नोव्हार्तिस यांसारख्या जगातील सर्वांत मोठ्या औषधकंपन्या इथल्याच. खते-रसायने बनवणाऱ्या सिन्जेन्टा वा सिबा, घड्याळे बनवणाऱ्या रोलेक्स वा फावर लुबा, कापडगिरण्यांना लागणारी यंत्रे बनवणारी सुलत्झर, एलेव्हेटर बनवणारी शिंडलर, सिमेंट बनवणारी होल्सिम, वीजनिर्मिती व पुरवठा करणारी एबीबी, कच्च्या मालाचा घाऊक व्यापार करणारी ग्लेनकोर, दुग्धपदार्थ वा चॉकलेट बनवणारी नेसले अशा अनेक आघाडीच्या बहराष्ट्रीय कंपन्या स्वीस आहेत. युबीएससारख्या इथल्या बँका आपल्या संपूर्ण सुरक्षित व्यवहारासाठी जगभर विश्वासार्ह म्हणून प्रसिद्ध आहेत; जगभरातून त्यांच्याकडे सोन्याचा व पैशाचा ओघ वाहत असतो.
पण ह्या उद्योगांपुरती व संपत्तीपुरती ह्या देशाची ख्याती सीमित नाही. गेली सात-आठशे वर्षे ह्या देशात लोकशाही अखंड टिकून आहे. ह्या देशावर त्या प्रदीर्घ कालावधीत अन्य कुठल्याही देशाने राज्य केलेले नाही. इथला सर्वसामान्य नागरिकही कमालीचा लढवय्या व स्वातंत्र्याचा भोक्ता आहे. अठरा वर्षांवरील प्रत्येकाला लष्करी शिक्षण घेणे व किमान दोन वर्षे लष्करात काम करणे सक्तीचे आहे. शिवाय, आवश्यक ती शस्त्रे त्याच्या घरीच असतात व अवघ्या चोवीस तासांच्या अवधीत तो लष्करी कामासाठी सुसज्ज होऊ शकतो. सगळा युरोप पादाक्रांत करणाऱ्या हिटलरलाही ह्या टीचभर देशावर आक्रमण करायची कधी हिंमत झाली नव्हती. स्वित्झर्लंड देश बहुतांशी डोंगराळ. त्यात पुन्हा थंडी कडाक्याची. स्वतःकडे खनिजसंपत्ती अशी जवळजवळ अजिबात नाही. असे असूनही आज हा देश इतका समृद्ध बनला आहे कारण काटक कष्टाळू समाज व प्रगतिपूरक शासकीय धोरणे. विशेष म्हणजे जनता शस्त्रसुसज्ज असूनही या देशाने कधीच अन्य कुठल्या देशावर आक्रमण केलेले नाही.
आपली अलिप्ततादेखील ह्या देशाने कटाक्षाने जपली आहे. त्यामुळेच युनायटेड नेशन्सच्या रेड क्रॉस, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे तब्बल २५ संस्थांची मुख्यालये आज ह्या देशात आहेत. लीग ऑफ नेशन्स ही पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली संस्था म्हणजे आजच्या युएनचे मूळ रूप: तिचेही मुख्यालय जिनिव्हा हेच होते. जिनिव्हा हे स्वित्झर्लंडमधील सर्वांत आंतरराष्ट्रीय शहर मानले जाते; पण देशाची राजधानी मात्र बर्न ही आहे.
स्वित्झर्लंडची विभागणी वेगवेगळ्या २६ कँटोन्समध्ये झालेली आहे व प्रत्येक कँटोन बऱ्यापैकी स्वायत्त आहे. देशात ६४ टक्के जर्मनभाषक व सुमारे २३ टक्के फ्रेंचभाषक आहेत. ह्याशिवाय छोट्या प्रमाणात ८ टक्के इटालियन व अगदी छोट्या प्रमाणात रोमांश ह्या दोन भाषाही बोलल्या जातात. जिनिव्हा फ्रेंचभाषक आहे, तर राजधानी बर्नमध्ये जर्मन भाषा बोलली जाते. पण आश्चर्य म्हणजे, सर्व युएन संस्थांमध्ये दैनंदिन व्यवहाराची भाषा फ्रेंच हीच त्यावेळी होती. जोशींना फ्रेंच चांगले येत होते व ही नोकरी त्यांना मिळण्यामागे ती एक जमेची बाजू मानली गेली होती.
१९६८ ते १९७६ ही आठ वर्षे जोशींनी इथे काढली. पण त्या काळाबद्दल अनेकदा प्रश्न विचारूनही जोशी विशेष काही माहिती पुरवू शकले नव्हते. तो सारा काळ जणू आता त्यांच्या विस्मृतीतच गेला होता. त्याकाळातील तुमचा कोणी सहकारी आज मला भेटू शकेल का?' ह्या प्रश्नालाही त्यांचे उत्तर सुरुवातीला नकारार्थीच होते.
तेवढ्यात एक अनपेक्षित घटना घडली. त्यांची मोठी मुलगी श्रेया सहकुटुंब स्वित्झर्लंडला जाणार होती व त्या भेटीत ते सर्व जोशी यांच्या तेथील एका जुन्या सहकाऱ्याकडे व शेजाऱ्याकडे राहणार होते. ह्या सहकाऱ्याबरोबर सर्व जोशी कुटुंबीयांचेच एकेकाळी खूप जवळचे संबंध होते, असेही त्यांच्या बोलण्यात आले. “मी त्या सहकाऱ्यांना भेटू शकतो का?" मी विचारले. कारण योगायोगाने एका सामाजिक संस्थेच्या परिषदेसाठी मला त्यानंतर महिन्याभरातच स्वित्झर्लंडमध्ये जायचे होते. जोशींना ती कल्पना आवडली व त्यानुसार त्याच दिवशी जोशींनी आपल्या त्या एकेकाळच्या सहकाऱ्याला इमेलवरून कळवले व चरित्रलेखनासाठी मला शक्य ती माहिती देण्याची विनंती केली.
नंतर त्यांच्याशी माझा इमेलवर संपर्क झाला व भेटीचे नक्की झाले. ते बर्न येथे राहत होते. आमचे बाझलजवळ राहणारे एक स्नेही डॉ. अविनाश जगताप हेही मी व माझी पत्नी वर्षा यांच्याबरोबर आले. आपल्या सँडोझमधील नोकरीमुळे ते स्वित्झर्लंडमध्येच स्थायिक झाले असले, तरी जगताप मूळचे पुण्याचे. बहुजनसमाजात शिक्षणप्रसाराचे मोठे काम करणारे त्यांचे वडील प्राचार्य बाबुराव जगताप एकेकाळी पुण्याचे महापौरदेखील होते. आम्ही तिघेही एकत्रच बर्नला गेलो. तिथे जोशी यांच्या त्या माजी सहकाऱ्याला भेटणे ह्या लेखनासाठी महत्त्वाचे ठरले. कारण ह्या आठ वर्षांच्या कालखंडाबद्दल त्यांनी भरपूर माहिती दिली व ती त्यांच्याइतकी खात्रीपूर्वक दुसरा कोणीच देऊ शकला नसता. त्यांचे नाव टोनी डेर होवसेपियां (Tony Der Hovesepian). सोयीसाठी म्हणून यापुढे त्यांचा उल्लेख टोनी असा करत आहे.
गुरुवार, १२ जुलै २०१२. साधारण सकाळची नऊची वेळ.
बर्न रेल्वेस्टेशनवरून आम्ही ट्राम पकडली व Weltpost ह्या स्टॉपवर उतरलो. ह्या जर्मन शब्दाचा अर्थ जागतिक पोस्टऑफिस. ठरल्याप्रमाणे टोनी आमची तिथे वाटच पाहत होते. पुढला सगळा प्रवास आम्ही त्यांच्याच मोटारीने केला.
इथेच युपीयुचे प्रचंड मुख्यालय आहे. ते आम्ही आधी बघितले. युपीयुचे व पूर्वी बर्नमध्येच असलेल्या इंटरनॅशनल टेलेकम्युनिकेशन्स युनियनचे प्रतीक म्हणून स्विस सरकारने सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारलेली धातूची दोन अप्रतिम शिल्पे बघितली. ही दोन्ही शिल्पे दोन स्वतंत्र चौकांत असून आपल्या मुंबईतील हुतात्मा स्मारकाच्या साधारण चौपट आकाराची आहेत. त्यानंतर आम्ही नॉयेनेग (Neuenegg) ह्या बर्नचे उपनगर म्हणता येईल अशा छोट्या गावात गेलो. इथेच टुल्पेनवेग (Tulpenweg) या रस्त्यावर असलेल्या एका प्रशस्त व सुंदर इमारतीत जोशी आपल्या आठ वर्षांच्या वास्तव्यापैकी सुमारे सात वर्षे राहिले. टोनी यांचा फ्लॅटदेखील त्यांच्या शेजारीच होता. जोशींचा फ्लॅट क्रमांक होता 3C, तर टोनी ह्यांचा 3D तीही जागा आम्ही बघितली.
टोनी साधारण जोशी यांच्याच वयाचे; कदाचित दोन-चार वर्षांनी लहान असू शकतील. शिडशिडीत आणि उंच. मूळचे आर्मेनिया ह्या युरोप व आशिया यांच्या सीमेवरच्या प्राचीन व पुढे सोविएत संघराज्याचा एक भाग बनलेल्या देशातले. अधिकृत धर्म म्हणून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणारे हे जगातले पहिलेच राष्ट्र. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे सुमारे शंभर वर्षांपूर्वी, तुर्की आक्रमकांनी, जवळ जवळ १५ लाख आर्मेनिअन लोकांची अत्यंत क्रूरपणे कत्तल केली. बायका-मुलांनाही त्यांनी सोडले नाही. कसाबसा जीव मुठीत धरून टोनी ह्यांचे आई-वडील लेबनॉनला पळाले. तिथेच टोनी ह्यांचा जन्म झाला. तिथून ते कुवेतला गेले व तेथील पोस्टात नोकरीला लागले. कुवेत त्यावेळी ब्रिटिश नियंत्रणाखाली होता व तेथील पोस्टखाते ब्रिटिश पोस्टखात्याशी जोडलेले होते. तिथूनच त्यांना युपीयुमध्ये १९६५ साली नोकरी लागली. शरद जोशी तिथे यायच्या आधी तीन वर्षे. दोघेही 'थर्ड सेक्रेटरी' ह्याच श्रेणीत होते. आपल्या पत्नीसह टोनी आजही त्याच घरात राहतात; जिथे सात वर्षे जोशी त्यांचे शेजारी होते. टोनी म्हणत होते,
"आम्ही दोघेही पहिल्या-दुसऱ्या दिवसापासूनच एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारू लागलो. शरद कामावर रुजू झाला तेव्हा त्याची बसायची केबिन व माझी केबिन शेजारीशेजारीच होती. मी ह्या नव्या इमारतीत फ्लॅट घेतल्याचं ऐकल्यावर त्यानेही ह्याच इमारतीत फ्लॅट घ्यायचं ठरवलं. अगदी शेजारचाच फ्लॅट. आम्ही साधारण एकाच वेळी तिथे शिफ्ट झालो.
"शरद अतिशय हुशार व कर्तबगार होता. सुमार बुद्धिमत्तेची माणसं त्याला आवडत नाहीत असा साधारण समज ऑफिसात रूढ होता. शिष्ट म्हणूनच त्याची ख्याती होती. याचं कारण थोड्या दिवसांतच मला समजलं. युपीयुमधले अनेक कर्मचारी निम्नस्तरीय श्रेणीतून चढत चढत वर आले होते तर, शरद मात्र इंडिअन पोस्टल सर्विस ह्या उच्च श्रेणीतच प्रथमपासून राहिला होता. साहजिकच तो इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत उठून दिसे. पण सुदैवाने आमचे राहायचे फ्लॅट शेजारी शेजारी व कामावर बसायची जागाही शेजारी म्हटल्यावर साहजिकच आमच्यात चांगली मैत्री झाली. आमचं घर ऑफिसपासून मोटारने जेमतेम पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं. ऑफिसात जाता-येताना व दुपारी जेवायला जाता-येताना आम्ही एकत्र जात अस. कधी त्याच्या मोटारीने तर कधी माझ्या मोटारीने.
"शरद जॉईन झाला त्याच वर्षी आमच्या ऑफिसात एक स्टाफ असोसिएशन सुरू झाली. मी तिचा एक कमिटी मेंबर होतो. बरेच उपक्रम आम्ही राबवत असू. त्या कमिटीत यायची शरदची फार इच्छा होती. पुढल्या वर्षी कमिटीच्या निवडणुकीला तो व मी असे दोन उमेदवार उभे होतो. पडणाऱ्या मतांनुसार पॉइंट्स मोजले जात. एकूण शंभर पॉइंट्स असत. गंमत म्हणजे दोघांनाही सारखी मतं पडली. नियमानुसार पुन्हा एकदा मतदान घेतलं गेलं. त्यावेळी त्याला ५१ व मला ४९ पॉइंट्स मिळाले; कारण माझं स्वतःचं मत मी त्याला दिलं होतं!
"ऑफिसात आम्ही ब्रेकमध्ये टेबल टेनिस खेळायचो. मला हा गेम खूप आवडायचा व चांगला यायचाही. १९७४च्या सुरुवातीला लोझान येथे युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस भरली होती. तिला मोठं चायनीज डेलेगेशन आलं होतं. प्रथमच. त्यांच्यात व आमच्या आयबी खात्यात शरदने एक टेबल टेनिस स्पर्धा आयोजित केली होती. आम्ही ती जिंकावी अशी त्याची फार इच्छा होती. किसिंजरच्या चायनाभेटीतील पिंगपाँग डिप्लोमसीमुळे त्यावेळी टेबल टेनिस खूप लोकप्रिय झालं होतं. आम्ही स्वतःला चांगलं खेळणारे समजत होतो व आम्ही बऱ्यापैकी प्रॅक्टिसही केली होती, पण चायनीज प्रतिनिधींपुढे आमचा अगदी धुव्वा उडाला! शरद खट्ट झाला होता; त्याला हरणं आवडत नसे." जोशींचे कौटुंबिक जीवन कसे होते, हे विचारल्यावर टोनी सांगू लागले,
"माझी पत्नी थेरेसा व लीला चांगल्या मैत्रिणी झाल्या. थेरेसा ४८ सालची, म्हणजे दोघींचं वयही साधारण सारखं होतं. थेरेसा एका लहान मुलांच्या शाळेत शिकवायची व पुढे तिने स्वतःच एक शाळा सुरू केला. आजही ती तेच काम करते. मुख्यतः वेगवेगळ्य कॉन्स्युलेट्समध्ये काम करणाऱ्यांची मुलं तिथे येतात. लीला मात्र घरीच असे. दोन मुलींना सांभाळणं हेच तिचं पूर्णवेळचं काम होतं. कधी कधी तिला घरी बसून कंटाळा यायचा हे खरं आहे, पण संस्थेच्या नियमानुसार तिला कुठल्याही प्रकारची नोकरी वा व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. माझी पूर्वीची नोकरी ब्रिटिश पोस्टखात्यातली होती व मी मूळचा आर्मेनियाचा; ह्या देशात अधिकृत निर्वासित मानला गेलेला. त्यामुळे आम्हाला स्विस नागरिकत्व लगेचच मिळून गेलं व साहजिकच थेरेसाला अर्थार्जन करायची मुभा मिळाली होती. शरदचं नागरिकत्व मात्र भारतीयच होतं. अर्थात युएन संस्थांमध्ये पगार उत्तम मिळायचे; इतर स्विस कंपन्यांपेक्षा व सरकारपेक्षा आमचा पगार निदान ३० टक्के अधिक होता. शिवाय इतरही फायदे खप मिळत. त्यामळे एकाच्याच पगारात घर चालवणं कठीण नव्हतं.
"जोशींना दोन मुली होत्या, तर आम्हाला लौकरच आमचा पहिला मुलगा झाला. एप्रिल ६९मध्ये झालेला पॅट्रिक, पुढे जोशींच्या दोन मुली व आमचा मुलगा अशी तिघं एकत्र खेळू लागली, एकत्र शाळेत जाऊ लागली. सगळ्यांची शाळा एकच – तेथील इंटरनॅशनल स्कूल. त्यांना शाळेत सोडायचं कामदेखील आम्ही वाटून घ्यायचो; कधी आम्ही तर कधी ते सोडायचे. फिरायला, नाटक-सिनेमा बघायला आम्ही एकत्रच जायचो.
"शरद ऑफिसात खूप गंभीर व अबोल असे, पण लहान मुलांशी खेळताना तो अगदी लहान होऊन जाई. ऑक्टोबर ७०मधला एक प्रसंग मला आठवतो. आमचे डायरेक्टर जनरल त्यावेळी एक इजिप्शिअन गृहस्थ होते. त्यांनी एकदा मला व थेरेसाला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. शरद व लीलाला मात्र आमंत्रण नव्हतं. कदाचित मी आर्मेनियन असल्याने, म्हणजे त्यांच्या एकेकाळच्या शेजारी देशातील असल्याने, मला इजिप्शिअन जेवण आवडेल असं त्यांना वाटलं असावं. तेव्हा आमचा पॅट्रिक दीड वर्षांचा होता. डिनरपार्टीला त्याला कुठे नेणार, म्हणून आम्ही त्याला जोशींच्या घरी ठेवायचं ठरवलं. अर्थात त्यांच्या संमतीने. आधी तो खूप रडत होता, त्यामुळे जावं की जाऊ नये अशा संभ्रमात थेरेसा होती. पण शरद व लीला 'अगदी खुशाल जा' असं दोन-तीनदा म्हणाल्यामुळे आम्ही त्याला त्यांच्या घरी ठेवून गेलो. तो राहील की नाही ह्याविषयी आम्हाला खूप धास्ती होती; त्याला असं सोडून जायची ही पहिलीच वेळ. रात्री उशिरा घरी परतलो व काहीशा धाकधुकीतच शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली. आधी वाटलं होतं, पॅट्रिक झोपला असेल, मग वाटलं तो रडून रडून बेजार झाला असेल आणि शरद-लीलालादेखील त्याने खूप त्रास दिला असेल. पण प्रत्यक्षात लीलाने दार उघडलं, तेव्हा पॅट्रिक चक्क जागा होता व शरद त्याच्याशी अगदी मजेत, हसत हसत खेळत होता. खूप रात्र झाली होती तरी दोघं खेळण्यात इतके दंग झाले होते, पॅट्रिकला त्याने इतका लळा लावला होता, की नंतर आमच्या फ्लॅटमध्ये त्याला परत नेताना तो रडू लागला! शरदचं एक वेगळंच रूप त्या दिवशी मला दिसलं!
"खूप मजेत गेली ती वर्षं. आमच्या इमारतीतली इतरही बहुतेक सर्व कुटुंबं युएनबरोबरच काम करणारी होती. बऱ्यापैकी समवयस्क होती. आमची छान गट्टी जमली. संध्याकाळी तळमजल्यावरच्या पार्किंग लॉटवर आम्ही एक बॅडमिंटन कोर्ट तयार केलं होतं. टेबलटेनिसचीपण सोय होती. जवळ जवळ रोजच संध्याकाळी जेवल्यानंतर सगळे एकत्र खेळायचो. तिथेच एका कोपऱ्यात बार्बेक्यू होता व दुसऱ्या कोपऱ्यात बार. शरद स्वतः बहुतांशी शाकाहारी होता, पण लीला व मुली मात्र सगळं खात. शरदला ड्रिंक घेणं आवडायचं. खूपदा आम्ही एकत्र जेवायला जायचो, पण त्याला ड्रिंक चढलं आहे असं मात्र इतक्या वर्षांत मी कधीही पाहिलं नाही. तसं त्याचं वागणं अगदी संयमी होतं. पाश्चात्त्य रीतीरिवाज, खाणंपिणं, कपडे हे सारं इथे आल्यावर अगदी थोड्याच दिवसांत जोशी कुटुंबीयांच्या पूर्ण अंगवळणी पडलं होतं. ते सारे उत्तम फ्रेंच बोलत. आमच्या घरापासून जवळच प्रसिद्ध गानटू (Gantu) डोंगराची सुरुवात होती. बहुतेक रविवारी आम्ही डोंगरावर जायचो. स्कीइंग आणि डोंगर चढणं हे आमचे जणू राष्ट्रीय खेळच आहेत. पुढे शरदलाही डोंगरांमधून मनसोक्त भटकणं आवडू लागलं. बाहेर खूप थंडी व पाऊस असेल तर मात्र घरात राहावं लागे.
"अशावेळी शरदला बुद्धिबळ खेळायला आवडायचं. अर्थात मला स्वतःला बुद्धिबळ फारसं येत नसे. त्यामळे प्रत्येक वेळी तोच जिंकायचा. एकदा दपारी मी त्यांच्या घरी गेलो असताना समोर टेबलावर ठेवलेलं How to play Chess नावाचं एक पुस्तक मला दिसलं. सहज म्हणून मी ते वाचायला लागलो. आवडलं म्हणून घरी घेऊन गेलो व पूर्ण वाचून काढलं. योगायोग म्हणजे त्या रात्री आम्ही बुद्धिबळ खेळायला बसल्यावर सगळे डाव तो हरला! हे मोठंच आश्चर्य होतं. 'टोनीने तुला चेकमेट करणं म्हणजे अगदी नवलच आहे! असं कसं झालं?' लीलाने विचारलं. 'कारण तो माझ्यापेक्षा चांगला खेळला म्हणून' एवढंच त्यावर शरद म्हणाला, मला स्वतःलाही मी कसा जिंकू शकलो ह्याचं नवल वाटलं. कदाचित त्या पुस्तकाचा तो परिणाम असेल! पण त्यानंतर एक गोष्ट घडली, जिचं स्पष्टीकरण मी आजही देऊ शकणार नाही. ती म्हणजे त्या रात्रीनंतर शरदने माझ्याशी बुद्धिबळ खेळणं पूर्ण बंद केलं. दोन-तीनदा 'चल, एक डाव टाकू' असं मी सुचवलं, पण त्याने स्पष्ट नकार दिला. न खेळण्याचं कारणही त्याने काहीच सांगितलं नाही."
आपले ऑफिसमधील काम सुरुवातीला जोशी यांना खूप आवडत होते. अर्थात त्यात प्रत्यक्ष कामापेक्षा ऑफिसातील अत्याधुनिक सुखसोयी, आंतरराष्ट्रीय वातावरण, कार्यसंस्कृती ह्यांचा वाटा अधिक होता. कामात कसलाही ताण नसे. शनिवार-रविवार सुट्टी असे. त्यामुळे वाचनासाठी भरपूर वेळ उपलब्ध असे. युपीयुचे सुसज्ज ग्रंथालय होते व शिवाय स्वतःच्या कामाला उपयुक्त अशी पुस्तके विकत घेण्याची अधिकाऱ्यांना मुभा होती. कामाच्या निमित्ताने जिनिव्हाला सारखे जावे लागे. तिथे पुस्तकांची मोठी मोठी दुकाने होती. जिनिव्हातले अधिकृत काम आटोपले, की तासन्तास या दुकानांत जोशी रमत. “किंमत किती आहे ह्याचा जराही विचार न करता पुस्तकं विकत घेण्यातला आनंद मी तिथे भरपूर उपभोगला. प्रचंड वाचन केलं," ते एकदा सांगत होते.
"इतकी वर्षं तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं; ह्या कालावधीतील ऑफिसमधल्या काही आठवणी तुम्ही सांगू शकाल का?" ह्या प्रश्नाला उत्तर देताना टोनी म्हणाले,
"आठवायला लागलं तर अशा बऱ्याच आठवणी आहेत. आपल्या कामात शरद खूप हुशार होता. एका परिषदेतील त्याच्या सादरीकरणाने प्रभावित होऊन युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP) ह्या एजन्सीने ती युपीयुच्या टेक्निकल असिस्टन्स प्रोग्रॅमला देत असलेल्या निधीत लगेचच मोठी वाढ केली होती. अनेकांनी शरदची त्यावेळी स्तुती केली, पण तेवढ्यापुरतीच; नंतर सगळे त्याला विसरून गेले! त्याला अपेक्षित होती ती नोकरीतली बढती काही शरदला मिळत नव्हती. एकूणच आपल्याला आपल्या कामाचं उचित श्रेय कधी मिळत नाही असं त्याला नेहमीच वाटत असे व हा त्याच्या कमनशिबाचाच एक भाग आहे असं तो म्हणायचा. मला आठवतं, एकदा एका खात्यात चांगली सिस्टिम लावून देण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. तिथून त्याची लौकरच दुसऱ्या खात्यात बदली होणार होती हे त्याला ठाऊक होतं, पण तरीसुद्धा त्याने हे परिश्रम घेतले होते. मी त्याला विचारलं, 'तू तर आता इथून जाणार. मग ह्या सगळ्याचा तुला काय फायदा होणार? कशासाठी हे श्रम घेतलेस तू?' त्याचं उत्तर माझ्या आजही लक्षात आहे. तो म्हणाला होता, 'आपण लावलेल्या झाडाची फळं आपल्याला खायला मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं.'
“मग त्याने मला येशू ख्रिस्ताच्या चौथ्या शिष्याची एक गोष्ट सांगितली होती. ती साधारण अशी होती. बेथलेहेममध्ये ज्या दिवशी ख्रिस्तजन्म झाला त्या दिवशी आकाशात एक खूप तेजस्वी तारा दिसला होता – ज्याचं प्रतीक म्हणून आम्ही ताऱ्याचा आकार असलेले कंदील नाताळच्या दिवशी लावतो. त्यावेळी असे तीन संत होते, ज्यांना तो तारा बघून कळलं, की येशूचा, देवाच्या मुलाचा जन्म होतो आहे व ते तिघे जण येशूचं स्वागत करायला बेथलेहेमकडे निघाले. यथावकाश ते तिथे पोहोचले व त्यांनी लहानग्या येशूचं कोडकौतुक केलं. तीन संतांची ही कथा प्रसिद्ध आहे, पण दुसरा एक भाग त्यात आलेला नाही. तो म्हणजे सामिरतान (समॅरिटन) नावाच्या तशाच एका चौथ्या संताची कथा. पुढे कुठल्यातरी एका इंग्रजी लेखकाने ती लिहिली होती व शरदच्या वाचनात आली होती म्हणे. हा संतदेखील तो तारा पाहन इतर तीन संतांच्या आधीच युरोपातून मध्यपूर्वेत बेथलेहेमला यायला निघाला होता; पण वाटेतल्या एका जंगलात काही लुटारूंनी त्याला पकडलं. त्याचं सगळं सामान लुटलं; अगदी त्याचे कपडेसुद्धा काढून घेतले आणि समुद्रकिनाऱ्यावर एका गुलामांचा व्यापार करणाऱ्याला विकलं. ख्रिस्ताचा पहिला संत बनण्यासाठी जो निघाला होता, तो अशाप्रकारे गुलाम बनला. त्या व्यापाऱ्याने सामिरतानला बोटीत भरलं व आफ्रिकेला नेऊन गुलाम म्हणून विकलं. गुलामगिरीच्या नरकयातना सोसत, चाबकाचे फटके खातखात त्याने अनेक वर्ष कशीबशी काढली. एक दिवस अचानक कशीतरी संधी मिळाली व तो मालकाच्या घरून पळाला. मनात ख्रिस्ताची भक्ती होतीच. पुन्हा त्याने बेथलेहेमची वाट पकडली. ख्रिस्तजन्माच्या वेळी आपण बेथलेहेमला पोचू शकलो नाही, पण आतातरी आपण तिथे जाऊ व त्याचं दर्शन घेऊ, ह्या आशेवर. शेवटी एकदाचा तो बेथलेहेमला पोचला. पण नेमक्या त्याच दिवशी ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आलं होतं. ख्रिस्ताचा पहिला शिष्य बनण्याऐवजी सुळी दिलेल्या ख्रिस्ताला सुळावरून उतरवण्याचं काम त्याच्या नशिबी आलं! 'मी ख्रिस्ताच्या त्या चौथ्या शिष्याप्रमाणे आहे, माझ्या कष्टांचं फळ मला कधीच मिळणार नाही आणि लहानपणापासूनच मी हे ओळखून आहे,' असं शरद तेव्हा म्हणाला होता."
श्रेयविहीनतेची ही जाणीव जोशींच्या भावी आयुष्यातही पुनःपुन्हा डोकावते.
शरद जोशी यांनी नंतर केलेल्या लेखनात स्वित्झर्लंडबद्दल तुरळक असे काही उल्लेख आहेत. एकूणच तो देश इतका समृद्ध आणि विशेष म्हणजे सुशासित असा आहे, की अडचणी अशा फारशा काहीच येत नाहीत; क्वचित कधी एखादी अडचण आली, तर किती तत्परतेने शासन आपत्तिनियोजन करते हे सांगताना जोशी लिहितात :
एकदा स्वित्झर्लंडमध्ये भर उन्हाळ्यात तीन आठवडे (या मोसमात एरव्ही तिथे पडणारा) पाऊस पडला नाही. लगेच सगळ्या माध्यमांतून धोक्याच्या सूचना खणखणू लागल्या – 'जंगलाजंगलातील गवत सुकेसुके, कोरडे झाले आहे; आगीचा धोका आहे. सिगारेटचे थोटूक प्रवासात इकडेतिकडे टाकू नका. एकदा आल्प्समधील एक शिखर सर करण्यासाठी आठ लोकांची टोळी गेली होती. बर्फाच्या वर्षावामुळे ती अडकून पडली. त्यांना सोडविण्यासाठी अवघ्या तासाभरात helicopters अपघातस्थळी जाऊन पोचली. अडकलेल्या गिर्यारोहकांच्या सुटकेचा तो सारा प्रचंड खटाटोप घरोघर लोकांनी टेलेव्हिजनवर प्रत्यक्ष पाहिला. असेच एकदा लष्करी सुरुंग पेरण्याच्या प्रदेशात एकदा एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू चुकून शिरले, तर त्याच्या सुटकेच्या प्रयत्नांवर सगळ्या देशाचे लक्ष वेधले गेले.
(शेतकरी संघटक, २१ ऑक्टोबर १९९३)
तेथील सरकार किती संवेदनशील व तत्पर आहे हे ह्यातून जाणवते.
ह्याच लेखात पुढे जोशी यांनी केलेले एका भेटीचे वर्णन वाचनीय आहे. बर्न शहरातील एका नागरी सुरक्षेच्या केंद्रास त्यांनी दिलेली ही भेट होती. सर्वसामान्य प्रवासी अशा गोष्टी सहसा कधी बघू शकणार नाही; पण युनायटेड नेशन्समध्ये काम करताना ज्या सवलती मिळतात, त्याचा बहुधा हा फायदा होता.
कधीकाळी कोणा शत्रूचे आक्रमण झालेच, तर त्याला रोखण्यासाठी अनेक मार्ग सरकारने तयार ठेवले होते. त्यांतला एक महामार्गांचे पट्टेच्या पट्टे बाजूला काढण्याचा व शत्रूची वाहतकच अशक्य करून सोडायचा होता. महामार्गांचा वापर लष्करी विमानांसाठी धावपट्टीसारखा करण्याचीही एक आपत्कालीन योजना होती. हे सारे ठाऊक असूनही त्या दिवशी जे पाहिले, त्यावर त्यांचा विश्वासही बसेना. बर्नच्या एक लाख लोकवस्तीसाठी हजारो लोकांना पुरेसा असा अवाढव्य सुरक्षा निवारा जमिनीखाली १०० मीटर इतक्या खोलीवर एका प्रचंड बोगद्यात केला होता. एखादा अणुबॉम्ब ह्या बोगद्याच्या डोक्यावरच पडला तर गोष्ट वेगळी; अन्यथा हे आश्रयस्थान अगदी पक्के सुरक्षित राहिले असते. जमिनीच्या इतक्या खोलवरही हवा खेळती राहण्याची व्यवस्था होती. लोकांकरिता झोपण्याची व्यवस्था होती. कोणत्याही संकटकाळी जेमतेम तासाभराच्या सूचनेवरून ही सारी यंत्रणा मदतीसाठी उपलब्ध होऊ शकत होती. मोठे सुसज्ज हॉस्पिटल कायम चकचकीत अवस्थेत तयार असते. कोठे संकट आले, तर सगळी तयारी सुसज्जपणे वाट पाहते आहे.
इथे लीला जोशी यांनी लिहिलेल्या एका विस्तृत लेखातील थोडा भाग उद्धृत करावासा वाटतो. स्वित्झर्लंडबद्दलची काही मार्मिक निरीक्षणे त्यांनी नोंदलेली आहेत. त्यांनी लिहिलेला व प्रकाशित झालेला हा एकमेव लेख आहे. आधी तो अंबाजोगाई येथून श्रीरंगनाना मोरे प्रसिद्ध करत असलेल्या 'भूमिसेवक' ह्या पाक्षिकात प्रसिद्ध झाला. पुढे तो अलिबागहून अरविंद वामन कुळकर्णी प्रसिद्ध करत असलेल्या 'राष्ट्रतेज' ह्या साप्ताहिकात पुनर्मुद्रित केला गेला. आणि त्यानंतर तो 'शेतकरी संघटक'च्या २१ ऑक्टोबर १९८३च्या अंकात पुनर्मुद्रित केला गेला. लीलाताईंच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली म्हणून. पण 'वारकरी' ह्या शेतकरी संघटनेच्या पहिल्या मुखपत्रात मात्र तो प्रकाशित झाला नव्हता; तसेच कुठल्या पुस्तकातही तो समाविष्ट झालेला नाही व त्यामुळे फारशा वाचकांपर्यंत पोचला नसावा. लेखात त्या लिहितात :
ह्या देशाने जी सधनता प्राप्त करून घेतली त्यामागचे कारण काय? आम्ही स्वित्झर्लंडमध्ये असताना भारतातले एक उद्योगपती आमच्याकडे आले होते. भारतातील उच्चमध्यमवर्गीयाइतके असलेले तेथील सामान्य कामगारांचे राहणीमान पाहून ते म्हणाले – 'त्यांच्याकडे पैसा आहे ना, म्हणून ते एवढं वेतन देऊ शकतात.' हे अनुमान साफ चूक! त्यांनी पैसा निर्माण केला. साठ वर्षांपूर्वी शेतीप्रधान, पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामोद्योग व शेती आणि आज एक औद्योगिक राष्ट्र अशी ह्या देशाची वाटचाल आहे.
त्यांना स्वतःला स्वित्झर्लंडमध्ये गेल्यावर सर्वांत पहिली गोष्ट जाणवली, ती म्हणजे तेथील 'अन्नक्रांती'. सुपरमार्केटमध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांची लयलूट होती. नुसता दुग्धजन्य पदार्थांचा विभाग बघितला तरी माणूस थक्क होऊन जाई. असंख्य प्रकारचे चीज. विविध कंपन्यांचे, विविध स्वादांचे, चवींचे दही. चक्का, लोणी व त्यांपासून केलेले असंख्य पदार्थ. विशेष म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठली असमानता नाही; तुम्ही गरीब असा वा श्रीमंत, सर्व लोक सर्व खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकतात. असमानता चालू होते ती स्थावर व जंगम मालमत्ता आणि तशा बाबतीत. औद्योगिक मालाकडे पाहिले तरी तेच. कपडे, खेळणी यांपासून ते टीव्ही, फ्रीज, मोटार ह्या सर्व वस्तू सर्वांच्या आवाक्यात येतात; अशा बाबतीत आपल्यासारखी कमालीची विषमता तिथे नाही. अगदी सामान्य शेतकऱ्यालाही या सर्व गोष्टी परवडतात.
हे कशामुळे घडते याचा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की याचे कारण म्हणजे शेतकऱ्याला शेतीमालाच्या विक्रीतून चांगले पैसे मिळतात व त्यामुळे तो विकून औद्योगिक माल विकत घेणे त्याला परवडते. पुढे त्यांनी शेतीमाल व औद्योगिक माल यांच्या दोन्ही देशांतील किमतींचा तुलनात्मक आढावा घेतला आहे.
उदाहरणार्थ, तिथे एक लिटर दुधाची किंमत १ फ्रँक तर एका रेफ्रिजरेटरची किंमत ५०० फ्रँक आहे; याउलट भारतात मात्र एक लिटर दुधाची किंमत २ रुपये तर एका रेफ्रिजरेटरची किंमत मात्र तब्बल ५००० रुपये आहे. ह्याचाच अर्थ, एक रेफ्रिजरेटर विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये ५०० लिटर दूध विकावे लागते, तर त्यासाठी भारतात मात्र त्यासाठी २५०० लिटर दूध विकावे लागते. याचाच अर्थ भारतात एक रेफ्रिजरेटर विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडपेक्षा पाचपट शेतमाल विकावा लागतो. अशीच तुलना पुढे लेखात टीव्ही, मोटार ह्या गोष्टी विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये व भारतात किती गहू वा तांदूळ विकावा लागेल ह्याबाबत केली आहे.
शेतीमालाला उत्तम किंमत मिळत असल्यानेच स्विस शेतकरी भारतीय शेतकऱ्यापेक्षा खूप अधिक सहजगत्या औद्योगिक माल घेऊ शकतो हे त्यावरून स्पष्ट होत होते.
स्वित्झर्लंडचा जास्तीत जास्त भू-प्रदेश शेतीखाली आणायचा म्हटला, तरी केवळ तीन पंचमांश लोकसंख्येला तो स्वतः अन्नधान्य पुरवू शकतो. उरलेले धान्य, तसेच मांस, मासे,अंडी त्यांना आयात करावी लागतात. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना परदेशातील स्वस्त खाद्यपदार्थांशी प्रचंड सामना करावा लागतो. त्याचवेळी डोंगरावरची शेती, लहान जमीनधारणा व छोटे गोठे यांमुळे स्वीस शेतीमालाचा उत्पादनखर्च मात्र जास्त असतो. यावर तेथे तोडगा कसा काढला याविषयी पुढे लीला जोशी यांनी लिहिले आहे,
औद्योगिक प्रसारामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी व लढाईच्या वेळेस काही अंशाने तरी खाद्यपदार्थांच्या बाबतीत स्वयंपूर्णता असावी म्हणून शेती जगवलीच पाहिजे व शेतीखालील क्षेत्र कमी होता कामा नये असे स्वीस सरकारचे धोरण आहे. त्यामुळे १९३० सालापासूनच स्वीस सरकारने शेतकऱ्यांचा माल उत्पादनखर्चावर आधारित उत्तम किमती देऊन विकत घेण्याचा निर्णय घेतला व तो माल बाजारात आयात केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्पर्धेत तोंड देईल एवढ्या कमी किमतीत ते विकू लागले. याचे पुढील २५ वर्षांत खालीलप्रमाणे फायदे झाले :
- मिळालेल्या नफ्यातून प्रत्येक शेतकऱ्याने शेतीचे यांत्रिकीकरण केले.
- भाज्या, फळे व धान्य शक्यतो प्रक्रिया करून व हवाबंद डब्यांतच विकण्यासाठी पाठवले जाऊ लागले.
- प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांच्या ग्रामोद्योगाचे एक प्रचंड जाळे तयार झाले.
अशा उपायांतून काही वर्षांतच स्विस शेतकरी स्वयंपूर्ण झाले व त्यामुळे गेल्या दोन पिढ्या सरकारी खरेदीची आवश्यकता तेथे राहिलेली नाही. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या हिताकडे सरकार डोळ्यांत तेल घालून पाहत असते. भाव खूप पडले व शेतकऱ्याचे नुकसान होईल असे वाटले, तर पुन्हा बाजारात उतरून स्वतः मालाची खरेदी करायचे व मागणी वाढवून भावही वाढवायचे सरकारचे धोरण कायम आहे.
स्वित्झर्लंडमध्ये असताना तेथील एका मोठ्या सहकारी संस्थेचे जोशी सदस्य बनले होते. त्या निमित्ताने तेथील सहकारी संस्था कशा काम करतात हे त्यांना नीट बघता आले. त्या संस्थेची किरकोळ विक्री करणाऱ्या शेकडो दुकानांची साखळी होती. शेतकऱ्याकडून थेट माल विकत घ्यायचा व ग्राहकाला या साखळीमार्फत विकायचा. अशा अनेक संस्था तिथे आहेत. यांतून शेतकऱ्याचीही सोय व्हायची व ग्राहकाचीही. शिवाय त्या सहकारी संस्थेलाही नफा व्हायचा व एक भागधारक या नात्याने लाभांशाच्या स्वरूपात तो जोशींनाही मिळायचा. अनेक वर्षांनी भारतात आल्यावर 'शिवार अॅग्रो' नावाने अशीच एक साखळी उभारायचा जोशींनी प्रयत्न केला होता; पण तो यशस्वी झाला नाही. त्याबद्दल पंधराव्या प्रकरणात येणारच आहे.
चाकण परिसरात जेव्हा जोशींनी स्वतःच्या शेतीला प्रारंभ केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की तिथे भुईमुगाचे पीक भरपूर यायचे; पण त्याला भाव मात्र अगदी कमी मिळायचा. भुईमुगाचा दर्जाही खूप कमी होता व तो सुधारण्याचा फारसा प्रयत्नही कोणी करत नव्हते. जे काही पीक निघेल, ते तेथील तेलाच्या घाणी अगदी स्वस्त दरात विकत घेत व त्याचे तेल काढून ते भरपूर भावाने विकून स्वतः गब्बर होत. उरणारी पेंडदेखील चांगल्या किमतीला जाई. त्याऐवजी शेतकऱ्यांनी शेंगदाण्यापासून स्वतःच तेल काढले किंवा लोणी, खारवलेले दाणे, तळलेले दाणे वा इतर स्नॅक फूड तयार केले, तर त्यात खूप फायदा होता. पण तसा प्रक्रियाउद्योग त्या परिसरात उभारणे बरीच पाहणी करूनही जोशींना जमण्यातले दिसेना.
दुसरा पर्याय होता, निर्यातीचा. परदेशातही शेंगदाण्याला भरपूर मागणी होती हे जोशींना ठाऊक होते. स्विस मार्केटमध्ये जोशींनी आपल्या ओळखीत एके ठिकाणी चौकशी केली. हा माणूस मदत मागत नाहीये, तर व्यापाराबद्दल बोलतो आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनीही मनापासून बोलणी करून सहकार्य दिले. त्यांची वार्षिक मागणी तब्बल तीनशे टनांची होती! पण त्यात एक अडचण होती; जगभरच्या भुईमुगाच्या शेतीचा त्यांनी अभ्यास केला होता व चाकण परिसरात होणाऱ्या शेंगदाण्यात अफ्लाटॉक्सिन (Aflatoxin) नावाचा एक विषारी पदार्थ खूप असतो हे त्यांच्या लक्षात आले होते.
खरे तर, हे अफ्लाटॉक्सिन सर्वच शेंगदाण्यांत असते; ज्याला आपण खवटपणा म्हणतो, तो ह्याच अफ्लाटॉक्सिनमुळे येतो. पण भारतातील त्याचे प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा पाच ते दहा पट अधिक असते. या विषामुळे यकृताचा व पोटाचा कॅन्सर होतो असे सिद्ध झाले आहे. आपल्या शरीराला कदाचित अशा जंतूंची व विषाची सवय झाली असल्याने आपल्या देशात आपण असल्या बाबींचा फारसा विचार करत नाही, पण तेथे शुद्धतेचे निकष खूप काटेकोरपणे पाळले जातात. म्हणूनच त्यांनी इस्राएल व दक्षिण आफ्रिकेतून हे शेंगदाणे मागवायला सुरुवात केली होती. “पण तुम्ही जर हे (अफ्लाटॉक्सिनचे) प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकाएवढे कमी केलेत, तर आम्ही तुमच्याकडूनही माल घ्यायचा विचार करू," असे आश्वासन त्यांनी दिले.
हे प्रमाण कमी करता येईल का, याविषयी जोशींनी खूप शेतकऱ्यांशी व तज्ज्ञांशी चर्चा केली; पण ते जमेना. शेतकऱ्यांनाही पारंपारिक पद्धतीने पीक काढणे व येईल त्या भावात तेलाच्या घाणींना विकून टाकणे, याचीच सवय झाली होती. आपण पिकाची गुणवत्ता सुधारली तर आपले उत्पन्न खूप वाढू शकेल, हा जोशींचा मुद्दा काही स्थानिक मंडळींना फारसा पटला नाही; किंवा पेलला नाही असे म्हणू या. हे अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकापेक्षाही खूप कमी असलेल्या भुईमुगाचे बियाणे तयार करण्यात पुढे बऱ्याच वर्षांनी, दोन हजार सालानंतर, कच्छमधील भूज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यश आले. असो.
अशा समृद्ध देशात राहत असतानाही भारतात परतायचे की परदेशातच कायम राहायचे ह्याविषयी जोशीची मन:स्थिती सारखी दोलायमान होत असे. सुरुवातीचे वर्षभर ते तिथे रमले तरी केव्हातरी भारतात परत जावे हा विचारही त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी असायचाच. १९७०मध्ये त्यांचे वडील वारले. त्यावेळी तीन महिन्यांची रजा काढून ते भारतात सहकुटुंब आले होते. भारतात परत जाण्याच्या दृष्टीने थोडी चाचपणी करायचाही त्यांचा उद्देश होता. त्या अनुभवाबद्दल जोशींनी लिहिले आहे. प्रत्यक्ष भेटीतही ते त्याबद्दल बोलले होते. ते म्हणाले,
"आधी आम्ही साहजिकच पुण्याला गेलो. कारण वडील सेवानिवत्त झाल्यानंतर पुण्यातच सेटल झाले होते आणि तिथेच वारले होते. वडलांचे सगळे दिवसवार वगैरे उरकल्यावर आम्ही प्रवासाला बाहेर पडलो. मुलींना जरा भारत दाखवावा व त्यातून भारताबद्दल त्यांचं चांगलं मत व्हावं, अशी आमची इच्छा होती. कारण कधीतरी भारतात परतायचं अशीच त्यावेळी आमची कल्पना होती. पण मुलींना भारत अजिबात आवडला नाही. दिल्ली, सिमला, आग्रा असा दौरा आम्ही आखला होता. ओळखीच्या एका लष्करी अधिकाऱ्यामळे राहायची उत्तम सोयदेखील करून ठेवली होती. दिल्लीहन सिमल्याला जाताना आम्ही खास डिलक्स बस घेतली होती. पण वाटेत जोराचा पाऊस सुरू झाला व त्या बसचं छत गळू लागलं. वरून अगदी धो धो पाणी पडू लागलं. थेट अंगावर. आम्ही सगळे भिजून चिंब झालो. थंडी जोराची. अगदी काकडून गेलो. चंडीगढची तेव्हा खूप चर्चा होती. नवी वसवलेली राजधानी. तीही कोर्बुसिए ह्या प्रख्यात फ्रेंच-स्विस आर्किटेक्टने. चंडीगढ मुलींना आवडेल अशी आमची कल्पना. पण प्रत्यक्षात त्यांना ते अजिबात आवडलं नाही. एक-दोनदा तेथील बसस्टॉपवरचं टॉयलेट वापरायचा प्रसंग आला. ते इतकं गलिच्छ होतं, की काही बोलून सोय नाही. ते स्वच्छतागृह मुलींनी पाहिलं आणि त्यांचा जीव घाबरा झाल्याचं मला जाणवलं. शक्य असतं, तर त्याच दिवशी विमान पकडून त्या परत बर्नला गेल्या असत्या."
१९७० साली त्या दौऱ्यावर असताना स्वित्झर्लंडची व भारताची जोशी यांच्या मनात सतत तुलना होत असे, कुटुंबीयांशीदेखील सतत ह्या विषयावर चर्चा होत असे. भारतात परतावे हे जोशींच्या मनात अधिक असे, पत्नी व मुलींचा मात्र त्याला प्रथमपासूनच कडवा विरोध होता. शेवटी सहकुटंब जेव्हा ते बर्नला परतले, तेव्हा यापुढे स्वित्झर्लंडमध्येच राहायचा निर्णय त्यांनी काहीशा नाइलाजाने घेतला.
बघता बघता आणखी दोन वर्षे गेली. मुली तेथील फ्रेंच शाळेत रमल्या होत्या, नोकरी उत्तम होती, स्वतःचे घर झाले होते; कमी असे काही नव्हतेच. पण तरीही पुन्हा एकदा मनात असमाधान खदखदू लागले.
ह्या असमाधानामागे काय कारणे होती? त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना त्यांच्या वागण्यात तसे काही जाणवत होते का? ह्याबद्दलची आपली निरीक्षणे मांडताना टोनी म्हणाले -
"असं नेमकं काही सांगणं अवघड आहे, कारण दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे ह्याची कल्पना बाहेरून बघणाऱ्याला कशी येणार? पण एक-दोन गोष्टींचा उल्लेख करायला हरकत नाही.
“एक म्हणजे, आपल्या नोकरीत शरदची स्थिती काहीशी साचलेल्या पाण्यासारखी झाली होती. आपल्याला प्रमोशन मिळायला हवं, आपली नक्कीच ती पात्रता आहे असं त्याला सतत वाटत होतं आणि ते प्रमोशन काही त्याला मिळत नव्हतं. ह्यावरून एकदा तो माझ्यावरही चिडला होता. आम्ही ऑफिसमधून घरी परतत होतो. ह्यावेळी गाडी त्याची होती. मी शेजारी बसलो होतो. गाडी चालवताना नेहमीप्रमाणे तो गप्पा मारत नव्हता. काहीसा घुश्श्यातच दिसत होता. मी त्याबद्दल काहीतरी बोललो. त्यासरशी माझ्याकडे कटाक्ष टाकत तो म्हणाला, 'लोकांनी तुझ्या घरावर दगड मारायला नको असतील, तर तूही दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणं थांबव.' नंतरच्या बोलण्यात उलगडलं, की त्याला प्रमोशन मिळू नये म्हणून, मी त्याच्या बॉसपाशी काही कागाळ्या केल्या होत्या, असं त्याला वाटत होतं. हे सगळं त्याच्या मनात कोणी भरवलं होतं कोण जाणे, पण ते अर्थातच खोटं होतं. नंतर मी खुलासा केल्यावर मात्र त्याला तो पटला आणि आमच्यातला तो दुरावा दूर झाला.
"आपल्याला अपेक्षित ते प्रमोशन मिळत नाही ह्याबद्दलचा शरदचा राग वाढायला आणखी एक कारण घडलं. आमचे डायरेक्टर जनरल त्यावेळी एक इजिप्शियन मुस्लिम गृहस्थ होते व जोशींना डावलून त्यांनी काँगो देशातील दुसऱ्या एका मुस्लिम कर्मचाऱ्याला ते प्रमोशन दिलं. त्यामुळे चिडलेला शरद मला म्हणाला, 'आपल्या या इंटरनॅशनल ब्यूरोत आता कामातल्या हुशारीला काहीच स्थान उरलेलं नाही. पूर्वी बढती देताना ती व्यक्ती कुठल्या खंडातून आलेली आहे याचा विचार व्हायचा. मग देशाचा विचार व्हायचा. मग राष्ट्रीयत्वाचा विचार व्हायचा. मग वर्णाचा विचार व्हायचा. आणि आता आणखी एका गुणाचा विचार होतो - तो म्हणजे त्या व्यक्तीच्या धर्माचा!' ह्याविरुद्ध तक्रार करायचं त्याने ठरवलं.
"जिनिव्हाला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं एक अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आहे. युएनच्या कुठल्याही शाखेतील कर्मचाऱ्यावर काही अन्याय होत असेल तर तो तिथे दाद मागू शकतो. आपल्याला पात्रता असूनही प्रमोशनसाठी डावललं जात आहे अशा प्रकारचं निवेदन त्याने ह्या ट्रायब्युनलपाशी दिलं होतं. त्या संदर्भात त्याला ट्रायब्युनलने त्याची बाजू ऐकून घ्यायला बोलावलंही होतं. पण दुर्दैवाने त्याची बाजू ट्रायब्युनलला पटली नाही व ती केस डिसमिस केली गेली.
"आज मागे वळून बघताना मला वाटतं, की त्याने जर अजून थोडा धीर धरला असता, तर त्याला प्रमोशन नक्की मिळालं असतं; जसं ते रुटीनमध्ये मलाही मिळत गेलं. इथे राहिला असता, तर तो माझ्याही वर, अगदी असिस्टंट डायरेक्टर जनरलच्या लेव्हलपर्यंत गेला असता. पण त्याने नोकरी सोडायचाच निर्णय घेतला.
"दुसरी एक घटना इथे नमूद करावीशी वाटते. शरद काही खूप चांगला ड्रायव्हर नव्हता; मी म्हणेन तो अॅव्हरेज ड्रायव्हर होता. एकदा गाडी चालवत असताना त्याच्या गाडीला गंभीर अपघात झाला होता. सुदैवाने त्याला स्वतःला काही दुखापत झाली नव्हती, पण त्याच्या मोटारीचं जबरदस्त नुकसान झालं होतं. माझ्या आठवणीप्रमाणे ती दुरुस्त करायचं गराजचं बिल ७००० स्विस फ्रैंक्स की असंच काहीतरी आलं होतं. तेवढे पैसे इन्शुरन्स कंपनी देणं शक्यच नव्हतं. 'माझं सगळं सेव्हिंग ह्यात गेलं' असं तो मला म्हणाल्याचं आठवतं. ह्या अपघातामुळे तो चांगलाच हादरला होता आणि ते तसं स्वाभाविकच होतं.
“एकूणच युएनच्या कामाबद्दल तो असमाधानी होता. आमचं बरचसं बजेट हे आमचे पगार, सल्लागारांचा मेहेनताना, प्रवास, हॉटेल, भव्य कार्यालय, डामडौल वगैरेवरच खर्च होतं; त्यातून गरीब देशांचं काहीच कल्याण होत नाही, अशी त्याची धारणा बनत चालली होती व त्यात तथ्यही होतंच.
"तरीही त्याने ही नोकरी सोडून भारतात जाऊ नये, इथेच त्याचा व त्याच्या कुटुंबीयांचाही उत्तम व्यक्तिगत विकास होऊ शकेल असं त्याला मी समजावलं. युएनमधील नोकरीमुळे काळाच्या ओघात त्याला स्वीस नागरिकत्वदेखील मिळू शकलं असतं. पण तसा तो निश्चयाचा पक्का होता व शेवटी त्याच्या मनाप्रमाणेच तो भारतात परत गेला."
जोशींच्या बर्नमधील कामाचे स्वरूप जुलै १९६९नंतर अधिक व्यापक झाले होते. युपीयुमधील नेहमीचे काम होतेच; पण त्याशिवाय युएनच्या विविध शाखा विकासासाठी जे कार्यक्रम जगभर राबवत होत्या, त्या कार्यक्रमांच्या आखणीसाठी आवश्यक त्या सामाजिक-आर्थिक पाहण्या करणे, त्यांना संख्याशास्त्रीय मदत करणे हाही आता त्यांच्या कामाचा एक भाग होता. त्यासाठी जगभर प्रवासही करावा लागे. हे सारे करताना जे त्यांच्या लक्षात येत होते ते युएनविषयी असलेल्या सर्वसामान्य कल्पनांना मुळापासूनच आव्हान देणारे होते.
ह्या साऱ्याची थोडी पार्श्वभूमी समजून घेणे जरुरीचे आहे. जगातील वाढत्या विषमतेची खंत पाश्चात्त्य जगातील अनेक नेत्यांना व जनतेलाही वाटत असे. त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या. वसाहतवादातून आपल्यापैकी अनेक राष्टांनी तिसऱ्या जगातील देशांचे शोषण केले आहे व त्याची काहीतरी भरपाई म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे ही त्यांची धारणा होती. युएनच्या सर्वच संस्थांचा भर त्यावेळी गरीब-श्रीमंत राष्ट्रांमधली अनुल्लंघनीय वाटणारी दरी कशी मिटवता येईल ह्यावर होता. जोशींच्या ऑफिसमध्येही गरीब देशांमधील पोस्टल सेवा कशी सुधारता येईल, त्यासाठी श्रीमंत देश कुठल्या स्वरूपात साहाय्य करू शकतील ह्याची चर्चा सतत होत असे.
डिसेंबर १९६१मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथे भरलेल्या अधिवेशनात अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी 'साठचे दशक हे विकासाचे दशक असेल' असे जाहीर केले. जगातील विषमता कमी व्हावी हा त्यामागचा उद्देश. त्याला 'फर्स्ट डेव्हेलपमेंट डिकेड' असे म्हटले गेले. त्या दशकात अविकसित देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी ५ % वाढ व्हावी असे ठरवले गेले. मात्र प्रत्यक्षात ही वाढ अवघी २% एवढीच झाल्याचे १९७०मध्ये लक्षात आले. त्याचवेळी विकसित देशांचे उत्पन्न मात्र ह्याच्यापेक्षा खूपच अधिक वेगाने वाढले होते; म्हणजेच विषमता कमी होण्याऐवजी वाढलेली होती.
त्यानंतर १९७०मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या पंचविसाव्या अधिवेशनात ही विषमता कमी करण्याच्या दृष्टीने सत्तरचे दशक हे 'सेकंड डेव्हलपमेंट डिकेड' म्हणून जाहीर केले. त्या दरम्यान अविकसित देशांचे उत्पन्न पाचऐवजी सहा टक्क्यांनी दरवर्षी वाढावे असे लक्ष्य ठरवण्यात आले. हे शक्य व्हावे, म्हणून सर्व विकसित देशांनी आपल्या उत्पन्नाचा एक टक्का इतका भाग हा अविकसित देशांना मदत म्हणून द्यावा असाही एक ठराव त्याच अधिवेशनात संयुक्त राष्ट्र संघाने संमत केला. गरीब देशच फार मोठ्या बहुसंख्येने असल्याने अधिवेशनातील मतदानात तो संमत होणे अगदी सोपे होते. अर्थात श्रीमंत (म्हणजेच मुख्यतः पाश्चात्त्य) राष्ट्रांचाही त्याला विरोध नव्हता.
पण तरीही विषमता कमी होण्याऐवजी सतत वाढतच होती. १९७५ साली विकसित देशांचे दरडोई उत्पन्न अविकसित देशांच्या उत्पन्नापेक्षा वीस पट झाले होते!
ह्या सुमारास जेव्हा 'मदत विरुद्ध व्यापार' ('aid versus trade') ह्याबद्दल जागतिक स्वरूपाची चर्चा सुरू झाली, तेव्हा 'मदत देण्यामागच्या अटी' आणि अविकसित देशांना नुकसान पोचवणाऱ्या व्यापाराच्या अटी' यांमागचे भयानक सत्य प्रकाशात येऊ लागले. जोशींच्या लक्षात आले, की मदत म्हणून जेव्हा काही निधी श्रीमंत राष्ट्रे देत, तेव्हा त्यासोबत अनेक अटीही असत. उदाहरणार्थ, ह्या रकमेतून तुम्ही आम्ही बनवलेला अमुकअमुक इतका माल खरेदी केला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्षात श्रीमंत राष्ट्रांची बाजारपेठ वाढवण्यासाठीच ह्या तथाकथित मदतीचा उपयोग होत होता. हे काही प्रमाणात अपरिहार्यही होते. कारण मुळात कुठल्याही राष्ट्राला विकास करण्यासाठी ज्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती व नंतर ज्या प्रकारच्या उद्योगांची गरज होती, ते उभारण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व तंत्रज्ञान हे श्रीमंत राष्ट्रांकडेच उपलब्ध होते. गरीब देशांतून येणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कायम कमी व श्रीमंत देशांतून निर्यात होणाऱ्या पक्क्या मालाच्या किमती कायम जास्त हे व्यापारातले वास्तव विदारक होते. 'मदत' या शब्दाला त्यामुळे काही अर्थच उरत नव्हता.
याचवेळी आपण देत असलेल्या मदतीची रक्कम अविकसित देशांतील अभिजनवर्ग स्वतःच खाऊन टाकतो व खऱ्या गरजू लोकांना काहीच मिळत नाही हे मत त्यावेळी अनेक पाश्चात्त्य वृत्तपत्रांमधून अधोरेखित होत असे. एखाद्या आफ्रिकन देशातील राजा आपल्या अल्सेशिअन कुत्र्याला चिकन भरवतो आहे व त्याचवेळी त्याच्या देशातील हजारो सामान्य लोक उपाशी मरत आहेत अशा प्रकारची व्यंग्यचित्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत होती. पाश्चात्त्य समाजात त्यामुळे गरीब देशांना 'मदत' द्यायला विरोध वाढू लागला.
स्वतः जोशी यांचा अनुभवही या मताला दुजोरा देणारा होता. ते जेव्हा आपल्या कामाचा भाग म्हणून वेगवेगळ्या अविकसित देशांमध्ये जात, त्यावेळी त्यांनीही त्या देशांतील वाढती अंतर्गत विषमता बघितली होती व जागतिक पातळीवरील गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील विषमतेपेक्षा ती अधिक भयावह होती. विशेषतः आफ्रिकेतील नायजेर ह्या देशामधील अनुभव त्यांना बराच अंतर्मुख करून गेला. तिथे त्यांनी बघितले, की देशाच्या राजधानीचा थोडासा भाग खूप श्रीमंत दिसतो, तिथे बडी बडी हॉटेल्स आहेत, विदेशी मोटारी, सौंदर्यप्रसाधने, अत्याधुनिक उपकरणे, कपडे हे सर्व काही ठरावीक दुकानांतून उपलब्ध आहे व एकूणच राज्यकर्ता वर्ग व इतर सत्ताधारी ऐषारामात जगत आहेत. अगदी युरोपातील उच्चवर्गीयांप्रमाणेच त्यांची जीवनशैली आहे. पण त्याचवेळी त्या देशातील बहुसंख्य जनता मात्र भीषण दारिद्र्यात सडत आहे.
जोशींनी हेही बघितले होते, की वेगवेगळ्या अविकसित देशांची मोठी मोठी शिष्टमंडळे युएनच्या परिषदांसाठी वा अन्य कार्यक्रमांसाठी युरोप-अमेरिकेत जातात तेव्हा त्यांचा एकूण दृष्टिकोन हा केवळ सरकारी पैशावर परदेशात मजा मारणे हाच असतो; प्रत्यक्षात संयुक्त राष्ट्रांकडे भीक मागण्याच्या पलीकडे ती काहीच करत नाहीत आणि मुख्य म्हणजे आपल्या देशाचा विकास व्हावा अशी तळमळही ह्या बड्या मंडळींना नसते; ते केवळ स्वतःची चैन आणि स्वार्थ एवढेच पाहत असतात.
त्यांचे एक निरीक्षण असे होते, की ह्या गरीब देशांतील नेते एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी गेले, की नेहमी आलिशान गाड्यांमधूनच फिरायचे व त्याउलट श्रीमंत देशांतील नेते मात्र तुलनेने साध्या गाड्या वापरत. हाच फरक कपडे, खाणेपिणे, दैनंदिन राहणी ह्या सगळ्यातच उघड दिसायचा. म्हणजे बोलताना आपण गरीब देशांच्या जनतेचा आवाज उठवतो आहोत असा आविर्भाव आणायचा, पण स्वतःच्या दैनंदिन जगण्यात मात्र अगदी चैनीत राहायचे! ह्या सर्व ढोंगबाजीची जोशींना घृणा वाटू लागली.
सुरुवातीला खूप मानाच्या आणि महत्त्वाच्या वाटलेल्या युएनमधील नोकरीत पुढे आपल्याला वैयर्थ्य का जाणवू लागले याची काही कारणे स्वतः जोशी यांनी योद्धा शेतकरी या पुस्तकात उद्धृत केलेल्या संभाषणात व इतरत्रही नमूद केली आहेत. त्यांच्या मते बाहेरून पाहणाऱ्याला असे वाटत असते, की या संयुक्त राष्ट्रसंघात फार महत्त्वाचे असे काही काम चालले आहे. पगारवगैरे उत्तमच असतो. पण संयुक्त राष्ट्रसंघाला प्रत्यक्ष अधिकार असे फारसे नसतात. वेगवेगळ्या देशांचे धोरण शेवटी ते ते देशच ठरवत असतात. संयुक्त राष्ट्रांमध्ये जेव्हा 'सेकंड डेव्हेलपमेंट डिकेड'चे काम सुरू झाले – म्हणजे 'विकासाच्या दुसऱ्या दशकाची' आखणी सुरू झाली – तेव्हा ह्या संघटनेतून बाहेर पडावे, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. 'विकासाचे दुसरे दशक' म्हणजे नेमके काय? विकासाचे पहिले दशक' तरी कुठे नीट पार पडले आहे? मग लगेच हे दुसरे दशक सुरू करायची भाषा कुठून आली? – असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले.
युएनतर्फे राबवला जाणारा 'विश्वव्यापी तांत्रिक साहाय्य' किंवा 'टेक्निकल असिस्टन्स' नावाचा जो कार्यक्रम आहे. तो म्हणजे एक फार मोठी बनवाबनवी आहे. खोटेपणा आहे हेही त्यांना कळून चुकले. ह्या तांत्रिक' साहाय्यातील फार मोठी रक्कम ह्या सल्लागारांच्या भरमसाट पगारातच जाते, आणि प्रत्यक्षात ज्यांना फायदा व्हावा म्हणून हा निधी उभा केला जातो, त्यांना जे हवे ते कधीच मिळत नाही.
ह्याशिवाय, आणखीही एक भयानक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे हे सारे वास्तव उघडउघड दिसत असूनही गरीब देशांतले सारे अर्थतज्ज्ञ, राज्यकर्ते, विचारवंत त्याकडे पूर्ण डोळेझाक करतात व जी भूमिका घेण्याने स्वतःचा फायदा होईल, स्वतःला आंतरराष्ट्रीय परिषदांचे आमंत्रण येईल, पुरस्कार मिळतील तीच भूमिका घेतात. स्वार्थापोटी आपली बुद्धी त्यांनी चक्क गहाण टाकलेली असते. आपली सध्याची नोकरी म्हणजेदेखील अप्रत्यक्षरीत्या ह्याच सगळ्या भ्रष्ट यंत्रणेचा एक भाग आहे, असेही त्यांना वाटू लागले.
एकीकडे त्यांचे वाचन व चिंतन सतत चालूच होते; भारतातील गरिबीचा प्रश्न हा शेतीमालाला मिळणाऱ्या अत्यंत अपुऱ्या किमतीशी निगडित आहे हे त्यांच्या लक्षात आले होते; पण त्यावर युएनमध्ये काहीच चर्चा होत नव्हती. ह्या सगळ्याचा जोशींना अगदी उबग आला. जोशी म्हणतात,
"दारिद्र्याच्या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा खराखुरा प्रयत्न कुणी केलेलाच नाही, हेदेखील माझ्या ध्यानात यायला लागलं! मी वेगवेगळे अहवाल आणि ग्रंथ वाचू लागलो, तेव्हा ह्या दारिद्र्याच्या प्रश्नाचं मूळ टाळून development techniques, linear programming equations वगैरे जडजंबाल शब्दांमध्ये जे काही लिहिलं जायचं, वाचायला मिळायचं, ते अगदी खोटं आहे हे प्रकर्षाने जाणवू लागलं. असे अहवाल आणि पुस्तकं लिहिणारे विशेषज्ञ हे दारिद्रयाच्या मढ्यावर चरणारे लोक आहेत, ह्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका उरली नाही! १९७२च्या सुमारास माझ्या मनात भारतामध्ये परतायचं हा विचार पक्का झाला आणि भारतात जाऊन काय करायचं, तर कोरडवाहू शेती - हेदेखील मी पक्कं ठरवलं! सगळ्या देशातील दारिद्र्याचं मूळ हे ह्या कोरडवाहू शेतीमध्ये आहे, अशी माझ्या मनाची खात्री पटली होती."
हळूहळू व्यक्तिगत पातळीवरही जोशींच्या मनात बरीच कटुता जमा होत होती. याची काही कल्पना टोनी यांच्या बोलण्यावरून येते. शिवाय जोशींचा युपीयुमधील स्टाफ असोसिएशनचा व एकूण सामाजिक वर्तुळाचा अनुभवही फारसा चांगला नव्हता. ते एकदा म्हणत होते,
"तिथल्या बहुतेक लोकांच्या मनात भारतीय माणूस म्हटल्यावर एक विशिष्ट प्रतिमा असते. देवभोळा, हिंदू परंपरा पाळणारा वगैरे. किंवा मग भांडवलदारांवर, उद्योगक्षेत्रावर, आधुनिक तंत्रज्ञानावर सतत टीका करणारा वगैरे. मी या दोन्ही प्रकारांत बसणारा कधीच नव्हतो. भारतीय म्हणून एखाद्याने जी भूमिका घ्यावी असं त्यांना वाटायचं, तसं वागणारे, किंवा वरकरणी तशीच भूमिका घेणारे, इतर अनेक उच्चभ्रू भारतीय तिथे यायचे. ह्या उच्चभ्रूचं ते प्रतिमा जपणं मला ढोंगीपणाचं वाटे. मी कधीच तो प्रकार केला नाही. दुसरं म्हणजे, भारतासारख्या मागासलेल्या देशातील माणसाला परदेशी खरी प्रतिष्ठा, खरं बरोबरीचं स्थान हे कधीच मिळत नाही.
म्हणजे वरकरणी सगळं नॉर्मल असतं, तुमचा अपमान वगैरे कोणी करत नाही, कायदेही सगळे सर्वांना समान असतात; पण त्यांच्या मनात एक दुरावा कायम असतोच. त्यांच्या समाजाचा एक घटक म्हणून ते तुमचा कधीच स्वीकार करत नाहीत. शिवाय तुम्ही व्यक्तिशः कितीही कर्तबगार असला, तरी तुमच्या देशाच्या एकूण मागासलेपणाचं ओझं तुमच्या खांद्यावर असतंच. तुमचं मूल्यमापन करताना तुम्ही शेवटी एक भारतीय आहात, मागासलेल्या देशातले आहात, ह्याचा त्यांना सहसा कधी विसर पडत नाही."
जोशींसारख्या मानी माणसाला हे सारे सहन होत नसे.
बांगलादेशातील यादवी युद्ध, भारतात आलेल्या बांगला निर्वासितांच्या छावण्या, भारतातील दुष्काळ, उपासमार, भ्रष्टाचार आणि त्याचवेळी काही जण मात्र श्रीमंत राष्ट्रांतील श्रीमंत वर्गानही हेवा करावा अशा विलासी थाटात मजा मारत आहेत अशी चित्रे त्यावेळी पाश्चात्त्य टीव्हीवरून जवळजवळ रोजच दाखवली जात होती. साधारण त्याच काळात सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्या प्रकरणातदेखील भारत सरकार एका छोट्या पण स्वायत्त देशाशी दांडगाई करत आहे असे मानणारा एक मोठा वर्ग पाश्चात्त्य जगात होता. "हे सारं तुमच्या देशात होत असताना तुमच्यासारख्या कर्तृत्ववान भारतीयाने इथे युरोपात राहावं हे तुमच्या सरकारला परवडतं तरी कसं काय?" असा प्रश्न जोशींना एका इंग्रज अधिकाऱ्याने विचारलाही होता.
व्यक्तिगत पातळीवरील आणखी एक निरीक्षण त्यांना चीड आणत असे. आपल्या इतर युरोपियन सहकाऱ्यांपेक्षा आपण अधिक कर्तबगार आहोत अशी जोशी यांची खात्री होती. पण त्याचवेळी भारतीय म्हणजे गरीब लोक, हा मागासलेला देश, आपण ह्यांना मदत केली पाहिजे, त्यांचा विकास करायला पाहिजे अशा प्रकारची एक वडिलकीची (patronizing) भावना पाश्चात्त्य समाजात त्यांना खूपदा आढळायची. व्यक्तिशः आपल्याकडे बघण्याची पाश्चात्त्यांची दृष्टीही तशीच अहंगंडातून आलेली आहे असे त्यांना जाणवायचे. ह्या भावनेतून येणारा पाश्चात्त्यांचा दातृत्वाचा आविर्भाव त्यांना चीड आणायचा; त्यांच्यातील प्रखर आत्मभानाला म्हणा किंवा अस्मितेला म्हणा तो कुठेतरी डंख करणारा होता.
मागे लिहिल्याप्रमाणे आपण कोणीतरी मोठे व्हावे, जगावेगळे काहीतरी करून दाखवावे अशी एक महत्त्वाकांक्षा जोशी ह्यांच्या मनात लहानपणापासून होतीच. भारतातील पोस्टखात्यात उच्चपदी असतानाही ह्या महत्त्वाकांक्षेने त्यांची पाठ सोडली नव्हती. स्वित्झर्लंडमध्ये राहताना बाकी सगळे असूनही ह्या मूलगामी महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेच्या दृष्टीने काहीच घडत नव्हते, घडणे शक्यही वाटत नव्हते. शेवटी भारत हीच आपली कर्मभूमी असायला हवी, इथे आपले आयुष्य फुकट चालले आहे, ही जाणीव त्यांच्या मनात त्यावेळी निर्माण झाली असणे सहजशक्य आहे.
टोनी म्हणाले,
"एक दिवस आपला मालकीचा फ्लॅट विकून टाकायचा व बर्नमध्ये भाड्याचं घर घेऊन राहायचा निर्णय त्याने घेतला. हे त्याने जेव्हा मला सांगितलं, तेव्हाच भारतात परतायचा त्याचा निर्णय पक्का झाला आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि एकदा त्याच्या मनानं एखादी गोष्ट घेतली, की त्याचं मन वळवणं अवघड नव्हे तर अशक्य आहे, हे आठ वर्षांच्या सहवासात मला कळून चुकलं होतं."
भारतात प्रत्यक्ष परतायच्या काही वर्षे पूर्वीच तसे करायचा सुस्पष्ट विचार जोशी यांच्या मनात आकाराला आला होता हे स्पष्ट करणारी काही कागदपत्रे उपलब्ध आहेत.
उदाहरणार्थ, मार्च १९७४ मध्ये हैद्राबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट या संस्थेच्या संचालकांबरोबर झालेला त्यांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यानुसार त्या संस्थेने स्वत:च्या जर्नलच्या वर्गणीचे म्हणून पाठवलेले सहा पौंडांचे बिलही उपलब्ध आहे. आपल्या पत्रात १५ जुलै ते ३१ डिसेंबर १९७४ या कालावधीत संस्थेचा कोर्स करायची इच्छाही जोशींनी व्यक्त केली आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एम. एस. ऊर्फ नानासाहेब पवार यांना जोशींनी लिहिलेले पत्र व त्याला नानासाहेब पवार यांनी दिलेले उत्तरही उपलब्ध आहे. त्या पत्रात भारतातील शेतीचा अभ्यास करायची इच्छा जोशींनी व्यक्त केली आहे व उत्तरात पवार यांनी त्यांना मार्गदर्शनही केलेले आहे. "आमचे एक प्राध्यापक डॉ एस. एस. थोरात पुणे कृषी महाविद्यालयात आहेत व त्यांच्याबरोबर १५ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत तुम्ही काम करू शकता. ते तुम्हाला पुण्याभोवतीच्या खेड्यांमधून घेऊन जातील, तेथील शेतकऱ्यांमधील आमचे काम तुम्ही पाहू शकाल," असेही त्यात लिहिले आहे.
त्यानंतर दोन वर्षांनी, २६ मार्च १९७६ रोजी, दिल्लीत प्रधानमंत्री कार्यालयातील सचिवांना जोशींनी बर्नहून एक महत्त्वाचे पत्र लिहिले आहे. त्या पत्रात भारतात परतायचा व शेतीविषयक काम करायचा आपला निर्णय त्यांनी कळवला आहे. सोबत आपल्या मनातील प्रकल्पाचा आराखडाही पाठवला आहे. त्यासाठी शासनाकडून पडीक जमीन उपलब्ध होईल का' अशी विचारणा केली आहे. असेच पत्र आपण महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले असल्याचा पत्रात उल्लेख आहे. "ही जमीन मी रोख पैसे देऊन विकत घेईन. शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या साहाय्याची मला अपेक्षा नाही," हेही पत्रात स्पष्ट केलेले आहे हे मुद्दाम नमूद करण्यासारखे आहे.
प्रस्तुत पत्राला सहसचिव, प्रधानमंत्री सचिवालय, यांनी लिहिलेले ५ एप्रिल १९७६ तारखेचे उत्तर उपलब्ध आहे. त्यात लिहिले आहे,
"तुमचे पत्र व सोबतचा तुम्ही बनवलेला कमीत कमी भांडवल वापरून शेती करायच्या पायलट प्रोजेक्टचा आराखडा मिळाला. या महत्त्वाच्या विषयात तुम्ही स्वारस्य घेत आहात याचे कौतुक वाटते. आपल्याला हे पटेलच की केवळ कच्च्या आराखड्याच्या आधारावर विस्ताराने काही प्रतिसाद देणे आम्हाला अवघड आहे, पण महाराष्ट्रात परतल्यावर तुम्ही तेथील शासनाशी चर्चा करणार असल्याचे तुम्ही पत्रात लिहिलेच आहे. महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला नक्कीच सर्व अपेक्षित उत्तरे मिळतील."
पत्रासोबत आपल्या योजनेचा कच्चा आराखडा जोडला असल्याचा उल्लेख जोशींनी केला आहे, व तो मिळाल्याचा उल्लेख सहसचिवांच्या उत्तरात आहे, पण दुर्दैवाने त्या आराखड्याची प्रत मात्र जोशी यांच्या कागदपत्रांत उपलब्ध झाली नाही. ती उपलब्ध असती, तर तो एक महत्त्वाचा दस्तावेज ठरला असता.
या सर्व पत्रव्यवहारावरून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे भारतात प्रत्यक्ष परतायच्या निदान दोन वर्षे आधी भारतात परतायचे व परतल्यावर कोरडवाहू शेतीविषयक प्रयोग करायचे जोशी यांचे ठरले होते व त्यादृष्टीने बरेचसे नियोजनही त्यांनी केले होते.
१ मे १९७६ रोजी, म्हणजे युपीयुमध्ये दाखल झाल्यानंतर बरोबर आठ वर्षांनी, जोशी भारतात परतले. तिथेच राहिले असते तर २००१पर्यंत त्यांना नोकरी करता आली असती पण त्यांचा निश्चय अविचल होता. टोनी म्हणाले,
"त्यानंतर त्याचा व माझा काहीच संबंध राहिला नाही. आमच्यात पत्रव्यवहारदेखील कधी झाला नाही. तो भारतात शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळावा यासाठी काही काम करतो, एवढं फक्त मला कुठूनतरी ऐकून कळलं होतं. अशीच जवळजवळ दोन वर्षं गेली. मग साधारण १९७८च्या सुमारास अचानक त्याचं मला पत्र आलं. त्याला झुरिकजवळ स्प्रायटेनबाख (Spritenbach) नावाच्या गावी असलेली झ्वीबाख (Zwibach) पोटॅटो चिप्स फॅक्टरी नावाची एक वेफर्स बनवायची फॅक्टरी बघायची होती. त्यानुसार तो स्वित्झर्लंडला आला, ठरल्याप्रमाणे बर्नला माझ्याच घरी राहिला. मी त्यापूर्वीच तिथल्या मॅनेजमेंटला फोन करून अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. दुसऱ्या दिवशी मीच त्याला त्या फॅक्टरीत घेऊन गेलो. पूर्ण दिवस आम्ही त्या फॅक्टरांमध्ये घालवला. सगळं बघण्यात आणि चर्चा करण्यात. तिथल्या अधिकाऱ्यांनी आमचं चांगलं स्वागत केलं. विशिष्ट प्रकारचे बटाटे कसे व कुठून मिळवले जातात, ते भरपूर पाण्याने कसे धुतले जातात, नंतर ते कसे सोलले व कापले जातात, कसे तळले जातात, त्यांची चव कशी तपासली जाते, दर्जा कसा कायम राखला जातो. तयार वेफर्सचं पॅकिंग कसं केलं जातं, त्यावरचा मजकूर कसा छापला जातो, तो तयार माल कसा वितरीत केला जातो हे सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं. शरदला असं काहीतरी भारतात सुरू करायचं होतं. पण प्रत्यक्षात असं काही करणं त्याच्या परिस्थितीत अशक्य आहे असा निष्कर्ष त्याने शेवटी काढला."
पुढे टोनी म्हणाले,
"१९७८ सालातील त्याच्या त्या भेटीनंतर पुन्हा पुढली ३४ वर्ष आमचा काहीच संबंध आला नाही. त्याच्या मुली मात्र अधूनमधून आमच्या संपर्कात होत्या. मग गेल्या महिन्यात अगदी अचानक त्याची इमेल आली व तुम्ही त्याचं चरित्र लिहीत आहात व त्या संदर्भात मला भेटू इच्छिता हे त्यानी कळवलं. तुमच्याशी झालेल्या ह्या चर्चेमुळे आज इतक्या वर्षांनी त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एका उमद्या, बुद्धिमान मित्राबरोबर आठ वर्षं मी काम केलं, त्यांतील सात वर्षंतर त्याचा अगदी जवळचा शेजारी म्हणूनही राहिलो, त्याचा व त्याच्या सगळ्या कुटुंबाचा भरपूर सहवास मिळाला ह्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो."
ह्या भेटीच्या वेळी व नंतरदेखील टोनी यांनी जे मनःपूर्वक सहकार्य दिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच होतील. आमच्या भेटीची मी लिहिलेली टिपणांची १८ पानेदेखील त्यांनी कंटाळा न करता व्यवस्थित तपासून दिली. शरद जोशी यांच्या जीवनातील हे बहुतांशी अज्ञात राहिलेले पर्व त्यांच्यामुळेच माझ्यापुढे साकार झाले.
आयुष्याच्या ऐन उमेदीत स्वित्झर्लंडसारख्या एखाद्या देशात आठ वर्षे सहकुटुंब राहताना, वरिष्ठपदी काम करताना जोशींच्या संवेदनशील मनावर अनेक संस्कार होणे अगदी स्वाभाविक आहे. असे कुठले वैचारिक संस्कार ह्या कालावधीत त्यांच्यावर झाले असतील, ह्याचा विचार करताना व त्यांचा भावी जीवनातील वाटचालीशी संबंध जोडताना चार मुद्दे सर्वाधिक महत्त्वाचे वाटतात.
इथल्या वास्तव्यात पटलेला व भावी जीवनावर प्रभाव टाकणारा पहिला मुद्दा म्हणजे आर्थिक समृद्धीचे मानवी जीवनातील सर्वस्पर्शी महत्त्व.
इथली डोळे दिपवणारी समृद्धी ही केवळ आर्थिक नव्हती; तिचे पडसाद जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत उमटताना दिसत होते. शिस्तबद्ध वाहतूक, लोकांचे एकमेकांशी असलेले समंजस वागणे, कसलाच तुटवडा नसल्याने आणि म्हातारपणाची उत्तम सोय सरकारने केलेली असल्यामुळे वागण्यात सहजतःच आलेले औदार्य, व्यक्तिस्वातंत्र्याची पराकोटीची जपणूक, लोकांचे निसर्गप्रेम, त्यांचे क्रीडाप्रेम, सर्व सोयींनी युक्त अशी मैदाने, प्रशस्त तरणतलाव, घराघरातून फुललेली रंगीबेरंगी फुले, सुदृढ व टवटवीत चेहऱ्यांचे नागरिक हे सारेच खूप आनंददायी होते. इथे आठ वर्षे काढल्यावर आर्थिक समृद्धीचे सर्वंकष महत्त्व त्यांना पूर्ण पटले. उर्वरित आयुष्यात व्यक्तिगत पातळीवर ते बहुतेकदा साधेपणेच राहिले; पण त्यांनी अर्थवादाचे महत्त्व कायम अधोरेखित केले व कधीही दारिद्र्याचे उदात्तीकरण केले नाही.
मनावर ठसलेला दुसरा मुद्दा म्हणजे देशाच्या या एकूण समृद्धीत समृद्ध शेतीचे असलेले पायाभूत महत्त्व.
स्वित्झर्लंडच्या समृद्धीमागे अनेक घटक आहेत हे नक्की, पण शेतीतील समृद्धी हा त्यांतील सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. शेतीतील फायद्यातूनच तिथे आधी शेतमालावर प्रक्रिया करणारे छोटे कारखाने उभे राहिले, त्यातून इतर ग्रामोद्योग, विकसित अशी ग्रामीण बाजारपेठ, ग्रामीण समृद्धी व त्यातून मग मोठाले उद्योग असा तेथील विकासाचा क्रम आहे. त्याच्या मुळाशी आजही शेती हीच आहे. ह्याची स्पष्ट कल्पना असल्यामुळेच तेथील सरकार शेतीला सर्व प्रकारे उत्तेजन देते. शेतीत वापरता येतील अशी अत्याधुनिक उपकरणे शेतकऱ्याला उपलब्ध असतात. शेतीमालाची साठवणक करण्यासाठी गदामे, शीतगहे वाहतूक करण्यासाठी वाहने व रस्ते, विक्रीसाठी सुसज्ज बाजारपेठ, भांडवली खर्चासाठी अत्यल्प व्याजदरात कर्जाची उपलब्धता, वीज व पाणी ह्यांचा अनिर्बंध पुरवठा या व अशा इतरही अनेक कारणांमुळे तेथील शेती आजही अतिशय किफायतशीर आहे – विशेषतः दूध शेती (Dairy Farming). या छोट्याशा देशामध्ये, ज्याची लोकवस्ती जेमतेम ८० लाख, म्हणजे आपल्या मुंबईच्या निम्म्याहून कमी आहे अशा देशात, आज २६,००० सहकारी दूध संस्था आहेत व त्यातील बहुतेक सर्व चांगल्या चालतात. इथे गायींना कोणीही गोमाता म्हणून पूजत नाही, पण इथल्या गायी धष्टपुष्ट असतात, उत्तम काळजी घेऊन निरोगी राखल्या जातात आणि रोज सरासरी तीस-चाळीस लिटर दूध देतात. ह्या दुधापासून दही, लोणी, चीज, दूध पावडर वगैरे अनेक उत्पादने मोठ्या प्रमाणावर तयार होतात व त्याला जगभरातून प्रचंड मागणी आहे. ह्या समृद्ध शेतीतूनच पुढे त्यांनी देशाचा औद्योगिक विकासदेखील केला; पण औद्योगिकीकरण करताना त्यांनी शेतीकडे कधीच दर्लक्ष केले नाही. हे सारे जोशी यांना तिथे जवळून बघता आले, अभ्यासता आले.
तिसरा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाचे मानवी विकासातील पायाभूत महत्त्व.
इथल्या वास्तव्यात जोशी यांना स्वतःला तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली. कदाचित ती उपजतदेखील असू शकेल, पण इथे तिला भरपूर वाव मिळाला असेही म्हणता येईल. टोनी सांगत होते,
"ऑफिसात कुठलंही नवं उपकरण आलं, की ते कसं वापरायचं हे शिकून घेण्यात तो आघाडीवर असायचा. कॉम्प्युटरचा वापर त्यावेळी बराच मर्यादित होता, पण तरीही जिनिव्हाला जाऊन कॉम्प्युटर व टेलेकम्युनिकेशन्स शिक्षणाचा एक तीन महिन्यांचा कोर्स करायची त्याची इच्छा होती. त्यासाठी बरीच धडपड करून त्याने ऑफिसची परवानगी मिळवली व तो कोर्स पूर्णही केला. हा कोर्स करणारे त्यावेळी आमच्या ऑफिसात अगदी थोडे लोक होते. संध्याकाळी घरी गेल्यावरदेखील तो वेगवेगळे पार्ट्स जोडून इलेक्ट्रॉनिकची ट्रेन तयार करायचा खेळ खेळण्यात रंगन जायचा. त्यासाठी त्याने बरीच महागडी साधनंही खरेदी केली होती."
जोशींची तंत्रज्ञानाची ही आवड पुढे आयुष्यभर कायम राहिली. म्हातारपणी ज्यावेळी हात कापत असल्यामुळे संगणकावर अक्षरलेखन करणे त्यांना जमेना त्यावेळी नुकतेच बाजारात आलेले Dragon Naturally Speaking या नावाचे एक आवाज ओळखून कळफलक वापरणारे सॉफ्टवेअर त्यांनी कुठूनतरी मिळवले, ते आत्मसात केले व पुढची तीन-चार वर्षे त्याचा वापर करून आपले इंग्रजी लेखन केले. पुढे पुढे मात्र अर्धांगवायूच्या झटक्यानंतर त्यांच्या आवाजात संदिग्धता आली व त्यानंतर मात्र त्यांना इंग्रजी लेखनासाठीही लेखनिकावर अवलंबून राहावे लागले.
१९७२-७३ या कालावधीत लोझान ह्या मोठ्या स्विस शैक्षणिक शहरात शनिवार-रविवार जाऊन-येऊन त्यांनी एक कोर्सही केला होता – Diploma in Data Processing, Computer Programming and SystemsAnalysis. यानंतर ऑफिसात 'हेड. डेटा प्रोसेसिंग सेंटर' या पदावर त्यांची नेमणूक झाली. नोकरी सोडली, तेव्हा ते ह्याच पदावर होते.
जिनिव्हा येथे राहणारे मोरेश्वर ऊर्फ बाळ संत नावाचे एक इंजिनिअर मला तिथे भेटले. जोशींना ते चांगले ओळखत होते. इंटरनॅशनल टेलेकम्युनिकेशन्स युनियन ह्या युएनच्या घटकसंस्थेत ते नोकरी करत होते. जोशी यांनी जिनिव्हाला जाऊन जो कोर्स केला होता, तो संत ह्यांच्या संस्थेनेच युएनच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणून खास तयार केला होता. जोशी तो कोर्स करण्यात किती रमले होते, बाजारात येणाऱ्या कुठल्याही नव्या संशोधनाबद्दल ते किती उत्साहाने चौकशी करत ह्याबद्दल संतदेखील सांगत होते. "मी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचा विद्यार्थी, जोशी मात्र अर्थशास्त्राचे विद्यार्थी; पण आमच्या गप्पा नेहेमी तंत्रज्ञानाबद्दल असत," ते म्हणाले. युपीयुच्या कामासाठी जोशी यांना जिनिव्हाला वारंवार यावे लागे व त्यामुळे दोघांच्या भेटीही वरचेवर होत.
शेती, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांची उत्तम सांगड स्वित्झर्लंडने कशी घातली आहे ह्याचे तेथील नेसले (Nestle) कंपनी हे उत्तम उदाहरण आहे. शेतकरी भरणा करत असलेल्या दुधाला त्यांनी उत्तम भाव दिला, त्याच्या समृद्धीला हातभार लावला. त्याशिवाय नुसते दूध वा दुधापासून तयार होणारे लोणी, दही वा चीज तुम्ही किती विकू शकता ह्याला मर्यादा आहे, हे ओळखून नेसले कंपनीने बेबीफूड, चॉकोलेट्स व 'मॅगी'सारखे 'फास्ट फूड' बनवायला सुरुवात केली, त्यांची निर्यात सुरू केली आणि आज त्या क्षेत्रांत ती जगातील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते.
इतक्या मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यालय जिनिव्हा, झुरिक, बर्न अथवा बाझल यांसारख्या कुठल्याच मोठ्या स्वीस शहरात नाही, तर वेवेसारख्या एका अगदी छोट्या गावात आहे हे आपण लक्षात घेणेही खूप महत्त्वाचे आहे.
चौथा मुद्दा म्हणजे मानवी जीवनातील स्वातंत्र्य ह्या मूल्याचे पायाभूत महत्त्व.
स्वीस लोकांनी व्यक्तिस्वातंत्र्याची जपणूक इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक जागरूकतेने केली आहे. ह्या देशात सार्वजनिक बसेसचा रंग कोणता असावा यावरसुद्धा (referendum) घेतले गेले आहे! खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जतन केलेला हा देश आहे. आपापला कारभार चालवण्यात प्रत्येक काउंटीला भरपूर स्वातंत्र्य आहे व तेच स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीलाही दिले गेले आहे. ह्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेभोवतीच ह्या देशाचे अस्तित्व गंफलेले आहे.
आपल्या सर्व भावी आयुष्यात स्वातंत्र्य हे मूल्य जोशींनी कायम सर्वाधिक महत्त्वाचे मानले. एक गंमत म्हणजे डोंगर चढण्याचा छंद हाही कुठेतरी ह्या स्वातंत्र्यप्रेमाशी जोडलेला असावा. स्वित्झर्लंडमध्ये हे डोंगरांचे प्रेम सार्वत्रिक आहे. हा देश डोंगरांचाच बनलेला आहे; देशात कुठेही जा, डोंगर तुमच्यापासून लांब नसतात. जोशींना लहानपणापासून डोंगरांचे आकर्षण होतेच, पण भारतात डोंगर चढायला फारसा वाव नव्हता; नोकरी मुख्यतः शहरांतच होती. स्वित्झर्लंडमध्ये मात्र ह्या गिर्यारोहणाला भरपूर वाव मिळाला. आपली बरीचशी बंधने ही भूमीशी निगडित असतात व डोंगर चढताना माणस जसजसा वर चढत जातो, तसतसा मानसिक पातळीवरतरी तो ह्या बंधनांपासून दूर होत जातो. 'As we elevate ourselves, we become freer and freer' असे कोणीसे म्हटले आहे. जोशींचे स्वातंत्र्यप्रेम हा आयन रँडसारख्यांचा प्रभाव असेल, इतरही काही संस्कारांचा प्रभाव असेल, पण कुठेतरी स्वित्झर्लंडचाही एक वारसा असू शकेल.
आर्थिक समृद्धीचे जीवनातील महत्त्व, देशात ती यावी यासाठी शेतीला द्यावयाची प्राथमिकता, तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर आणि स्वातंत्र्याची दुर्दम्य लालसा ह्या चतुःसूत्रीला जोशींच्या भावी जीवनातही बरेच महत्त्व आहे व या चतुःसूत्रीचा पाया बळकट व्हायला स्वित्झर्लंडमधली आठ वर्षे बऱ्यापैकी कारणीभूत झाली असावीत.
शरद जोशी स्वित्झर्लंड सोडून सहकुटुंब भारतात परतले १ मे १९७६ रोजी.
ते आणीबाणीचे दिवस होते. २५ जून १९७५मध्ये पुकारलेल्या आणीबाणीला सुरुवातीला झालेला थोडाफार विरोध थोड्याच दिवसांत मावळला होता. काही लोकशाहीप्रेमी सरकारविरुद्ध लढा देत होते, पण तो बहुतांशी छुप्या स्वरूपातला होता; जाहीररीत्या सरकारविरुद्ध कारवाया अशा होत नव्हत्या. 'गाड्या बघा आता कशा अगदी वेळेवर धावतात!' हे कौतुक सारखे कानावर पडायचे.
योगायोग म्हणजे त्या दिवशी जोशींनी पुण्याला जाण्यासाठी डेक्कन क्वीन पकडली. तेव्हा ती नेमकी अर्धातास उशिरा सुटली होती! आणीबाणीसमर्थकांचा निदान एक दावा तरी चुकीचा होता ह्याचा त्यांना प्रत्यय आला!
आपले बहुतेक घरगुती सामान त्यांनी युरोपातून बोटीने मागवले होते व ते येण्यास अजून काही दिवस लागणार होते. कपडे वगैरे आवश्यक तेवढ्या सामानाच्या चार बॅगा घेऊन, पत्नी लीला आणि गौरी व श्रेया ह्या दोन मुली यांच्यासह ते टॅक्सीने विमानतळावरून दादर स्टेशनवर आले होते व तिथेच त्यांनी व्हीटीहन नेहमी संध्याकाळी पाच दहाला निघणारी डेक्कन क्वीन पकडली होती. प्रथम वर्गाची तिकिटे असल्याने गाडीत जागा तर मिळाली, पण पूर्वीप्रमाणे गाडीत कुठेच कोणाच्या गप्पा रंगल्या नव्हत्या. सगळा शुकशुकाट.
"कधीच लेट न सुटणारी गाडी आज चक्क अर्धा तास लेट सुटली!" शेजारच्या माणसाला ते सहज काहीतरी गप्पा सुरू करायच्या म्हणून म्हणाले, तशी त्याने व आजूबाजूच्या दोन-तीन जणांनी चमकून त्यांच्याकडे पाहिले. सगळ्यांचेच चेहरे सावध दिसत होते. भारतात सध्या प्रचंड सरकारी दहशत आहे हे त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये असताना वाचले होते व ते खरेच असावे हे त्या पहिल्याच संध्याकाळी जाणवले. पुढचा प्रवास जोशी कुटुंबीयांनी आपापसातच वरवरच्या गप्पा मारत पार पाडला.
त्यांच्यासारख्या कमालीच्या स्वातंत्र्यप्रेमी आणि त्यातही पुन्हा स्वित्झर्लंडसारख्या देशात आठ वर्षे राहून परत येणाऱ्या गृहस्थाला ही दहशत बोचणारी होती. पण त्याचवेळी कसाही असला, तरी हाच आपला देश आहे आणि यापुढे आपण इथेच राहायचा निर्णय स्वखुशीने घेतला आहे ह्याची जाणीव त्यांना होती. सगळ्या राजकीय घडामोडींपासून आपण अगदी अलिप्त राहायचे आहे व फक्त शेतीवरच आपले सर्व लक्ष केंद्रित करायचे आहे, ह्याची खूणगाठ त्या पहिल्या संध्याकाळीच त्यांनी मनाशी पक्की बांधली.
पुण्याला पोचल्यावर रेल्वेस्टेशनवरून ते सहकुटुंब डेक्कनवर श्रेयस हॉटेलात गेले. इथल्या दोन खोल्या त्यांनी पूर्वीच आरक्षित करून ठेवल्या होत्या. आईसमवेत सदिच्छा बंगल्यात न राहता स्वतःचे वेगळे घरच विकत घ्यायचे व ते सापडेस्तोवरदेखील हॉटेलातच राहायचे जोशींनी ठरवले होते. त्यादृष्टीने थोडीफार चौकशी त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये असतानाच करून ठेवली होती.
त्याप्रमाणे ते लगेच कामाला लागले. सहाएक आठवड्यांतच एक बंगला त्यांनी खरेदी केला. औंध येथील सिंध सोसायटीत ७०५ क्रमांकाचा. तीन बेडरूम्स असलेला. शिवाय पुढेमागे थोडी बाग होती. परिसर निवांत होता. मालक एक शाळामास्तर होते. त्याकाळी पुण्यापासून लांब समजल्या जाणाऱ्या औंधसारख्या ठिकाणी घरे बऱ्यापैकी स्वस्तात उपलब्ध होती. घराचे नाव त्यांनी मृद्गंध ठेवले. त्या नावाचा विंदा करंदीकर यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध होता व शिवाय त्या शब्दातच काव्यात्मकता होती. जोशींसारख्या कविताप्रेमीला तो शब्द भावला. त्यांनी बंगला घेतला त्यावेळी पावसाळा नुकताच सुरू झाला होता व औंध परिसरात तेव्हा बऱ्याच शेतजमिनी असल्याने खूपदा हवेत हवाहवासा वाटणारा मृद्गंध दाटून येई, हेदेखील त्यामागचे कदाचित एक कारण असू शकेल.
पुढच्या काही दिवसांत बोटीने येणारे त्यांचे सामानही येऊन पोचले. ते नीट लावण्यात बराच वेळ गेला. 'बर्नमधल्या माझ्या खोलीत जे सामान आहे, ते सगळंच्या सगळं पुण्यातल्या माझ्या खोलीत असलं, तरच मी पुण्याला येईन, अशी धाकट्या गौरीची अटच होती. नव्या जागी वास्तव्य सुरू करायचे म्हणजे धावपळ तर अपरिहार्यच होती. शहरापासून इतक्या लांब त्यावेळी सार्वजनिक वाहनव्यवस्था नव्हती; दिवसभरात जेमतेम सात-आठ बसेस औंधमार्गे पिंपरी-चिंचवडकडे जायच्या. शिवाय बहुतेक सगळ्या खरेदीकरिता डेक्कनला जावे लागे. त्यामुळे त्यांनी लगेचच स्वतःसाठी एक लॅम्ब्रेटा स्कूटर घेतली व सहकुटुंब कुठे जाता यावे म्हणून काही दिवसांनी एक सेकंडहँड जीप गाडीही खरेदी केली..
घर शोधत असतानाच मुलींसाठी चांगली शाळा कुठे मिळेल याचाही शोध चालूच होता. कारण ते अगदी शाळा सुरू व्हायचेच दिवस होते. स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही मुलींना इतर विषयांबरोबरच फ्रेंच, जर्मन व लॅटिन हे तीन विषय होते; इथे पुण्यात मात्र त्याऐवजी इंग्रजी, हिंदी व मराठी हे विषय होते. पाचगणीला एका मुलींच्या प्रख्यात निवासी शाळेत फ्रेंच हा विषय अभ्यासक्रमात आहे असे त्यांनी ऐकले होते व नव्या शाळेतला एकतरी विषय मुलींना चांगला येणारा असावा म्हणून एकदा सगळे पाचगणीला जाऊनही आले. शाळेला मैदान वगैरे उत्तम होते, इमारत प्रशस्त होती, पण निवासव्यवस्था दाटीवाटीची व अस्वच्छ होती – निदान नुकतेच स्वित्झर्लंडहून आलेल्यांच्या दृष्टीनेतरी. 'आम्ही ह्या असल्या डॉर्मिटरीमध्ये चार दिवससुद्धा राहू शकणार नाही' असे दोन्ही मुलींनी स्पष्ट सांगितले. मुळात भारतात परत यायचा वडलांचा निर्णय मुलींना मनापासून मान्य नव्हताच; कशीबशी वडलांच्या आग्रहापुढे त्यांनी मान तुकवली होती. अशा परिस्थितीत त्यांना अमान्य असलेल्या शाळेत घालून अधिक नाराज करणे वडलांना परवडणारे नव्हते. पाचगणीच्या शाळेत मुलींना घालायचा इरादा त्यांना सोडून द्यावा लागला.
पुण्याला परतल्यावर दुसऱ्याच दिवशी पाषाण भागात असलेली सेंट जोसेफ ही जुनी कॉन्व्हेंट शाळा ते बघायला गेले व ती त्यांना चांगली वाटली. शिक्षणखात्याच्या कार्यालयात तीन चार चकरा टाकल्यावर इथे प्रवेश मिळू शकेल हे तेथील अधिकाऱ्यांकडून कळले. शाळेच्या स्वतःच्या बसेस होत्या व कधी गरज पडली तर घरापासून पायीसुद्धा पंधरा-वीस मिनिटांत जाता येईल इतकी ती जवळ होती. विशेष म्हणजे तिथे फ्रेंच हा विषय होता. त्याच शाळेत मग मुलींचे नाव घातले गेले.
हे सगळे होत असतानाच एकीकडे त्यांनी शेतीसाठी जमिनीचा शोधही सुरू केला होता. पूर्णतः पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू जमीनच घ्यायची हे त्यांनी परदेशात असतानाच नक्की केले होते. त्यांची आई व अन्य भावंडे ह्यांना जोशी करत होते तो कमालीचा विक्षिप्तपणा वाटत होता. मुळात त्यांच्या खानदानात कधी कोणी शेती केलीच नव्हती. पण त्यांनी 'तुला काय योग्य वाटेल ते कर' अशीच भूमिका घेतली. एकदा आपल्या शरदने एखादी गोष्ट ठरवली, की ती केल्याशिवाय तो कधीच राहणार नाही हे घरच्यांना चांगले ठाऊक होते. आश्चर्य म्हणजे, अन्य जवळ जवळ कोणीच त्यांच्या उपक्रमाबद्दल फारसे कुतूहल दाखवलेच नाही! म्हणजे उत्तेजनहीं दिले नाही आणि टीकाही केली नाही. हा शहरी मध्यमवर्गीय अलिप्तपणा म्हणायचा की काय कोण जाणे!
नात्यागोत्यांतल्या बहुतेकांनी दाखवलेल्या या अलिप्ततेच्या अगदी उलट अनुभव म्हणजे रावसाहेब शेंबेकर यांच्याशी झालेली भेट, तशी त्यांची काहीच पूर्वओळख नव्हती. कोणाकडून तरी त्यांनी जोशीविषयी ऐकले व कुतूहल वाटून ते खास त्यांना भेटायला म्हणून पुण्याला आले. शेंबेकर यांची स्वतःचीही उसाची बरीच शेती होती. ते म्हणाले, "बागायती शेतीतूनही शेवटी शेतकऱ्याच्या पदरी तोटाच येतो. हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. नाहीतरी तुम्हाला प्रयोगच करायचा आहे ना? मग त्यासाठी बागायती शेती का नाही घेत? हवं तर मीच माझ्या जमिनीचा एक चांगला तुकडा तुम्हाला प्रयोगासाठी देतो. त्याचे तुम्ही मला काहीही पैसे देऊ नका." खरेतर ह्या भल्या गृहस्थाने आपणहून दिलेला सल्ला अगदी योग्य असाच होता. शिवाय सोबत प्रत्यक्ष मदतीचे अत्यंत दुर्मिळ व ठोस असे आश्वासनहीं होते; पण जोशींनी तो जुमानला नाही; आपला कोरडवाहू शेतीचा आग्रह सोडला नाही. बऱ्याच वर्षांनी, २० जून २००१ रोजी, 'दैनिक लोकमत'मध्ये लिहिलेल्या आपल्या एका लेखात ते म्हणतात,
शक्य तितक्या सौजन्याने मी रावसाहेब शेंबेकरांना काढून लावले. कोरडवाहू कातळात पाणी शोधण्याच्या आणि शेती फुलवण्याच्या कामात गढून गेलो.
शेंबेकरांच्या मनात किती सच्चाई आणि कळकळ होती ते कळायला मला दहा वर्षे लागली. त्यांचा तेवढा एक अपवाद सोडला तर शेतीच्या प्रयोगात मला सल्ला देण्याचा किंवा मी काय करतो आहे ते समजून घेण्याचा उपद्व्याप करणारे इतर कोणीच आले नाहीत.
आल्याआल्याच जोशींनी किर्लोस्कर कन्सल्टंट्स या प्रसिद्ध कंपनीला सल्लागार म्हणून नेमले होते; योग्य ती शेतजमीन शोधून देण्यासाठी. उगाच इकडच्या तिकडच्या ओळखीवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट व्यावसायिक तत्त्वावर करण्याची त्यांची इच्छा होती. कंपनीच्या वतीने एका अधिकाऱ्यावर हे काम सोपवले गेले. पण त्या सल्लागाराचाही फारसा उपयोग होत नव्हता. यवत व उरळीकांचन येथे काही सुपीक विकाऊ जमिनी त्यांनी दाखवल्या; जोशींनी त्यांतली एखादी जमीन खरेदी करावी असा त्यांचा सल्ला होता. अशा भेटींच्या वेळी बहुतेकदा लीलाताईदेखील बरोबर असत. 'उसाच्या शेतीतदेखील हवे ते प्रयोग आपण करू शकू. शिवाय, त्यात धोका कमी आहे. आपल्याला आता केवळ शेतीवरच उदरनिर्वाह करायचा आहे, तेव्हा जिथे चार पैसे सुटायची थोडीतरी शक्यता आहे, तीच जमीन का खरेदी करू नये?' असे त्यांचे म्हणणे. पण जोशी आपल्या निर्णयापासून जराही हटायला तयार नव्हते.
शेवटी एकदाची हवी होती तशी कोरडवाहू शेतजमीन जोशींना मिळाली. त्या मागेही एक योगायोगच होता. एक निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर जोशींच्या ओळखीचे झाले होते. त्यांनी त्यांच्या एका मित्राची जोशींबरोबर ओळख करून दिली. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण ह्या गावापासून सात किलोमीटरवर आंबेठाण नावाचे एक छोटे खेडे होते. ह्या मित्राची तिथे जमीन होती, पण त्यांनी वेळोवेळी बँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी ती गहाण पडली होती. खूप तगादा लावूनही त्यांच्याकडून कर्ज फेडले जात नसल्याने शेवटी बँकेने जमिनीचा लिलाव करायचे ठरवले होते. या परिस्थितीत काही मार्ग निघतो का, हे बघायला ते जोशींकडे आले होते.
जोशींची ती जमीन प्रत्यक्ष बघायची इच्छा होती व त्यानुसार दुसऱ्याच दिवशी दोघे तिथे गेले. वाटेत त्यांच्या बऱ्याच गप्पा होतच होत्या. त्यांचा मोकळाढाकळा स्वभाव जोशींना आवडला व त्याच दिवशी बँकेचे एकूण जितके कर्ज थकले होते. तेवढे पैसे जोशींनी त्यांच्या बँकेत रोख भरले व त्यांची जमीन लिलावापासून वाचवली.
पण तेवढ्याने त्यांची पैशाची गरज भागणार नव्हती. कारण आता दुसऱ्या काही कामासाठी त्यांना पुन्हा पैशांची गरज होती. पुन्हा एकदा जोशींनी त्यांना रोख पैसे कर्जाऊ दिले. असे दोन-तीनदा झाले. ते शेतकरी बँकेच्या कर्जातून मुक्त झाले, तरी आता जोशींचे बरेच पैसे त्यांच्याकडे थकले होते व ते परत मिळायची काही लक्षणे दिसेनात. जोशींच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी म्हणून शेवटी त्यांनी आपली ती जमीनच जोशींना विकायचे ठरवले.
प्रत्यक्ष व्यवहार करण्यापूर्वी एकदा ती जमीन नीट पारखून बघावी, ह्या उद्देशाने जोशी पतिपत्नी त्यांच्याबरोबर पुन्हा आंबेठाणला गेले. त्या जमिनीच्या बरोबर समोर तुकाराम महाराजांचा भामचंद्राचा डोंगर होता- जिथे ते चिंतन करायला एकांतात बसत. त्या डोंगराला एक विशिष्ट उंचवटा आहे. योगायोग म्हणजे बर्नमधल्या जोशींच्या घराजवळ जो गानट्र नावाच्या डोंगराचा भाग होता, अगदी तसाच तो उंचवटा दिसत होता. जोशीना एकदम तो जागा आवडली. या डोंगराच्या गानटशी असलेल्या साधामळे इथेच शेती करायचा योग आपल्या आयुष्यात आहे असे काहीतरी त्यांना वाटले. लगेचच त्या शेतकऱ्याने सांगितलेली किंमत जोशींनी चुकती केली व ती शेतजमीन विकत घेतली. १ जानेवारी १९७७ रोजी.
ही एकूण साडेतेवीस एकर जमीन होती. त्या जागेचे नाव जोशींनी 'अंगारमळा' असे ठेवले. 'क्रांतीचा जयजयकार' ही कुसुमाग्रजांची कविता जोशींच्या खूप आवडीची. त्याच कवितेतील 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, होता पायतळी अंगार' ह्या ओळीवरून हे नाव त्यांना सुचले. पुढील आयुष्यात त्या जागी जोशींची जी वाटचाल झाली त्यातील दाहकता विचारात घेता हे नाव अगदी समर्पक ठरले असेच म्हणावे लागेल.
सरकारी नियमानुसार जो शेतकरी नाही त्याला शेतजमीन विकत घेता येणे आजच्याप्रमाणे त्याकाळीही अतिशय अवघड होते. पण प्रत्येक कायद्याला काही ना काही पळवाटा असतातच. ५ जुलै २००१ रोजी 'दैनिक लोकमत'मधील आपल्या एका लेखात त्यांनी लिहिले आहे,
मी सरकारी नोकरीत असताना रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख झाली होती. त्यांचे चिरंजीव आयएएस पास होऊन प्रांत म्हणून काम बघत होते. त्यांच्या मदतीने मार्ग सापडला.
कोकणातला रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा यांच्या सीमेवरच्या खेड तालुक्यातील चाकण हे गाव. शिवाजी महाराजांनी बारा मावळांपासून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. चाकण हे या मावळ मुलुखाचे प्रवेशद्वार. इथलेच लढवय्ये मावळे त्यांचे जिवाभावाचे सोबती.
असे ऐतिहासिक महत्त्वाचे गाव असूनही इथला सामान्य शेतकरी मात्र कमालीच गांजलेला होता. दुष्काळातील त्याच्या दुःखाचे हृदयस्पर्शी वर्णन तुकाराम महाराजांनी केलेले आहे; पण दुष्काळ नसतानाही त्याची परिस्थिती फारशी काही वेगळी नसायची.
इथे सतत लढाया चालू असत. कधी दिल्लीचे मोगल आक्रमण करत तर कधी विजापूरच्या अदिलशहाचे सरदार, कधी सिद्धी जोहरचे सैनिक तर कधी पेंढाऱ्यांचे लहानमोठे हल्ले. प्रत्येक स्वारीत उभी पिके कापली जात, गावे लुटली जात, अगदी बेचिराख केली जात. आक्रमक कोणीही असला तरी शेतकऱ्याचे हाल सर्वाधिक असत. त्याचे घरदार, बैलनांगर, बी-बियाणे, पाण्याची व्यवस्था सारे नष्ट होऊन जाई. पुन्हा त्याला शून्यातून सुरुवात करावी लागे आणि जे नव्याने उभारायचे तेही कधी लुटले जाईल ह्याचा काहीच नेम नसायचा. स्थैर्याच्या पूर्ण अभावामुळे मोठे असे काही उभारायची, भविष्यासाठी बचत करायची, संपत्ती निर्माण करायची सारी प्रेरणाच नाहीशी होऊन जायची. राजेमहाराजांच्या स्वाऱ्या, त्यांच्या आपापसातील लढाया, त्यांचे पराक्रम ह्या सगळ्यांनी भरलेल्या इतिहासात त्या सामान्य शेतकऱ्याची काहीच नोंद होत नव्हती. होणारही नव्हती. माणसाचा स्वतःच्या प्रयत्नावरचा सगळा विश्वास उडून जावा व अपरिहार्यपणे, केवळ जगण्यापुरते तरी बळ मिळावे म्हणून त्याने दैववादी बनावे, ठेविले अनंते तैसेची राहावे' हाच आदर्श समोर ठेवून गेला दिवस तो आपला समजत जगावे, अशीच एकूण परिस्थिती होती. पिढ्यानपिढ्या हे असेच चालत आले होते व त्या संचितातूनच शेतकऱ्याची विशिष्ट मानसिकता घडत गेली होती.
भामा ही इथली प्रमुख नदी. वांद्रे गावाजवळ ती उगम पावते व पुढे भीमा नदीला मिळते. भामा नदीवर जवळच आसखेड धरण आहे. चाकण हे एक टोक पकडले तर वांद्रे गाव हे दुसरे टोक. वांद्र्याच्या पलीकडे रायगड जिल्हा सुरू होतो. वांद्रे व चाकण या दोन टोकांमधले अंतर ६४ किलोमीटर. ह्या भागाला भामनहरचे (किंवा भामनेरचे) खोरे असे म्हटले जाते व याच रस्त्यावर चाकणपासून सात किलोमीटरवरचे आंबेठाण हे एक छोटेसे गाव. इथला सगळा परिसर डोंगराळ. कांदे, बटाटे, ज्वारी आणि भुईमूग ही मुख्य पिके; खोऱ्याचा वांद्र्याजवळचा जो भाग आहे तिथे पाऊस जास्त पडत असल्याने भाताचे पीक घेतले जायचे.
रोज सकाळी सहा वाजता औंधमधील आपल्या घरून जोशी स्कूटरवरून निघायचे आणि ४० किलोमीटरवर असलेल्या आंबेठाणला सकाळी सातपर्यंत पोचायचे. कधी कधी लीलाताईदेखील सोबत येत. अशावेळी ते आपली महिंद्रची पांढरी जीप गाडी आणत. संध्याकाळी काळोख पडला की औंधला परतत. दिवसभर शेतीचे काम करता करता जमेल तेव्हा इतर गावकऱ्यांशी संवाद साधत, त्यांची शेती अभ्यासत.
आधी त्यांनी जमिनीला कंपाऊंड घालायचे काम हाती घेतले. दोन बाजूंना भिंत, तिसऱ्या बाजूला तार व चौथ्या बाजूला घायपात. घायपात म्हणजे निवडुंगासारखी बांधावर लावली जाणारी झाडे, ह्याची पाने शेळ्या-बकऱ्या खात नसल्याने ती दीर्घकाळ टिकतात व त्यांच्यापासून भाजीच्या जुड्या वगैरे बांधायला लागणारा जाडसर धागा मिळतो. हे असले ज्ञान प्रत्यक्ष शेतीत उतरल्यावरच जोशींना मिळाले. इथली बहुतेक जमीन उंचसखल, खडकांनी भरलेली अशी होती; किंबहुना म्हणूनच ती त्यांना स्वस्तात मिळू शकली होती. कित्येक वर्षे तिथे कुठलेच पीक घेतले गेले नव्हते. शेतीसाठी ती सर्वप्रथम नीट सपाट (लेव्हल) करून घेणे आवश्यक होते. पाणी उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी दोन विहिरीही खणायला घेतल्या. सुदैवाने पाणी चांगले लागले. पाइपाने पाणी सगळीकडे खेळवायचीही व्यवस्था केली. जमिनीवर दोन खोल्यांचे स्वतःसाठी एक घर बांधले. घराशिवाय एक सामानाची खोली होती, शेतीची अवजारे, खते व तयार शेतमाल ठेवायला मोठी शेड होती. म्हशी पाळायचा त्यांचा विचार होता व त्यासाठी गोठाही बांधायला घेतला. वीज महामंडळाकडे अनेक चकरा टाकून विजेची जोडणी करवली. अडचणीच्या वेळी अत्यावश्यक म्हणून टेलिफोनचीही सोय करून घेतली. त्या परिसरातले ते पहिले टेलिफोन कनेक्शन, शून्यातूनच सगळी सुरुवात करायची म्हटल्यावर एकूण प्रकरण तसे अवघडच होते; विशेषतः यावेळी जोशींची चाळिशी उलटलेली असल्यामुळे. पण ते चिकाटीने एकेक करत कामे मार्गी लावू लागले.
सुरुंग लावणे, मोठाले खडक उकरून बाहेर काढणे, पिकांसाठी प्लॉट पाडणे, बांध घालणे, पाइप लाइन्स टाकणे, अंतर्गत कच्चे रस्ते तयार करणे, कुंपण घालणे, अशी अगणित कामे होती. सर्वात आधी गरज कामगारांची होती. निदान शे-दीडशे माणसे रोज कामाला लागणार होती. मोठे मोठे खडक उकरून जमीन सारखी करताना आणि विहिरी खणताना त्या खडकांखाली दडलेले लांब लांब, मनगटाएवढे जाड साप चवताळून बाहेर पडत. त्यांच्या पुरातन घरांवरतीच इथे आक्रमण होत होते. साप सापडला नाही असा एक दिवस जात नसे. मजुरांना काम करताना सापांची भीती वाटायची. नाथा भेगडे नावाचा एक माणूस जोशींनी शेतीकामासाठी मुकादम म्हणून नेमला होता. तो रोज फटाफट साप मारत असे.
शक्यतो पुढच्या चार-पाच महिन्यांत जास्तीत जास्त कामे संपवावीत असे जोशींनी ठरवले होते, कारण नंतर मजुरीला माणसे मिळतीलच अशी खात्री नव्हती. खुद्द आंबेठाणमध्ये भूमिहीन मजूर असे जवळजवळ कोणीच नव्हते; प्रत्येकाची थोडीफार तरी शेती होतीच. पण तरीही स्वतःचे शेतीकाम संपल्यावर अधिकच्या कमाईसाठी सगळेच कुठे ना कुठे मजुरीवर जात. पण आपल्याला गरज असेल तेव्हा ते मजुरीसाठी उपलब्ध असतील याची शाश्वती नव्हती. सुदैवाने रब्बी पिकांचे काम झाल्यावर बहुतेक गावकऱ्यांना फारसे काही काम नसायचेच व त्यामुळे त्या कालावधीत पुरेसे मजूर उपलब्ध झाले. बरेचसे लांब लांब राहणारे कातकरी होते.
त्यावेळी मुक्काम करता येईल असा शेतावर आडोसा नव्हता. स्वित्झर्लंडहून आणलेली एक स्लिपिंग बॅग जोशींनी इथे आणून ठेवली होती; तशीच वेळ आली तर काहीतरी सोय असावी म्हणून. पण पुण्यातही कामे असायचीच; त्यामुळे जोशी शक्यतो झोपायला औंधला जात. अर्थात रोज न चुकता सकाळी सातच्या आत शेतावर हजर असत. वीजजोडणी, प्लंबिंग, सुतारकाम, गवंडीकाम अशी काही कामे कंत्राटावर दिलेली होती. ती मंडळी आपापले सामान घेऊन येत, आपापले काम करत; पण त्यांच्यावरही लक्ष ठेवावे लागे. बाकी कामे जोशी स्वतःच सांभाळत. एकाच वेळी चारपाच ठिकाणी कामे सुरू असत. जोशी जरा वेळ एका कामावर जायचे, तर जरा वेळाने दुसऱ्या कामावर. प्रत्येक ठिकाणी पाळीपाळीने स्वतः रांगेत उभे राहत, घमेली उचलत, दगडगोटे इकडून तिकडे टाकायचे काम करत. विहीर खणण्याच्या कष्टाच्या कामातही ते हाफ पँट घालून स्वतः खड्ड्यात, चिखलात उतरत. इतरांनाही कामाला हुरूप यावा, ही भावना त्यामागे होतीच; पण आठ वर्षे युरोपात काढल्यावर स्वतःच्या हाताने काम करायची तशी त्यांना सवयही झाली होती. इतर अनेक शहरी सुशिक्षित भारतीयांना वाटते तशी शरीरश्रमांची त्यांना लाज वाटत नसे; आणि शिवाय एकदा एखादे काम स्वतःच्या इच्छेने अंगावर घेतल्यावर सर्व ताकदीनिशी त्याला भिडायचे हा त्यांचा स्वभावच होता. स्वतः मजुरांच्या बरोबरीने काम करण्यात त्यांचा आणखीही एक उद्देश होता. तो म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारणे व त्यातून गावकऱ्यांचे जगणे अधिक चांगले समजून घेणे. सुरुवातीला गावकऱ्यांशी जोशींचा जरा वाद झाला. बाहेरून येणाऱ्या या कातकऱ्यांना मजुरी म्हणून किमान वेतन कायद्याप्रमाणे रोजचे तीन रुपये द्यायचे आणि स्त्री व पुरुष दोघांनाही सारखेच पैसे द्यायचे असे जोशींनी ठरवले होते. त्यांना स्वतःला ही मजुरी अगदी नगण्य वाटत होती. परदेशात काही वर्षे राहिलेल्या व तिथल्या किमतीची सवय झालेल्या माणसाला भारतात आल्यावर इथल्या सर्वच किमती, विशेषतः मानवी श्रमांचे इथले मूल्य, अगदीच नगण्य वाटते, तसाच हा प्रकार होता. पण मजुरीच्या ह्या दरामुळे गावकऱ्यांमध्ये मात्र खळबळ माजली, कारण ते स्वतः त्यांच्या शेतीच्या कामासाठी रोजी फक्त दीड रुपया मजुरी देत होते. "तुम्ही लोकांना इतकी मजुरी देऊन लाडावून ठेवलं, तर आम्हाला आमच्या कामासाठी मजूर कसे मिळणार? तुम्हाला ते परवडत असेल; पण आम्हाला नाही ना परवडणार!" असे त्यांचे म्हणणे होते.
"मी बाहेरून आलेला माणूस आहे. कायद्याने ठरवून दिली आहे त्यापेक्षा कमी मजुरी मी दिली तर तो गुन्हा होईल. मला ते करणं कसं शक्य आहे?" जोशी त्यांना समजावू लागले.
गावकऱ्यांना ते पटले नाही, पण त्यांनीही मग तो मुद्दा फारसा रेटून धरला नाही. कारण त्यांच्यातले जे जोशींच्या शेतावर मजुरीला जायचे, त्यांना स्वतःलाही ही वाढीव मजुरी मिळतच होती व हवीच होती. जोशींचे काम संपले, की पुन्हा मजुरीचे दर आपोआपच खाली येतील, अशीही त्यांची अटकळ असावी.
इथे एक मुद्दा स्पष्ट करायला हवा - शेतकरी व शेतमजूर असा काहीच भेद त्या मजुरांमध्ये नव्हता. ते स्वतः शेतकरीही होते व त्याचवेळी अधिकचे चार पैसे हाती पडावेत म्हणून शेतमजुरीही करत होते. जे फक्त मजुरी करत तेही एकेकाळी शेतकरी होतेच; पुढे कधीतरी त्यांच्या जमिनी कर्जापोटी गहाण तरी पडल्या होत्या किंवा विकल्या गेल्या होत्या. आयुष्यात पुढे जेव्हा काही विचारवंत 'तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा विचार करता, शेतमजुरांचा नाही' असा आरोप करत, तेव्हा आपल्या शेतावरचे हे मजूर त्यांच्या डोळ्यांपुढे उभे राहत व असल्या निव्वळ पुस्तकी आरोपातील स्वानुभवावरून कळलेला फोलपणा त्यांना प्रकर्षाने जाणवे.
गावकऱ्यांना मजुरीचे इतके कमी असलेले दरही परवडत नव्हते ह्याचे कारणही अर्थातच जोशींना साधारण ठाऊक होते आणि येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष अनुभवानेही ते अधिक चांगले कळणार होते - ते कारण म्हणजे गावकरी विकत असलेल्या ज्वारीचा त्यांच्या हाती पडणारा दर त्यावेळी क्विटलला (१०० किलोना) फक्त सत्तर रुपये होता आणि कांद्याचा भाव फक्त वीस रुपये होता!
ह्या मजुरांचे, विशेषतः कातकरी मजुरांचे दारिद्र्य हृदय हेलावून टाकणारे होते. इथल्या आदिवासींत कातकरी व ठाकर असे दोन समाज मुख्य होते. सगळे तसे विस्थापित. वेगवेगळ्या धरणयोजनांमुळे कोकणातून बाहेर पडून वांद्रेमार्गे इथे आलेले. साधारण निम्मे मजूर पुरुष होते तर निम्म्या बायका. सगळ्यांचीच शरीरयष्टी कृश. लहानपणापासून आबाळझालेली. पुरेसा पोषक आहार न मिळाल्याने मुळातच अवयवांची नीट वाढ न झालेली. (आदिवासी स्त्रिया व पुरुष यांच्या आकारमानात फारसा फरक का नसतो, हा भविष्यात जोशींच्या एका अभ्यासाचा विषय होता.) अंगारमळ्यात येण्यासाठी यांतल्या अनेकांना पाचपाच, दहा-दहा किलोमीटर चालावे लागे. रणरणत्या उन्हात. काट्याकुट्यांतून, जवळजवळ कोणाच्याही पायात चपला नसायच्या. संध्याकाळी घरी जाताना पुन्हा तोच प्रकार. जोशी लिहितात,
निसर्गाने बुडवलेल्या, चोरांनी लुटलेल्या, सावकारांनी नाडलेल्या, सुलतानांनी पिडलेल्या, धर्मजातींनी गांजलेल्या या मंडळींच्या जवळ जाण्याचा मी प्रयत्न करीत होतो; पण कुणी खुलेपणाने बोलत नव्हते. त्यांच्यात माझ्यात अंतर किती? ते उल्लंघावे कसे? पुढे पुढे मला एक युक्ती कळली - निबंधवार उत्तरे द्यावी लागतील असे प्रश्न विचारायचेच नाहीत. वस्तुनिष्ठ प्रश्न विचारायचे. उत्तरे आपण सुचवायची. उत्तर काय दिले जाते, यापेक्षा उत्तर देतानाची चेहऱ्यावरची मुद्रा बारकाईने न्याहाळायची.
दुपारी जोशी दोन तास सुट्टी देत. ज्या गावकऱ्यांना घरी जाऊन जेवायचे असेल, इतर काही कामे उरकायची असतील त्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून. लांब राहणारे मजूर अर्थात तिथेच थांबत. पण बरेच गाववासी मजूरही शेतावरच थांबत, सावलीत बसून बरोबर आणलेला भाकरतुकडा खात. "दुपारची आपण भजनं म्हटली तर?" एक दिवस जोशींनी सुचवले. सर्वांनाच ती कल्पना आवडली. भजने म्हणणे हा तिथल्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग होता.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मजूर मृदंग-झांजा घेऊन हजर झाले. जेवण उरकल्यावर भजनांना सुरुवात करायचे ठरले होते. जोशींनी भजनाचे सुचवले त्यामागे दोन कारणे होती. एक म्हणजे, मजुरांच्या अधिक जवळ जायचा हा एक मार्ग होता. दुसरे कारण अधिक व्यक्तिगत होते. काही महिने शेतीकामात काढल्यावर जोशी स्वतःही, नाही म्हटले तरी, काहीसे उदास झाले होते. 'परवापरवापर्यंत जिनिव्हा-न्यूयॉर्कमधल्या आलिशान सभागृहांत चर्चा करणारा मी, आज कुठे इथल्या वैराण, ओसाड कातळावर दगडांचे ढीग टाकण्याचे काम करत बसलोय? आपण धरलेला हा रस्ता योग्य आहे ना? आपण स्वतःचीच फसवणूक तर नाही ना करत आहोत?' अशा प्रकारचे विचार अलीकडे त्यांच्या मनात येत असत. विशेषतः दुपारची निवांत वेळ त्यांना अधिक अस्वस्थ करणारी वाटे. एकत्र भजने म्हटल्याने आपल्यालाही थोडेसे उल्हसित वाटेल, असा त्यांनी विचार केला होता.
गावातली भजने नेहमीच 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा... ह्या भजनाने सुरू होत. पण त्या दिवशी मजुरांनी सुरुवात केली ते भजन होते, "हरिश्चंद्र राजा, तारामती राणी... डोंबाघरी भरी पाणी, डोंबाघरी पाणी..." जोशी दाम्पत्याची मनःस्थिती त्या मजुरांनी अगदी अचूक ओळखली होती, विशेषतः जोशींच्या मनातील विचार त्यांना नेमके कळले होते वत्यांना चपखल लागू पडेल, असेच भजन त्यांनी फारशी चर्चा न करताच निवडले होते. जोशी लिहितात,
या निरक्षर अडाण्यांनी, मी त्यांच्या चेहऱ्यावर वाचले नव्हते इतके भाव माझ्या चेहऱ्यावर वाचले होते. मृदंग-झांजांचा कल्लोळ आणि गाणाऱ्यांची सामूहिक बेसूरता ओलांडून भजनाचा अर्थ असा काही भिडला, की गळ्यातला आवंढा गिळवेना.
या प्रसंगानंतर ह्या गरीब बिचाऱ्या मजुरांसाठी आपण ठोस काहीतरी केलेच पाहिजे असे त्यांनी ठरवले. भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचा अधिक बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांची निरीक्षणे अतिशय अस्वस्थ करणारी होती. पुण्यासारख्या महाराष्ट्राच्या तथाकथित सांस्कृतिक राजधानीपासून आणि झपाट्याने वाढत चाललेल्या उद्योगनगरीपासून अवघ्या चाळीस किलोमीटरवर असलेल्या आंबेठाणसारख्या गावात अशी परिस्थिती असावी, देश स्वतंत्र होऊन तीस वर्षे उलटल्यावरही ती तशीच राहिलेली असावी, हे खूप विषण्ण करणारे होते.
आंबेठाण गावात वीज जवळ जवळ कुठेच नव्हती आणि जिथे होती तिथेही ती वरचेवर खंडित व्हायची. त्यामुळे सूर्यास्तानंतर सगळे व्यवहार ठप्प व्हायचे. घरातही एखाददुसरा मिणमिणता कंदील. करमणूक अशी कुठलीच नाही. शिवाय, वीज नसली की शेतीला पाणी कुठून आणणार? जिथे विहीर असायची तिथे पंप चालवले जात. शेतीला पाणी मिळावे म्हणून. पण डिझेलचाही प्रचंड तुटवडा. खुल्या बाजारात ते कधीच उपलब्ध नसे. मामलेदाराकडे जाऊन खूप खटपट केल्यावर परवाना मिळायचा पण तोही महिन्याला फक्त वीस लिटरचा. म्हणजे रोजचे साधारण ७०० मिलीलिटर. पंप धुवायलाही ते अपुरे पडायचे! मग त्यात रॉकेलची भेसळ करणे आलेच. खरे तर तेही पुरेसे कधीच मिळत नसे; त्यालाही रेशन कार्ड लागायचे. फारच थोड्या जणांकडे ते असायचे. बाकीच्यांना जादा पैसे देऊन ते मिळेल तिथून खरेदी करावे लागे. या भेसळीत इंजिनची नासाडी व्हायची; दुरुस्तीचा खर्च बोकांडी बसायचा. पण पंप चालवला नाही तर कांद्याला पाणी देणे अशक्य आणि मग तयार पीकही जळून जायची भीती.
गावात एकाच्याही घरी संडास नव्हता: बायाबापड्यांनाही उघड्यावरच बसावे लागे. कुठल्याच घरात नळ नव्हते. पिण्यासाठी साधारण शुद्ध असेही पाणी उपलब्ध नव्हते. कुठूनतरी घमेल्यातून मिळेल ते पाणी आणायचे, तोंडाला पदर लावून तेच प्यायचे; त्यातून गाळले जाईल तेवढे जाईल. त्यामुळे रोगराई प्रचंड. खरे तर बरेचसे रोग हे स्वच्छतेच्या साध्यासुध्या सवयी लावल्या तरी दूर होऊ शकणारे. जेवणापूर्वी हातपाय स्वच्छ धुणे, धुतलेले कपडे घालणे, रोज अंघोळ करणे, भांडीकुंडी नीट घासून घेणे, केरकचरा व्यवस्थित गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे ह्या सगळ्या, म्हटले तर अगदी साध्या गोष्टी. पण इथे कोणीही यांतले काहीच करत नसे. त्यामुळे गावात बहुतेक सर्वांना खरूज झालेली असे. कॉलरा,हगवण, नायटा हे रोगही घरोघर. बहुतेक सर्व आजार अशुद्ध पाणी, अपुरा आहार आणि जंतांमुळे होणारे.
गावात शाळा एकच. चावडीवर भरणारी. शिक्षक हजर असला तर ती भरणार. गळके छप्पर, भेगाळलेल्या भिंती. तुटकी दारे. पावसाळ्यात खूपदा ती बंदच असे. एकूण मुलांचा शाळेत जाण्यापेक्षा न जाण्याकडे कल अधिक. 'शिकन काय करायचं?' ही आईवडलांची भूमिका. ते स्वतःही निरक्षरच. त्यामुळे एकूण अनास्था खूप. शेतावर काम असले तर मुले ते नाखुशीने का होईना पण थोडेफार करायची; नाहीतर दिवसभर अशीच उनाडक्या करत भटकायची.
ह्या एकूण मागासलेपणाला कंटाळून अनेक तरुण मग शेती सोडून एमआयडीसीसारख्या जागी नोकरी शोधायला जात. असाच एक तरुण एकदा जोशींना भेटायला आला. म्हणाला,
"साहेब, पूर्वी मी तुमच्या शेतावर मजुरी करायचो. दिवसभर उन्हातान्हात घाम गाळल्यावर मला संध्याकाळी तीन रुपये भेटायचे. आज एका कारखान्यात लागलो आहे. मशिनच्या मागे आरामात उभं राहून विड्या फुकत काम करतो. पण गेल्या महिन्यात मला नऊशे रुपये पगार मिळाला. रोजचे तीस रुपये. शेतीकामात मिळत होते त्याच्या दसपट! तेही भरपूर आरामाचं काम करून!"
हे सांगताना त्या तरुणाचे डोळे जुन्या श्रमांच्या आठवणीने पाणावले होते. शेतातील श्रम व कारखान्यातील श्रम यांचे बाजारात जे मोल केले जाते, त्यातील ही जबरदस्त तफावत जोशींनाही अस्वस्थ करून गेली. अर्थात कारखान्यात अशी नोकरी मिळायचे भाग्यही शंभरात एखाद्यालाच लाभणार.
स्वतःची शेती सुरू करता करता जेवढे शक्य होते तेवढे ग्रामविकासाचे प्रयत्न त्या सुरुवातीच्या काळात जोशींनी केले. रोगराई कमी व्हावी म्हणून स्वच्छता मोहिमा काढल्या. गाव हागणदारीमुक्त व्हावे म्हणून चराचे संडास खणले. श्रमदानाने कच्चे का होईना पण रस्ते बांधले. विहिरीत साठलेला गाळ उपसून काढायची योजना राबवली. शाळेचा दर्जा सुधारावा म्हणून ग्रामपंचायतीकडे साकडे घातले. साक्षरता वर्ग चालवले. वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती गावकऱ्यांना व्हावी म्हणून अधिकाऱ्यांना गावात बोलावून आणले. पारंपरिक समाजसेवेच्या सगळ्या वाटा चोखाळून झाल्या; पण असल्या प्रयत्नांच्या मर्यादाही हळूहळू त्यांच्या लक्षात येत गेल्या. मागासलेपणाचे सर्वांत मोठे कारण गरिबी हे आहे. ती जोवर दर होत नाही तोवर इतर कुठल्याच उपायांना अपेक्षित ते यश मिळणार नाही, आणि त्यासाठी शेतीमालाला अधिक भाव मिळायला हवा हे उघड होत गेले.
जोशी सांगत होते,
“एक साधं उदाहरण देतो. आंबेठाणमध्ये सुरुवातीच्या काळात साफसफाईचं खूप काम मी केलं, पण तरीही आमच्या आंबेठाणपेक्षा शेजारचं भोसे गाव अधिक स्वच्छ होतं. तिथली जमीन खडकाळ नव्हती व अधिक सुपीक होती, फळं व भाजीपाला तिथे खूप यायचा, हे खरंच आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या गावचा कांदा अधिक चांगल्या दर्ज्याचा होताव त्याला अधिक चांगला भाव मिळत असे. हाती चार पैसे शिल्लक राहू लागले की माणसाला आपोआपच टापटीपीने राहावं असं वाटू लागतं. आर्थिक प्रगती झाल्यानंतरच इतर प्रगती शक्य होती.”
गावातील स्थिती सुधारावी म्हणून जोशींनी अगदी सुरुवातीच्या काळात केलेल्या एका गंभीर प्रयत्नाविषयी थोडे विस्ताराने लिहिले पाहिजे. स्वतः जोशींनीही त्याविषयी लिहिले आहे.
सर्व भूमिहीनांना प्रत्येकी दोन-अडीच एकर जमीन मिळावी अशी एक सरकारी योजना होती. आंबेठाणच्या आजूबाजूलादेखील काही जणांना तशा जमिनी मिळाल्या होत्या. पण त्या नुसत्याच पडून होत्या. म्हाळुगे गावातील शिवळे पाटील यांच्या जमिनीचा बराच भागही कित्येक आदिवासींना वाटला गेला होता. पण त्या जमिनीही तशाच पडून होत्या. कॉलेजात शिकलेल्या पुस्तकांत आणि अनेक पुरोगामी विचारवंतांच्या लेखनात बड्या जमीनदारांकडून अतिरिक्त जमिनी सरकारने ताब्यात घ्यायला हव्यात, भूमिहीनांना त्यांचे वाटप व्हायला हवे, तसे झाले, की मग ते ती जमीन कसायला लागतील, स्वतःचे पोट भरू शकतील आणि त्यातूनच ग्रामीण दारिद्र्याचा प्रश्न मिटेल अशी मांडणी केल्याचे जोशींनी वाचले होते; त्यांचेही मत पूर्वी साधारण तसेच होते.
पण इथे त्यांच्या डोळ्यांसमोर मात्र वेगळेच काहीतरी घडत होते. जमीन हातात येऊनसुद्धा त्यांच्यापैकी कोणीही हातपाय हलवत नव्हते. प्रत्येकाची काही ना काही अडचण होती; नुसती जमीन मिळून त्यांचे भागणार नव्हते. कोणाला अवजारे हवी होती, कोणाला बैल हवे होते, कोणाला बियाणे हवे होते, खते हवी होती. त्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते, किंवा करायला तयार नव्हते.
खेडमधील प्रांत अधिकाऱ्यांशी एक दिवस जोशींनी विस्तृत चर्चा केली. सामूहिक शेती करण्याबद्दल. तो एक उत्तम तोडगा असल्याचे जाणवत होते. सुदैवाने अधिकारी सज्जन होते, त्यांनी दावडी गावातील काही नवभूधारकांशी गाठ घालून दिली. जमिनीचा जुना मालक थोडा कटकट करत होता. पण सरकारपुढे त्याचे काहीच चालणार नव्हते. शिवाय, आणीबाणीच्या त्या दिवसांत सरकारी अधिकाऱ्यांची खेड्यापाड्यांतून बरीच भीतीदेखील होती. मामलेदार स्वतः दावडीला आले व त्यांनी जमिनीच्या सीमा आखून दिल्या. एकूण अकरा भूमिहीनांना तिथे सलग अशा जमिनी मिळाल्या. शेती सामूहिक करायचे ठरले. नाहीतर ज्याच्या जमिनीच्या तुकड्यात विहीर लागेल तो इतरांना पाणी देणारच नाही! सगळ्यांना ती अट मान्य होती. त्या सामूहिक शेतीला 'अकरा भूमिपुत्र' असे नाव दिले गेले.
जसजसे दिवस जात गेले तसतशा एकेक गोष्टी जोशींच्या लक्षात यायला लागल्या. एकतर त्यांपैकी खरे भूमिहीन असे फक्त तिघे होते. त्यांच्या घरची माणसे पुण्या-मुंबईत नोकरीला होती व त्यावर त्यांचे घर चालत होते. आपल्या नावावर शेती व्हावी ह्याच्यात त्यांना खचितच आनंद होता, त्यासाठी वेगवेगळ्या पुढाऱ्यांना भेटून त्यांनी थोडाफार पैसाही खर्च केला होता; पण प्रत्यक्ष जमीन कसण्यात मात्र त्यांना जराही उत्साह नव्हता. जोशींसमोर आणिसरकारी अधिकाऱ्यांसमोर ते उत्साहाचे केवळ नाटक व तेही अगदी अहमहमिकेने करत होते. बँकेकडून कर्ज मिळावे म्हणून स्वतः जोशी यांनीच खेड या तालुक्याच्या गावी अनेक खेटे घातले. त्यांच्याबरोबर अकरापैकी फक्त एकच भूमिपुत्र सोबत म्हणून बँकेत आला; बाकीच्या सगळ्यांनी घरी काही ना काही काम आहे अशी सबब सांगून स्वतः येणे टाळले. पण तरीही जोशींनी मनात कटुता येऊ दिली नाही. 'आपल्यावर त्यांनी विश्वास ठेवावा असे आपण प्रत्यक्षात काय करून दाखवले आहे? त्यांचा निरुत्साह अगदी समजण्यासारखा आहे. जसजसे काम उभे राहील तसतसा त्यांचा विश्वास वाढेल' - असे जोशी स्वतःला समजावत राहिले. त्यांनी लिहिले आहे, एकोणिसाव्या शतकातील मिशनऱ्यांच्या धाटणीवर मी स्वतःलाच धीर देत होतो." (मिशनऱ्यांच्या मनोभूमिकेचे त्यांनी इतके चपखल बसणारे उदाहरण द्यावे हे नवलच आहे. कदाचित त्यांनी केलेल्या सॉमरसेट मॉमच्या वाचनाचा हा प्रभाव असावा.)
जमीन डोंगरकपारीत उतारावर होती; त्यामुळे बांधबंदिस्तीचे बरेच काम करणे आवश्यक होते. त्यासाठी ह्या भूमिहीनांकडे पैसे नव्हते. ह्या प्रकरणात जोशी घेत असलेल्या पुढाकारामुळे स्थानिक सरकारी अधिकारी बरेच प्रभावित झाले होते. एव्हाना जोशी यांची पार्श्वभूमी त्यांच्याही कानावर आली होती. ते म्हणाले, “सामानाचा सगळा खर्च कुठल्यातरी शासकीय योजनेखाली आम्ही करू. पण आमची एक अट आहे. मजुरीचा बंदोबस्त मात्र नवभूधारकांनी केला पाहिजे."
जोशी आनंदाने तयार झाले. लगेच दावडीला आले. सगळ्यांना गोळा केले व त्यांच्यापुढे त्यांनी ही योजना मांडली - तीन दिवसांनी सगळ्यांनी शेतीवर राहायलाच जायचे. बांधबंदिस्तीचे काम पूर्ण होईस्तोवर तिथेच राहायचे. प्रत्येक घरातून निदान दोन जण तरी आले पाहिजेत. आपले महत्त्वाचे काम त्यामुळे होऊन जाईल. प्रारंभीची एक मोठी अडचण दूर होईल. शिवाय, विशेष इन्सेंटिव्ह म्हणून, जे हजर राहतील त्यांना सध्याच्या दराप्रमाणे मजुरीही मिळेल. आणि जे गैरहजर राहतील त्यांना मात्र दंड केला जाईल.'
व्यवस्थापनशास्त्राप्रमाणे ह्यात चांगले काम करणाऱ्याला गाजर आणि कामात हयगय करणाऱ्याला छडी' अशी तजवीज जोशींनी केली होती. सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या.
ठरलेल्या दिवशी सकाळी उजाडता उजाडताच जोशी पुण्याहून निघून दावडीला गेले. तिथे एकही व्यक्ती हजर नव्हती! तास-दोन तास बरीच खटपट केल्यावर आणि निरोपानिरोपी केल्यावर चार घरांमधली मिळून एकूण नऊ माणसे हाती लागली. त्यांना आपल्या जीपमध्ये घालून जोशी शेतावर घेऊन गेले. मिळतील तेवढे दगडगोटे गोळा करून रात्रीच्या आडोशासाठी भिंती उभ्या करायला सुरुवात केली. जोशी स्वतःही अंग मोडून कामाला लागले. संध्याकाळी सगळ्यांनी कंदिलाच्या उजेडात भाकऱ्या खाल्ल्या.
तो सगळाच अनुभव जोशींना विलक्षण रोमांचक वाटत होता. भारतात परतल्यावर प्रथमच आपण थोडेफार अर्थपूर्ण जगतो आहोत असे वाटत होते. जेवण झाल्यावर दोघे जण काहीतरी अडचण सांगून आपल्या घरी निघून गेले. दुसरे दोघे "आम्ही आत्ता गावात जातो,प्रत्येक घरात फिरतो आणि उद्या सकाळी घरटी दोन जण तरी शंभर टक्के घेऊन येतो' असे वचन देत आपल्या गावी गेले. उरलेले पाच जण आणि जोशी स्वतः अशा सहा जणांनी दगड रचून तयार केलेल्या भिंतींच्या आडोशाला, डोंगरातून वाहणारे भणभणते वारे अंगावर झेलत, कुडकुडत कशीबशी ती रात्र काढली.
सकाळी उठून जोशी पुन्हा कामाला लागले. या सहा जणांसह. इतर जण येतील तेव्हा येतील, असा विचार करत. पण प्रत्यक्षात दपारपर्यंत एकही नवा माणस आला नाही. गावात कोणीतरी मेल्याची बातमी तेवढ्यात कानावर आली आणि उरलेले पाच भूमिपुत्रही लगबगा गावाला निघून गेले. त्यांच्या त्या सामूहिक शेतावर आता घाम गाळायला एकटे जोशीच उरले!
असा प्रकार वरचेवर घडू लागला. एक दिवस जोशींनी सगळ्यांना स्पष्टच विचारले, "तुमची अडचण काय आहे? तुम्हाला शेती करायची आहे की नाही? नसेल करायची तर तसं सरळ सांगून टाका आणि मला याच्यातून मोकळं करा."
त्यांच्या या स्पष्टोक्तीनंतर सगळे जरा गांगरले. "असं नका हो करू. तुम्ही गेलात तर सगळंच कोसळेल. आमचं नाक कापलं जाईल आणि तो मूळ जमीन मालक आम्हाला जगूही देणार नाही. जरा बेताबेताने घेऊ या." वगैरे म्हणत सारवासारव करू लागले. पण त्यात फारसा काही अर्थ नव्हता हे एव्हाना जोशींना कळून चुकले होते. या प्रकरणात त्यांच्या स्वतःच्या पदरचे दोन हजार रुपये खर्च करून झाले होते. ते बुडीत खाती गेले आहेत हे स्पष्ट होते.
या अकरा जणांपैकी एकालाही जमीन कसण्याची आणि कष्ट करण्याची इच्छा नव्हती. बिगरशेती उत्पन्नाचे साधन असतानाही भूमिहीन म्हणून नावे नोंदवून त्यांनी जमीन मिळवली होती. जोशींसारख्या शहरी माणसापुढे भूमिहीनतेचे करुण नाटक त्यांनी उत्तम वठवले होते; पण गावकऱ्यांसमोर त्यांचे नाटक चालत नव्हते.
मुळात त्यांना स्वतः कष्ट करून जमीन कसायचीच नव्हती; पुढेमागे एखादा खरीददार सापडला तर त्या जमिनी विकून दोन पैसे करायचे एवढेच त्यांचे उद्दिष्ट होते. तसे केल्यानंतर पुन्हा नव्याने एखाद्या सरकारी योजनेत जमीन मिळवायला ते मोकळे होणार होते! ह्या कहाणीचा समारोप करताना जोशी लिहितात,
पण ह्यात त्यांचे कुठेच चुकत नव्हते. चुकत माझेच होते. बँकेच्या कर्जाचे प्रकरण करतानाच माझ्या लक्षात आले होते, की विहिरीचा खर्च करून, पाण्याची सोय करून, शेती करायची म्हटले, तर कोणतेही पीक काढले तरी बँकेच्या कर्जाची परतफेड यावज्जन्म शक्य नव्हती. दरवर्षी चांगले पीक येईल असा हिशेब केला, तरी खर्च फिटत नव्हता. ही काय गंमत आहे याचा उलगडा मला त्यावेळी झाला नव्हता. गावकऱ्यांना ते कळले होते, भूमिपुत्रांनाही ते कळले होते; पण ते मला सांगत नव्हते. हे सर्व समाजव्यवस्थेचे गुह्यतम गुह्य आणखां उग्र तपस्येने माझे मलाच शोधावे लागणार होते.
'तुमची सगळ्यांची जमिनीवर राहायला जायची तयारी झाली, म्हणजे मला निरोप द्या,' असे म्हणून मी भूमिपुत्रांचा निरोप घेतला. एक धडा शिकून. यापुढे लोकांचे भले करण्याचे प्रयत्न बंद. भिकेच्या आणि मदतीच्या प्रकल्पांतून गरिबीचा प्रश्न सुटत नाही. वर्षानुवर्षे गावागावातील गरिबी संपवण्याबद्दल जो मार्ग मनात शंकासुद्धा न आणता मी मानला होता, त्याबद्दलच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पुन्हा एकदा शून्यावर आलो होतो. स्वित्झर्लंडला परत जाण्याचा मोह मी कसा टाळला कुणास ठाऊक!
(अंगारमळा, पृष्ठ १४-५)
ग्रामविकासाचे हे प्रयत्न चालू असतानाच दुसरीकडे जोशींची शेतीदेखील चालूच होती. भारतातील शेती बव्हंशी कोरडवाहू आहे; पण अशा कोरडवाहू शेतीतही पुरेसा पैसा गुंतवला, उपलब्ध तंत्रज्ञान वापरले, आपल्या शिक्षणाचा उपयोग करून चांगले व्यवस्थापन केले तर ती शेती फायदेशीर होऊ शकते का ह्याचा त्यांना शोध घ्यायचा होता. किंबहुना, शेतीत पडण्यामागे त्यांचा तोच खरा उद्देश होता. त्या दृष्टीने सतत काही ना काही नवे प्रयोग ते करत असत. शेतीतील कामाबद्दल जे काही वाचनात यायचे, कानावर पडायचे त्याचा अवलंब स्वतःच्या शेतीत करून बघत. कधी हे बियाणे वापर, कधी त्या कंपनीचे बियाणे घे; कधी हे खत, कधी ते औषध. कधी असे पाणी द्या, कधी तसे द्या. सारखे काहीतरी नवे करून बघायचे, आपला अनुभव हाच आपला गुरू मानायचा असे त्यांनी ठरवले होते.
लौकर येणारे आणि रोख पैसे देऊ शकणारे पीक म्हणून खरिपाच्या पहिल्याच हंगामात जोशींनी खीरा जातीच्या काकडीचे पीक घेतले. तीन-एक महिन्यांत पाच-सहा पोती काकडी निघाली, ती अडत्याकडे पाठवून दिली. विक्रीचा खर्च वजा जाता १८३ रुपये मिळाले. शेतीतली ती पहिली कमाई. नाही म्हटले तरी जोशींना आनंद झाला. दुसऱ्या वेळीही असेच काहीतरी दीड-दोनशे रुपये आले. पण तिसऱ्या वेळी त्यांना वेगळाच अनुभव आला. ह्यावेळी त्यांनी लागवडीचे क्षेत्र वाढवले होते. दहा पोती काकडी आली, ती पुण्याला अडत्याकडे पाठवून दिली. तीन-चार दिवसांनी, आता यात निदान तीनशे रुपये तरी फायदा होईल या अपेक्षेने ते पुण्यातील अडत्याच्या (दलालाच्या) ऑफिसात गेले. जरा वेळाने तेथील कारकुनाने त्यांच्या हातात एक लिफाफा कोंबला आणि ३२ रुपयांची मागणी केली. "हे कसले पैसे द्यायचे?" त्यांनी आश्चर्याने विचारले.
"लिफाफा उघडा म्हणजे कळेल." कारकुनाने उत्तर दिले.
उभ्याउभ्याच जोशींनी लिफाफा उघडला व आतला कागद बाहेर काढला. त्यावर जो हिशेब खरडला होता, त्याचा सारांश होता : 'वाहतूक, हमाली, दलाली, वजनकाटा, मार्केट कमिटीचा चार्ज आणि मुख्यमंत्री फंडाला द्यायचे पैसे हे पकडून एकूण खर्च इतका इतका; काकडी विकून आलेले पैसे इतके इतके; तुमच्याकडून येणे रुपये ३२.'
जोशींनी कपाळावर हात मारून घेतला. शेतावर तीन महिने राबून काढलेल्या काकडीचे
बाजारमूल्य, माल तयार झाल्यापासून विकला जाईपर्यंतचा (पोस्ट-हार्वेस्ट) खर्च भरून निघेल इतकेदेखील नव्हते. ती तूट भरून काढायलाच खिशातले ३२ रुपये द्यावे लागणार होते! शेतकऱ्यांच्या परिभाषेत यालाच 'उलटी पट्टी' म्हणतात. बियाणे, मजुरी, खते, औषधे, पाणी वगैरे (प्री-हार्वेस्ट) खर्चाचा यात कुठे समावेशही नव्हता! जमिनीवरील इतर खर्च, बँकेचे व्याज, स्वतःच्या श्रमाचे मूल्य व इतर ओव्हरहेड्स यांची गोष्ट तर दूरच राहिली! या सर्व व्यवहारात बियाणे विकणारा, खते-औषधे विकणारा, टेम्पोवाला, दलाल, वजन करणारा मापारी, हमाल, मार्केट कमिटी आणि अगदी मुख्यमंत्री फंड या इतर सर्व घटकांना आपापला वाटा मिळाला होता; नागवला गेला होता तो फक्त मालाचा प्रत्यक्ष उत्पादक, म्हणजेच शेतकरी.
सगळीच व्यवस्था (सिस्टिम) शेतकऱ्याच्या विरोधात काम करत होती. कुठल्याही विद्यापीठात न शिकवला जाणारा, किंवा कुठल्याही पुस्तकात न नोंदवलेला हा महत्त्वाचा धडा स्वतःचा घाम शेतात जिरवून जोशी शिकत होते.
असाच दुसरा अनुभव होता परावलंबित्वाचा; बेभरवशी निसर्गावर शेतकरी किती अवलंबून असतो याचा. तो आला बटाट्याच्या पिकाबाबत. भामनेरच्या खोऱ्यात बटाट्याचे पीक मुबलक येते. बटाट्यासाठी चाकणची बाजारपेठ खप प्रसिद्ध आहे. 'तळेगाव बटाटा या नावाने जो बटाटा बाजारात विकला जातो, तो बराचसा ह्याच परिसरात तयार होतो. जोशींनी लावलेले सुरुवातीचे बटाट्याचे पीक उत्तम आले. सगळीकडे खूप कौतुक झाले. खेड येथील सरकारच्या बटाटा संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनी मुद्दाम येऊन त्या शेतीची पाहणी केली. जोशी खूष झाले. शेतीवर आतापर्यंत गुंतवलेले चार लाख रुपये अशा किती हंगामांत सुटतील याची गणिते मांडू लागले. पुढच्या वेळी हौसेने पुन्हा बटाटा लावला. पण नेमका त्यावर्षी कसलातरी रोग आला आणि बटाट्याचे सगळे पीक नष्ट झाले! ही अस्मानी सुलतानी सर्वसामान्य भारतीय शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेली असते; पण जोशींना हा अनुभव नवाच होता. बऱ्याच वर्षांनी ह्या अनुभवाकडे वळून पाहताना जोशी म्हणाले,
"मी बटाटा लावला होता ती जमीन आदली अनेक वर्षे पडीक होती व म्हणूनच केवळ पहिले पीक उत्तम आले होते! त्यात माझ्या प्रयत्नाचा भाग नगण्यच होता. माती, पाऊस अशा वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांवर आपला शतक घडले असेल हे सांगणे त्यालाही शक्य नसते. हळूहळू माझे शेतीतले सगळेच नियोजन अयशस्वी ठरू लागले."
पण तरीही जेव्हा इतर शेतकऱ्यांबरोबर ते बाजारपेठेत वा चावडीवर गप्पा मारायला बसत तेव्हा बाकीच्या शेतकऱ्यांना मात्र नफा होतो आहे असे संभाषणात कानावर पडत असे. हे काय गौडबंगाल आहे त्यांना कळेना. एकदा त्यांनी इतर गावकऱ्यांना गप्पा मारता मारता विचारले,
"मघापासून मी ऐकतोय, कोणी म्हणतात, यंदा ज्वारी चांगली दहा-बारा पोती आली,
कोणी म्हणतात, इतका इतका मूग आला, इतका कांदा आला. म्हणजे सगळ्यांचंच एकूण चांगलं चाललेलं दिसतंय. मग मला हे समजत नाही की मी इतका शिकलेला असूनही आणि सगळा वेळ ह्या शेतीतच राबत असूनही मला का प्रत्येक वेळी तोटा येतोय? माझं नेमकं कुठे चुकतंय?"
गप्पा संपल्यावर त्यांना बाजूला घेऊन एक म्हातारा सांगू लागला, “साहेब, हे सगळे लोक थापा मारताहेत. हे जर असं काही सगळ्यांसमोर बोलले नाहीत, तर ह्यांच्या घरच्या मुलींची लग्नं होणार कशी? तुमचा अनुभव हाच खरा अनुभव आहे. आपण सगळेच शेतकरी तोट्यातच आहोत."
शेतकऱ्यांची आत्मवंचना किती भयाण आहे हे त्यादिवशी जोशींच्या लक्षात आले. सरकार शेतकऱ्याकडून लेव्हीची ज्वारी फक्त सत्तर पैसे किलो दराने खरेदी करत असतानाही, हे शेतकरी दीड रुपये किलो दराने खुल्या बाजारातन ज्वारी खरेदी करतात आणि ती बैलगाडीवर लादून सरकारी गोदामात आपली अपुरी भरलेली लेव्ही पूर्ण करायला जातात तेव्हा मात्र बँडबाजा लावून, वाजतगाजत जातात, ह्या मुर्खपणाचे कोडे त्यांना उलगडले. मुळात फारच थोडे शेतकरी आपला नेमका उत्पादनखर्च काढतात, त्यात काय काय पकडायचे ते खूपदा त्यांच्या लक्षातही येत नाही हा एक भाग होताच; पण शिवाय, आपली इभ्रत कायम राहावी म्हणून इतरांपुढे करायचे नाटकही त्यात होते.
शेतीमालावर प्रक्रिया केल्याशिवाय त्याची बाजारातील किंमत वाढणार नाही हे त्यांच्यातील अर्थतज्ज्ञाला सहज समजण्यासारखे होते. त्या दृष्टीनेही जोशींनी वेगवेगळे प्रयोग करून बघितले. चाकण परिसरात पूर्वी कोणीतरी बटाट्याचे वेफर्स करायचा छोटा कारखाना सुरू केला होता, पण लौकरच तो बंद पडला होता. त्याचे आपण पुनरुज्जीवन करू शकू का, किंवा तसाच एखादा कारखाना आपण उत्तमप्रकारे नव्याने उभारू शकू का, ह्याचा त्यांनी खोलात जाऊन विचार केला होता. बरीच आकडेमोड केली होती. त्यासाठी त्यांनी एकदा स्वित्झर्लंडला भेटही दिली होती. शेंगदाण्यावर आधारित प्रक्रियाउद्योग सुरू करण्याचा आणि चांगल्या दर्थ्यांचे शेंगदाणे पिकवून ते परदेशी निर्यात करायचा प्रयत्नही त्यांनी केला होता. कारण त्या भागात भुईमुगाचे पीक भरपूर यायचे. ह्या दोन्ही पुढाकारांबद्दल मागील प्रकरणात लिहिलेच आहे.
अशा वेगवेगळ्या प्रयोगांसाठी जोशींनी स्वतःची सारी पुंजी पणाला लावली होती. युपीयुमधील नोकरी सोडून ते भारतात परतले तेव्हा त्यांना पाच-सहा लाख रुपये फंड, ग्रॅच्युइटी वगैरेचे मिळाले होते, ते सर्व घर आणि शेती घेण्यात आणि नंतर ती शेती सुधारण्यात जवळजवळ संपले. त्याशिवाय त्यांनी कर्जही काढले होते. 'इथे शेती करणं म्हणजे वाळूत मुतल्यासारखं आहे. सगळे पैसे संपवून लौकरच हा भिकारी बनणार,' असे एकदोघांनी म्हटले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून जोशींनी आपले काम अगदी निष्ठेने चालू ठेवले. जोशी सांगत होते,
"हा एवढा सगळा पैसा शेतीत गुंतवण्यामागे आणखी एक विचार होता – तो म्हणजे शेतीतून बाहेर पडायचा आपल्याला कधीच मोह होऊ नये!"
हे सारे करत असताना भोवतालच्या इतर स्थानिक मंडळींशी जोशींचे संबंध कसे होते? सुरुवातीला ते अर्थातच अगदी परके होते, पण जसजसे दिवस जात होते, तसतसे त्यांचे स्थानिक परिचितांचे वर्तुळ वाढू लागले.
७ ऑगस्ट २०१५ रोजी सुरेशचंद्र म्हात्रे ह्यांच्या सौजन्याने चाकण येथे एक सुखद योग घडून आला. म्हाळुंगे येथील एक हॉटेलमालक श्याम पवार, चाकणमधील एक जुने डॉक्टर अविनाश अरगडे, मांडव कॉट्रॅक्टर गोपालशेठ मारुती जगनाडे (संत तुकारामांच्या अभंगांचे लेखनिक म्हणून ज्यांनी एकेकाळी काम केले होते त्या संताजी महाराजांचे हे वंशज), राष्ट्र सेवा दलाचे शाखाप्रमुख रामराव मिंडे, ऑइल इंजिन दुरुस्ती करणारे मधुकर रघुनाथ शेटे, आप्पासाहेब ऊर्फ प्रल्हाद रंगनाथ देशमुख, मामा शिंदे वगैरे जोशींच्या त्यावेळच्या काही निवडक सहकाऱ्यांबरोबर त्यादिवशी प्रस्तुत लेखकाला मनसोक्त गप्पा मारता आल्या आणि त्यावेळचे जोशींच्या सहकारी वर्तुळाचे चित्र डोळ्यापुढे आपोआपच उभे राहत गेले.
आप्पासाहेब ऊर्फ प्रल्हाद रंगनाथ देशमुख आणि बाबुभाई शहा यांच्यापासून बहुधा ह्या स्थानिक वर्तुळाची सुरुवात झाली. ह्या दोघांचीही त्याकाळी चाकण परिसरात सायकल दुरुस्त करायची दुकाने होती. ग्रामीण भागात त्यावेळी सायकल हेच वाहतुकीचे प्रमुख साधन होते. दोघांच्याही व्यावसायिक जीवनाची ती सुरुवात होती. अप्पा देशमुखांनी पुढे डिझेल पंपाची निर्मिती व दुरुस्ती करायचे केंद्र काढले. ते स्वतः कुशल फिटर होते व देशमुख फिटर म्हणूनच त्यांना सगळे हाक मारत. जोशींच्या शेतातील विहिरीवर बसवलेला पहिला डिझेल पंप त्यांनी देशमुखांकडूनच खरेदी केला होता. पुढे फॅब्रिकेशनचा व्यवसायदेखील ते उत्तम करू लागले. शेतातील गोबर गॅस प्लांट, शेड हे सारेही त्यांनीच उभारून दिले होते. बाबुभाईंनीतर पुढे आणखी व्यावसायिक प्रगती केली. एक पेट्रोल पंप काढला आणि मोटर गाड्यांचे सर्व्हिसिंग सेंटरही काढले. शेतीमालाच्या साठवणुकीसाठी त्यांनी एक हिमराज कोल्ड स्टोरेजदेखील काढले. पुढे जोशींनी बटाट्याचे पीक काढायला सुरुवात केली तेव्हा आपल्या शेतातले बटाटे विक्री होईस्तोवर ते हिमराज कोल्ड स्टोरेजमध्येच ठेवत असत.
अशाप्रकारेच पुढे एकेक करत उपरोक्त सगळ्या स्थानिक मंडळींशी जोशींचे संबंध जडले. सुरुवातीला ते व्यावसायिक संबंध होते, पण पुढे त्याचे स्नेहात रूपांतर झाले. ही मंडळी नंतर त्यांच्या शेतकरी आंदोलनातही यथाशक्ति सामील झाली. जगनाडे यांनी पंढरपूर येथील मेळाव्याचा तसेच परभणी अधिवेशनाच्या वेळचा सगळा मांडव अत्यल्प खर्चात उभारून दिला होता. श्याम पवार, डॉ. अविनाश अरगडे वगैरे सगळेही आंदोलनात जमेल तसा सहयोग देत राहिले. त्र्याण्णव वर्षांचे मधुकर शेटे प्रस्तुत लेखकाला सांगत होते,
"आम्ही तशी आपापला छोटा व्यवसाय करणारी माणसं. चळवळ वगैरे आमचं क्षेत्र कधीच नव्हतं. पण जोशीसाहेबांचा प्रभाव आमच्यावर असा काही पडला, की आम्ही
आपोआपच त्यांच्या आंदोलनात खेचले गेलो. खरं तर पूर्वी आम्हाला शेतकऱ्यांबद्दल काहीच प्रेम वगैरे नव्हतं. आमचं गि-हाईक म्हणूनच आम्ही या शेतकऱ्यांकडे बघायचो; खूपदा त्यांच्याशी भांडायचोही. पण जोशीसाहेबांमुळे आमची त्यांच्याकडे बघायची सगळी दृष्टीच बदलून गेला. त्यांच्यावर किती अन्याय होत आहे याची आम्हाला प्रथमच जाणीव झाली. मी स्वतः तीन वेळा शेतकरी आंदोलनात तुरुंगात गेलो. दोनदा येरवडा तुरुंगात व एकदा औरंगाबाद तुरुंगात."
बाबुभाई शहा यांनी जोशींची दुसऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर ओळख करून दिली. शेतीच्या काही कामासाठी जोशी शहांकडे गेले होते. त्यांच्या चाकणमधील कार्यालयात. काम झाल्यावर ते जाण्यासाठी उठले तशी, "थांबा दोन मिनिटं. तुमची एका भल्या माणसाबरोबर ओळख करून देतो," असे म्हणत शहांनी त्यांना थांबवून घेतले. तेवढ्यातच हे भले गृहस्थ त्या दुकानात आले. कदाचित जोशींबरोबर परिचय करून देण्याच्या उद्देशाने शहांनीच त्यांना तिथे बोलावून घेतले असेल. ते होते दत्तात्रेय भिकोबा ऊर्फ मामा शिंदे. त्यांनी जोशींच्या चाकणमधील सुरुवातीच्या दिवसांत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्याविषयी इथे थोडे विस्ताराने लिहायला हवे.
दुसरे सानेगुरुजी' म्हणूनच चाकण परिसरात आजही मामा ओळखले जातात. हे साम्य केवळ दिसण्यापुरते नव्हते, तर वृत्तीतही होते. राष्ट्र सेवा दलाचे ते प्रथमपासून निष्ठावान सेवक. १९४७ साली देश स्वतंत्र झाला तेव्हा सर्व पोलीस स्टेशनांनी आपापल्या आवारात झेंडावंदन करावे असे सरकारचे आदेश निघाले. पण चाकण पोलिसांना झेंडावंदन कसे करतात तेच ठाऊक नव्हते. मामा राष्ट्र सेवा दलाची शाखा गावात चालवतात हे मात्र त्यांना ठाऊक होते. त्यांनी मामांनाच पोलीस ठाण्यात पाचारण केले. खांब उभारणे, झेंड्याला दोरी लावून तो वर सरकवणे व मग तो फडकवणे या सगळ्याची रंगीत तालीम केली आणि मग १५ ऑगस्टला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांनी पहिले झेंडावंदन केले.
बाबुभाई पक्के काँग्रेसवाले असूनही मामांना इतके मानतात याचे जोशींना कौतुक वाटले. विरोधी पक्षातील लोकांनाही आपले मोठेपण मान्य असणे हे आपल्याकडे तसे दुर्मिळच. लौकरच जोशींना कळले, की चाकणमध्ये सर्वच नेत्यांना मामांचे मोठेपण मान्य आहे.
जोशींनी शेतीला सुरुवात केली त्याच महिन्यात, २३ जानेवारी १९७७ रोजी, दिल्लीत एक अगदी अनपेक्षित घटना घडली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना इंदिरा गांधींनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. ठरल्याप्रमाणे २० मार्चच्या संध्याकाळी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसचा अभूतपूर्व असा पराभव करून केंद्रात जनता पक्षाचे राज्य आले. काँग्रेसेतर सरकार केंद्रात सत्तेवर यायचा हा देशाच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग. जोशी तसे प्रत्यक्ष राजकारणापासून दूरच होते, पण भोवताली काय चालले आहे हे बारकाईने पाहत असत. आणीबाणीची दहशत असल्याने लोक तसे शांत आहेत हे
ठाऊक असले, तरी विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबणे, त्यांचा छळ करणे, विशेषतः सक्तीची नसबंदी वगैरेबाबत लोकांत खूप असंतोष आहे हे त्यांनी हेरले होते. इंदिराजी हरल्या ह्याचा त्यांनाही इतरांप्रमाणेच आनंद झाला होता. त्या आधीच्या १८ महिन्यांत आणीबाणीमुळे राजकीय मंचावर सारे कसे शांत शांत होते. आता एकदम सगळीकडे राजकारणाची चर्चा सुरू झाली. लोक जणू आपल्या दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते. त्यानंतर पुढल्याच वर्षी, मार्च १९७८मध्ये, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचे जाहीर झाले. मामा खेड मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुका लढवणार व जिंकणार ह्याविषयी सगळ्या चाकणची खात्री होती. पण अचानक कुठेतरी चावी फिरली आणि जनता पक्षाने मामा शिंदे यांना तिकीट नाकारले. त्यांना मानणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शेवटी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचे ठरवले. त्यांचे चिन्ह होते सायकल.
आपल्या लढतीची पूर्वतयारी साधारण ७८च्या जानेवारी महिन्यातच मामांनी सुरू केली व त्याचवेळी जोशी आपण होऊन त्यांना म्हणाले, "मामा, ह्या संपूर्ण प्रचारात मी माझ्या डिझेल भरलेल्या जीप गाडीसह तुमच्या सेवेला हजर राहीन. तुम्ही जिथे जिथे जाल, तिथे तिथे मी तुमच्याबरोबर येईन." मामांना ह्या अनपेक्षित ऑफरचे खूप अप्रूप वाटले. गाडी, डिझेल आणि ड्रायव्हर ह्या सगळ्याचीच एकदम सोय झाली होती! शिवाय त्या काळात जोशींच्या भोवतीचे आयएएसचे व स्वित्झर्लंडचे वलय कायम होते. गावात कुठेही गेले तरी ते आपली छाप हमखास पाडत. अशी व्यक्ती दिमतीला असणे ही मामांच्या दृष्टीने मोठीच जमेची बाजू होती.
जोशी म्हणतात,
"मामांच्या निवडणूक प्रचाराच्या काळात मी रोज माझी मोडकीतोडकी जीप गाडी घेऊन, त्यात डिझेल भरून, मामांच्या घरासमोर उभा राहत असे. आमची निघण्याची वेळ अगदी पक्की ठरलेली असे. ते निवडून आले, तर त्यांच्या मतदारसंघात काय काय करता येईल याची आखणी आम्ही प्रवासात करत असू."
अपक्ष असूनही मामांनी चांगलीच लढत दिली. तालुक्यातील प्रत्येक गावात 'ही सायकल कोणाची, गरीब आपल्या मामांची' ही घोषणा दुमदुमत होती. ते निवडून येतील असे जोशींसकट सगळ्यांनाच वाटले होते, पण प्रत्यक्षात त्यांना सुमारे १२.००० मते पडली व आणीबाणीची पार्श्वभूमी असतानाही त्यांच्यापेक्षा दुप्पट म्हणजे २३,००० मते मिळवून काँग्रेसचे राम जनार्दन कांडगे निवडून आले. तसे व्यक्तिशः तेही मामांना गुरुस्थानी मानत. लोकभावना ओळखण्यात आपण कसे चुकतो व प्रत्यक्षात निवडणुकांची गणिते किती वेगळी असतात याची जोशींना ह्या काळात थोडीफार जाणीव झाली.
अर्थात, जोशींच्या दृष्टीने निवडणुकीतील हारजीत तशी कमी महत्वाची होती. मामांच्या प्रचाराच्या पलीकडे जाऊन काहीतरी साधायचे त्यांचे उद्दिष्ट होते. किंबहुना ते उद्दिष्ट समोर
ठेवूनच ते ह्या प्रचारकार्यात सामील झाले होते. मतदारसंघातील जवळ जवळ प्रत्येक गावात ते गेले. शेतकरी प्रश्न समजून घेण्यासाठी व पुढे सोडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त असे संपर्क जोशी साधत होते. मामांचे भाषण चालू असताना मागे उभे राहून वा गर्दीत मिसळून ते सगळे निरखून पाहत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव, अपेक्षा व अडचणी ऐकून घेत. 'हा माणूस इतर शहरी सुशिक्षित लोकांपेक्षा वेगळा आहे' असे त्या भागातील शेतकऱ्यांच्या मनावर ठसू लागले. त्यावेळी मामा म्हणत, "आम्ही राजकारणी चाकणहून दिल्लीला जाण्यासाठी धडपडतो आणि शरद जोशी मात्र परदेशातून येतात आणि चाकणहून टोकाच्या वांद्रे गावाला जाण्याचा ध्यास धरतात."
जोशी म्हणतात, “या त्यांच्या शेऱ्यामध्ये माझ्या पुढच्या सगळ्या शेतकरी चळवळीच्या इतिहासाचे बीज आहे."
पुढे कांदा आंदोलनात मामा शिंदे सर्व ताकदीनिशी सामील झाले. ते स्वतः आयुष्यभर समाजवादी पक्षाचे काम करत आलेले; त्या पक्षाच्या विचारसरणीला जोशी यांचा अगदी मुलभूत असा विरोध. तरीही दोघे एकत्र काम कसे करू शकतात याचे अनेकांना आश्चर्य वाटे. पण "शरद जोशींचा विचार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार आहे व आजवर तो तसा कोणीही मांडला नव्हता. अशा वेळी त्यांना साथ देणं हे माझं एक शेतकरी म्हणून कर्तव्य आहे," असे मामा म्हणत. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते एसेम जोशी व नानासाहेब गोरे यांनी आणि शरद जोशी यांनी व्यापक शेतकरीहित विचारात घेऊन एकत्रितपणे काही कृती करावी अशी त्यांची फार इच्छा होती व त्यादृष्टीने त्यांनी खूपदा प्रयत्नही केले होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे शेतकरी संघटनेच्या चाकणमधील एक-दोन सभांना नानासाहेब गोरे व जॉर्ज फर्नांडीस हजर राहिले होते. पण जोशींबरोबर समाजवाद्यांचे, किंवा खरे तर कुठल्याच पक्षाचे, फारसे कधी जुळले नाही.प्रचारसभांच्या धामधुमीतून मोकळे झाल्यावर एप्रिल १९७८पासून जोशी पुन्हा एकदा आपल्या शेतीवर लक्ष केंद्रित करू लागले. एकूण परिस्थिती आता खूप गंभीर झाली होती. आर्थिक टंचाई होतीच, काही कौटुंबिक ताणतणावही होते. जोशी आपल्या शेतीतील प्रयोगांत पूर्ण रमले असतानाच लीलाताईंनी गुलाबाची रोपे विकणारी रोपवाटिका सुरू केली होती. मुख्य म्हणजे स्वतःची एक पोल्ट्री सुरू केली होती. काहीतरी स्वतंत्र व्यवसाय उभा करण्याची त्यांची जिद्द होती. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण त्यांनी खडकी येथील शासकीय कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्रातून घेतले होते. खूप मनापासून त्या हा व्यवसाय करत होत्या. अंड्यांचे आहारातील वाढते महत्त्व म्हणजे मोठीच व्यावसायिक संधी होती. पुणे-तळेगाव हे कुक्कुटपालनाचे एक मोठे केंद्र म्हणून विकसित होत होते. सुरुवात त्यांनी मृद्गंध बंगल्यातूनच केली होती, पण नंतर व्याप वाढू लागल्यावर व त्या निवासी जागेत व्यवसाय वाढवणे शक्य नसल्याने त्यांनी कोंबड्यांचे सगळे पिंजरे अंगारमळ्यात नेले. चाकणच्या अप्पा देशमुखांनीच हे पिंजरे तयार केले होते व ते ठेवण्यासाठी पत्र्याच्या शेडदेखील त्यांनीच उभारून दिल्या होत्या. पण दुर्दैवाने प्रथमपासूनच पोल्ट्रीच्या या व्यवसायात अनेक अडचणी येत गेल्या. एकदा वीज गेल्यामुळे शीतगृह बंद पडले व त्यात साठवून ठेवलेला माल नष्ट झाला. शीतगृहमालकाने वस्तुरूपात थोडी भरपाई दिली, पण तरीही नुकसान बरेच झाले. एकदा मुंगुसांनी कसातरी पिंजऱ्यात प्रवेश केला आणि दोन-अडीच हजार कोंबड्यांपैकी पाचेकशे खाऊन फस्त केल्या. असे एकापाठोपाठ एक धक्के बसत गेले. दरम्यान कर्जाचा बोजा वाढतच चालला. शेतीतही कर्ज साठत होते आणि पोल्ट्रीतही साठत होते.
साधारण ह्याच सुमाराची एक घटना. जोशी यांच्या वैचारिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी त्या दिवशी गाठला.
पुण्यातील पाषाण विभाग, आणि विशेषतः आज ज्याला नेकलेस रोड म्हणतात तो त्यातला भाग, त्या काळी आत्तापेक्षाही अधिक निवांत होता. स्वच्छ रस्ते, ओळीनी लावलेले वृक्ष, मागे दिसणाऱ्या डोंगररांगा. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, डीआरडीओ यांसारख्या काही नामांकित संस्थांची भव्य आवारे इथेच आहेत. त्यांच्याआधीच लागते सेंट जोसेफ शाळा. शाळेच्या प्रशस्त आवारात जोशींची गाडी शिरली, तेव्हा दुपारचे साधारण तीन वाजले होते. सोबत लीलाताई आणि श्रेया व गौरीही होत्या. दोघी ह्याच शाळेत शिकत होत्या आणि शाळेच्याच वार्षिक स्नेहसंमेलनासाठी म्हणून जोशी कुटुंब तिथे आले होते. ही शाळा मुलींची. त्याच मिशनची मुलांसाठीची शाळा, लॉयोला हायस्कूल, शेजारीच आहे.
ख्रिस्ती मिशनऱ्यांनी कोणे एके काळी गरीब विद्यार्थ्यांसाठी म्हणून अनेक देशांत शाळा सुरू केल्या. जगभरातून देणग्या मिळवून उत्कृष्ट इमारती उभारल्या. ग्रंथालये, प्रयोगशाळा, क्रीडांगणे, वसतिगृहे, भरपूर मोकळी जागा यांची तजवीज केली. देशोदेशींच्या मिशनरी स्त्रिया व पुरुष अतिशय कळकळीने व सेवावृत्तीने शिकवण्याचे काम करीत. साहजिकच बघता बघता या शाळांचा खूप दर्जेदार म्हणून सर्वत्र लौकिक पसरला. पण म्हणूनच अहमहमिकेने अभिजनवर्ग आपली मुले इथेच घालू लागला आणि त्यामुळे मूळ गरिबांसाठीच्या या शाळा काळाच्या ओघात उच्चभ्रूच्या शाळा म्हणूनच स्थिरावल्या. विशिष्ट परिस्थितीमुळे संस्थांना मूळ उद्देशापासून अगदी वेगळे स्वरूप कसे प्राप्त होत जाते ह्याचे हे एक ठळक उदाहरण आहे.
शाळेच्या आवारात पार्किंगसाठी भरपूर जागा असूनही गाड्यांची गचडी झाली होती. इथल्या बहतेक विद्यार्थिनी गाडीवाल्या! त्यात पुन्हा आज खास दिवस. कशीबशी आपली गाडी पार्क करून जोशी कुटुंब सजवलेल्या मांडवात शिरले. सगळीकडे अगदी सणासुदीचे वातावरण होते. सगळ्या मुली फॅशनेबल कपड्यांत आलेल्या. त्यांचे पालक तसेच नटूनथटून आलेले. त्यांनी तसे यावे, हा आग्रह प्रत्येक मुलीचा असायचाच! आपल्या आईवडलांमुळे इतर मुलींसमोर आपली 'पोझिशन डाऊन' होऊ नये यासाठीची ही त्यांची खबरदारी! सगळीकडे पताका, झिरमिळ्या, फुगे. नाच, गाणी, करमणुकीचे कार्यक्रम. बाजूला ओळीने उभारलेले वेगवेगळे खाद्यपदार्थ व इतर वस्तू विकणाऱ्यांचे स्टॉल्स. त्यांच्याभोवती उडालेली मुलींची झुंबड. आपल्याला हवे ते विकत घेण्यासाठी त्या पर्समधून वा खिशातून पन्नास शंभरच्या नोटा अगदी सहज काढत होत्या. त्यांच्या गोंगाटाने आणि हसण्याखिदळण्याने, इकडेतिकडे बागडण्याने तो सगळा परिसर भरून गेला होता. एरव्ही अशा शाळांमधली शिस्त मोठी कडक. पण आज तिथल्या शिक्षकांनी मुलींना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले. वातावरणात उत्साह, उल्हास दाटलेला. पालकही गप्पांमध्ये रंगलेले.
जोशी स्वतः त्या सगळ्यापासून अलिप्त होते, नुसतेच आजूबाजूला पाहत होते. तसे सरकारी नोकरीत व परदेशात त्यांनी वैभव भरपूर उपभोगले होते; पैशाचे त्यांना अप्रूप नव्हते. पण आज मात्र त्यांना हे सारे बघताना वैषम्य वाटत होते. वाटले, 'ह्या सगळ्या मंडळींमध्ये बहुधा आपणच सर्वांत गरीब असू. आपल्या मुली म्हणजे श्रीमंत शाळेतल्या गरीब मुली!'
त्यांना असे वाटण्याचे बरेच प्रसंग गेल्या काही दिवसांत आले होते. नुकतेच मोठ्या श्रेयाला काश्मीरला ट्रीपला जायचे होते, वर्गातल्या सगळ्याच मुली जाणार होत्या. पण त्यासाठी लागणारे पाचशे रुपये त्यावेळी जोशींकडे नव्हते. 'तुला यंदा ट्रीपला पाठवणं नाही झेपणार मला' असे तिला सांगताना त्यांच्या हृदयाला जणू सहस्र इंगळ्या डसल्या होत्या. स्वित्झर्लंडमध्ये असताना असा प्रसंग कधीच आला नव्हता; मुलींची प्रत्येक हौस पुरी करणे तिथल्या पगारात त्यांना सहज शक्य झाले होते.
वडलांच्या हट्टामुळे मुलींना भारतात यावे लागले होते आणि मग त्यांचे सगळे जीवनच एकदम बदलून गेले होते. इथली शाळा, शिक्षक, मैत्रिणी, शेजारी, हवापाणी, रस्ते, रहदारी, इथले एकूण सामाजिक वातावरण सगळे तिथल्यापेक्षा खूप वेगळे होते. बर्नमध्ये शिकत असताना दोन वर्षांपूर्वीच श्रेयाने कोपर्निकसवर फ्रेंचमध्ये निबंध लिहिला होता; इथल्या शाळेत मात्र तिला गमभन गिरवायला लागले होते! होणाऱ्या खर्चावरून, वाढणाऱ्या कर्जावरून घरी खूपदा भांडणे व्हायची. तशा दोघीही मुली समजूतदार होत्या, आईवडलांची परिस्थिती त्यांना समजत होती. शक्यतो त्या काही मागतच नसत. त्यांच्या चेहऱ्यावर अकालीच उमटलेल्या त्या गांभीर्याच्या छटा जोशींना अधिकच बोचायच्या. घरातल्या प्रत्येकालाच खरे तर वातावरणातला तणाव जाणवत होता. आपला अनेक वर्षे कष्ट घेऊन केलेला स्टॅम्प्सचा संग्रहही त्यांना विकावा लागला होता व ते तर जोशींना खूपच जिव्हारी लागले होते. लीलाताईंची स्थिती काही वेगळी नव्हती. त्याही बदललेल्या प्रापंचिक परिस्थितीशी जुळवून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करत होत्या. पण सगळे तसे जडच होते. आपल्या तत्कालीन मानसिकतेचे नेमके वर्णन जोशींनी केले आहे. ते लिहितात :तिच्या मनात खरोखरच काय चाललं होतं कोण जाणे! माझी ही उडी खरं म्हटलं तर तिच्यावरही अन्यायच होता. आयएएस पास झालेल्या, हुशार, कर्तबगार समजल्या जाणाऱ्या नवऱ्याच्या हाती तिने हात दिला, तो सुखासमाधानाच्या चौकोनी कुटुंबाच्या राज्यात चिरकाल राज्य करण्यासाठी. पुढे हे असं काही घडेल याची तिला तरी काय कल्पना होती? ... झोपी जाताना चिंतांची तोटी बंद करून झोपी जायचं, ही माझी फार जुनी कला आहे. झोप लागताना सगळ्या चिंतांचा आणि तणावांचा काही त्रास व्हायचा नाही. रात्री अडीचतीन वाजता मात्र झोप खाडकन खुले. पुढे झोपणंच अशक्य होई. कपाळाला हात लावून मी स्वतःलाच विचारी, 'मी पाहतो आहे ते खरं की स्वप्न?' आसपास शांतपणे झोपलेल्या लीला, श्रेया, गौरीकडे पाहून पोटात गलबलून यायचं. यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा मला काय अधिकार होता? (अंगारमळा, पृष्ठ ८-१०)
शाळेतील तो कार्यक्रम संपवून घरी परतेस्तोवर रात्र झाली होती. तिथेच इतके सगळे खाणेपिणे झाले होते, की आता घरी गेल्यावर जेवायचा काही प्रश्नच नव्हता. आज कधी नव्हे ती मुलींची बडबड सारखी चालू होती; संध्याकाळच्या आठवणी काढून त्या सारख्या खिदळत होत्या. खूप दिवसांनी त्यांचा असा चिवचिवाट ऐकताना, त्यांचे असे फुललेले चेहरे पाहताना आईवडलांनाही खुप आनंद होत होता. जोशींना तर वाटत होते, ह्यांना इतक्या आनंदात असलेले आपण भारतात परतल्यावर आज प्रथमच पाहतो आहोत! आज इतक्या दिवसांनी प्रथमच त्यांना एक वडील म्हणून इतके समाधान वाटत होते.
एका तृप्तीतच ते पलंगावर आडवे झाले, शेजारचा बेडलँप मालवला. जरा वेळ त्यांना पेंग आली. पण मग अचानक खडबडन जाग आल्यासारखे झाले. डोळ्यासमोर कालची ती लहान मुलगी उभी राहिली. शेतमजुराची मुलगी. अलीकडे शेतीच्या कामामुळे त्यांना खूपदा आंबेठाणला अंगारमळ्यात रात्रीही मुक्काम करावा लागे. तिथल्या त्या छोट्या तकलादू घरात. घरासमोरच्या पडवीत आपल्या शेतावर काम करणाऱ्या शेतमजुरांच्या मुलांसाठी ते रात्री सगळी कामे उरकल्यावर शिकवणी घेत. त्यांना लिहायला वाचायला शिकवत. खरेतर दिवसभराच्या श्रमांमुळे ते तोवर अगदी गळून गेलेले असत, पण तरीही ह्या मुलांनी शिकले पाहिजे असे त्यांना खूप वाटे. म्हणूनच त्यांची ही धडपड असे. त्या मुलीच्या हातात पाटी व पेन्सील होती. जोशींनी भिंतीवरच्या फळ्यावर काढलेली अक्षरे ती आपल्या पाटीवर अलगद लिहीत होती, पुन्हा पुन्हा गिरवत होती. तिची एकाग्रता, तन्मयता, शिकण्याची हौस ह्या सगळ्याचे प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. ते पाहून जोशींना अगदी गहिवरून आले. खूप वेळ ते तिच्याकडे रोखून पाहत होते.
आत्ता पुन्हा एकदा तिचा तो चेहरा त्यांच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. बघता बघता मनात विचारचक्र फिरू लागले. आंबेठाणमधले ते शेतमजुरांचे जग आणि इथले जग यांची मन तुलना करू लागले.इथली गुटगुटीत, गोरीगोमटी, नवेकोरे कपडे घातलेली, बोर्नव्हीटा-हॉर्लिक्सच्या जाहिरातीतल्यासारखी दिसणारी गोंडस मुले आणि तिथली रोगजर्जर, किडकिडीत, खरजेने भरलेली, ढगळ फाटकेतुटके कपडे घातलेली मुले.
इथली ती सेंट जोसेफसारखी भव्य शाळा आणि तिथली ती अर्धमोडल्या भिंतींची, गळकी, एकमास्तरी चावडीवरची शाळा. इथल्या शाळेतला तो मोठा थोरला स्विमिंग पूल आणि तिथल्या कोरड्या पडलेल्या विहिरी.
इथला तो शाळेसमोरचा रस्ता; विद्यापीठ चौकापासून थेट एनडीएपर्यंत गेलेला वीसएक किलोमीटरचा रस्ता. गेल्याच वर्षी केवळ एक दिवसाकरिता राष्ट्रपती येणार होते, म्हणून तो उत्तम असतानाही पुन्हा एकदा डांबर ओतून, काही लाख रुपये खर्चुन अधिक गुळगुळीत करण्यात आला होता. आणि गावातला तो दहा-बारा वर्षांपूर्वी दुष्काळाच्या वेळी श्रमदानाने बांधलेला खडीचा कच्चा रस्ता; ज्याच्यावरून चालताना घोटे बुडतील इतका चिखल प्रत्येक मोठ्या पावसानंतर हमखास साचायचा.
वाटले, पुणे आणि आंबेठाण म्हणजे जणू दोन वेगवेगळे देश आहेत – एकमेकांपासून इतके वेगळे, की त्यांच्यात काही नातेच नसावे.
स्वित्झर्लंडसारख्या अत्यंत प्रगत देशात राहून भारतात परतल्यावर आपला देश आणि तो देश यांच्यातील तफावत किती प्रचंड आहे, याची जोशींना कल्पना होतीच, पण आंबेठाणसारख्या ग्रामीण भागात गेले वर्षभर शेती केल्यानंतर, तिथली परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर, जोशींच्या लक्षात आले, की पुण्यासारखा शहरी भारत आणि तिथून अवघ्या चाळीस किलोमीटरवरचा आंबेठाणसारखा ग्रामीण भारत यांच्यातील दरी ही स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यातल्या दरीपेक्षाही कितीतरी जास्त भीषण आहे.
झेंडा एकच आहे, राष्ट्रपती एकच आहेत, राष्ट्रगीत एकच आहे - वरवरच्या खुणा सगळ्या एकच आहेत; परंतु आर्थिकदृष्ट्या ह्या देशाचे दोन भाग पडले आहेत. एक भाग हा दुसऱ्या भागाच्या शोषणावरच जगतो आहे, आणि सतत जास्तीतजास्त शोषण करत चालला आहे आणि दुसऱ्या भागाचे मात्र शोषणच होत आहे.
शोषक म्हणजे 'इंडिया' आणि शोषित म्हणजे 'भारत'.'इंडिया' आणि 'भारत' यांच्यातील या जमीनअस्मानाच्या फरकाचे मूळ कारणही त्यांच्या लक्षात आले होते. किंबहुना, ते सतत मनात सलतच होते. ते होते त्यांची आणि त्यांच्यासारख्या सर्वच शेतकऱ्यांची नुकसानीतली शेती. महिन्यापूर्वीच त्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेला कांदा विकला होता. अवघ्या २० रुपये क्विटल या भावाने. त्यांच्या चारपाच महिन्यांच्या घामाचा बाजारपेठेतला भाव तेवढाच होता-२० पैसे किलो! आणि इथल्या आजच्या समारंभात तर केवळ खाण्यापिण्यावर शंभराची नोट उडाली होती!
तसे पाहिले तर भारतातल्या आत्यंतिक विषमतेची असली मांडणी त्यांना अपरिचित नव्हती. कम्युनिस्ट विचारवंत ती वर्षानुवर्षे करत आले होते. मुंबईत मलबारहिलवर १९६५च्या सुमारास जेव्हा उषाकिरण ही भारतातील पहिली सव्वीस मजली गगनचुंबी इमारत बांधली गेली, तेव्हा ते मुंबईतच नोकरी करत होते आणि उषाकिरण बिल्डिंग आणि शेजारीच मलबारहिलच्या डोंगरउतारावर असलेल्या झोपड्या ह्यांची एकत्रित छायाचित्रे अनेक ठिकाणी प्रकाशित झालेली त्यांनी पाहिली होती. पण जोशींना त्यावेळी तो केवळ एक 'प्रचार' (प्रपोगंडा) वाटला होता. त्यानंतर कोल्हापूर येथे एक वर्ष शिकवत असताना सिडनममधले आपले सहाध्यायी आणि कोल्हापूरमधले आपले विद्यार्थी यांच्यातील फरकही त्यांनी बघितला होता. पण त्यावेळीही ते द्वंद्व त्यांच्या मनाला तितकेसे भिडले नव्हते; किंबहुना त्यांच्यात काही द्वंद्व आहे हे बुद्धीला तितकेसे पटलेही नव्हते.
याचे कारण त्यावेळी ते स्वतः त्या 'इंडिया'चाच एक भाग होते आणि जे मत आपल्याला फायदेशीर आहे, तेच मत आपोआपच मनोमन ग्राह्य मानणे आणि जे मत आपल्या हितसंबंधांना बाधा आणणारे आहे, ते दुर्लक्षित करणे हे एकूणच मनुष्यस्वभावाला धरून होते.
पण आताची परिस्थिती अगदी वेगळी होती. स्वतःच घेतलेल्या निर्णयामुळे ते पूर्वीच्या सुखासीन अशा 'इंडिया'तून दरिद्री 'भारता'त फेकले गेले होते. आपल्या आताच्या दुःखाला दुसरा कोणीतरी 'शोषक' इंडिया जबाबदार आहे, ही जाणीव त्यांच्या हृदयात काट्याप्रमाणे सलत होती. शहरात आहे तो 'त्यांचा इंडिया' आणि गावात आहे तो 'आपला भारत'.
देशातील एकूण गरिबीचे मूळ शेतकऱ्याला मिळणाऱ्या अत्यल्प भावातच आहे हेही उघडच होते. शहरात झोपड्यांमधून राहणारे ते दुर्दैवी जीव – किंवा त्यांचे पूर्वज - हेही एकेकाळी आपल्यासारखेच शेतकरी असले पाहिजेत आणि शेतीत होणारी उपासमार टाळण्यासाठी त्यांना शहरात स्थलांतर करावे लागले असले पाहिजे हेही स्पष्टच होते.
'इंडिया विरुद्ध भारत' या त्यांच्या मनात घोळू लागलेल्या द्वंद्वाला आणखीही एक महत्त्वाचा व्यक्तिगत पदर असणे शक्य होते. गेल्या दीड वर्षात पदोपदी त्यांना अगदी किरकोळ लोकांपुढे बाबापुता करावे लागले होते, अगदी क्षुल्लक कारणासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागले होते, समोरच्या माणसाशी अजिजीने बोलावे लागले होते. घर घेणे, जमीन घेणे, त्यासाठी लागणारे असंख्य कागदपत्र मिळवणे, गॅस-टेलिफोनचे कनेक्शन मिळवणे, विजेचे मीटर स्वतःच्या नावावर करून घेणे, मुलींसाठी शाळेत प्रवेश मिळवणे, त्यासाठी तहेत-हेचे दाखले मिळवणे - एक ना दोन, अशा असंख्य प्रसंगी गेल्या दीड वर्षांत त्यांच्या वाट्याला असे अपमान आले होते. आपल्या शेतातले कांदे, बटाटे, काकड्या विकण्यासाठी जेव्हा ते चाकणच्या बाजारसमितीत जात होते, तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांच्याकडून, व्यापाऱ्यांकडून, अगदी हमालांकडूनही त्यांच्या आत्मसन्मानाला प्रत्येक वेळी अशीच ठेच पोचत होती. आपल्या मालाची किंमत किंवा आपल्या श्रमाचे मूल्य हा समोरचा फालतू माणूस ठरवणार आणि ते मुकाटपणे मान्य केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, ही जाणीव त्यांचे विलक्षण संवेदनशील मन पोळणारी होती.
त्यांच्यासारख्या उच्च शासकीय सेवेत दहा वर्षे काढलेल्या व्यक्तीला ह्यातला प्रत्येक प्रसंग अगदी जिवावर धोंडा ठेवून निभवावा लागला होता. आत्मसन्मानाची अतिशय प्रखर जाणीव असलेल्या त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या दृष्टीनेतर यांतल्या प्रत्येक प्रसंगाची दाहकता अधिकच असह्य होती.
'इंडिया विरुद्ध भारत' या संकल्पनेत त्यांना उमगलेले तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब तर होतेच, पण त्यांच्या स्वतःच्या तत्कालीन मानसिक संघर्षाचे प्रतिबिंबही त्या संकल्पनेत नेमके उतरले होते. त्यात केवळ वैचारिक पातळीवरचे आकलन नव्हते; भावनांचे उत्कट गहिरेपणही होते. त्यात व्यक्तिशः आपल्या होत असलेल्या अवहेलनेचा दंशही होता; त्या 'इंडिया'वासींमुळे आपल्यासारख्या 'भारत'वासींना सोसाव्या लागणाऱ्या लाचारीविषयीचा संतापही होता.
म्हणूनच त्यांची नेहमीची हुकमी झोप आज त्यांना सोडून गेली होती. 'इंडिया विरुद्ध भारत'चे वादळ डोक्यात सतत घोंघावू लागले होते.◼
५चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी
कांद्याची महती प्राचीन काळापासून माणसाला ज्ञात आहे. कांदेनवमी अनेक ठिकाणी साजरी केली जाते: असे भाग्य अन्य कठल्या भाजीला लाभलेले नाही! कांद्याची भजी लोकप्रिय आहेत. त्याची भाजीही अनेक प्रकारे केली जाते; तो नुसताही चवीने खाल्ला जातो. विशेष म्हणजे अन्य पदार्थांची चवही तो वाढवतो. त्यामुळे देशभर सगळीकडेच रोजच्या जेवणात कांद्याचा समावेश केला जातो. पण कांद्याचे सर्वाधिक उत्पन्न मात्र महाराष्ट्रातच होते. त्यातही पुन्हा पुणे व नाशिक जिल्ह्यांत तो जास्त पिकतो. इथून मग तो देशभर पाठवला जातो.
कांदा हे बहात्तर रोगांवर औषध आहे असे म्हटले जाते. पण तो पिकवणाऱ्या शेतकऱ्यापुढे 'आता पुढे काय होणार?' हा त्याला रडवणारा प्रश्न कायम 'आ' वासून असतो. का, ते १९७७ साली शरद जोशींनी शेतीला सुरुवात केल्यानंतर लगेचच त्यांच्या लक्षात आले.
अल्पकाळासाठी लावलेला बटाटा व काकडी सोडली, तर कांदा हेच त्यांचे मुख्य पीक होते. कांद्याचे पीक तयार व्हायला साधारण पाच महिने लागतात. त्या काळातला त्याचा उत्पादनखर्च एका क्विटलला (१०० किलोंना) साधारण ४५ ते ६० रुपये असायचा, पण त्यांना बाजारपेठेत मिळणारा भाव हा कधीच तेवढा नसायचा; खपदा तर तो अगदी १५ रुपये इतका कमी असायचा. मिळणाऱ्या भावातून शेतातला कांदा तोडणे व बाजारात विक्रीसाठी नेणे हेही शक्य होत नसे. एकदा तर ते इतके निराश झाले होते, की त्यांनी 'ज्याला कांदा हवा असेल त्याने माझ्या शेतातून तो फुकट न्यावा' अशी जाहिरातही पुण्यातील एका पेपरात दिली होती! लवकरच कांद्याबद्दलच्या अनेक अडचणी त्यांच्या पूर्ण लक्षात आल्या.पहिली मोठी अडचण म्हणजे, कांदा हे नाशवंत पीक आहे. तो शेतावर दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. पैशासाठी सदैव गांजलेल्या शेतकऱ्याला तेवढा धीर धरणेही शक्य नसते. कधी एकदा तो विकला जातो व पैसे हाती येतात असे त्याला होऊन जाते. त्यामुळे येईल त्या भावाला तो कांदा विकून टाकतो.
दुसरी मोठी अडचण वाहतकीची असायची. टकमध्ये तो पोत्यातन न भरता सटा भरला जाई. कारण एका ट्रकलोडमध्ये समजा आठ टन कांदा जाणार असेल, तर एका पोत्यात ५० किलो ह्या हिशेबाने त्यासाठी १६० पोती लागतील व एका पोत्याला चार रुपये ह्या दराने तोच खर्च ६४० रुपये येणार. तो परवडत नाही म्हणून शेतकरी कांदा सुटाच भरत. त्यात नासाडी बरीच होई. डिझेलच्या भरमसाट दरवाढीमुळे एका ट्रकचे भाडे निदान हजार रुपये होते. (सर्व आकडे १९७८ सालातील.) तोही खर्च न परवडणारा. कसाबसा तो कांदा शेतातून चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नेला जाई व रस्त्याच्या कडेलाच त्याचे ढांग लावले जात.बाजार समितीचा माणूस किंवा व्यापाऱ्याचा माणूस तिथे येऊन मालाचा दर्जा तपासणार व भाव ठरवणार. हेदेखील लवकर होणे गरजेचे असे. कारण चाकण भागातला कांदा साधारण फेब्रुवारी, मार्च व एप्रिल ह्या तीन महिन्यांत विक्रीला येतो व नेमक्या ह्याच काळात तिथे वळवाचा पाऊस पडतो. दुपारी उन्ह खूप तापले आणि संध्याकाळी पाऊस पडला, असे खूपदा घडते. बाजार समितीत कांदा नेऊन टाकला, की तो खपायला जितका वेळ लागेल तितका वेळ शेतकरी सारखा वर उन्हाकडे बघतो आणि ढगांकडे बघतो. कारण दुपारी कांदा उन्हात तापला आणि संध्याकाळी त्यावर वळवाचा पाऊस पडला, तर सगळ्याच कांद्याचा चिखल व्हायची भीती असते.
तिसरी मोठी अडचण भावाच्या अनिश्चिततेची. बाजारातील कांद्याच्या भावात प्रचंड चढउतार व्हायचे. ह्यात निरक्षर शेतकऱ्याचे हमखास नुकसान व्हायचे व दलालाचा फायदा. 'शेतकरी संघटक'च्या १३ जुलै १९८४च्या अंकात प्रकाशित झालेले भगवान अहिरे नावाच्या एका बागलाणच्या शेतकऱ्याचे पत्र ह्याचे उत्तम निदर्शक आहे. ते लिहितात,
उन्हाळी कांदे विकण्यासाठी मी ते मनमाड मार्केटवर घेऊन गेलो. माझा एक ट्रक व दोन ट्रॅक्टर भरतील एवढाच माल होता. भाव मिळाला, क्विटलला ४४ रुपये. माल लवकर विकला गेला व मी मोकळा झालो ह्याचा मला आनंद झाला. त्यावेळी उत्पादनखर्च काढणे वगैरे काहीच माहिती नव्हते. पैसे घेऊन जाण्यासाठी दलालाने आठ दिवसांनी बोलावले. त्याप्रमाणे मी आठ दिवसांनी मनमाडला गेलो. त्यावेळी ८५ ते ९० रुपये भाव चालू होता. म्हणजे आठ दिवसांत तो दुप्पट झाला होता! मी अगदी नाराज झालो. वाटले, काय पाप केले होते मी! आठ दिवस थांबलो असतो तर! मला माझे शेतातले कष्ट आठवू लागले. दिवसभर उन्हात उभे राहून पाणी भरणे, ऑइल इंजिनच्या धुराड्यामुळे कपडे, शरीर काळे-पिवळे होणे. माझे कांदे तसेच त्याच्याकडे पडून होते. म्हणजे भाववाढीचा सगळा फायदा त्यालाच मिळणार होता. ४४ रुपयांनी माझ्याकडून घेतलेले तेच कांदे, फक्त आठ दिवसांत, दुप्पट पैसे घेऊन तो विकणार होता. जणू मी त्याच्यासाठीच सगळे कष्ट घेतले होते!
चौथी मोठी अडचण केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाची होती. परदेशात, विशेषतः आखाती देशांत, भारतीय कांद्याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे जेव्हा निर्यात खुली केली जाते, तेव्हा कांद्याचे भाव एकदम चढतात. त्यात शेतकऱ्याला अधिक भाव मिळू शकतो; पण तसे झाले तर स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकाला जास्त पैसे मोजावे लागतात. त्याबरोबर तो शहरी ग्राहक खवळून उठतो. विरोधी पक्षांची सर्वांत जास्त आंदोलने शेतीमालाच्या भाववाढीच्या मुद्द्यावरून होतात. टूथपेस्टपासून मोटारीपर्यंत आणि शर्टापासून पेट्रोलपर्यंत बाकी सगळ्या गोष्टी महाग झाल्या तरी कुरकुर न करणाऱ्या शहरी लोकांना शेतीमालाची भाववाढ मात्र अजिबात सहन होत नाही, लगेच त्याविरुद्ध काहूर उठवले जाते. त्यामुळे शेतीमालाची भाववाढ होऊ नये यासाठी सरकार नेहमीच दक्ष असते. म्हणूनच कांदा हे राजकीयदृष्ट्या तसे खुप संवेदनशील पीक आहे. शहरातून आरडाओरड सुरू झाली, पेपरांतून टीका सुरू झाली, की सरकार घाईघाईने निर्यातबंदी करते. त्यामुळे मग भाव एकदम कोसळतात. शेतकऱ्याला उत्पादनखर्च भरून निघेल एवढाही भाव मिळत नाही. तसे पाहिले तर शहरी ग्राहकांची संख्या शेतकऱ्यांपेक्षा कमी असते, पण त्यांचे उपद्रवमूल्य खूप असते. ते सुशिक्षित असल्याने आपला विरोध लगेचच व्यक्त करतात. राज्यकर्ते व नोकरशहा, पत्रकार व विचारवंत वगैरे मंडळीही बहुतांशी शहरातच राहत असतात. त्यांच्यापर्यंत ग्राहकाचा असंतोष तत्काळ पोचतो. दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीच्या बाबतीत तर हे अधिकच खरे आहे. दिल्लीतल्या बारीकशा घडामोडीचीही दखल शासनाला प्राधान्याने घ्यावी लागते कारण त्या घटनेचे पडसाद देशभर उमटत असतात.
याउलट शेतकरी सगळा ग्रामीण भागात असतो. सरकारी धोरणामुळे त्याला प्रचंड त्रास झाला तरी जे होईल ते सहन करायची त्याची एक सवयच असते; गैरसोयी त्याच्या अंगवळणीच पडलेल्या असतात. त्यातून त्याने कधी असंतोष व्यक्त केला तरी त्याचा आवाज इतका क्षीण असतो, की राजधानीपर्यंत तो पोचतच नाही! कांद्याच्या बाबतीत जोशींना हे वरचेवर जाणवायचे.
ह्याबाबतचा एक विदारक आणि हृदयाला हात घालणारा पुढील अनुभव आपल्या भाषणात जोशी सुरुवातीच्या दिवसांत खूपदा सांगत असत.१९७८ साली पावसाळ्यात दिल्लीच्या भाजी मंडीत प्रथमच कांद्याचा भाव सव्वा रुपया किलो झाला. कांद्यावर लगेचच निर्यातबंदी घालण्यात आली. ताबडतोब चाकणच्या बाजारात कांद्याचा भाव क्विटलला १७ रुपयापर्यंत घसरला. त्यावेळी चाकणच्या बाजारात घडलेलं एक उदाहरण सांगतो.
एका शेतकऱ्याकडे चार गाड्या कांदा निघाला होता. आदल्या वर्षी त्याचं कांद्याचं पीक धुईमुळे संपूर्ण बुडालं होतं. पीक बुडाल्यामुळे त्याला बायकोला लुगडं घेता आलं नव्हतं. तो कांद्याच्या गाड्या घेऊन बाजाराला निघाला, तेव्हा बायकोनं सांगितलं, 'माझ्या लुगड्याच्या पार दशा झाल्या आहेत. तर येताना फार खर्चाचं नको, पण एक धडसं लुगडं आणा. आणि पोराची चड्डी फाटली आहे; त्याला मास्तर वर्गात बसू देत नाही, म्हणून घरी पळून येतो. त्याला एक चड्डी आणा.' शेतकऱ्याने चार बैलगाड्या भरून कांदा बाजारात नेला. पण १७ पैसे किलोने कांदा विकून झाल्यावर व मग कर्ज, हमाली, दलाली वगैरे देऊन झाल्यावर त्याच्या असं लक्षात आलं, की यंदाही काही बायकोला लुगडं घेता यायचं नाही. आणि पोराला चड्डी घेता यायची नाही. तो तसाच घरी गेला. त्याचा चेहरा पाहिल्यावर बायकोच्या लक्षात सगळी परिस्थिती आली. तीच त्याला म्हणाली, 'जाऊन द्या, काही वाईट वाटून घेऊ नका. काढीन एवढ्याच लुगड्यावर आणखी एक वर्ष.' दिल्लीत जी माणसं सात रुपयाचं सिनेमा तिकीट वेळ आल्यास पंचवीस रुपयांनादेखील खरेदी करतात, ती माणसं त्यांच्या जेवण्यातला कांदा सव्वा रुपये झाला, की लगेच आरडाओरडा करतात. आणि त्यांना ती भाववाढ टोचू नये, म्हणून शेतकऱ्याच्या घरी काय परिस्थिती असेल याचा जराही विचार न करता सरकार निर्यातबंदी घालतं. (शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती, पृष्ठ ५०-१, पहिली आवृत्ती, नोव्हेंबर १९८२)
कांद्याचे पीक शेतकऱ्याच्या हाती आले, की निर्यातीवर बंदी घालायची, जेणेकरून शेतकऱ्याला मिळणारा भाव कमीत कमी असेल व व्यापाऱ्यांना तो अगदी स्वस्तात खरेदी करता येईल आणि व्यापाऱ्यांची खरेदी संपली, कांदा त्यांच्या गोदामात गेला, की निर्यातबंदी उठवायची; जेणेकरून तोच कमी भावात घेतलेला कांदा आता व्यापाऱ्यांना वाढीव भावात विकता येईल. १९७८, १९७९, १९८० ह्या तिन्ही वर्षांत हे घडले.
बऱ्याच वर्षांनंतर, म्हणजे सुमारे २०१४ साली, एका मुलाखतीत जोशींनी ह्या संदर्भात म्हटले होते.
"कांद्याचा भाव जेव्हा पुण्यात डेक्कन जिमखान्यावर एक रुपया किलो होता, तेव्हा तिथे सिनेमाचे तिकीट एक रुपया होते. आज सिनेमाचे तिकीट किमान शंभर रुपये झाले आहे व तरीही लोक ते तिकीट बिनदिक्कत खरेदी करतातच. मग कांद्याचा भाव १०० रुपये किलो झाला, तर एवढा आरडाओरडा करायचे काय कारण आहे?"ह्या सततच्या समस्येचा दोन वर्षे अभ्यास केल्यावर व अनेक कटू अनुभव पदरी जमा झाल्यावर जोशींनी कांद्याला उत्पादनखर्चावर आधारित क्विटलला किमान ४५ ते ६० रुपये भाव मिळालाच पाहिजे असे सर्व शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात केली. जवळ जवळ रोजच ते चाकणच्या बाजारपेठेत जात. जमेल तेवढ्या शेतकऱ्यांशी संपर्क साधत. त्यांना मानणारे काही व्यावसायिक संबंधित होते, ज्यांच्याबद्दल मागील प्रकरणात लिहिलेच आहे. शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात त्या मंडळींचा उपयोग व्हायचाच. पण त्याशिवाय केवळ कांदा आंदोलनामुळे जोडले गेलेले असेही त्यांचे दोन स्थानिक सहकारी होते. एकेकाळी चाकणचे सरपंच राहिलेले व दुकानदारीसह अनेक व्यवसाय केलेले शंकरराव वाघ आणि कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले व गावात छापखाना चालवणारे बाबूलाल परदेशी. वाघ, परदेशी आणि जोशी अशा या त्रिकुटाने भामनेर खोऱ्यात असंख्य वेळा एकत्र प्रवास केला. आधी एखादा सहकारी बॅटरीवर चालणाऱ्या लाउडस्पीकरवर निवेदन करायचा, 'जगप्रसिद्ध शेतकरी नेते श्री. शरद जोशी आज आपल्या गावात आले आहेत व शेतीप्रश्नावर बोलणार आहेत. तरी सर्व गावकऱ्यांनी त्यांच्या भाषणाचा फायदा घ्यावा' अशा स्वरूपाचे ते निवेदन असे. गावभर फिरून ते पुन्हा पुन्हा ऐकवले जाई. हळूहळू गर्दी जमू लागे. आधी बाकीचे बोलत व पुरेशी गर्दी जमली, की जोशी बोलायला उभे राहत. हा प्रकार त्यांनी सातत्याने वर्षभर शे-दीडशे ठिकाणी तरी केला. त्यावेळी कांद्याचा भाव पार कोसळला होता; अगदी क्विटलला २०-२५ रुपयांपर्यंत.
आता आपले काही खरे नाही याची जाणीव सर्वच कांदा शेतकऱ्यांना झाली. चाकण बाजारसमितीसमोर जोशींनी शेतकऱ्यांचा एक मेळावा घेतला व एकूण परिस्थिती सगळ्यांना समजावून सांगितली. कांद्याला क्विटलमागे ४५ ते ६० रुपये भाव मिळालाच पाहिजे हे जोशींचे म्हणणे सगळ्यांनाच पटले व ती मागणी समोर ठेवून त्यांनी चाकणच्या बाजारपेठेत त्वेषाने घोषणा द्यायला सुरुवात केली. हे पहिले कांदा आंदोलन, शनिवार २५ मार्च १९७८ची ही घटना.
हे भाव त्यावेळी इतके पडले होते, याचे कारण म्हणजे केंद्र सरकारचे धोरण. मोहन धारिया त्यावेळी केंद्रात व्यापारमंत्री होते. कांद्याच्या भाववाढीमुळे असंतोष पसरतो आहे हे लक्षात घेऊन १९७७ साली कामाची सूत्रे हाती घेतल्याघेतल्याच त्यांनी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली व त्यामुळे एकाएकी कांद्याचे भाव कोसळले. शेतकऱ्यांची दैना उडाली. उत्पादनखर्च तर सोडाच, कांदा शेतातून काढणे व बाजारात आणणे यातला मजुरीचा व वाहतुकीचा खर्चही भरून निघेना. 'या भावात कुठल्याही परिस्थितीत कांदा विकायचा नाही' असे आवाहन जोशींनी केले. चिडलेल्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. आपला कांदा त्यांनी बाजारात आणलाच नाही. बाजारपेठ ओस पडली. सरकारने ४५ ते ६० रुपये क्विटल हा वाढीव भाव बांधून दिला नाही, तर एक एप्रिलपासून शेतकरी रास्ता रोको करतील' असा इशारा लागोपाठ तीन दिवस भरलेल्या शेतकरी मेळाव्यांत तीन वेळा जोशींनी दिला.
चाकणला काहीतरी गडबड होणार आहे, ह्याची साधारण पूर्वकल्पना स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी कलेक्टरना दिली होती. चर्चेसाठी २९ मार्च रोजी दुपारी कलेक्टरनी एक तातडीची बैठक बोलावली. आपल्या काही साथीदारांसह जोशी पुण्याला कलेक्टरच्या कार्यालयात गेले. चाकणमधले वेगवेगळे राजकीय पक्षांचे पुढारी व बाजारसमितीचे पदाधिकारी पूर्वीच कार्यालयात येऊन पोचले होते. सगळ्या खुर्ध्या त्यांनीच अडवल्या होत्या. जोशींना बसायलाच कुठली खुर्ची रिकामी नव्हती. सगळ्यांचे म्हणणे मांडून झाल्यावर शंकरराव वाघ यांनी जोशीसाहेबांनी आता बोलावे' अशी जाहीर घोषणा केली. तोपर्यंत जोशी नुसतेच एका कोपऱ्यात उभे राहून सगळे ऐकत होते.
सगळ्या माना चपापून त्यांच्या दिशने वळल्या. कलेक्टरही काहीसे गडबडल्यासारखे झाले. जोशींच्या पार्श्वभूमीची त्यांना थोडीफार कल्पना होती. जरासे उठल्यासारखे करत जोशींसाठी व त्यांच्या दोन सहकाऱ्यांसाठी त्यांनी खुर्च्या मागवल्या. जोशींनी मग पुढे सर्वांसमोर येऊन उभ्याने बोलायला सुरुवात केली. इतका वेळ ज्यांनी त्यांना अनुल्लेखाने मारले होते ते इतर नेतेही आता कान टवकारून त्यांचे म्हणणे ऐकू लागले. कलेक्टर स्वतःच जोशींना इतके महत्त्व देतो आहे म्हटल्यावर त्यांचाही नाइलाज होता!
"माल जेव्हा शेतकऱ्याच्या हाती येतो व मालाला मागणी असल्याने शेतकऱ्याला चार पैसे अधिक मिळायची शक्यता असते, तेव्हाच निर्यातबंदी करून भाव पाडायचे, आणि माल व्यापाऱ्याकडे गेला, की मात्र निर्यात खुली करून टाकायची, हे सरकारी धोरण शेतकऱ्याच्या जिवावर उठलं आहे. ते बदललंच पाहिजे," हे जोशींचे मुख्य प्रतिपादन होते. ते त्यांनी अनेक उदाहरणे देऊन उत्तम प्रकारे सिद्ध केले. शेवटी ते म्हणाले, “दुष्काळ पडला, की जे सरकार स्वत:च ठरवलेल्या अत्यल्प भावात शेतकऱ्याकडचा शेतीमाल लेव्हीच्या स्वरूपात जबरदस्तीने काढून घेतं, ते सरकार अशा अडचणीच्या वेळी शेतकऱ्याच्या मदतीला का येत नाही? फायदा बाजूला राहू द्या, पण त्याचा उत्पादनखर्च तरी भरून निघेल एवढा भाव सरकार त्याला का मिळवून देत नाही? शेतकऱ्याने जगावं असं सरकारला वाटत नाही का?"
काही क्षण कार्यालयात सगळे स्तब्ध होते. आपली भूमिका सरकारपुढे जाहीररीत्या मांडणारे जोशींचे हे आयुष्यातील पहिले प्रतिपादन, स्वतः कलेक्टरनी त्यांचे जवळ जवळ दहा मिनिटांचे भाषण लक्षपूर्वक ऐकले. मग स्वतःच पुढाकार घेऊन कांद्यासाठी वाढीव दराची शिफारस करायचे त्यांनी कबल केले व त्याच दिवशी तसे प्रत्यक्षात केलेही. शेवटी सरकारने नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India) या शासकीय संस्थेला ४५ ते ५० रुपये क्विटल या भावाने कांदा खरेदी करायचा तातडीचा आदेश दिला. त्यानंतरच बाजारपेठेत नाफेडकडे आपला कांदा द्यायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारे 'रास्ता रोको'च्या नुसत्या इशाऱ्याने व जोशी यांनी आपली बाजू कलेक्टरकडे प्रभावीपणे मांडल्याने काम झाले; प्रत्यक्ष संघर्ष असा या वेळी करावा लागला नाही.
ह्या प्रसंगानंतर राजकीय नेते जोशींना अगदी पाण्यात पाहू लागले. आजवर ह्या आंदोलनापासून ते कटाक्षाने दूर राहिले होते. किंबहुना जोशींची त्यांनी कुचेष्टाच केली होती. कदाचित असले शेतकऱ्यांचे आंदोलन कधीच यशस्वी होणार नाही अशी त्यांची अटकळ होती. शिवाय, ज्यात आपले नेतृत्व नाही, ज्याचे श्रेय आपल्याला मिळणार नाही, अशा आंदोलनात सहभागी होण्यात कुठल्याच राजकारण्याला स्वारस्य नव्हते. त्यांनी आजवर फक्त मतांसाठी व गर्दी जमवण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर केला होता. जोशींचा विजय हा त्यांना स्वतःचा पराजय वाटला.
राजकारण्यांप्रमाणेच व्यापाऱ्यांनाही मिळालेला हा मोठाच धक्का होता. त्यापूर्वी कधीच नाफेडने कांदाखरेदी केली नव्हती; कांद्याचा सर्व व्यापार खासगी व्यापाऱ्यांच्याच हातात होता.
शेतकऱ्यांचे हे यश खूप मोठे होते. आपल्या ताकदीचा त्यांना आलेला हा पहिला प्रत्यय होता. या आंदोलनाचा एक परिणाम म्हणून २५ एप्रिल १९७८ रोजी केंद्र सरकारने निर्यातबंदी रद्द केली. चाकणसारख्या छोट्या गावातील आंदोलनाची थेट दिल्लीने दखल घेतली होती. एक दुर्दैव म्हणजे, महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी मात्र ह्या शेतकरीविजयाला काहीच महत्त्व दिले नाही. बहुतेक ठिकाणी ही बातमीसुद्धा छापून आली नाही.प्रत्यक्ष आंदोलन संपल्यावरही आणि नाफेडमार्फत वाढीव दराने कांदा खरेदी करायचे नक्की झाल्यावरही, नेमक्या त्याच दराने खरेदी होते आहे, का त्यापेक्षा कमी दर शेतकऱ्याला दिला जात आहे, हे तपासण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज हजर असणे आवश्यक होते.
इथे शहरी वाचकाच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या व्यवस्थेबद्दल थोडे लिहायला हवे. बाजारपेठ हा शब्द तसा खूप व्यापक आहे; त्यातील शेतकऱ्याशी सर्वाधिक संबंध येणारा विशिष्ट भाग म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती. शेती हा जगातला सगळ्यांत पहिला व्यवसाय असल्याने शेतीचा व्यापार हाही अगदी पहिल्यापासून सुरू झालेला व्यवहार आहे. शतकानुशतके हा व्यापार खासगी क्षेत्रातच चालू होता. हे व्यापारी अनेक प्रकारे अशिक्षित व गरीब शेतकऱ्यांना फसवत असत. त्या फसवणुकीला आळा बसावा म्हणून पुढे शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन केल्या. अशा समित्या देशभर सगळ्याच राज्यांत आहेत. महाराष्ट्रात सुमारे ३०० आहेत. जिल्हापरिषदा, ग्रामपंचायती, वेगवेगळ्या सहकारी संस्था वगैरेंप्रमाणे या बाजार सामित्यांचेही नियंत्रण लोकनियुक्त सदस्य करतात. प्रत्यक्षात मात्र अन्य ठिकाणी होते तेच इथेही होते. सर्व समाजाच्या नावाखाली प्रत्यक्षात काही मूठभर मंडळीच सगळी सूत्रे आपल्या हाती ठेवतात. सरकारी कायद्यानुसार शेतीमालाचा सर्व व्यापार ह्या समित्यांमध्येच होऊ शकतो; आपला माल इतर कुठेही वा कोणालाही विकायचे स्वातंत्र्य शेतकऱ्याला नसते. पुन्हा कुठलाही व्यापारी बाजार समित्यांमध्ये येऊन खरेदी-विक्री करू शकत नाही; त्यासाठी बाजार समितीकडून विशिष्ट परवाना घ्यावा लागतो व परवानाधारक व्यापाऱ्यांनाच इथे प्रवेश करता येतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या नाड्या या समितीच्या हातात असतात तसेच व्यापाऱ्यांच्या नाड्याही. साहजिकच या समित्यांच्या हाती प्रचंड सत्ता एकवटलेली असते. उद्योगक्षेत्रावरील सरकारी बंधनांची सर्वसामान्य नागरिकालाही बऱ्यापैकी माहिती असते, त्यांतून तयार झालेल्या लायसन्स-परमिट राजवर भरपूर चर्चाही होत असते; पण त्याहूनही कितीतरी अधिक जाचक बंधने शेतीक्षेत्रावर आहेत व यांची काहीच चर्चा शहरी वर्गात होत नाही.
चांगल्या उद्देशाने सुरू झालेल्या असंख्य सरकारी योजनांप्रमाणे या बाजार समित्यांनाही काळाच्या ओघात शोषणकर्त्यांचे विकृत स्वरूप प्राप्त झाले. आजारापेक्षा औषध अधिक घातक ठरले. सर्व शेतीमालाच्या व्यापारात त्यांची एकाधिकारशाही (मोनोपॉली) असल्याने, कोणाचीच स्पर्धा नसल्याने, आपण काहीही केले तरी शेतकऱ्याला आपल्याकडे येण्याशिवाय काही पर्यायच नाही हे त्यांना ठाऊक होते. इथे होणाऱ्या प्रत्येक खरेदी-विक्रीवर बाजार समिती स्वतःचा कर लावते व त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी माल ठेवायला मोकळी जागा, तो साठवायला गुदामे, शीतगृहे, पुरेसे वाहनतळ, अचूक वजनकाटे, बसायची-जेवायची सोय, स्वच्छतागृहे, प्रत्यक्ष व्यापारासाठी प्रशस्त जागा, मालाच्या कुठल्या ढिगासाठी कुठल्या व्यापाऱ्याने किती रुपयांची बोली लावली आहे याची नेमकी नोंद ठेवणारी यंत्रणा, संगणक वगैरे सुविधा, विकल्या गेलेल्या मालाचा त्वरित हिशेब होऊन शेतकऱ्याच्या हाती त्याचे पैसे द्यायची व्यवस्था वगैरे सोयी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात अशी मुळात योजना होती.
प्रत्यक्षात यातले फारसे काही झाले नाही. फक्त सरकारी जमिनीवर, सरकारी पैशाने मोठी मोठी मार्केट यार्ड्स उभी राहिली, तिथे समिती सदस्यांची सुसज्ज कार्यालये तयार झाली आणि शेतकऱ्याचे हित सांभाळले जाण्याऐवजी त्याचे अधिकाधिक शोषण करणारी एक साखळीच तयार झाली. आर्थिक गैरव्यवहार प्रचंड प्रमाणावर होऊ लागला. सगळा मनमानीचा कारभार. समितीसदस्यांशी संगनमत करून व्यापारी आपला स्वार्थ साधू लागले. आलेल्या शेतीमालाचे वजन करणारे मापारी, तो माल इकडून तिकडे हलवणारे हमाल, मालाची गुणवत्ता ठरवणारे निरीक्षक, पैशाचा हिशेब ठेवणारे कर्मचारी हे सगळेच शेतकऱ्याला नाडू लागले. एकाधिकारशाहीमुळे लाचार बनलेल्या शेतकऱ्यापुढे त्यांची मर्जी राखल्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता.
ह्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणावी म्हणून बऱ्याच नंतर, म्हणजे २००४ साली, राज्य सरकारने एक तज्ज्ञांची समिती नेमून विस्तृत अहवाल तयार करवला. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी झालीच नाही. कारण बाजार समिती सदस्यांच्या हितसंबंधांना आळा घालणे व त्यातून त्यांना दुखावणे हे कोणालाच परवडणारे नव्हते. शेवटी सत्तेवरील राजकीय पक्षाला निवडणुका जिंकणे आवश्यक होते व या निवडणुकांवर स्थानिक बाजार समिती सदस्यांची पकड असायची; बहुतेकदा ते सगळे सत्ताधारी पक्षाचेच असत. एकगठ्ठा मते त्यांच्या हाती असत. अगदी कालपरवापर्यंत कुठलेच सरकार त्यामुळे या बाजार समित्यांना धक्का लावू शकले नव्हते. अगदी अलीकडे, म्हणजे २०१६ साली, प्रथमच राज्य सरकारने ह्या बाजार समित्यांची एकाधिकारशाही बंद केली. म्हणजे या समित्या बरखास्त केल्या गेल्या नाहीत, पण इथेच मालाची खरेदी-विक्री झाली पाहिजे ही अट काढून टाकून खासगी क्षेत्रासाठीही आता हा व्यापार खुला करण्यात आला आहे. याचा काय परिणाम होतो ते कळायला अजून काही कालावधी जावा लागेल. असो.जोशी व त्यांचे सहकारी रोज सकाळी या बाजार समितीत येत असत. नाफेडच्या खरेदीबरोबरच सर्व बाजारात फिरून एकूण व्यवहारावर लक्ष ठेवत. नाफेडची खरेदी होत असली तरी त्यावेळी इतर व्यापारीदेखील आपापली खरेदी चालूच ठेवत. त्यांचेही अनेक शेतकऱ्यांशी जुने संबंध असत, ते नाते टिकवून ठेवणे शेतकऱ्यांच्यादेखील फायद्याचे असे. कारण हेच व्यापारी वेळप्रसंगी शेतकऱ्याला कर्जदेखील देत असत. प्रत्येक शेतकऱ्याला अशा कर्जाचीदेखील कायम गरज असे. अशा व्यापाऱ्यांकडूनदेखील खरेदी नियत दरातच होणे आवश्यक होते. शिवाय, मालाचा दर्जा नीट तपासला जातो आहे की नाही ह्याकडेही लक्ष ठेवावे लागे. इतर कुठल्याही मालाप्रमाणे कांद्याच्या बाबतीतही गुणवत्तेनुसार दर कमी-जास्त होत असत. कांद्याचे पुरुष-पुरुष उंचीचे ढीग यार्डाच्या बाहेरही रस्त्याकडेला रचलेले असत. त्यांच्यामधून वाट काढत पुढे जावे लागे. एखाद्या वेळी भाव घसरले आणि लिलावात कोणी अधिकची बोली लावायलाच तयार होत नसेल, तर अशावेळी मग एखादा शेतकरी स्वतःच जोशींकडे येई. त्यांची मदत घेई. यातूनच मग एखाद्या कायमस्वरूपी संघटनेची गरज सर्वांना पटू लागली.
या गरजेपोटीच मग १९७९ सालच्या क्रांतिदिनी, म्हणजे ८ ऑगस्ट रोजी, शेतकरी संघटना स्थापन करण्यात आली. चाकण बाजारपेठेसमोरच एक तकलादू ऑफिस थाटले गेले. बाबूलाल यांच्या छापखान्यातच, जागा अगदी छोटी असली तरी मोक्याच्या जागी होती. दोन टेबले, चार खुर्त्या आणि दोन बाकडी मावत होती. दारावरच शेतकरी संघटना' अशी पाटी लावली होती. त्या नावाने लेटरहेड छापून घेतली.
बाजारपेठेचे गाव परिसरातील शेतकऱ्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. बहुतेक ठिकाणी 'आठवडी बाजार' भरतो व कुठलाही शेतकरी त्याला येतोच येतो. त्याचवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात जाऊन शेतीमालाचे प्रत्यक्षात काय भाव सुरू आहेत हे बघतो. त्याला स्वतःच्या कुटुंबासाठीदेखील अनेक गोष्टींची खरेदी करायची असते. आज इंटरनेट व संगणक आल्यामुळे ही परिस्थिती निदान काही प्रगत शेतकऱ्यांसाठी तरी पालटली आहे; जगभरातले बाजारभाव शेतकरी आपल्या घरी बसल्याबसल्या शोधू शकतो; पण १९७९ सालची परिस्थिती फार वेगळी होती.
संघटना उभारण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याशी संपर्क साधायचा असेल तर बाजाराच्या गावी त्याला गाठणे हा एकमेव मार्ग होता. बाजाराच्या दिवशी तिथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने आपले काम संपल्यावर थोडा वेळ तरी संघटनेच्या ऑफिसात डोकवावे, आपल्या गाहाण्यांची चर्चा करावी ही अपेक्षा असायची. फक्त शेतीविषयक चर्चा नाही, तर एकूणच विकासविषयक चर्चा करण्यासाठी. अशा चर्चेतून शेतकऱ्यांशी जवळीक साधणे, आपल्यापुढील समस्यांची त्यांना जाणीव करून देणे, त्या सोडवण्यासाठी त्यांना एकत्र आणणे हा संघटनेमागचा मुख्य उद्देश.
स्वतः शरद जोशी रोज ऑफिसात येऊन बसत. आपल्या स्वतःच्या शेतीकडे आता ते कमी कमी लक्ष देऊ लागले होते. शेती करणे हा जोशींच्या दृष्टीने एक प्रयोग होता व तो करताना त्यांच्यासमोर काही सुस्पष्ट उद्दिष्टे होती. दोन तृतीयांश भारतीय शेती करतात व साहजिकच भारताच्या दारिद्र्याचे मूळ शेतीत आहे हे त्यांना पटले होते; पण ती शेती किफायतशीर का होत नाही हे त्यांना शोधून काढायचे होते. ती किफायतशीर न व्हायची काही कारणे अनेकांनी वेळोवेळी मांडली होती. उदाहरणार्थ, शेतीचे क्षेत्र कमी असणे. भांडवलाची कमतरता. पुरेसे पाणी उपलब्ध नसणे. चांगल्या अवजारांचा अभाव. खते, औषधे व प्रगत बियाणे यांचा पुरेसा वापर न करणे. आणि मुख्य म्हणजे शेतकरी अशिक्षित असल्याने आधुनिक व्यवस्थापनतंत्रांचा व तंत्रज्ञानाचा त्याला फायदा न मिळणे. स्वतःच्या शेतीत त्यांनी ह्यातील प्रत्येक अडचणीला उत्तर उपलब्ध करून दिले होते. त्यांचे शेतीचे क्षेत्र पुरेसे होते, भांडवल भरपूर गुंतवले होते, विहिरींचे पाणी होते, अवजारे-खते-बियाणे इत्यादी सर्व आधुनिक गोष्टींचा वापर त्यांनी केला होता.
पण हे सगळे करूनही त्यांची शेती किफायतशीर नव्हती. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपण जे-जे काही पिकवतो त्याला बाजारात मिळणारा भाव इतका कमालांचा अपुरा आहे, की त्यातून ही शेती किफायतशीर होणे कधीच शक्य नाही, आणि परिस्थिती अशी आहे हा केवळ एखादा अपघात नसून, देशाने स्वीकारलेल्या अत्यंत चुकीच्या व शेतीला मारक अशा तथाकथित सोव्हिएत धर्तीच्या समाजवादी धोरणाचा तो परिणाम आहे; त्या विकृत व्यवस्थेत देशातील अभिजनवर्गाचे हित गुंतलेले आहे व म्हणूनच ते धोरण चालू राहिले आहे, ह्या निष्कर्षाप्रत आता जोशी आले होते. खंडीभर भले थोरले ग्रंथ वाचून आणि असंख्य परिसंवादांत भाग घेऊन जे सत्य कधीच उमजले नसते, ते आता त्यांना अनुभवांतून नेमके उमजले होते. ही भ्रष्ट यंत्रणा बदलण्यासाठी लढा उभारायचा त्यांनी पक्का निर्धार केला होता. म्हणूनच जवळ जवळ सगळा वेळ संघटना उभारण्यासाठीच द्यायचा असे त्यांनी ठरवले होते.
परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून कसलाच प्रतिसाद मिळेना. दिवसभर जोशी आणि त्यांचे काही निवडक सहकारी अगदी आतुरतेने इतर कोणी शेतकरी बांधव येतात का, याची वाट पाहत असत. पण फारसे कोणी येतच नसत. त्यातूनही कोणी आलेच तरी ते खूप घाईत असायचे, चाकणमधली आपली इतर कामे करता करता ते केवळ 'शेतकरी संघटना हा प्रकार तरी काय आहे?' एवढे बघण्यापुरतेच डोकावून जायचे; नंतर पुन्हा ते तोंड दाखवत नसत. संघटना बांधणे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसे. कधीकधी तासन्तास तिथे बसून वेळ अगदी फुकट गेला असे जोशींना वाटायचे. शेतकऱ्यांना एकत्र आणणे फारच अवघड आहे; त्यामानाने कामगारांची एकजूट उभारणे तुलनेने सोपे असते, असे कार्ल मार्क्स म्हणाला होता ते जोशींना अशा वेळी आठवू लागे.
शेवटी मग पर्वत महमदाकडे आला नाही, तर महमदाने पर्वताकडे जावे, ह्या न्यायाने, शेतकरी कार्यालयात यायची वाट न बघता पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा आपणच स्वतः गावोगावी जायचे, त्यांना भेटायचे, आपल्यावरील अन्यायाची त्यांना जाणीव करून द्यायची, त्याच्या निवारणार्थ एकत्र येण्यातले फायदे त्यांना पटवायचे व संघटनेचा प्रसार करायचा असे त्यांनी ठरवले. त्या दृष्टीने सकाळी थोडा वेळ ऑफिस व नंतर दिवसभर भटकंती हा प्रकार सुरू झाला.
सुरुवातीपासून आंदोलनात असलेले चाकणजवळच्या म्हाळुगे गावचे श्याम पवार म्हणतात,
"संघटनाबांधणीच्या सुरुवातीच्या त्या काळात जोशी आपल्याजवळचे तीन-चार सहकारी घेऊन भामनेर खोऱ्यातील एखाद्या गावात जात. आमच्यासोबतच झाडाखाली बसून पिठलं, भाकरी, कांदा खात. कधी आम्हाला एखाद्या धाब्यावर घेऊन जात. बिल तेच देत. कधी जीपने येत, पण कधी रस्ता नसला तर बरेच अंतर पायीदेखील जावे लागे. त्यासाठी स्थानिक जत्रा, यात्रा किंवा बाजाराचा दिवस ते पकडत. बरोबरचे सहकारी पारावर किंवा देवळाशेजारी गाणी वा पोवाडे म्हणू लागत. थोडेफार लोक जमले, की जोशी बोलायला सुरुवात करत. शेतकऱ्यांच्या समस्या कुठल्या आहेत, त्यावर काय इलाज करता येईल वगैरे विचार मांडत. एक अनाकलनीय ऊर्जा जणू या कामासाठी त्यांना प्रवृत्त करत असावी. शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढायचा, ह्या पहिल्या धड्यापासून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय घडामोडींचा शेतकऱ्यावर काय परिणाम राहील इथपर्यंत अनेक मूलभूत मुद्दे ते मांडत. अगदी सोप्या भाषेत बोलत."पण अशा फिरण्यालाही अंत होता. अख्खा जन्म जरी असे फिरण्यात घालवला तरी हजारभर शेतकऱ्यांच्या पलीकडे आपण पोचू शकणार नाही हे उघड होते. काय करावे याचा विचार करत असतानाच संघटनेचे एक साप्ताहिक काढावे ही कल्पना पुढे आली. त्याचबरोबर साप्ताहिकाचे नाव काय ठेवायचे, ते रजिस्टर कुठून करून घ्यायचे, साप्ताहिकासाठी कुठून कुठून परवाने घ्यावे लागतात, टपालखात्याची परवानगी कशी मिळवायची, प्रत्यक्ष छपाई कोण करणार, कागद कुठून मिळवायचा, एकूण खर्च किती येतो वगैरे अनेक प्रश्न उभे राहिले. ही साधारण ऑक्टोबर १९७९मधली गोष्ट आहे.
अशा वेळी बाबूलाल परदेशी मोठ्या धडाडीने पुढे झाले. ते वारकरी पंथाचे होते व कीर्तनेही करायचे. ते म्हणाले,
"मला स्वतःला भक्तिमार्गाचा प्रचार करण्यासाठी एक साप्ताहिक काढायचं आहे व त्यासाठी मी वारकरी हे नाव दिल्लीहून मंजूर करून घेतलं आहे. तुम्ही म्हणालात तर तेच आपण संघटनेचं मुखपत्र म्हणून सुरू करू शकतो. माझा स्वतःचा छापखाना आहे. मनात आणलं तर दोन-तीन आठवड्यातच आपण ते सुरू करू शकू."
सुरुवातीला जोशींना ह्या प्रस्तावाबद्दल जरा साशंकता होती. मुख्यतः नावाबद्दल. त्यांच्या मनातील लढाऊ अशा शेतकरी संघटनेचे मुखपत्र म्हणायचे आणि नाव मात्र वारकरी, हे खूप विसंगत वाटत होते. पण दुसरे कुठले नाव मंजूर करून घायचे म्हणजे त्यात पाच-सहा महिने सहज जाणार होते. तेवढा वेळ आता त्यांच्यापाशी नव्हता. भामनेरच्या रस्त्यासाठी एक मोठे आंदोलन उभारायचा गेले काही महिने ते प्रयत्न करत होते. फेब्रुवारी महिन्यात सुरू होणाऱ्या पुढच्या हंगामात कांदाप्रश्नही पुन्हा एकदा भडकणार हे उघड दिसत होते. आता अधिक न थांबता आहे ते वारकरी नाव घेऊनच साप्ताहिक काढणे श्रेयस्कर होते. त्यानुसार मग त्यांनी साप्ताहिकाची कसून तयारी सुरू केली. कुणाचीतरी ओळख काढून पुण्यातील एका दैनिकाकडून कागद मिळवला, मजकूर तयार केला आणि लवकरच वारकरीचा पहिला अंक छापून तयार झाला. तो शनिवार होता व अंकावरची तारीख होती ३ नोव्हेंबर १९७९.
पहिल्या अंकाच्या पहिल्या पानावर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे चित्र छापले होते. खालच्या भागात संत रामदासांचे चित्रही आहे. कारण या तिघांचे ब्लॉक्स छापखान्यात तयारच होते! 'ओम नमो जी आद्या' या ज्ञानेश्वरीतील पहिल्या ओवीच्या आधाराने जोशींनी पहिले संपादकीय लिहिले. “देश नासला नासला, उठे तोच कुटी, पिके होताची होताची, होते लुटालुटी" ह्या रामदासस्वामींच्या अगदी समर्पक अशा ओळींनी संपादकीय सुरू झाले होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापले त्यावेळची परिस्थिती आणि महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती यांचे वर्णन करून दोन्हीमधील साधर्म्य त्यात दाखवले होते.शेतकरी संघटनेचा प्रवास कसा सुरू झाला हे वारकरीच्या सुरुवातीच्या अंकांवरून अभ्यासकांना जाणवेल. उदाहरणार्थ, पहिला अंक :
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची निर्भीड चर्चा करणारे शेतकरी संघटनेचे मुखपत्र' हे पहिल्याच पानावर शीर्षस्थानी ठळक अक्षरांत छापले आहे. शेतकरी संघटनेचा १९७९-१९८०चा दोनकलमी कार्यक्रमही ठळक अक्षरांत पहिल्याच पानावर छापला आहे. तो आहे :
१) चाकण व संबंधित बाजारपेठांत कांदा, बटाटा व भुईमूग यांचे भाव क्विटलमागे रुपये ५०, रुपये १०० व रुपये २५०च्या खाली जाऊ न देणे.
२) गावोगावी संघटना बांधून पुढील लढ्याची तयारी करणे.
दुसऱ्या पानावर शेतकरी संघटनेच्या तीन घोषणा छापल्या आहेत -
- शेतकरी तितुका एक एक!
- जय किसान! जय जवान!
- भारत झिंदाबाद!
त्याच पानावर आसखेड धरण आणि भामनहर रस्ता यांसाठी संघटनेतर्फे डिसेंबर महिन्यात भरवल्या जाणाऱ्या एका परिषदेची माहिती देणारी चौकट आहे. शेतकऱ्यांनी काय करावे म्हणून 'सहा मार्गदर्शक तत्त्वे ह्याच पानावर आहेत. शेतकरी संघटनेचा मुख्य भर शेतीमालास रास्त भाव मिळवून देण्यावर आहे व म्हणून संघटनेने ठरवून दिलेल्या किमान किमतीच्या खाली आपला शेतीमाल विकू नका हे त्यातील प्रमुख तत्त्व आहे. याच पानावर ते सेवादलाच्या शाखेत जायचे तेव्हापासून ज्यांच्याविषयी जोशींना कायम आदर होता, त्या सानेगुरुजींचे किसानांना उद्देशून लिहिलेले एक चार कडव्यांचे गीत संपूर्ण छापले आहे. 'शेतकरी संघटनेचे गीत' म्हणन स्वीकारण्यात आलेल्या या गीताची सरुवात होती : उठू दे देश, पेटू दे देश; येथून तेथून सारा, पेटू दे देश.
या गीतातील विचार शेतकरी संघटनेच्या एकूण विचारांशी इतके जुळणारे आहेत, की आज इतक्या वर्षांनी ते वाचताना या साम्याचे खूप आश्चर्य वाटते. विशेषतः ‘घाम गळे तुमचा, हरामाला दाम' ह्या ओळीत 'भीक नको, हवे घामाचे दाम' ह्या शेतकरी संघटनेच्या प्रसिद्ध घोषणेचे बीज दडलेले आहे हे कोणालाही जाणवावे. गीताच्यावर सानेगुरुजींचे छायाचित्र छापलेले आहे व संपूर्ण अंकातील समकालीन व्यक्तीचे असे ते एकमेव छायाचित्र आहे.
याच पानावर कवितेखाली 'कलावंत शेतकऱ्यांना आवाहन' या मथळ्याखाली एक चौकट आहे व तिच्यात संघटनेला प्रचारासाठी एक शाहीर पथक लगेच तयार करायचे आहे आणि त्यासाठी गायक, वादक, कवी यांची, तसेच नट व चित्रकार यांचीही गरज असल्याचे छापले आहे. संघटनेच्या प्रसारासाठी जोशी यांनी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या माध्यमांचा विचार केला होता हे त्यातून जाणवते.
या पहिल्या अंकाच्या तिसऱ्या पानावर कांद्याचा लढा हा स्वतः शरद जोशींनी लिहिलेला लेख आहे. संपूर्ण अंकातला हा एकमेव मोठा लेख आहे व तो त्यांचा आहे. पुढे 'शेतकरी संघटक' नावाने जे पाक्षिक संघटनेचे मुखपत्र म्हणून बरीच वर्षे चालवले गेले, त्यातही मुख्य लेखन हे बहुतेकदा जोशी यांचेच होते व मुखपत्राचे आणि संघटनेचेही हे एकचालकानुवर्तीय स्वरूप पहिल्यापासूनचेच आहे हेही हा अंक वाचताना लक्षात येते.
या पहिल्याच चार-पानी अंकाचे चौथे संपूर्ण पान आठ छोट्या जाहिरातींनी भरलेले आहे व ह्या सर्व जाहिराती त्यांच्या संपर्कात आलेल्या चाकणमधील लहान लहान व्यावसायिकांच्या व व्यापाऱ्यांच्या आहेत. त्यांच्या शुभेच्छा त्यावेळी व नंतरही शेतकरी संघटनेला व शरद जोशी यांना होत्या; जोशींनीही कधी उद्योजकतेला विरोध केलेला नाही हे लक्षात येते.
किरकोळ अंकाची किंमत ३० पैसे, तसेच वार्षिक वर्गणी रुपये १५ ह्याच्याबरोबरच तहहयात वर्गणी रुपये १५० हेदेखील छापलेले आहे. याचाच अर्थ हे केवळ तात्कालिक गरजा भागवणारे साप्ताहिक नसून ते वर्षानुवर्षे चालू राहावे, अशी जोशी यांची त्यावेळी तरी कल्पना होती हे जाणवते. जिथे वितरक व प्रतिनिधी नेमणे आहे अशा दहा गावांची यादीही अंकात आहे. संपादक म्हणून शरद जोशी यांचे तर कार्यकारी संपादक म्हणून बाबूलाल परदेशी यांचे नाव शेवटी छापले आहे. पत्तादेखील परदेशी यांच्या चाकण प्रिंटींग प्रेसचाच आहे.
“माझ्यासारख्या नास्तिकाला वारकरी हे नाव पसंत नव्हते," असे जोशी यांनी म्हटले आहे. पुढच्याच वर्षी जोशी यांचा ज्या विजय परुळकर यांच्याशी निकटचा संबंध आला, त्यांनी "वारकरी म्हणजे 'वारकरी; अन्याय करणाऱ्यावर वार करणारा" अशी त्याची फोड केली होती व ते जोशींना खूप आवडले होते; मनात काहीशी डाचणारी अप्रस्तुत नावाबद्दलची खंत त्यामुळे दूर झाली!
अंकाची जुळणी चालू असतानाच एकीकडे प्रकाशन समारंभाची तयारी सुरू झाली. एव्हाना ऑक्टोबरचा शेवटचा आठवडादेखील संपत आला होता. जेमतेम चार दिवस हातात होते. चाकण बाजारात एक लहानसा मांडव घातला गेला. बाबूलालनी आपल्या छापखान्यात घाईघाईने काही पत्रिका छापल्या, वाटल्या, पोस्टर्स छापली. एक अशी कल्पना निघाली, की समारंभात जे सामील होतील त्यांना लावायला एखादा बिल्ला तयार करावा, म्हणजे मग भविष्यात संघटनेचे कार्यकर्ते कोण आहेत हे ओळखणे कोणालाही सुलभ होईल. बिल्ला कसा असावा ह्याविषयी काही कल्पना मनात स्पष्ट होत्या. लाल रंगाचा गोल बिल्ला व त्यावर पांढऱ्या अक्षरात शेतकरी संघटना' ही अक्षरे. (लाल पार्श्वभूमी व त्यावर पांढरा क्रॉस ह्या स्वित्झर्लंडच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाइनशी असलेले ह्याचे साम्य लक्षणीय आहे.) पण अल्पावधीत असे बिल्ले कोण करून देणार हा प्रश्नच होता. बाबूलाल ह्यांचे डॉ. रमेशचंद्र नावाचे एक पुण्यात राहणारे मित्र होते. समाजवादी पक्षाचे ते स्थानिक संघटक होते. बिल्ले कुठे मिळतील ह्याची चौकशी करायला मंडळी त्यांच्या घरी गेली. दुर्दैवाने ते घरी नव्हते. निराश होऊन जोशी व बाबूलाल बाहेर पडले तेव्हा फाटकातच रमेशचंद्रांचे भाऊ भेटले. 'काय काम होतं?' असे त्यांनी विचारल्यावर जोशींनी आपली गरज त्यांना सांगितली. “माझा प्लास्टिक मोल्डिंगचा एक छोटा कारखाना आहे. मी तुम्हाला चोवीस तासांत तसे प्लास्टिकचे बिल्ले बनवून देतो," ते म्हणाले.
'चला, प्लास्टिक तर प्लास्टिक, पण आपली आत्ताची गरज तर भागली,' म्हणत जोशींनी सुटकेचा सुस्कारा सोडला. एक अडचण तरी दूर झाली. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी त्यांनी बिल्ले दिलेदेखील हे विशेष. पुढे प्लास्टिकचे हे बिल्ले बदलन पत्र्याचे बिल्ले तयार केले गेले, पण डिझाइन तेच राहिले. हा बिल्ला पुढे शेतकरी संघटनेची निशाणी म्हणून देशभर प्रसिद्ध पावला.
दोन नोव्हेंबरपर्यंत खुर्च्या, टेबल, बॅनर्स, हारतुरे ह्याची व्यवस्था झाली. कार्यक्रमाची रूपरेखा ठरली. ओळखीतून कोणीतरी एक लाउडस्पीकर मिळवला. अध्यक्ष कोणाला बोलवायचे हा प्रश्नच होता. कारण संघटना त्यावेळी अगदी नगण्य होती आणि राजकारण्यांशी फटकूनच राहिली होती. त्यामुळे खासदार, आमदार वगैरे मंडळी सोडाच, साधा ग्रामपंचायतीचा सभापतीदेखील प्रकाशनासाठी यायची शक्यता नव्हती.
शेवटी भामनेर खोऱ्यातील एका गावाच्या पंचायत समितीचा एक सदस्य अध्यक्ष म्हणून नक्की केला. 'आगामी भामनेर सडकेच्या आंदोलनात तो उपयोगी पडेल' ही जोशींची कल्पना. बाबूलाल अधिक व्यवहारी होते. तो निदान वारकरीचा आजीव सदस्यतर होईल' ही त्यांची कल्पना. प्रत्यक्षात त्याने आजीव सदस्य व्हायचे कबूलदेखील केले; पण दिले मात्र फक्त रुपये ५०! उरलेले १०० राहूनच गेले!'वारकरी'चे प्रकाशन झाले आणि योगायोगाने त्याच आठवड्यात आंदोलनाचा परत एक प्रसंग आला. आधीचे काही महिने नाफेडने खरेदी थांबवली होती व सर्व व्यवहार व्यापाऱ्यांच्याच हातात पुन्हा गेला होता. त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. त्यांच्या सभा-निदर्शने सुरू झाली. शेवटी ७ नोव्हेंबरपासून नाफेडने पुन्हा एकदा खरेदी सुरू केली. असे नेहमीच होत असे – नाफेड कधी खरेदी करायचे, मध्येच ती थांबवायचे. ह्यावेळी त्यांनी खरेदी सुरू करताना कांद्याचा भाव क्विटलमागे पूर्वी ४५ ते ६० असा होता, तो कमी करून सरसकट ४०वर आणला.
त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांची बाजारसमितीसमोर निदर्शने सुरू झाली. शेवटी १४ नोव्हेंबर रोजी नाफेडतर्फे भाव पूर्ववत केले गेले. संघटनेच्या कार्यालयात ह्या निमिताने अनेक शेतकरी येत गेले व त्यांना वारकरीचे अंकदेखील वाटले गेले. वारकरीची गरज लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी ह्या आंदोलनाची मदत झाली.
शेतकऱ्यांना रुची वाटेल अशा बातम्या अंकात असायच्या. उदाहरणार्थ, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार त्याच सुमारास अरब देशांचा दौरा करून आले होते. त्याविषयीच्या बातमीत म्हटले आहे, पवार यांनी अगदी मुक्त कंठाने चाकणच्या कांद्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, चाकणच्या कांद्याला दुबई व कुवेत येथील मार्केटमध्ये ७०० रुपये क्विटल भाव मिळत आहे. मी त्यांना ३२ कोटी रुपयाचा कांदा व इतर भाजीपाला पुरवायचा करार केला आहे. तुम्ही भरपूर कांदा पिकवा. तुम्हाला किमान ७० रुपये क्विटल भाव नक्की मिळेल. शेतकऱ्याच्या जीवनातील ह्या महत्त्वाच्या प्रश्नावर शरद पवार योग्य निर्णय घेतील अशी खात्री बाळगू या.अरबी मुलुखात क्विटलला ७०० रुपये भाव मिळत असताना चाकणच्या बाजारात इथल्या शेतकऱ्याला मात्र नाफेडतर्फे क्विटलला जेमतेम ४५ ते ६० रुपयेच भाव मिळत होता, व तोही प्रत्येक वेळी संघर्ष करून मिळवावा लागत होता हे लक्षात घेण्यासारखे आहे.
तिसऱ्या अंकापासूनच 'इंडिया विरुद्ध भारत' ही शब्दरचना अंकाच्या शीर्षस्थानी आली. 'भारत झिंदाबाद, इंडिया मुर्दाबाद' ही घोषणाही लगेचच पहिल्या पानावर आली. पहिल्या अंकात फक्त 'भारत झिंदाबाद' होते, त्याच्याखाली आता 'इंडिया मुर्दाबाद' आले. ह्या वाढत्या संघर्षाचे प्रतिबिंब अंकातील मजकुरावरही पडत गेल्याचे जाणवते. वर्गणीदारांची व आजीव वर्गणीदारांची यादीही अधूनमधून प्रसिद्ध होत होती. हळूहळू वारकरीचा थोडाफार विस्तार होऊ लागला. चौथ्या अंकात पहिल्याच पानावर २२ आजीव सदस्यांची व ४२ वार्षिक वर्गणीदारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ही संख्या तशी अत्यल्प वाटते, पण शेतकरीवर्गातून वाचक मिळणे सोपे नव्हते.
अंकात व्यावसायिक माहितीही असायची. कांद्याचा उत्पादनखर्च कसा काढायचा. पिकांना होणारे वेगवेगळे रोग व त्यावरील उपाय वगैरे माहिती असायची. ग्रामविकासाच्या योजनांची माहितीदेखील असायची. बरीच पत्रे त्याबाबत असत. वाचकपत्रांना अंकात आवर्जुन अर्धाएक पान स्थान दिले जायचे. संपूर्ण भामनेर खोऱ्याच्या पंचवार्षिक विकासाचा एक विस्तृत आराखडाही एका अंकात प्रसिद्ध झाला होता. संघटनेतर्फे तरुण शेतकऱ्यांसाठी व्हॉलीबॉलस्पर्धादेखील आयोजित केल्या गेल्या होत्या व त्याचेही वृत्त अंकात आले होते. शेतकरी एकत्र आणण्यासाठी सर्वच मार्गाचा अवलंब केला जात होता, वावडे असे कशाचेच नव्हते.
अंकातील एक वेधक वृत्त म्हणजे मुंबईतील 'जेवण डबे वाहतूक मंडळ' यांनी मुंबईला २० डिसेंबर १९८० रोजी केलेल्या सत्काराचे. भामनेर खोऱ्यातील अनेक तरुण मुंबईला डबेवाला म्हणून नोकरी करत. ते फारसे शिकलेले नसत, पण त्यांचे काम वक्तशीरपणा व शिस्त यांसाठी खूप वाखाणले जाई. लांब लांब राहणाऱ्या मुंबईकर कुटुंबांतून सकाळी नऊदहाच्या सुमारास जेवणाचे डबे गोळा करायचे व दुपारी बरोबर बारा-एकच्या आत ते फोर्टसारख्या लांबच्या भागातील ज्याच्या-त्याच्या कार्यालयात पोचवायचे काम ते करत. संध्याकाळी ते डबे घरोघर परतही पोचवत. ह्या कामात कधीही हयगय होत नसे व घरचे सात्त्विक अन्न खायला मिळाल्यामुळे मुंबईकर त्यांच्यावर खूष असत. बड्या व्यवस्थापनतज्ज्ञांनीदेखील या डबेवाल्यांवर पुढे अभ्यासलेख लिहिले आहेत. मंडळाने मुंबईत त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. बातमीत म्हटले होते,पूजेपूर्वी शरद जोशी यांची ढोल-ताशे वाजवत मुंबईत मिरवणूक काढली गेली. त्यानंतर पूजेला जोडूनच जाहीर सभाही झाली व त्या सभेत जोशी यांचा जाहीर सत्कार केला गेला. जोशी यांनी सुमारे तासभर भाषण केले. डबेवाहतूक मंडळाशी असलेल्या आपल्या ऋणानुबंधांचा जोशी यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला व शेतकरी संघटनेबद्दल माहिती दिली. नंतर मंडळाने साप्ताहिक वारकरीला रुपये ५०१ देणगीदाखल दिले. सभेनंतर रात्री भजनी भारुडाचा कार्यक्रम झाला.
(वारकरी, ३ जानेवारी १९८१)
पुढे पुढे मात्र दर आठवड्याला वारकरी काढायचा जोशींना त्रास होऊ लागला. बाबूलालना ठरलेल्या वेळेत काम करायची फारशी सवय नव्हती. ह्याचे एक कारण म्हणजे गावात त्यांचा छापखाना हा एकमेव छापखाना होता; म्हणजे त्यांची मक्तेदारीच होती. छापखान्यात पत्रिका छापायला उशीर होत आहे, म्हणून लग्नाची तारीख पुढे ढकलली गेल्याचीही उदाहरणे होती! पण साप्ताहिक म्हटले की पोस्टाच्या नियमानुसार ठरलेली तारीख पाळावीच लागे. त्यामुळे शनिवारी दुपारी अंक बाहेर पडणे आवश्यक असायचे. दर बुधवारी रात्री जागून जोशी सगळा मजकूर तयार करायचे, हाताने लिहून काढायचे. गुरुवारी सकाळी सकाळी तो बाबूलालकडे द्यायचे, जेणेकरून त्यांना छपाईसाठी निदान दोन दिवस मिळावेत. पण बाबूलाल यांची आणखी एक सवय म्हणजे रात्री तीन वाजेपर्यंत गावातल्या मारुतीच्या देवळात गप्पा छाटत बसायचे आणि सकाळी पार दहा वाजेपर्यंत ताणन द्यायची. त्यांचा छापखाना व घर जवळजवळ होते. सकाळी जोशी मजकूर घेऊन त्यांच्याकडे जात, तेव्हा ते झोपलेलेच असत. बाबूलाल ह्यांच्या पत्नी सुषमा “अहो, तुमचा सासरा आला आहे बघा!" असे म्हणून गदागदा हलवत पतीला उठवायच्या. मग दुपारपर्यंत जुळारी शोधण्यात वेळ जायचा. कधी तो मिळायचा, कधी नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा हाच प्रकार. शेवटी कसाबसा अंक शनिवारी सकाळी तयार व्हायचा. खूपदा चाकणला अर्धवट तयार झालेला मजकूराचा कंपोझ पुण्याला नेऊन तिथे अंक पुरा करावा लागे. जोशी म्हणतात,
बाबूलाल घड्याळ काय, पण कॅलेंडरकडेसुद्धा लक्ष देणे म्हणजे, विलायतेतून आलेल्या लोकांचे फॅड समजायचा! साप्ताहिक वारकरीचा प्रत्येक अंक म्हणजे जुळारी, छापखाना, बाबूलाल आणि वेळ ह्यांच्याशी घेतलेली निकराची झुंज व्हायची. छपाईंकामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड प्रमाणावर राहून जाणारे मुद्रणदोष. मला स्वतःला मीच लिहिलेला मजकूर छापील स्वरूपात तपासता येत नाही. लिहिलेली वाक्ये मनात इतकी पक्की बसलेली असतात, की मुद्रणातल्या चुका लक्षातच येत नाहीत. आणि बाबूलालला कुठल्याच चुका चुका वाटत नाहीत. असा सगळा आनंद! भावी काळातले राजवाडे वारकरीचे अंक घेऊन बसतील, तेव्हा मुद्रणदोष ओलांडत ओलांडत वाचताना त्यांच्या डोक्याला मुंग्या आल्याखेरीज राहणार नाहीत. (वारकरीची जन्मकथा, आठवड्याचा ग्यानबा, १ ते ८ मार्च १९८८, पृष्ठ ९)
चळवळ वाढत गेली तसतसा जोशींना स्वतःला त्यासाठी पुरेसा वेळ देता येईना. आधी काही अंक नियमित दर आठवड्याला निघाले, मग मात्र ते अनियमित स्वरूपात निघू लागले. सुमारे सव्वा वर्षाने वारकरी बंदच पडले. १७ जानेवारी १९८१चा अंक हा वारकरीचा शेवटचा अंक. पण त्याने त्या मर्यादित काळात महत्त्वाची भूमिका बजावली. भामनेर खोऱ्यात, पुणे जिल्ह्यात आणि खरे तर इतरही अनेक जिल्ह्यांत शेतकरी संघटनेची त्यामुळे तोंडओळखतरी झाली. अनुयायांशी संपर्क साधण्याचे ते एकमेव साधन होते. शरद जोशींचा थेट सहभाग असलेलेही हे एकमेव नियतकालिक. संघटनेची म्हणून त्यानंतर 'आठवड्याचा ग्यानबा' व 'शेतकरी संघटक' ही दोन मुखपत्रे निघाली व त्यांतून जोशींचे लेखन प्रसिद्धही होत गेले, पण त्यांच्या व्यवस्थापनात जोशींचा थेट सहभाग नसायचा.
लोकांनी जर आपल्याबरोबर यावे असे वाटत असेल, तर त्यांच्या जिव्हाळ्याचे जे विषय आहेत त्यात तुम्हालाही स्वारस्य असावे लागते. म्हणूनच आंबेठाणमध्ये आल्यापासून जोशींनी दोन गोष्टींवर बरेच लक्ष केंद्रित केले होते. पहिली म्हणजे गावातले आरोग्य.
आरोग्याचा प्रश्न जोशींना फारच गंभीर वाटत होता. मुळातच कुपोषित असलेले गावकरी कुठल्याही रोगाला सहज बळी पडत असत. त्यांची एकूण कार्यक्षमताही कुपोषणामुळे खूप कमी झालेली असायची. भामनेरच्या त्या खोऱ्यात चाकण सोडले तर कुठे एकही डॉक्टर नव्हता. एखादा पोरगा खप आजारी पडला तर शेतकरी नाइलाजाने त्याला बाजाराच्या दिवशी थेट चाकणला घेऊन जायचा. चाकणला सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. पण तिथे कोणीच डॉक्टर हजर नसतो असे त्यांना स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले होते. गावकऱ्यांच्या मते तिथे औषधेही उपलब्ध नसत. तिथले सरकारी कर्मचारी खेडूतांशी इतक्या मग्रुरीने वागत की पुन्हा त्या दवाखान्याची पायरीही चढू नये असे त्या शेतकऱ्याला वाटायचे. मग खासगी डॉक्टरकडे जाणे हाच एक रस्ता असायचा. तो खासगी डॉक्टर रुग्णाला तपासून काहीतरी औषधे लिहून द्यायचा. पण औषधांच्या दुकानात गेले आणि औषधांची किंमत ऐकली की तो शेतकरी पोराला घेऊन तसाच गावी परत जायचा. कारण तेवढे पैसे खर्च करणे त्याला परवडायचे नाही. हे सारे नेहमीचेच होते.
डॉ. शाम अष्टेकर यांच्याविषयी आणि डॉ. रत्ना पाटणकर यांच्याविषयी इथे लिहायला हवे. पुढे या दोघांनी विवाह केला पण सुरुवातीला ते एकेकटेच चाकणच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. ऑक्टोबर १९७८मध्ये पुण्याहून एमडी केल्यावर डॉ. अष्टेकर इथे लागले होते. एक दिवस एका रुग्णाला घेऊन जोशी आरोग्य केंद्रात आले व त्यावेळी त्यांचा व अष्टेकरांचा प्रथम परिचय झाला. परिसरातील आरोग्याबद्दल दोघांची खूप चर्चा व्हायची. डॉ. रत्ना पाटणकर यांनी जोशींनी आयोजित केलेल्या एका भव्य मोर्यातही मोलाचे वैद्यकीय साहाय्य दिले होते. पुढे त्याबद्दल येणारच आहे. १९८३पर्यंत डॉ. अष्टेकर या केंद्रात कार्यरत होते. त्यानंतरही ह्या ध्येयवादी जोडप्याने अनेक वर्षे ग्रामीण भागातच रुग्णसेवा केली. आता ते नाशिक येथे स्थायिक झाले आहेत. दोघांनीही शेतकरी संघटनेत अगदी झोकून देऊन काम केले. शरद जोशींच्या प्रत्येक आजारपणात डॉ. अष्टेकर त्यांच्यासोबत असत.
आंबेठाणला आल्यावर जोशींनी बराच पुढाकार घेतलेली दुसरी सामाजिक समस्या म्हणजे पक्क्या रस्त्याचा अभाव. आपल्या दैनंदिन गरजा पुऱ्या करण्यासाठी, आजारपणात त्वरित उपचार मिळावेत म्हणून, शेतीमाल कमीत कमी वेळात बाजारात पोचवण्यासाठी चांगला रस्ता अत्यावश्यक होता. इथल्या एकूण मागासलेपणाचे रस्ते नसणे हे एक मोठेच कारण होते. आंबेठाणवरून जाणाऱ्या चाकण ते वांद्रे ह्या ६४ किलोमीटर रस्त्यापैकी फक्त चाकण ते आंबेठाण हा सात किलोमीटरचा रस्ता त्यातल्या त्यात नीट असायचा. बऱ्याच वर्षांपूर्वी, आधी १९६७ साली व नंतर १९७३ साली, दुष्काळात शेतकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणन काढलेल्या कामांचा एक भाग म्हणून तो सरकारने तयार करवला होता. स्थानिक शेतकऱ्यांनी त्यासाठी श्रमदान केले होते. पण नंतरच्या काही वर्षांत त्याची पुरती दुर्दशा झाली होती. खोऱ्यात एकूण २७ गावे होती व त्यांपैकी २४ गावे अशी होती, की एकदा पावसाळा सुरू झाल्यावर पुढचे निदान सहा महिने त्या गावांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध राहायचा नाही; कारण मोडका-तोडका जो रस्ता असायचा, तो पहिल्या दोन-चार पावसांतच वाहून जायचा. गावातली माणसे मग गावातच अडकून पडायची. भाजीपाला वगैरे अक्षरशः कवडीमोलाने विकून टाकावा लागायचा; किंवा कधीकधी चक्क फेकून दिला जायचा. कोणी आजारी पडले तरी चाकणला जायची काही सोय नाही; रुग्णाला डोली करून नेणे हा एकमेव पर्याय असायचा. पण तेही फार अवघड असायचे कारण ह्या भागातील बरेचसे तरुण मुंबईला डबेवाला म्हणून नोकरी करायचे; उरलेली वस्ती मुख्यतः बायका, मुले व वृद्ध यांची. गावातली एखादी बाळंतीण अडली आणि घरच्यांसमोर तडफडून मेली, असे दर पावसाळ्यात एकदातरी घडायचेच. हा रस्ता पक्का व्हावा अशी मागणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने जोशींनी केली होती. शेतकऱ्यांची संघटना बांधायचे ठरवल्यावर त्यांनी लोकजागृतीसाठी हाती घेतलेला हा पहिला प्रकल्प होता. ह्या आंदोलनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जोशींनी आयोजित केलेला मोठा मोर्चा; चीनच्या माओ त्से तुंगच्या शब्दांत सांगायचे तर – लाँग मार्च.
वांद्रे येथून २४ जानेवारी १९८० रोजी हा मोर्चा सुरू होणार होता व ६४ किलोमीटर चालून २६ जानेवारीला चाकणला पोचणार होता. त्याच्या तयारीसाठी म्हणून आधीचे दोन महिनेतरी जोशींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसून प्रयत्न केले होते. 'घरातल्या जनावरांच्या
(डावीकडून) वसंत बाळकृष्ण जोशी (मेहुणे), सौ सिंधु क्संत जोशी (भगिनी), वडील अनंत नारायण जोशी, आई इंदिराबाई, मागे उभे शरद जोशी, सौ निर्मला चंद्रकांत देशपांडे (भगिनी), मागे प्रभाकर जोशी, चंद्रकांत देशपांडे (मेहणे). स्थळ: अंधेरी पूर्व, मुंबई येथील निवासस्थान. (सौजन्यः सौ. नीता प्रभाकर जोशी)शरद व लीला जोशी, विवाहप्रसंगी, मुंबई, २५ जून १९६१पोस्टातील एका प्रशिक्षण वर्गातील सहकारी, पहिल्या रांगेत मध्यभागी जोशी, १९६१
शरद जोशी यांचे स्वित्झर्लंडमधील निवासस्थान. तळमजल्यावरील उजवीकडचा फ्लॅट त्यांचा. शेजारचाच फ्लॅट टोनी डेर होवसेपियां यांचा.इमारतीतील क्लब हाउसमध्ये टेबलटेनिस खेळताना. "त्याला हरणे आवडत नसे." -टोनी डेर होक्सेपियांयुनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या मुख्यालयासमोर अविनाश जगताप, टोनी और होवसेपियां व भानू काळे, १२ जुलै २०१२.________________
युपीयुची टोकियो येथील आंतरराष्ट्रीय परिषद, १९६८) (जोशी पहिल्या रांगेत डावीकडून दुसरे) बन येथील एका स्नेहसंमेलनातील भारतीय संगीताची मैफल. उजवीकडे तानपुरा जुळवताना लीला जोशी श्रेया व गौरी या आपल्या दोन मुलींसमवेत, सदिच्छा बंगला, पुणे, २ सप्टेंबर १९८४ मातोश्री इंदिराबाई यांच्यासमवेत शरद जोशी व सोबत दोन्ही मुली, सदिच्छा बंगला, पुणे २ सप्टेंबर १९८४ ________________
आंबेठाण गाव, १९७७ मध्ये जसे होते अंगारमळा : जोशी यांचे घर, १९८३ ________________
नाशिक येथील ऊस आंदोलन. १० नोव्हेंबर १९८०, आडगाव फाटा, रास्ता रोकोची सुरुवात. (सौजन्य: सरोजा परुळकर) PIMPALNER (80 DEOLA 20 १० नोव्हेंबर १९८०, रेल रोको, खेरवाडी. येथील पोलीस गोळीबारात दोन शेतकरी हुतात्मा झाले. (सौजन्य : सरोजा परुळकर)
ऊस आंदोलनातील त्रिमूर्ती (उजवीकडून) प्रल्हाद कराड पाटील, शरद जोशी व माधवराव मोरे, मागे बसलेल्या लीलाताई जोशी. सटाणा अधिवेशन, २ जानेवारी १९८२.
चाकण येथील अगदी सुरुवातीचे साथीदार. (डावीकडून) श्याम पवार, अप्पा देशमुख, शरद जोशी, मामा शिंदे व गोपाळ जगनाडे. श्याम पवार यांचे म्हाळुगे येथील हॉटेल, ९ नोव्हेंबर २०१४.जोशींची मुलाखत घेताना इंग्लंडहून निपाणीला आलेली बीबीसी टेलिव्हिजनची टीम, ३० जानेवारी १९८१. (सौजन्य : सरोजा परुळकर)सुभाष जोशी आंदोलनातील तंबाखू कामगार महिलांना काही सूचना देताना, मार्च-एप्रिल १९८१. शेजारी त्यांच्या पत्नी सुनीता. (सौजन्य : सरोजा परुळकर)
रात्रंदिवस रास्ता रोको करणारे तंबाखू शेतकरी चार घास खाताना (सौजन्य: सरोजा परुळकर)पोलीस गाड्यांमधून नेले जाणारेसत्याग्रही, ६ एप्रिल १९८१
(सौजन्य: सरोजा परुळकर)...आणिपोलीस गोळीबारानंतर उद्ध्वस्त झालेली
आंदोलननगरी, ६ एप्रिल १९८१
शरद-लीला-श्रेया-गौरी जोशी, मृदगंध, पुणे, २७ ऑक्टोबर १९८२पुणे, ६ जून १९८६. श्रेया जोशी व सुनील शहाणे यांच्या विवाहप्रसंगी जामात सुनील यांची
प्रमोद महाजन यांच्याबरोबर ओळख करून देताना. मधे प्रकाश जावडेकर.व आजारी माणसांच्या देखभालीसाठी आवश्यक असतील तेवढ्याच माणसांनी आपापल्या घरात थांबावे व बाकीच्या सर्वांनी मोर्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रत्येक गावात जाहीर सभा घेऊन करण्यात आले होते. 'शक्य असूनही जे शेतकरी मोर्ध्यात सहभागी होणार नाहीत, त्यांना आपल्या शेतकरीबांधवांशी द्रोह केल्याचा दोष लागेल, असेही भावपूर्ण आवाहन प्रत्येक सभेत केले गेले होते. २३ जानेवारीलाच स्वत: जोशी व त्यांचे सहकारी वांद्रे येथे जाऊन राहिले.
रात्री जेवणे झाल्यावर कुतूहलाने काही तरुण गावकरी त्यांना भेटायला आले होते. त्यांच्यात भोसले नावाचा एक जण होता. बोलता बोलता तो म्हणाला, "ज्या समाजाची प्रगती खुंटलेली आहे, त्याची स्थिती साचलेल्या डबक्याप्रमाणे होते." ते ऐकून जोशी एकदम चमकले. कारण संघटनेविषयी ते वारकरीमध्ये लिहीत असलेल्या लेखमालेतील ते वाक्य होते. "हे वाक्य तू कुठं वाचलंस?" जोशींनी विचारले. तो उत्तरला, “साहेब, तुमच्याच लेखातलं आहे हे वाक्य." "तुम्ही वाचता हे लेख?" जोशींचा प्रश्न. त्याचे उत्तर होते,
"आमच्या गावात तुमच्या लेखांचं आम्ही सार्वजनिक वाचन करतो. माझी तर त्यातली वाक्यंच्या वाक्यं पाठ आहेत," असे म्हणत त्यानी लेखांतली अनेक वाक्ये घडाघडा म्हणून दाखवली. ते ऐकून जोशींना खूप आनंद झाला. कारण त्यापूर्वी आपण इतक्या कष्टाने हे साप्ताहिक चालवत आहोत, पण प्रत्यक्षात ते कोणी वाचत असेल का, ह्याविषयी त्यांना काहीशी शंका होती. जोशी यांनी लिहिले आहे, “इतक्या उपद्व्यापाने फेकलेले बियाणे, मावळातील सगळ्या डोंगरमाथ्यात एका ठिकाणी जरी रुजत असेल, तरी सगळ्या कष्टांचे चीज झाले असे वाटून गेले."
दुसऱ्या दिवशी सकाळी मोर्च्याला सुरुवात झाली. सुरुवातीला सुमारे शंभर पुरुष व स्त्रिया मोर्च्यात सामील होत्या. पण जसजसा तो पुढे सरकू लागला, तसतशी त्यांची संख्या वाढू लागली. रात्रीच्या मुक्कामासाठी शिवे गावी मोर्चा आला, तेव्हा त्यात दोन हजार माणसे सामील झालेली होती. शिवेकरांनी त्या सर्वांना जेवण घातले. दुपारच्या एकूण तीन जेवणांसाठी प्रत्येकाने आपापल्या भाकऱ्या बांधून आणल्या होत्या व रात्रीच्या जेवणांची वाटेतल्या गावकऱ्यांनी एकत्रित व्यवस्था केली होती. २४ तारखेच्या रात्री संघटनेच्या कलापथकाने कार्यक्रम सादर केला. त्यानंतर बाहेर शिवारातच सगळे झोपले. २५ जानेवारीला सकाळी मोर्चा शिवे गावाहन पुढे सरकला. मोर्च्याचे वाढते स्वरूप पाहन सर्वांनाच उत्साहाचे भरते आले होते. पण तरीही मोर्च्यातली शिस्त विलक्षण होती. त्याचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे.
साधारण दुपारी तीन वाजेपर्यंत मोर्चा भांबोली गावात पोचला. रणरणत्या उन्हात चालून चालून सगळ्यांचे गळे सुकले होते. गावच्या विहिरीवर मामा शिंदे यांनी सगळ्यांसाठी प्यायच्या पाण्याची व्यवस्था केली होती. पण भांडी-लोटे खूप कमी होते. गडबड होऊ नये म्हणून सगळ्या मोर्चेकऱ्यांना रस्त्यावरच बसण्यास सांगण्यात आले. आयोजकांनी घोषणा केली की, “एकेका गावाचे नाव पुकारताच फक्त त्या गावच्या मोर्चेकऱ्यांनी विहिरीपाशी यावे. त्यांचे पाणी पिऊन झाले, की मग पुढील गावाचे नाव पुकारले जाईल. तेव्हा त्यांनी पुढे यावे. अशा प्रकारे सगळ्यांना काहीही गोंधळ न होता पाणी प्यायला मिळेल." हा कार्यक्रम जवळ जवळ तासभर चालला, पण एकही जण आपली रांग सोडून पुढे घुसला नाही. "हा साधासुधा मोर्चा नसून शिस्तबद्ध अशी फौज आहे," असे उद्गार हे अभूतपूर्व दृश्य पाहणारे अनेक लोक काढत होते.
असेच आणखी एक उदाहरण म्हणजे मोर्चेकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या वैद्यकसेवेचे. मोर्च्यात अनेक बायकामुलेदेखील सामील होणार, त्यामुळे कोणाचे काही दुखलेखुपले तर लगेच औषधपाणी करता यावे यासाठी संघटनेच्या निकटच्या हितचिंतक डॉ. रत्ना पाटणकर आणि डॉ. दाक्षायणी देशपांडे २३ जानेवारीलाच चाकणहून वांद्र्याला दाखल झाल्या. २४ तारखेपासून मोर्च्याबरोबर त्याही संपूर्ण अंतर पायी चालल्या. वाटेत गावोगावी त्यांनी वैद्यकीय तपासण्या केल्या, औषधपाणी केले. मोर्च्यातील स्त्रियांना त्या इतक्या जवळच्या वाटल्या, की दुपारी जेवणाच्या वेळेला, "पोरींनो, जेवलात की नाही? बसा आमच्याबरोबर," असे आग्रहाने त्यांतल्या अनेक जणी या दोघींना सांगत असत. पुढे २६ जानेवारीला मोर्चा चाकणला पोचला तो दिवस सुट्टीचा होता. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद होते. पण तरीही ह्या दोघींनी आरोग्यकेंद्रात मुक्काम ठोकला आणि अनेक स्त्रियांवर औषधोपचार केले. या दोघीमुळे सगळ्याच मोर्चेवाल्यांची मोठी सोय झाली.
संध्याकाळपर्यंत मोर्चा आंबेठाण गावाला पोचला. ग्रामस्थांनी मोर्चेवाल्यांचे प्रेमाने स्वागत केले. रात्रीच्या जेवणासाठी आंबेठाणमध्ये साडेतीन हजार माणसे होती. रात्री पुन्हा भजन व भारुडाचा कार्यक्रम झाला, उशिरापर्यंत रंगला.
पुढल्या दिवशी २६ जानेवारी रोजी सकाळी आंबेठाणमध्ये झेंडावंदन करून मोर्चा चाकणकडे जाऊ लागला. आता इतर अनेक गावांतून शेतकरी बांधव व भगिनी मोर्च्यात सामील होत होत्या. ढोल, लेझीम, झांजा यांनी वातावरण दुमदुमून गेले होते. प्रत्येक गावाचे मोर्चेकरी एकत्र चालत होते, त्यांच्यापुढे त्यांच्या गावाच्या नावाचे फलक घेतलेले स्वयंसेवक होते, तसेच प्रत्येक गावाचे स्वतंत्र कलापथकही होते. मोर्चा आता इतका लांब झाला होता, की एका टोकापासून मोर्च्याचे दुसरे टोक दिसत नव्हते. प्रत्येकाच्या छातीवर शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला लावलेला होता. प्रत्येकी दोन रुपये देऊन सगळ्यांनी तो विकत घेतला होता व तीच रक्कम संघटनेची वर्गणी म्हणून जमा करण्यात आली होती; तशी पावतीही प्रत्येकाला दिली जात होती.
दुपारी बाराच्या सुमारास चाकण बाजारपेठेसमोरच्या मोकळ्या पटांगणात मोर्चा पोचला, तेव्हा तिथे जमलेल्या दोन हजार लोकांनी त्याचे स्वागत केले. 'चाकण-वांद्रे रस्ता झालाच पाहिजे', 'शेतकरी संघटनेचा विजय असो', 'मोर्चा आला पायी पायी, रस्ता करा घाई घाई', 'तुम्ही रस्ता करत नाही, आम्ही सारा भरत नाही' अशा घोषणांनी वातावरण भारून गेले होते. प्रत्यक्ष सभा सुरू झाली तेव्हा आठ हजारांचा जनसमुदाय तिथे हजर होता. एवढा मोठा जनसमुदाय चाकणमध्ये पूर्वी कधीच कुठल्या कार्यक्रमासाठी एकत्र आला नव्हता. ऐतिहासिक अशीच ती घटना होती.
कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी संघटनेच्या कलापथकाने सादर केलेल्या 'किसानांच्या बाया, आम्ही शेतकरी बाया' आणि येथून तेथून सारा, पेटू दे देश' या दोन प्रेरणादायी गीतांनी झाली. आपल्या भाषणात जोशींनी 'रस्ता होईस्तोवर शेतकऱ्यांनी सारा भरू नये' असे आवाहन केले. ते म्हणाले,
"मघाशी आपण ऐकलेले गीत ज्या सानेगुरुजींनी लिहिले, त्यांच्या आत्म्याला आनंद होईल व समाधान लाभेल असाच आजचा हा शेतकरी जागृतीचा क्षण आहे. चाकण ते वांद्रे हा रस्ता बारमाही करण्यासाठी गेली बावीस वर्षं अनेक अर्ज-विनंत्या करण्यात आल्या. अनेक आश्वासनंही देण्यात आली. पण प्रत्यक्षात काहीही प्रगती झाली नाही. पावसाळ्यात सहा-सात महिने रस्ता बंद असल्याने औषधपाणी, शाळा, वाहतूक, बाजारपेठ ह्या साऱ्या मूलभूत सोयींपासून आम्ही वंचित राहतो. माणूस म्हणून आम्हाला जगणंही असह्य झालं आहे."
यानंतर शेवटी त्यांनी सर्व शेतकऱ्यांना शपथ घातली. आधी जोशी बोलणार आणि मग उपस्थित त्यांचे शब्द मागोमाग पुन्हा उच्चारणार असा प्रकार होता. ती शपथ अशी होती,
"आमची आणखी एक पिढी अशा हलाखीत पिचू नये म्हणून, मी, श्री भीमाशंकर महाराज यांच्या पायाच्या शपथेने प्रतिज्ञा करतो, की भामानहर रस्ता हा वर्षभर उघडा राहून एसटी बस बारा महिने वांद्रेपर्यंत जाऊ लागेपर्यंत, मी शासनाला एक पैसाही शेतसारा भरणार नाही. त्यासाठी मला जो त्रास होईल, तो मी सहन करीन. कोणत्याही परिस्थितीत इतर शेतकरी बांधवांबरोबर द्रोह करणार नाही." शेवटी सामुदायिकरीत्या घेतली जाणारी अशी शपथ हे पुढे शेतकरी संघटनेच्या प्रत्येक सभेचे एक वैशिष्ट्य बनले व त्याची सुरुवात अशी ह्या मोात झाली होती. अतिशय भावपूर्ण वातावरणात व घोषणांच्या गजरात सभा संपली.
अनेक वर्षांपूर्वी स्वातंत्र्यआंदोलनात गुजरातेत सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथे असाच एक साराबंदी सत्याग्रह केला होता. त्यामुळेच त्यांना सरदार ही पदवी लोकांनी बहाल केली होती. त्यांची आठवण करून देणारा हा चाकणमधला मोर्चा होता.
एक लक्षणीय घटना इथे नमूद करायला हवी. आधी निषेधाचा एक मार्ग म्हणून राष्ट्रध्वज जाळायचा काही मोर्चेकऱ्यांचा विचार होता. त्याला विरोध करणारे एक पत्र चाकणच्या मामा शिंदे यांनी लिहिले होते व ते संपूर्ण पत्र वारकरीच्या पहिल्याच पानावर १५ डिसेंबर १९७९ रोजी प्रकाशितही करण्यात आले होते. त्याचा आशय संक्षेपात सांगायचा तर असा होता :
जो राष्ट्रध्वज अनेक देशभक्तांच्या त्यागातून आणि रक्तातून निर्माण झाला, ज्याच्यासाठी कितीतरी ज्ञात आणि अज्ञात देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या राष्ट्रध्वजाचे रक्षण करणे हेच आपले ब्रीद आहे. आमच्या सरकारचा राग आम्ही त्या राष्ट्रध्वजावर का काढणार? राष्ट्रध्वज जाळून सत्याग्रह करू नका, अन्य कोणत्याही सत्याग्रही मार्गाचा अवलंब व्हावा. त्यात सर्व जण तुमच्या पाठीशी उभे राहतील.'
मामा शिंदे स्वतः ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते व मागे लिहिल्याप्रमाणे चाकणमधले पहिले झेंडावंदन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले होते. पत्रातील त्यांची भावना समजण्यासारखी होती. परंतु त्यांच्या पत्राखालीच स्वतः जोशींनी आपली प्रतिक्रिया प्रसिद्ध केली होती. त्यात त्यांनी लिहिले होते,
इंग्रजांना देशातून काढून लावल्यानंतर ज्यांच्या हाती सत्ता आली, ते भारतीयांच्या सुखदुःखाबद्दल इंग्रजांपेक्षाही अधिक बेपर्वा राहिले. कच्चा माल स्वस्तात स्वस्त विकत घेऊन, कारखानदारी माल महागात महाग विकणे, हे इंग्रजांचेच वसाहतवादी तंत्र नवीन राज्यकर्त्यांनी चाल ठेवले. भारतावरचे इंग्रजांचे राज्य गेले, पण इंडियाची जुलमी राजवट चालू झाली... काँग्रेसच्या स्थापनेनंतरच्या काळात मवाळपक्षीय लोकांना इंग्रज राणीचे राज्य मान्य होते. इंग्रजांच्या युनियन जॅक' झेंड्याला ते भारताचाच ध्वज मानीत. स्वतंत्र भारताची स्वप्ने पाहणाऱ्यांना जहाल, अराजकवादी अशी नावे ठेवत. मामा शिंदे यांची मनःस्थिती त्या काळच्या मवाळांप्रमाणे आहे... सत्याग्रहाच्या तंत्राबद्दल महात्मा गांधींच्या हयातीतही अनेक वादविवाद होते. सत्याग्रहात नेमके काय करता येते आणि काय करता येत नाही हे ठरवणारे कोणतेही धर्मपीठ नाही. मोर्चे, मिरवणुका ही जुनी साधने आज निरुपयोगी झाली आहेत. मामलेदार, कलेक्टर यांच्या कचेरीसमोर दररोज आठदहा मोर्चे येतात, पोलीस त्यांना योग्य वाटेल ती कारवाई करतात, ती झाली की संपली चळवळ, अशा मार्गांनी जनतेचा उत्साहभंग होतो, अवसानघात होतो... राष्ट्रध्वजावर काव्य म्हणणे सोपे आहे, पण ज्यांच्या जीवनात काव्य कधी शिरलेच नाही, त्या शेतकऱ्यांना त्याचे काय हो! दररोज शेकड्यांनी होणाऱ्या तथाकथित सत्याग्रहांतला हा आणखी एक नाही. हा गंभीर कायदेभंग आहे. त्याचे परिणाम भोगण्याची सत्याग्रहींची तयारी आहे. त्यांची वेदनाही तितकीच मोठी आहे.
कुठल्याही प्रकारचा संघर्ष करायची त्या काळात जोशींची कशी तयारी झाली होती याचे ही प्रतिक्रिया म्हणजे एक द्योतक आहे.
पुढे नेमके काय झाले ते स्पष्ट नव्हते. अगदी अलीकडेच माझ्या चाकणच्या एका भेटीत याबद्दल मी मामा शिंदे यांच्याकडे चौकशी केली असताना, “सुदैवाने मोर्ध्यात राष्ट्रध्वज जाळण्यात आला नाही. माझ्या प्रखर विरोधामुळे तो बेत बारगळला," असे त्यांनी सांगितले.
मोर्च्याला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. 'ह्या बामणाच्या मागे कोण जातंय!' अशीच सुरुवातीची प्रतिक्रिया होती. एक वरिष्ठ पक्षनेते म्हणाले होते, "भामनेर हा माझा भाग आहे. तेथून शेतकरी संघटनेच्या मोर्च्याला दहा लोकसुद्धा जमायचे जाहीत. जमले तर मी राजीनामा देन" देईन." पण प्रत्यक्षात ६,००० लोक मोर्च्यात व २,००० नंतरच्या सभेत सामील झाले! विशेष म्हणजे त्यात १,००० महिलादेखील होत्या. तसे पाहिले तर कांदा शेतकरी ह्या मोर्ध्यात थोडे होते; मुख्यतः भातशेती करणारे व आदिवासी जास्त होते. बहुधा त्यांनाच रस्ता नीट नसल्याची सर्वाधिक झळ पोचत होती. पण एकूण प्रतिसाद थक्क करणारा होता.
पुढे सरकारने हे काम हाती घेतले व संघटनेनेहा साराबंदा तहकूब केली. शासनाच्या नेहमीच्या कूर्मगतीने केव्हातरी काम पूर्णही झाले. अर्थात आज इतक्या वर्षांनीसुद्धा चाकणवांद्रे ह्या रस्त्याचा दर्जा अगदीच सुमार आहे.
रूढ अर्थाने विधायक कार्य म्हणता येईल असे जोशींचे हे शेवटचेच काम ठरले. एकूणच प्रचलित स्वरूपाच्या ग्रामविकासाच्या कार्याविषयी त्यांचे मत खूप प्रतिकूल बनत गेले होते. यानंतर त्यांनी शेतकरी आंदोलन हाच आपला एक-कलमी कार्यक्रम ठरवला व आयुष्यभर तो निर्णय कायम ठेवला.
जानेवारी १९८०पासून निर्यातबंदीमुळे पुन्हा एकदा भाव घसरू लागले. कांद्याला त्याच्या दाप्रमाणे क्विटलमागे रुपये ५० ते ७० असा किमान भाव मिळावा ह्या मागणीला चाकण बाजार समितीतील व्यापाऱ्यांनीसुद्धा पाठिंबा दिला होता. विक्रीसाठी कांद्याचा जेव्हा बाजारात लिलाव केला जाईल, तेव्हा ह्या भावापेक्षा कमी बोली असेल, तर आम्ही स्वतःच ती स्वीकारणार नाही,' असे त्यांनी जाहीर केले. वारकरीच्या ९ फेब्रुवारी १९८०च्या अंकात त्यांनी तसे एक पत्रकच प्रसिद्ध केले होते.
यावेळी आंदोलनाचे स्वरूप काय असावे ह्याबद्दल जोशींनी बऱ्याच विस्ताराने मांडणी केली होती. सुरुवातीलाच त्यांनी म्हटले होते की सध्या शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणूच नये; कारण एकदा तो बाजारात आणला, की मग परत तो आपल्या शेतावर नेता येत नाही, मिळेल त्या भावाला विकावा लागतो. त्याऐवजी आपल्या शेतावरच जिथे सावली असेल किंवा कोरडी जमीन आणि वर छप्पर असेल अशा जागी शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवावा; २०% खाद (कांद्यातील पाण्याचे खताच्या वापरामुळे वाढलेले प्रमाण) असेल तर किमान ५० रुपये क्विटल भाव मिळावा, व अजिबात खाद नसेल, म्हणजेच कांद्याचे ढीग उत्तम असतील, तर किमान ७० रुपये भाव मिळाला पाहिजे. तसा भाव मिळेल, तेव्हाच तो कांदा बाजारात आणावा.
अनेक शेतकऱ्यांना घेतलेली कर्जे फेडण्याची निकड लागलेली असते आणि त्यामुळे कांदा बाजारात आणण्याची ते घाई करतात. शेतकऱ्यांना कर्जाबद्दल सवलती देण्याच्या अनेक घोषणा झालेल्या आहेत. तेव्हा येत्या दोन-तीन महिन्यांत भांडीकुंडी उचलण्याच्या घटना घडणार नाहीत अशी अपेक्षा आहे. पण जर भांडीकुंडी जप्त करण्याचे वा जमिनीचे लिलाव पुकारण्याचे प्रयत्न झालेच, तर गावातील सर्व शेतकऱ्यांनी तोट्यात कांदा विकणे भाग पाडू नका अशी विनंती त्या अधिकाऱ्यास करावी. एवढे करूनही त्यानी आपला हेका कायमच ठेवला, तर सर्व शेतकऱ्यांनी आलेल्या अधिकाऱ्यास शांतपणे व संपूर्ण अहिंसात्मक मार्गाने 'घेराव' घालावा. अशा त-हेने सत्याग्रह करून शेतकऱ्यांनी आपला निर्धार दाखवला पाहिजे. निर्यातबंदी हटवावी म्हणून १ मार्च १९८०पासून शेतकऱ्यांनी चाकणमध्ये 'रास्ता रोको' सुरू केले. प्रत्यक्ष रस्ता अडवायचा प्रकार ह्या वेळी आंदोलनात प्रथमच घडला. तसे पाहिले तर ह्यापूर्वी अनेकदा बाजारात सतत पडणारे भाव पाहून जोशी बाजारपेठेसमोर भाषणे करत, कमी भावात कांदा न विकण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करत. काही जण त्यांचे म्हणणे मानत, काहींना आपल्या गरजेपोटी येईल त्या भावाने कांदा विकणे भाग पडे. आपल्या भाषणांचा काही परिणाम होत नाही हे पुन्हा पुन्हा पाहिल्यावर वैतागलेले जोशी म्हणत, "आपण सगळे चाकणवरून जाणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग अडवून धरू. तसे केले की सगळीकडे खळबळ माजेल व आपल्या मागणीची दखल घेणे सरकारला भाग पडेल. चला, तुम्ही सगळे या माझ्या मागे."
एवढे बोलून जोशी स्वतः चालू लागत. सुरुवातीला उत्साहाने ६०-७० शेतकरी त्यांच्या मागोमाग बाजारपेठेपासून हमरस्त्यापर्यंत यायला निघत. पण मग एकेक करत ते गळून पडत. कोणाला घरी जायची घाई असायची, कोणाला गावात उरकायचे दुसरे काही काम आठवायचे. खरे म्हणजे बहतेकांना अशा काही आंदोलनाची सवयच नव्हती. ते शासनाबरोबरच्या कुठल्याही प्रकारच्या संघर्षाला घाबरत. त्यापेक्षा आपल्या अडचणी सहन करणे व कसेतरी दिवस रेटून नेणे हेच पिढ्यानुपिढ्या त्यांच्या अंगवळणी पडले होते. जेव्हा महामार्गापर्यंत जोशी पोचत, तेव्हा जेमतेम सात-आठ जण जोशींसोबत उरलेले असत व इतक्या कमी जणांनी रस्ता रोखून धरण्याचा प्रयत्न करणे शक्यच नसायचे.
असे पूर्वी खूपदा झाले होते व त्यामुळे ह्या वेळेला तरी शेतकरी कितपत प्रतिसाद देतील ह्याविषयी साशंकता होती. पण गेल्या काही महिन्यांत शेतकरी संघटनेने बऱ्यापैकी जागृती केली होती. त्यामुळे त्या १ मार्चला चांगले चार-पाचशे शेतकरी घोषणा देत देत त्यांच्यामागे जाऊ लागले. सगळ्यांनी महामार्गावर येऊन रस्त्यावर बैठक मारली. दोन्ही बाजूंनी जाणारीयेणारी वाहने थांबली. जोरजोरात घोषणा सुरू झाल्या होत्या. वातावरण तंग झाले.
जवळ मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तयारच होता. वरून हुकूम येताच पोलिसांनी भराभर रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांना ओढत ओढत वाहनांमध्ये कोंबले. जे प्रतिकार करत होते त्यांना लाठ्यांचे तडाखे खावे लागले. पंधरा-वीस मिनिटांत रस्ता मोकळा झाला. एकूण ३६३ शेतकरी पकडले गेले; दुसऱ्या दिवशी त्यांना जामीनावर सोडण्यात आले. अर्थात आंदोलनाची तीव्रता कमी झाली नाही. ५ मार्चच्या आत शासनाने कांदाखरेदीच्या भावाबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास ५ मार्चपासून आपण आमरण उपोषण सुरू करू असे जोशींनी जाहीर केले.
शेवटी ५ मार्चच्या सकाळी सरकारने ५० ते ७० रुपये भावाने कांदा खरेदी करायचे जाहीर केले; पण प्रत्यक्षात मात्र त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. नाइलाजाने ८ मार्च रोजी जोशींनी आपले आयुष्यातले पहिले बेमुदत उपोषण सुरू केले.
लीलाताईंनाही त्यांनी त्याबद्दल काहीच कळवले नव्हते. त्यांना ते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पेपरात वाचल्यावर कळले. लीलाताई त्यामुळे खूपच नाराज झाल्या. त्यांनी लगोलग चाकणला धाव घेतली. 'मला न विचारता, न सांगता तुम्ही असं एकदम उपोषण सुरू करताच कसे?' हा त्यांचा स्वाभाविक प्रश्न होता. कशीबशी जोशींनी पत्नीची समजूत काढली. बऱ्याच वर्षांनंतर ह्या घटनेकडे मागे वळून बघताना जोशी म्हणाले,
"सेनापती स्वतः जेव्हा रणांगणात उतरतो, आपला स्वतःचा जीव पणाला लावतो, तेव्हाच त्याचे सैनिक स्वतः लढायला तयार होतात. त्या वेळी माझ्या पोटातली तिडीकच अशी होती, की तिथे बाजारात बसल्याबसल्याच मी बेमुदत उपोषण करायचं ठरवलं. हा काही खूप साधकबाधक विचार करून घेतलेला निर्णय नव्हता. त्यापूर्वी मी आयुष्यात कधीही उपोषण वगैरे काही केलं नव्हतं. घरातही मी एकदाही उपास वगैरे केलेला नाही. एका तिरीमिरीतच मी तो निर्णय घेतला व लगेच उपोषणाला बसलोसुद्धा. एका अर्थाने माझी ती सत्त्वपरीक्षा होती. स्वतःच्या जिवाची काहीही पर्वा न करता मी ह्या आंदोलनात पडलो आहे, ह्याची त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांची खात्री झाली. त्यानंतरही मी स्वतः जो धोका पत्करायला तयार नव्हतो, तो धोका पत्करायला मी माझ्या कार्यकर्त्यांना कधीही भरीस घातलं नाही. त्यांनी जे भोगलं ते सर्व मी स्वतःही त्यांच्याआधी भोगलं. त्यामुळेच हे शेतकरी आंदोलन उभं राहू शकलं."
जोशी यांचे उपोषण चालू असताना १० मार्च ते १६ मार्च निघोजे गावच्या शेतकऱ्यांनी एक अभिनव प्रकार केला. गावचे सरपंच वसंतराव येळवंडे यांचा त्यात पुढाकार होता. गावातले शंभरएक शेतकरी आपापल्या बैलगाड्या घेऊन छोट्या छोट्या गटांनी निघाले. साधारण दोन-तीन किलोमीटरचा तो रस्ता होता. वाटेत त्यांचे भजन-कीर्तन सारखे चालूच होते. आपण कुठल्यातरी लग्नाला वहाड घेऊन चाललो आहोत, असे त्यांनी इतरांना व पोलिसांना भासवले. रात्रीच्या काळोखात आपापल्या बैलगाड्या त्यांनी पुणे-नाशिक रस्त्यावर आणून उभ्या केल्या, त्या बैलगाड्यांना मारके बैल बांधले व 'रास्ता रोको' सुरू केले. ह्या शेतकऱ्यांचा उत्साह खूप मोठा होता. ह्या वृषभदलापुढे पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. त्यांना कसे हटवायचे व रस्ता मोकळा करायचा हे पोलिसांना कळेना. ह्या निघोजेकर मंडळींची आणखी एक भन्नाट कल्पना होती. हजार बैलगाड्या घेऊन असेच भल्या पहाटे पुण्यात शिरायचे आणि पुण्यातला सगळ्यात गर्दीचा असा अख्खा लक्ष्मी रोड बंद करून टाकायचा! त्याप्रमाणे आसपासचे शेतकरी चारेकशे बैलगाड्या घेऊन चाकणला दाखलदेखील झाले होते. पण आंदोलनात आणखी कटकटी निर्माण व्हायला नकोत, म्हणून कुणीतरी निघोजेकरांची कशीबशी समजूत घातली आणि हा अतिप्रसंग टाळला.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग बंद पडल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. हजारो ट्रक अडकून पडले होते. आंदोलनाचे पडसाद पार दिल्लीपर्यंत उमटले. १५ मार्च रोजी लोकसभेत शासनातर्फे निवेदन करण्यात आले, की नाफेडला रुपये ४५ ते ७० प्रती क्विटल ह्या दराने कांदा खरेदी करायचे आदेश देण्यात आले आहेत. संघटनेची मागणी बहुतांशी मंजूर झाली आहे म्हणून जोशींनी आंदोलन मागे घेतले. १६ मार्च रोजी अशा प्रकारे रस्ता रोकोची यशस्वी सांगता झाली व त्याचदिवशी जोशींनी आपले आदले आठ दिवस चालू असलेले उपोषण सोडले. ह्या आंदोलनाची वृत्तपत्रांनी बऱ्यापैकी दाखल घेतली; आधीच्या दोन आंदोलनांकडे त्यांनी तसे दुर्लक्षच केले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनाची प्रथमच राज्यभर चर्चा सुरू झाली.
'आम्ही कांदा खरेदी ३० जूनपर्यंत चालू ठेवणार आहोत, त्यामळे शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारपेठेत आणण्याची घाई करू नये. आपल्या घरीच तो नीट साठवावा, निवडावा आणि सोयीनुसार बाजारपेठेत आणावा, असे एक निवेदन नाफेडने काढले होते. किंबहुना वारकरीमध्ये अर्धे पान जाहिरात म्हणून ते प्रसिद्धही केले गेले होते. पण प्रत्यक्षात २३ एप्रिल रोजीच नाफेडने कांदाखरेदी बंद केली व त्याविरुद्ध जोशींनी आपले दुसरे बेमुदत उपोषण सुरू केले. ही घटना १ मेची.
३ मे रोजी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून जोशींना पोलिसांनी पकडले व पुण्याला ससून हॉस्पिटलला हलवले. जोशी यांच्या आठवणीप्रमाणे अजित निंबाळकर हे तेव्हा पुण्याचे कलेक्टर होते व आंदोलनात त्यांनी बरेच लक्ष घातले होते. हॉस्पिटलमध्ये जोशींना चांगली सेवा मिळेल याची त्यांनी तजवीज केली होती. पण वैद्यकीय उपचारांना जोशींनी साफ नकार दिला. “माझे उपोषण म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न नाही. त्यामुळे ज्या आरोपावरून मला पकडले गेले आहे, तो आरोप मुळातच अगदी चुकीचा आहे," असे त्यांनी कोर्टात सांगितले. त्या मुद्द्यावर पुढे बरेच महिने चर्चा होत राहिली.
यावेळी बरेच शेतकरी आपापल्या मालासह चाकणच्या बाजारसमितीसमोर ठिय्या देऊन होते, जोशींच्या आदेशाप्रमाणे त्यांनी माल विकला मात्र नव्हता. एक दिवस दुपारी अचानक हवा पावसाळी झाली. पाऊस सुरू झाला तर कांदा भिजेल, त्याचा चिखल होईल व सगळा माल अक्षरशः पाण्यात जाईल अशी भीती साहजिकच काही शेतकऱ्यांना वाटली. आंदोलन फोडायला उत्सुक असलेले काही फितूर होतेच. त्यांनी 'कशाला या जोशींच्या नादी लागता! आत्ताची वेळ येईल त्या भावाला कांदा विकून टाकू, मग पुढच्या वेळेला बघू आंदोलनाचं काय करायचं ते, अशी कुजबुज सुरू केली. बरेच शेतकरी गोंधळात पडले. सच्चे कार्यकर्ते जोशींच्या मागे होते. पण मालाचे नकसान होईल ही भीती त्यांनादेखील होतीच, शेतकरी संघटनेच्या दृष्टीने हा अगदी कसोटीचा क्षण होता.
अशावेळी लीलाताई आंदोलनाच्या स्थळी आल्या. आल्या-आल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली की, "एवढा आजचा दिवस आम्हाला आमचा कांदा विकून टाकायची परवानगी द्या. पुढच्या वेळेला आम्ही शेवटपर्यंत कळ काढू."
त्यावेळी चाकण बाजारपेठेत जमलेल्या शेतकऱ्यांसमोर लीलाताईंनी खूप झुंझार भाषण केले. त्या म्हणाल्या,
"ज्या कोणाला आपला कांदा विकावा असं वाटत असेल, त्याने तो खुशाल विकावा. पण सर्वच्या सर्व शेतकऱ्यांनी जरी हे आंदोलन सोडायचं ठरवलं, तरी ह्या कामासाठी माझ्या नवऱ्याने सुरू केलेलं उपोषण त्याने सोडावं असं मी मुळीच म्हणणार नाही! माझ्या कुंकवाचा बळी पडला तरी चालेल, पण मी आता माघार घेणार नाही. इतकंच नव्हे तर माझा नवरा, मी, आमची गाडी, आमचे दोन बैल, आणि आमचा डॅश कुत्रा ह्या रस्त्यावर बसू आणि आम्ही हे आंदोलन असंच पुढे चालवू.'
लीलाताई जेव्हा आंदोलनस्थळी आल्या व त्यांनी भाषण करावे अशी काही जणांनी त्यांना विनंती केली, तेव्हा त्या मंडळांची अपेक्षा अशी होती, की त्या साहेबांचा जीव वाचावा म्हणून, तात्पुरती का होईना पण, आंदोलनाला स्थगिती देतील आणि मग आपला कांदा आपण येईल त्या भावाला नेहमीप्रमाणे विकून मोकळे होऊ. पुढचे पुढे. प्रत्यक्षात उलटेच काहीतरी घडले. समोर शेकडो शेतकरी स्त्रियाही उपस्थित होत्या व लीलाताईंच्या भाषणाने त्या अगदी पेटून उठल्या. त्यांतील एक उत्स्फूर्तपणे उभी राहिली व म्हणाली,
"माझं कुंकू पुसलं गेलं तरी हरकत नाही, पण आता मी माघार घेणार नाही, असं आत्ता साहेबांच्या बाई म्हणाल्या. त्या जर एवढ्या मोठ्या त्यागाला तयार असतील, तर मग मीही आता मागे हटणार नाही. बाकी पुरुष शेतकरी भले पळून जावोत, आम्ही शेतकऱ्यांच्या बाया आता हे रास्ता रोको चालूच ठेवू. ही लढाई आम्ही लढतच राहू. आमचं जे काय व्हायचं असेल ते होऊन जाऊ दे."
बायकांनी घेतलेला हा अनपेक्षित पुढाकार पाहून मग सगळेच शेतकरी पुन्हा एकदा रास्ता रोको करायला पुढे झाले. सगळेच वातावरण एकदम बदलून गेले. त्वेषाने जोरजोरात घोषणा सरू झाल्या. नाफेडच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांनी बाजार समितीतल्या त्यांच्या कार्यालयातच कोंडले. आंदोलनाची तीव्रता एकदम वाढली. सरकारी अधिकारी व हजर असलेले पोलीसही गांगरून गेले. शेतकऱ्यांच्या निर्धारापुढे मग सरकारी यंत्रणेला झुकावे लागले.
लीलाताईंचे ते वीरश्रीपूर्ण भाषण म्हणजे कांदा आंदोलनातील एक नाट्यपूर्ण व निर्णायक क्षण होता. शिवकाळात कोंढाणा किल्ला सर करताना शेलारमामाने जी भूमिका बजावली होती व आपल्या पळून जाणाऱ्या मावळ्यांना चेतवून पुन्हा एकदा लढाईसाठी सज्ज केले होते, तशीच काहीशी भूमिका ह्या वेळी लीलाताईंनी बजावली होती. मामा शिंदे व त्या रोमांचक क्षणाचे साक्षीदार असलेले त्यावेळचे चाकणमधील इतरही काही कार्यकर्ते आजही ही आठवण पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात.
शेवटी नाफेडचे पाटील नावाचे एक अधिकारी चाकणला आले व त्यांनी वाटाघाटी करून क्विटलला ५० ते ६० रुपये हा भाव मान्य केला. हा विजय मोठा होता; कारण त्या वेळी कांद्याचा भाव १५ रुपये क्विटलपर्यंत कोसळला होता. त्यामुळे मग ६ मे रोजी, सहाव्या दिवशी, जोशींनी आपले हे दुसरे उपोषण सोडले.
निर्यातबंदी घालणे व आंदोलन तीव्र झाले तर ती तेवढ्यापुरती उठवणे हे एक दुष्टचक्रच सुरू झाले होते. ह्याचीच पुनरावृत्ती पंधरा दिवसांनी झाली. २८ मे १९८० रोजी खेड तालुक्यातील विधानसभेची निवडणूक होणार होती. सगळीकडे धामधुमीचे वातावरण होते. पण त्याचवेळी चाकणच्या बाजारपेठेत मात्र शेतकरी खूप काळजीत होते. ह्यावेळी नाफेडने वरकरणी खरेदी चाल ठेवली होती, पण प्रत्यक्षात ते कांदा खरेदी करत नव्हते; काही ना काही कारण दाखवून आलेला कांदा परत पाठवत होते.
शनिवार, २४ मेची दुपार. मोठ्या संख्येने कांद्याचे ढीग लिलावासाठी बाजारसमितीच्या आवारात पडून होते पण नाफेडतर्फे त्यातले फक्त दहा टक्के ढीग खरेदी केले गेले; बाकीचे 'रिजेक्ट' म्हणून तसेच पाडून ठेवले गेले. त्या 'रिजेक्ट' ढिगांचे काय करायचे ह्या काळजीने शेतकरी हवालदिल झाले होते. दिवसभरात जोशी यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली, पुण्याला जाऊन ते मुद्दाम कलेक्टरनाही भेटून आले. 'उद्या रविवार असूनही खरेदी चालू ठेवू व उद्या व्यवस्थित व्यवहार होईल' असे आश्वासन त्यांनी मिळवले.
त्यानुसार रविवारी पुन्हा खरेदी चालू झाली. पण ढीग नाकारण्याचे प्रमाण तेच कायम होते. उदाहरणार्थ, बाजीराव शिंदे या दलालाच्या गाळ्यासमोर कांद्याचे ४२ ढीग होते, पण त्यांपैकी नाफेडने फक्त एक ढीग खरेदी केला. इतर दलालांच्या गाळ्यांसमोरही साधारण हेच प्रमाण होते. शंकरराव वाघ, बाबूलाल परदेशी व जोशी सतत बाजारपेठेत फिरत होते. शेतकरी त्यांच्यापाशी मोठ्या प्रमाणावर तक्रारी घेऊन येऊ लागले. नाकारलेले ढीग का नाकारले गेले याची माहिती व्यवस्थित भरून घेण्यासाठी शेतकरी संघटनेने काही फॉर्म छापून घेतले होते. त्यात ती माहिती भरली जात होती. एकूण २०० अर्ज छापून घेतले होते व ते सर्व भरले गेले. शेवटी कोऱ्या कागदावर ही माहिती भरून घ्यायला संघटनेने सुरुवात केली. तसे कोऱ्या कागदावरचेही ४५० अर्ज भरले गेले, पण तरी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी एवढी होती, की त्यांचे आता काय करायचे हा प्रश्नच होता.
लांबलांबचे शेतकरी इथली कांद्याची बाजारपेठ मोठी, म्हणून मुद्दाम आपला माल इथे घेऊन येत. असेच अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील काही शेतकरी २५ दिवसांपूर्वी आले होते, पण अजूनही त्यांचा कांदा विकत घेतला गेला नव्हता. ते शेतकरीही रस्त्यावरच मुक्काम ठेवून होते. एव्हाना त्यांचा धीर पार खचला होता. बाजारसमितीत येऊन ते अक्षरशः रडायलाच लागले. ते म्हणत होते, "आमच्या कांद्याकडे कोणीच ढुंकून पाहत नाही. तीन आठवडे झाले आम्ही इथे बसून आहोत. आम्हाला कोणीच वाली नाही. काहीही करा पण आता आमचा निर्णय लावा."
पण नाफेडच्या अधिकाऱ्यांवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. 'उद्यापासून व्यवस्थित व्यवहार होईल' हे त्यांचे आश्वासन फक्त तोंडदेखलेच होते. एक ढीग असा होता, की त्याची खरेदी ६० रुपये क्विटल दराने व्हायला हवी होती. पण तो ढीगही नाफेडच्या अधिकाऱ्यांनी नामंजूर केला. जोशी स्वतः त्यावेळी ढिगाजवळ उभे होते व त्यांनी स्वतः तपासून तो ढीग उत्तम असल्याचे सांगितले. पण अधिकारी ऐकेनात. ही म्हणजे जणू उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संघटनेच्या बाजूने व नाफेडच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली व लिलाव बंद पाडला. शेतकरी तसेच पुणे-नाशिक महामार्गावर आले, मोठ्या प्रमाणावर रस्त्यालगतचे दगड गोळा करून त्यांनी ते रस्त्यात ठेवले व त्यांनी स्वतःही तिथेच बसकण मारली. पुन्हा एकदा रास्ता रोको सुरू झाले.
आता कुठलेच वाहन आरपार जाणे शक्य नव्हते. एव्हाना आंदोलकांची संख्या चारपाच हजाराच्यावर गेली होती. गंमत म्हणजे अडकलेल्या वाहनांमध्ये एक वाहन होते मुंबईचे झुंजार कामगारनेते व आमदार डॉ. दत्ता सामंत यांचे. एका प्रचारसभेसाठी त्यांना मंचरला जायचे होते, पण त्यांना पुढे जाता येईना. चालत चालत ते आंदोलकांपाशी गेले व तिथला माइक घेऊन त्यांनी "कामगारवर्ग लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील" असे ठणकावून सांगितले. त्यानंतर जोशींच्या सांगण्यावरून त्यांच्या वाहनाला तेवढी वाट मोकळी करून दिली गेली. दोन दिवसांनंतर होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालायचे सभेत ठरले. बघता बघता संध्याकाळचे पाच वाजले.
महामार्ग बंद पडल्याने वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली होती. दरम्यान बराच मोठा फौजफाटा घेऊन पोलीस घटनास्थळी हजर झाले. आंदोलकांना त्यांनी चारी बाजूंनी वेढले. बाबूलाल परदेशी त्यावेळी भाषण करत होते. एक इन्स्पेक्टर पुढे झाला व त्याने त्यांच्या हातातला माइक हिसकावून घेतला. पण तेवढ्यात जोशींनी तो ओढून आपल्या हातात घेतला व ते बोलायचा प्रयत्न करू लागले. समोर जमलेल्या शेतकऱ्यांना उद्देशून त्यांना काहीतरी आवाहन करायचे होते. पण ते काही बोलायच्या आतच त्या इन्स्पेक्टरने त्यांच्याही हातातला माइक हिसकावून घेतला व सर्व आंदोलकांना अटक करण्यात येत आहे' असे जाहीर केले. 'आम्ही इथून हलणारच नाही, तम्ही काय वाटेल ते करा,' असे म्हणत जोशींनी व इतर कार्यकर्त्यांनी रस्त्यातच बसकण मारली. ते ऐकेनात म्हणून शेवटी एकेक करत त्यांना चार-चार पोलिसांनी उचलले व एका पोलीस गाडीत कोंबले. आंदोलकांना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच एसटी बसेस व दोन मोठ्या पोलीस गाड्या तयार ठेवल्या होत्या. त्यात सगळ्यांना कोंबण्यात आले व गाड्या तिथून निघाल्या. पोलिसांनी जोशींना व त्यांच्याबरोबर एकूण ३१६ आंदोलनकर्त्यांना अटक केली.
रात्री दहा वाजता चाकणमध्येच त्यांना मॅजिस्ट्रेटसमोर उभे केले गेले. आधी असे वाटले होते, की त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून दुसऱ्या दिवशी सोडून दिले जाईल. पण ह्यावेळी शासनाने ताठर भूमिका घेतली होती. १७ फेब्रुवारीपासूनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. सगळ्यांना १० दिवसांचा रिमांड दिला गेला. जोशींना इतर सात कार्यकर्त्यांसह औरंगाबाद येथील तुरुंगात डांबण्यात आले. इतरांची रवानगी वेगवेगळ्या तुरुंगांत केली गेली. त्या कारावासातील अनुभवावर आधारित 'सजा-ए-औरंगाबाद' नावाची एक रसाळ लेखमाला वारकरीमध्ये (१२ जुलै ते १३ सप्टेंबर १९८०) बाबूलाल परदेशी यांनी लिहिली होती.
आंदोलकांना ह्यावेळी पोलिसांचा चांगला अनुभव आला. बरेचसे पोलीस म्हणजे स्वतः शेतकऱ्यांची मुले होती. शेतकऱ्यांच्या मागण्या अगदी न्याय्य आहेत, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे कदाचित त्यांच्या मनात आंदोलनकर्त्याविषयी काहीशी सहानुभूती होती. सर्वांत चांगला अनुभव आला तो औरंगाबाद जेलच्या प्रमुख जेलरचा. त्यांनी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितले, "तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत आहात. कैद्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला वागवणार नाही. ह्या जेलमध्ये ए किंवा बी दर्ध्याच्या कैद्यांची सोय नाही, त्यामुळे तुम्हाला सर्वसाधारण कैद्यांप्रमाणेच राहावं लागेल. परंतु आमच्याकडून शक्य होतील तितक्या सगळ्या सोयी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ." त्यानंतर जेलरसाहेब म्हणाले, "माझ्या स्वतःच्या तीन एकर शेतातला कांदा अजून शेतात पडून आहे. कांद्याला असाच कमी भाव मिळत राहिला तर मलाही खरोखरच ही शेती परवडणार नाही."
जेलरसाहेबही समदःखीच निघाले!
पण असा अनुभव यायचा हा शेवटचाच प्रकार; त्यानंतर मात्र प्रत्येक आंदोलनाच्या वेळी पोलीस शेतकऱ्यांना खूप क्रूरपणे झोडपून काढत.
३ जून रोजी रिमांडचे दहा दिवस पूर्ण होत होते. सगळ्यांना खेड तालुका कोर्टात हजर केले गेले. आंदोलकांच्या वतीने अॅडव्होकेट साहेबराव बुटे व दोन-तीन सहकारी वकिलांनी काम पाहिले. आमदार राम कांडगे हेदेखील काही मदत लागली तर ती करायला तिथे हजर होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास दहा दिवसांच्या रिमांडमधून सगळ्यांची जामिनावर सुटका झाली. कांदा आंदोलन चालू असताना जोशी नेहमी शिवकाळाचा संदर्भ देत. तीनशे वर्षांपूर्वी जगाच्या दृष्टीने नगण्य असलेल्या मावळ्यांनी चाकणला इतिहास घडवला. स्वराज्याची लढाई झाली नसती तर कित्येक तानाजी, बाजीप्रभू, येसाजी आणि सावळ्या तांडेल जगाला अज्ञात राहिले असते. त्याचप्रमाणे शेतकरी आंदोलन झाले नसते तर इथले बाबूलाल परदेशी किंवा शंकरराव वाघ यांच्यासारखे हिरे समुद्राच्या तळातल्या रत्नांप्रमाणे अज्ञातच राहिले असते. ह्या सर्व कालखंडात हे दोघे जोशींचे जणू दोन हातच बनले होते. पुढेही अनेक वर्षे त्यांनी आंदोलनात अत्यंत इमानी अशी आणि सन्मानाची कुठलीही अपेक्षा न ठेवता जिवाभावाची साथ दिली. या काळात मामा शिंदे यांचीही खूप मदत झाली. बाकीचे तुरुंगात असताना शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवायचे मोठे काम त्यांनी केले.
शेतकरी संघटनेने आंदोलनासाठी प्रथम कांदा हे पीक निवडले हा कदाचित धोरणपूर्वक घेतलेला निर्णय नसेल व त्यामागे मुख्यतः परिस्थितीचाच रेटा असेल, पण ती निवड अगदी अचूक ठरली हे नक्की. सबंध देशामध्ये त्यावेळी कांद्याचे जे पीक येई, त्यापैकी ६० ते ७० टक्के कांदा एकट्या महाराष्ट्रात व्हायचा व त्यापैकी ५० टक्के कांदा हा नाशिक व पुणे जिल्ह्यांच्या फक्त पाच तालुक्यांत व्हायचा. म्हणजे देशातला जवळजवळ एक तृतीयांश कांदा ह्या पाच तालुक्यांत होत होता. एवढ्या सीमित भूभागात इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या पिकाचे उत्पादन एकवटले आहे, असे एरव्ही दिसत नाही. बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्याचे आंदोलकांचे सामर्थ्य उघड होते. कुठल्या शेतीमालाचे आंदोलन कुठे परिणामकारक होऊ शकते ह्याचेही एक भान ह्या आंदोलनाने दिले. जोशींच्या मते विशिष्ट किमतीखाली कांदा विकायचाच नाही हा निर्धार इथल्या शेतकऱ्यांनी केला, तर देशभरच्या ग्राहकांना कांदा अधिक पैसे देऊन खरेदी करावा लागेल, आंदोलनाचे पडसाद देशभर उमटतील; इतरही शेतकरी असेच आंदोलन उभारू शकतील आणि कांद्याचा लढा ही देशभरातील शेतकरी क्रांतीची सुरुवात ठरू शकेल.
व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर, आपला शेतीमालाला रास्त दाम' हा एक-कलमी कार्यक्रम शतकानुशतके विस्कळित राहिलेल्या, दबलेल्या, पिचलेल्या शेतकरी समाजाला एकत्र आणू शकतो, त्यांनाही आंदोलनासाठी उभे करू शकतो ह्याचा आत्मविश्वासदेखील जोशींना या कांदा आंदोलनाने दिला. शेतकरी संघटनेचे हे पहिलेच आंदोलन. संघटनेचे सामर्थ्य या आंदोलनात सिद्ध झाले.
ह्या आंदोलनात प्रथमच जोशी यांनी रास्ता रोको किंवा उपोषण ह्यांसारखी हत्यारे वापरली. अशा प्रकारचे आंदोलन हा त्यांच्यासारख्या एकेकाळच्या वरिष्ठ सनदी नोकराचा पिंडच नव्हता. शिवाय ते एक अभ्यासकही होते व अशा प्रकारचे आंदोलन हा एखाद्या अभ्यासकाचाही पिंड नव्हे. जोशी यांच्या पूर्वायुष्याकडे पाहता असे काही त्यांच्या भावी आयुष्यात घडू शकेल ह्याचा अदमास कुणीच बांधू शकले नसते, इतके हे आंदोलन त्यांच्या व्यक्तित्वाशी विसंगत होते. 'शेतकरी संघटना हा माझ्या आयुष्यातील एक अपघात आहे,' असे स्वतः जोशी पुढे अनेकदा म्हणाले.
पण हे घडून आले खरे. त्यांच्यासारखा एक गंभीर विचारवंत एक कडवा आंदोलक बनला तो ह्याच काळात. त्यांच्या भावी कार्याची ही नांदी होती. याच पहिल्या ठिणगीतून बघता बघता एक वणवा भडकणार होता.
स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केला तर इतके यशस्वी शेतकरी आंदोलन दुसरे कुठले झाल्याचे दिसत नाही. कांदा आंदोलनाचे हे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे.
◼
६
उसाचे रणकंदन
“Journey of a thousand miles begins with the first step” (हजार मैलांच्या प्रवासाची सरुवात एका पहिल्या पावलाने होते) हे रशियन क्रांतिकारक लेनिनचे उद्गार प्रसिद्ध आहेत. चाकण येथील कांदा आंदोलन हेदेखील एक मोठ्या प्रवासाचे केवळ पहिले पाऊल आहे ह्याची शरद जोशी यांना हळूहळू जाणीव होत गेली. कारण सगळ्याच शेतकऱ्यांची दुःखे इथूनतिथून सारखीच आहेत हे उघड होत गेले.
ठिकठिकाणचे शेतकरी 'वारकरी'कडे पाठवत असलेल्या पत्रांवरूनदेखील ही गोष्ट अगदी स्पष्ट होत होती. वेळात वेळ काढून जोशी त्यांतील निवडक पत्रांना उत्तरेही लिहीत असत. त्यासाठी रात्रीची झोप त्यांनी शक्य तितकी कमी केली होती. कारण पत्रव्यवहार सांभाळायला त्यांच्याकडे दुसरा कोणी कर्मचारी नव्हता. कार्यकर्ते होते, पण ते तसे लिखापढी करणारे नव्हते. सगळी पत्रे जोशी स्वतःच लिहीत व तीही हाताने. पण त्यात ते कधी कंटाळा करत नसत, कारण ह्या साध्या साध्या पत्रांतूनच अंगारमळ्यातील अंगार इतर ठिकाणीही जाऊन पोचणार होता याची त्यांना खात्री होती. असेच एक पत्र त्यांनी एका सकाळी पत्रपेटीत टाकले. ते होते, निफाडचे एक तरुण तुकाराम निरगुडे पाटील यांना. त्यांच्या त्याच दिवशी आलेल्या एका पत्राचे उत्तर म्हणून. त्या पत्रामागची उत्कटता कुठेतरी जोशी यांना स्पर्शून गेली होती.
चाकण परिसरातील कांद्याइतकाच शेजारीच असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत बाजारपेठेतला कांदाही खूप प्रसिद्ध होता. तेथील शेतकरीही मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवत आणि साहजिकच चाकणच्या आंदोलनाकडे तेही डोळे लावून बसले होते. त्यांच्यापैकीच एक होते निरगुडे. निफाड सहकारी साखर कारखान्यात ते कारकुनी करत. शेतीवाडी गावाला होती. राहायला कारखान्याच्या कॉलनीतच जागा होती. संध्याकाळी खोलीवर आल्यावर मिळतील तेवढे सगळे रोजचे पेपर वाचायचा त्यांचा प्रघात होता. असेच एका संध्याकाळी त्यांनी चाकणच्या कांदा आंदोलनाबद्दलचा एक सविस्तर वृत्तान्त वाचला. वाचून ते अगदी भारावून गेले. 'कसेही करून ह्या शरद जोशींना भेटले पाहिजे, त्यांच्या मनाने घेतले. पण भेटणार कसे? ओळखपाळख काहीच नव्हती. पण भेटायचा विचार पिच्छा सोडेना. झोपही येईना. शेवटी न राहवून रात्री बारानंतर ते उठले. कोणाकडून तरी आंतर्देशीय मिळवून त्यांनी एक पत्र लिहिले – 'मी तुम्हाला भेटायला येऊ इच्छितो.' अंदाजानेच शरद जोशी, शेतकरी संघटना, चाकण' असा पत्ता लिहिला आणि सकाळी ते पत्र टपाल पेटीत टाकले. आश्चर्य म्हणजे लगोलगच उत्तरही आले! 'प्रत्यक्ष येऊन भेटावे व चर्चा करावी.'
दुसऱ्याच दिवशी निरगुडे बरोबर भाकऱ्या बांधून नाशिकला गेले व पुण्याच्या एसटीत बसले. 'भेट वादळाशी' ह्या शीर्षकाखालील एका लेखात त्यांनी ह्या पहिल्या भेटीचे रसाळ वर्णन केले आहे. (मा. शरद जोशी अमृतमहोत्सव स्मरणिका, २००९, पृष्ठ १२५)
कारखाना व घर हा परिसर सोडून त्यापूर्वी निरगुडे कुठेच गेले नव्हते; अगदी चाकणलाही नाही. बस कंडक्टरला 'चाकण आले की मला नक्की सांगा' असे सांगून, बस तिथे पोचल्यावरही दोन-चार जणांना विचारून खात्री करून घेत ते उतरले आणि बरीच विचारपूस करत कसेबसे संघटनेच्या कार्यालयात पोचले. आत बाबूलाल परदेशी एकटेच होते. त्यांचे जोशींबरोबर पूर्वीच बोलणे झाले असावे. थोड्याच वेळात जोशी आले. त्यांना पाहताच निरगुडे गांगरले, पण जोशींनी हसतमुखाने त्यांच्याशी बोलून त्यांना आश्वस्त केले. 'चला माझ्याबरोबर,' जरा वेळाने जोशी म्हणाले. कुठे, कशाला काही नाही.
लगेच निरगुडे उठले. बरोबर बांधून आणलेली भाकऱ्यांची पुरचुंडीदेखील घाईघाईत ते बसलेल्या बाकड्याखालीच विसरले! जोशींनी झटक्यासरशी आपली बुलेट सुरू केली. निरगुडे मागे बसले. त्या काळात जोशी खूप वेगात गाडी हाकत. बघताबघता गाडी हायवेला लागली. निरगुडे लिहितात, "माझ्या आयुष्यात इतक्या वेगाने मोटार सायकल चालवणारा अद्यापतरी कोणी भेटलेला नाही.”
दोघे सरळ पुण्याला जोशींच्या औंधमधील घरी गेले. गप्पा सुरू झाल्या. आपल्या आंदोलनात ह्या पोरसवदा तरुणाचा उपयोग होऊ शकेल, ह्याच्यात काहीतरी वेगळी चमक आहे, हे जोशींना बहुधा जाणवले होते. किंबहुना म्हणूनच त्यांनी तत्परतेने पत्रोत्तर पाठवून निरगुडेंना बोलवून घेतले होते. त्या दृष्टीने त्यांची जुळणी सुरू होती. ते नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांची नेमकी माहिती काढू पाहत होते. निरगुडे त्या रात्री जोशी परिवाराबरोबरच जेवले व राहिलेही. ते लिहितात,
सर्व कुटुंबासह आणि डायनिंग टेबलावर असा मी आयुष्यात प्रथमच जेवत होतो. आग्रह होत होता. मी नको नको म्हणत कसबसा घाबरतच जेवत होतो...त्या रात्री झोप येणं शक्य नव्हतं. मनात विचार चालू होते. ही मोठी माणसं, त्यांच्या सहवासात आपण चुकून आलो. त्यांचं जग वेगळं, आपलं वेगळं. उद्या सकाळी उठून चहा न घेताच इथून एकदाचं पलायन करायचं.
पण प्रत्यक्षात पुढले तीन दिवस जोशींनी त्यांना स्वतःबरोबरच आपल्या प्रवासात सतत ठेवून घेतले. संघटनेच्या आळंदी येथील सभेला निरगुडे त्यांच्याबरोबरच हजर राहिले. किंबहुना त्यांनी स्टेजवर बसावे असा जोशी यांचा आग्रह होता; पण संकोचाने निरगुडेंनी तो मानला नाही. जोशी यांच्या तेथील भाषणाविषयी निरगुडे लिहितात,
मी समोर प्रेक्षकांत बसून एकाग्रतेने तल्लीन होऊन ऐकत होतो. त्यांनी शेतकरी महिलांवर बोलायला सुरुवात केली. मी भान विसरून ऐकत होतो. मला एकाएकी भरून आलं. इतकंच नाही तर अक्षरशः दुःखाश्रू आवरेनासे झाले. कारण साहेब माझ्या आईच्या भोगाचं दुःखच सांगत असल्याचा मला भास होत होता. माझ्या आईने पाठीशी पोर बांधून, डोक्यावर पाटी घेऊन, शेतामातीत व चुलीजवळ कष्टाचे जे कढ सोसले तेच साहेब सांगत होते. जगात सुख काय असतं हे माहीत न होताच आई देवाघरी गेली होती. त्या भाषणाने मी व्याकूळ झालो.
निरगुडेंनी पाहिलेली संघटनेची ही पहिलीच सभा होती. दुसऱ्या दिवशी नारायणगाव येथे व तिसऱ्या दिवशी मंचर येथे झालेल्या संघटनेच्या सभांनाही जोशी त्यांना बरोबर घेऊन गेले. संघटनेचे काम म्हणजे नेमके काय आहे हे निरगुडेंच्या आता पूर्ण लक्षात आले होते. त्या तीन रात्री त्यांचा मुक्काम चाकणजवळील शंकरराव वाघांच्या मळ्यातील घरी होता. जोशींना फक्त एकदा थोड्या वेळासाठी भेटावे ह्या माफक अपेक्षेने, राहण्याचे काहीही सामान बरोबर न घेता आलेले निरगुडे शेवटी चौथ्या दिवशी निफाडला परतले! त्यांना निरोप द्यायला शंकरराव व जोशी स्वतः एसटी स्टँडवर आले होते. ह्या तीन दिवसांत नाशिकला संघटनेचा कार्यक्रम घेण्याविषयी जोशी त्यांच्याशी चर्चा करत होते. त्याविषयी निरगुडे स्वतः खूपच साशंक होते. कारण आपण खूप छोटे आहोत, आपले कोण ऐकणार, असे त्यांना वाटत होते. तरीही त्यांनी 'आपण नक्की नाशिकला कार्यक्रम करू' असे आश्वासन दिले.
जोशी यांचे आडाखे अचूक होते; त्यांची पेरणी फुकट गेली नाही. पुढे निरगुडेंनी आंदोलनात महत्त्वाचे योगदान दिले. ते काम करत होते त्या निफाड साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव बोरास्ते ह्यांची. तसेच. पढे शेतकरी संघटनेत खप प्रभावी नेतत्व दिलेले माधवराव खंडेराव मोरे ह्यांची जोशींबरोबरची पहिली भेट त्यांनीच घडवून आणली. एका अर्थाने ऊस आंदोलनात ते संप्रेरक (catalyst) ठरले. त्यांच्यात एक कलावंतही दडलेला होता. जोशींवर चित्रपट काढायची त्यांची योजना होती व त्यासाठी पटकथाही त्यांनी लिहिली होती. शेतकरी संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
पण हा सारा नंतरचा भाग झाला; जोशी यांनी सुरुवातीच्या काळात चाकण परिसरापलीकडे जाऊन माणसे कशी जोडली, त्यासाठी किती कष्ट घेतले, किती विचारपूर्वक नियोजन केले ह्याचे हे एक उदाहरण.
संघटनेच्या आळंदी येथील शिबिराविषयी इथे लिहायला हवे. कारण शेतकरी संघटनेचे हे पहिलेच शिबिर असल्याने त्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. रविवार, ६ एप्रिल १९८० रोजी सकाळी सुरू झालेले हे शिबिर सोमवार, ७ एप्रिलच्या रात्री संपले. नंतरच्या संघटनेच्या शिबिरांमध्ये बाहेरच्या तज्ज्ञांना फारसे स्थान कधी मिळू शकले नाही; पण हे पहिले शिबिर मात्र त्या बाबतीत वेगळे होते. पहिल्या सकाळी आपल्या प्रास्ताविक भाषणात जोशींनी शेतकरी संघटनेचा पुढील अष्टसूत्री कार्यक्रम स्पष्ट केला :
- देशातील दारिद्र्य हे सर्वप्रथम ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे दारिद्र्य आहे. शहरातील गरिबी हा केवळ ग्रामीण दारिद्र्याचा एक परिणाम आहे.
- शेतकऱ्याचे दारिद्र्य हे सर्वस्वी कोरडवाह शेतकऱ्याचे दारिद्र्य आहे. ३. कोरडवाहू शेतकऱ्याचे दारिद्र्य सतत वाढत आहे. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याची परिस्थिती खपच खालावली आहे.
- ह्या दारिद्र्याचे कारण हे, की शेतीमालाला नेहमीच अपुरा भाव मिळतो व शेतकऱ्याचा उत्पादनखर्चसुद्धा भरून निघत नाही.
- कोरडवाह शेतीचा खर्च पावसाच्या अनिश्चिततेमळे फार वाढतो. उलटपक्षी हंगामी पावसावर काढलेली सर्व पिके एकदम बाजारात येतात आणि सुगीनंतर सर्व शेतीमालाचे भाव कोसळतात.
- या परिस्थितीचा फायदा घेऊन इंग्रजांनी देशाचे शोषण केले. 'कच्चा माल स्वस्तात
स्वस्त, पक्का माल महागात महाग' हे त्यांचे वसाहतवादी सूत्र. स्वातंत्र्यानंतरच्या काळात राज्यकत्यांना हीच पद्धत चालू ठेवली. भारतावर इंडियाने अंमल बसवला. शेतीमालाचे विविधीकरण, त्याच्या साठवणाची व्यवस्था, शेतीमालावरच्या प्रक्रियेचे उद्योगधंदे, शेतीमालाच्या किमान भावाची हमी अशा कार्यक्रमांऐवजी शहरी नोकरशाहीचा लाभ करून देणारे कार्यक्रम सरकारने राबवले.
- दीन शेतकऱ्याची आज तथाकथित विधायक मार्गाने जाण्याची ताकद नाही. त्याला तेवढा अवसरही नाही. संघटित लढा हा एकच मार्ग आज त्याला उघडा आहे.
जोशीनंतर सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ वि. मा. कुलकर्णी बोलले. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात ते 'विकास पत्रकारिता' हा विषय शिकवत. मूळचे ते चाकण परिसरातील कडूस ह्या गावचे. त्यांनी पायवाट नावाचे एक साप्ताहिक सुरू केले होते व अतिशय निष्ठेने जवळजवळ एकहाती ते चालवले होते. ग्रामीण भागाकडे कायम होणारे दुर्लक्ष व ग्रामीण अर्थव्यवस्थेची हेळसांड ह्यावर त्यांचा भर होता.
डॉ. मो. वि. भाटवडेकर हे आंतरराष्टीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ स्वतःहन अगत्याने शिबिराला हजर राहिले होते. कुलकर्णी यांच्यानंतर ते बोलले. 'अर्थविकास आणि जागृती' हा विषय त्यांनी घेतला होता. उत्पादन वाढले म्हणजे शेतकऱ्याची स्थिती सुधारते का, ग्रामीण भारताची हेळसांड हेतूतः झाली की अजाणतेपणी आणि विकास आधी की जागृती आधी ह्या तीन प्रश्नांचा त्यांनी ऊहापोह केला. हे तिन्ही मुद्दे तसे नावीन्यपूर्ण होते व त्यांवर भाषणानंतर बरीच चर्चा रंगली.
दुपारी शेतकरी संघटनेने चालवलेल्या सध्याच्या लढ्याविषयी व संघटना उभारण्याविषयी चर्चा झाली. प्रत्यक्ष व्यवहारातील बाबींवर त्यात भर होता. रात्री जेवण झाल्यानंतर राष्ट्रीय समता मंचाच्या कार्यकर्त्यांनी गाण्याचा रसाळ कार्यक्रम सादर केला व तो सर्वांचीच दाद मिळवून गेला.
दुसऱ्या दिवशी विषय होता – सरकारी कामाचा शेतकऱ्यांना येणारा अनुभव. सर्वांचा बोलण्याचा सूर एकच होता - सरकारी कामात भ्रष्टाचार फार आणि कार्यक्षमता शून्य. अपेक्षेप्रमाणे ह्या चर्चेत बऱ्याचशा शिबिरार्थीनी आपले अनुभव सांगितले. शेतकऱ्यांच्या साचलेल्या कर्जाविषयीही ह्या सत्रात सखोल चर्चा झाली.
जेवणानंतरच्या सत्रात ख्यातकीर्त अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांनी 'शेतीमालाचे भाव' ह्या विषयावर भाषण केले. शेतीमालाची मागणी व त्याचा पुरवठा ह्यांत सुसूत्रता आणणे आणि पक्क्या मालाची मागणी व त्याचा पुरवठा ह्यांतही सुसूत्रता आणणे कसे गरजेचे आहे ह्यावर ते बोलले. संघटित कामगारवर्ग व शेतकरी यांच्यात एकजूट निर्माण करायची असेल, तर त्यासाठी संघटित कामगारांनी आपली स्वार्थी वृत्ती कमी केली पाहिजे असे ते म्हणाले.
शेवटचे सत्र १९८०-८१ साली संघटनेचा कार्यक्रम काय असावा ह्यावर होते. काही महत्त्वाच्या शेतमालाचे किमान भाव ठरवून मागावेत हा मुख्य कार्यक्रम ठरला. पण त्याखेरीज दारिद्र्य हटवण्यासाठी गावातील दारूवरील खर्च तसेच वेगवेगळे उरूस-सण ह्यांवरील खर्च ह्यांनाही आळा घालायची गरज अनेकांनी व्यक्त केली. शिबिराच्या शेवटी आळंदीच्या ग्रामस्थांची एक सभा झाली व त्यात ग्रामस्थांना संघटनेच्या कार्याची माहिती दिली गेली.
शिबिराला एकूण शंभरावर शेतकरी हजर होते. आळंदी येथील डबेवाला धर्मशाळा येथे सर्वांची राहायची-जेवायची व सभांची व्यवस्था केली होती. चाकणच्या काही प्रथमपासूनच्या सहकाऱ्यांनी शिबिराची सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.
संघटनेच्या भावी शिबिरांसाठी दैनंदिन कार्यक्रमाचा व एकूण व्यवस्थापनाचा एक ढाचा ह्या शिबिराने घालून दिला.
पाच धरणांचे पाणी मिळणारा नाशिक जिल्ह्यातील निफाड हा खुप सुपीक तालुका. पिंपळगाव बसवंत ही येथील एक प्रमुख बाजारपेठ. ऊस व कांदा ह्यांचे इथे उत्तम पीक येई. देशात जेव्हा कृषी संशोधन केंद्रे स्थापन करायला सरकारने सुरुवात केली, तेव्हा अगदी सुरुवातीच्या टप्प्यात इथे एक केंद्र स्थापन झाले होते. चाकण आंदोलनाचे पडसाद इथेही उमटले होतेच. फेब्रुवारी १९८०मध्ये कांद्याच्या भावाची घसरगुंडी सुरू झाली व ती थांबण्याचे काहीही चिन्ह दिसेना. त्यामुळे शेतकरी खूप चिडलेले होते. ज्या गाड्या व ट्रेलर्समधून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कांदा आणला होता, त्या त्यांनी रस्त्यावर वेड्यावाकड्या सोडून दिल्या व मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखला. ही घटना १९ मार्च १९८०ची. त्यावेळी जोशींचे ह्या भागात आगमन झाले नव्हते; आंदोलनाचे नेतृत्व पिंपळगाव येथील माधवराव खंडेराव मोरे करत होते.
महामार्ग मोकळा करण्यासाठी आंदोलकांशी कोणताही विचारविनिमय न करता शासनाने कडक कारवाई करायचे ठरवले. वायरलेसवरून एसआरपीच्या एका गटाला तातडीचा हुकूम गेला. हे जवान खरेतर दुसऱ्याच कुठल्यातरी मोहिमेवर चालले होते, पण त्यांना अचानक मुंबई-आग्रा महामार्गावर पाठवले गेले. त्यांनी शिरवाडे (कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचे गाव) येथे रस्ता रोखून धरलेल्या शेतकऱ्यांवर जबरदस्त लाठीमार केला. एवढेच नव्हे तर दुपारी पावणेदोन वाजता गोळीबारदेखील केला. दोन शेतकरी ठार झाले. माधवराव मोरे यांच्यासह आठ आंदोलक जबर जखमी झाले. शेतकरी संघटनेने ह्या घटनेचा तीव्र निषेध केला व जोशी स्वतः तातडीने पिंपळगाव येथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद जोशी यांचे निफाडमध्ये आगमन झाले. १५ एप्रिल १९८० रोजी निफाड सहकारी साखर कारखान्याच्या आवारात असलेल्या के. के. वाघ विद्याभवनात दुपारी दोन वाजता जोशी यांची सभा आयोजित करण्यात आली. ह्या सभेत जोशींनी दीड तास भाषण केले. नाशिक जिल्ह्यातील त्यांची ही पहिली सभा. एका अर्थाने शेतकरी संघटनेचे हे नाशिक जिल्ह्यातील बीजारोपण म्हणता येईल.
त्यानंतर झालेल्या चर्चेत १५ ऑगस्ट रोजी निफाडला मोठी सभा घ्यायचे ठरले. त्यासाठी जोशी आणि मोरे यांची एकत्र भेट घडवन आणायचे निरगडेंनी ठरवले व १२ ऑगस्टला तशी भेट घडवूनही आणली. "माधवराव, ह्या मुलांनी उद्या तुमच्या तालुक्यात माझा दौरा आखला आहे. तुम्हीही आमच्याबरोबर यावं अशी माझी इच्छा आहे," भेटीत जोशी म्हणाले. मोरे यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. ते म्हणाले, “साहेब! तुम्ही आमच्या तालुक्यात येऊन आम्हालाच कार्यक्रमाला यायचं आमंत्रण देता? हे पाहा, उद्यापासून मी तुमच्या गाडीचा ड्रायव्हर. आपण हुकूम करायचा."
यापूर्वी या दोघांनी एकमेकांविषयी ऐकले होते, वाचले होते, मात्र प्रत्यक्ष भेट प्रथमच होत होती. पण अवघ्या दहा मिनिटांच्या चर्चेतच दोघांची मने जुळली. कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रल्हाद कराड पाटील हेही लौकरच त्यांना येऊन मिळाले. यावेळच्या आंदोलनातच नव्हे तर त्यानंतरही शेतकरी संघटनेच्या वाटचालीत ही त्रिमूर्ती अनेक वर्षे अग्रस्थानी राहिली.
चाकण आंदोलनात जोशी यांना शंकरराव वाघ, बाबूलाल परदेशी यांच्यासारखे जे जिवाभावाचे सहकारी लाभले, त्यांच्यापेक्षा हे दोन सहकारी अनेकदृष्ट्या वेगळे होते. दोघेही आपापल्या परीने समाजात नामांकित होते. दोघांचीही स्वतःची मोठी शेती होती. दोघांमध्येही स्वतःचे असे नेतृत्वगुण आंदोलनात येण्यापूर्वीही होते. दोघांनीही जोशी ह्यांचे प्रथम स्थान निर्विवादपणे मान्य केले होते यात शंका नाही, पण त्यांच्यापासूनही जोशी यांना काही ना काही शिकायला मिळत होते. उदाहरणार्थ, उसाची शेती बरीच फायदेशीर असते असे जोशींना वाटायचे, ते खूप चुकीचे होते हे या दोघांनी दाखवून दिले. ऊसशेतीतल्या अडचणी, खतांच्या आणि औषधांच्या भडकलेल्या किमती, कारखान्यांमधील भ्रष्टाचाराच्या नाना तहा, साखरनिर्मितीच्या प्रत्येक पावलावर असलेले सरकारचे व पर्यायाने राजकारण्यांचे जाचक नियंत्रण वगैरे अनेक गोष्टी या दोघांमुळे जोशींच्या लक्षात आल्या.
असे असूनही ऊस शेतकरी रुबाबात कसे काय राहू शकतात, ह्याचे उत्तर देताना प्रल्हाद कराड पाटील प्रांजळपणे म्हणाले,
"आमच्या ह्या बाह्य रूपावर जाऊ नका. हे सारं फसवं आहे. सगळे कर्जात डुबलेले आहेत. आम्हा शेतकऱ्याचं धोतर एका बँकेचं असतं, सदरा दुसऱ्या बँकेचा असतो, तर टोपी तिसऱ्या बँकेची असते!"
हे त्यांचे उद्गार जोशींच्या स्मरणात कोरले गेले होते व पुढे अनेक ठिकाणी त्यांनी ते उद्धृत केले.
पुढील काही दिवस ह्या त्रिमूर्तीने केवळ निफाड तालुका नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्हा पालथा घातला. धुळे आणि नगर जिल्ह्यांतही सभा घेतल्या. आंदोलनाचे लोण गावागावातून पोचवले. एकेका दिवसात आठ-आठ, दहा-दहा सभा होत. याच दरम्यान बागलाणचे एक शेतकरी रामचंद्रबापू पाटील त्यांना येऊन मिळाले. इतरही साथी मिळत गेले. मुख्य म्हणजे निफाड साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव बोरास्ते हेदेखील त्यांच्या बाजूने उभे राहिले. खरे तर त्यांनी सुरुवातीला संघटनेला खूप विरोध केला होता, जोशींना निफाडमध्ये आणल्याबद्दल निरगुडेंना बराच दमदेखील भरला होता. पण पुढे मोरे यांनी त्यांचे मन वळवले; १५ एप्रिल रोजी जोशी यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीचाही बराच परिणाम झाला. जोशींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ऊस पिकवण्याचा व पुढे कारखान्यात त्याची साखर बनेस्तोवरचा सगळा खर्च काळजीपूर्वक काढला व जोशी यांची मागणी अगदी न्याय्य आहे ह्याविषयी त्यांची खात्री पटली. त्यांच्याच पाठबळाने भरलेली निफाडची १५ ऑगस्ट १९८०ची सभा महत्त्वाची ठरली.
'शंभरखाली कांदा नाही, तीनशेखाली ऊस ना