पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यापेक्षा आपले जुने लायसन्स-परमिट राज्यच बरे होते' असे आपल्याला वाटते. पण हळूहळू आपल्याला ह्या खुलीकरणाची सवय होईल, त्याचे असंख्य फायदे दिसू लागतील, कारण मुळात व्यापार बंदिस्त करणाऱ्या ह्या भिंतीच कृत्रिम आहेत, त्या पाडून टाकणे हेच नैसर्गिक आहे, खऱ्याखुऱ्या खुलीकरणातूनच समृद्धी येईल ह्याविषयी त्यांचा खात्री होती. ह्यात आपला आर्थिक फायदा आहे हे जेव्हा लोकांना दिसू लागेल तेव्हा आपोआपच ते खुलीकरणाचे समर्थन करू लागतील, कारण शेवटी आपला आर्थिक फायदा ज्या व्यवस्थेत होतो तीच व्यवस्था माणसाला हवीशी वाटायला लागते.
 हा अर्थवादी दृष्टिकोन ते जीवनाच्या इतरही अनेक क्षेत्रांना लागू करतात. उदाहरणार्थ, माणसाच्या वागण्याच्या संदर्भात ते म्हणतात,
 "आपण अर्थशास्त्रीय विचार करताना पहिल्यांदा एक गोष्ट गृहीत धरायची आहे, की प्रत्येक गोष्टीचं कारण हे आर्थिक असतं. अर्थकारणानं स्वभाव ठरतात, स्वभावानं अर्थकारण ठरत नाही. अगदी पुण्यामध्ये ब्राह्मण घरात जन्मलेले आणि लहानपणी स्नानसंध्या केलेले लोक अमेरिकेत गेल्यावर पहिल्याच आठवड्यात गोमांसभक्षण कसं करू लागतात, हे मी पाहिलेलं आहे. ज्यांच्या आयुष्यात कधीही काही विशेष घडलेलं नाही, तेही कसे बदलतात हेही पाहिलेलं आहे. याला कारण त्यांचं अर्थकारण बदललेलं असतं. अमुक एका माणसाचा स्वभाव असा का, हे समजून घ्यायचं असेल, तर त्याचा स्वभाव तसा असल्याने किंवा तसा नसण्याने त्याचा काय फायदा किंवा काय तोटा होणार आहे, हे समजून घ्यावं लागेल. जसं वागल्याने आपला अधिक फायदा होणार असतो, तसं वागणं ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. माणसाचं विचार करण्याचं इंद्रिय मेंदू हे नसून खिसा हे आहे.”

 शरद जोशींचे तिसरे वैचारिक वेगळेपण म्हणजे त्यांनी शेतीप्रश्न हा फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अशा प्रकारे त्याच्याकडे न पाहता, हा एकूण देशाचे दारिद्र्य दूर करण्याचा प्रश्न आहे अशी मांडणी केली. एकूण देशाच्या व्यापक परिप्रेक्ष्यात शेतकऱ्याचा प्रश्न पूर्वी कधी मांडला गेला नव्हता.
 त्यांच्या मते शेतीमालाला वाजवी भाव मिळाला, की शेतकऱ्याच्या हातात अधिक पैसा येईल. हाती पैसा आला, की शेतकऱ्याला अधिक चांगले जगावेसे वाटेल. आजच्यापेक्षा अधिक चांगले खाणे, पिणे, कपडे घालणे, घर बांधणे, ते विविध वस्तू आणून सजवणे, प्रवास करणे, शिक्षण घेणे, साहित्य-कलांचा आस्वाद घेणे व एकूणच चांगल्या प्रकारे जगणे त्याला जमेल. पुन्हा हे समृद्धीचे चक्र फक्त त्याच्या व्यक्तिगत जीवनापुरते सीमित राहत नाही. आपली बचत तो गावातच छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यात गुंतवू शकेल. गावातील सर्व तरुणांनी रोजगारासाठी शहराकडे धाव घ्यायची आणि तिथल्या बेसुमार गर्दीत आणखी भर घालायची हा प्रकार संपेल. गावातच त्या तरुणाच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. यातूनच गाव समृद्ध होईल आणि अंतिमतः देश समृद्ध होईल. शेतकरी समृद्ध होणे म्हणजेच देश समृद्ध होणे.


४५६ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा