पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतील, तर हे धरण व्हावे म्हणून मी जलसमाधी घ्यायला तयार आहे,' असे उद्गार या तरुण सामाजिक कार्यकर्तीने काढले होते. 'बालमूर्ती नावाचे मुलांसाठीचे एक मासिक त्या चालवत. माँटेसरी शिक्षणाचे भारतातील खंदे पुरस्कर्ते गिजुभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले हे मासिक. संस्थापकांच्या निधनानंतर एका न्यासातर्फे ते चालवले जाई. कुठच्याही ध्येयवादी मासिकाप्रमाणे बालमूर्तीचा संसारही भागवाभागवीचाच होता. त्याची व्यावहारिक जबाबदारी दर्शिनी यांनी घेतली होती.बडोद्याला जोशी हृदयविकाराच्या दखण्यानंतर विश्रांतीसाठी आले असताना, त्यांना एखाद्या स्वीय सहायकाची गरज होती. त्यासाठी स्वयंस्फूर्तीने दर्शिनी पुढे झाल्या. आपले घरातले व जोशींना सांभाळण्याचे काम त्या इतक्या निगुतीने करत, की जोशींनी नंतर त्यांना पुण्याला येऊन त्यांच्या घरची जबाबदारी घ्यायची विनंती केली. बालमूर्तीच्या विश्वस्तांची व आपल्या कुटुंबाची परवानगी घेऊन त्या आल्या आणि मग २००० ते २०१६ अशी पुढची सोळा वर्षे जोशींबरोबरच राहिल्या. जोशी त्यांना आपली मुलगीच मानत. त्यांच्यातला धाडसीपणा थक्क करणारा होता. जोशी दौऱ्यांवर असताना खूपदा आंबेठाणला त्या एकट्या राहत. कधीकधी अगदी बिछान्याजवळून मोठाला साप जाई. पण त्या कधीही घाबरल्या नाहीत. किंवा जोशींशी पटले नाही म्हणून गुजरातेत आपल्या घरी परत जावे असे त्यांच्या मनातही आले नाही. कितीही त्रास झाला तरी त्यांनी आपल्या कामात कधी कुचराई केली नाही. जोशींच्या फ्लॅटला घरपण लाभले ते त्यांच्यामुळे. शेतकरी संघटनेतले सगळे कार्यकर्ते त्यांना 'दीदी' म्हणत. जोशींची शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी जी प्रेमाने आणि निरलस सेवा केली ती केवळ अजोड अशीच आहे.

 काही जण व्यावसयिक रूढार्थाने संघटनेचे कार्यकर्ते नव्हते; पण जोशींविषयी त्यांना जिव्हाळा होता व वेळोवेळी त्यांनी संघटनेच्या कामात सहभागदेखील दिला. नाशिकचे वकील दौलतराव घुमरे, मुंबईचे वकील राम जेठमलानी व नितीन प्रधान, संघटनेच्या हिशेबाची जबाबदारी घेणारे मुंबईचे अर्थसल्लागार व चार्टर्ड अकाउंटंट संजय पानसे, पुण्याचे जाहिरात व्यावसायिक शरद देशपांडे इत्यादी. यांच्याशी जोशींचा संबंध केवळ व्यावहारिक कामापुरता राहिला नाही; या सर्वांनी जोशींना आपापल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊनही मनःपूर्वक सहकार्य दिले.
 मुंबईचे एस. व्ही. राजू, दिल्लीच्या लिबरल ग्रुपचे वरुण मित्र व पार्थ शहा, किसान समन्वय समितीचे भूपिंदर सिंग मान, बंगलोरचे हेमंतकुमार पांचाल, केरळचे प्रा. बाबू जोसेफ, आंध्रातील शंकर रेड्डी, बुंदेलखंडातले डॉ. साहेब लाल शुक्ला, शेतकरी संघटक'मधील निवडक लेखांचा हिंदीत अनुवाद करून ते लेख उत्तर भारतात प्रसृत करणारे झाशीचे प्रा. रामनाथन कृष्ण गांधी, सुरतचे बिपीन देसाई व गुणवंत देसाई, लेखक इंद्रजित भालेराव व शेषराव मोहिते, नागपूरचे विधिज्ञ शरदराव बोबडे हीदेखील त्यांच्या स्नेहपाशात अडकलेली मंडळी.

 ही यादी खरे तर अजून खूप वाढवता येईल. पण कुठेतरी थांबायलाच हवे. ह्यांतील बहुतेक सर्वांबद्दल ह्या पुस्तकात वेगवेगळ्या ठिकाणी प्रसंगोपात्त लिहिले गेलेच आहे; ज्यांचा उल्लेख अनावधानाने राहून गेला असेल, त्यांची क्षमा मागतो.

३८८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा