पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तरीही त्यांच्या इच्छेनुसार दुसऱ्या दिवशी आम्ही चित्रकूटलादेखील जाऊन आलो. पूर्वी तो परिसर म्हणजे बांदा जिल्ह्याचाच एक तालुका होता. आठ-दहा वर्षांपूर्वी चित्रकूटला एका स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. भाजपचे नानाजी देशमुख यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर या अत्यंत मागासलेल्या भागात ग्रामविकासाचे मोठे काम उभे केले आहे. इथले रामदर्शन हे प्रदर्शनही प्रसिद्ध आहे. रामाच्या जीवनातील विविध प्रसंग तिथे चित्रित केले आहेत. मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांचा ह्यात मोठा सहभाग होता. तिथेही जोशींनी दोन तास खर्च करून एक प्रदक्षिणादेखील घातली.
  मुळात बांद्याला जाणे हाच मोठा द्राविडी प्राणायाम होता. आधी भल्या सकाळी पुण्याहून विमानाने नागपूरला जायचे. तेथून गोंडवाना एक्स्प्रेसने झांसी. रात्री बारा वाजता झांसीला उतरायचे आणि तिथून रात्री दोन वाजता संपर्क क्रांती एक्स्प्रेस पकडायची. ती बांद्याला जाते. प्रत्यक्षात ती दोन तास उशिरा आली. रात्रीचा तो सगळा वेळ आम्ही प्लॅटफॉर्मवरच काढला. परत येताना पुन्हा तोच प्रकार. एकूण सगळा फार जिकीरीचाच प्रवास. प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी व्हीलचेअर शोधणे म्हणजेही मोठे दिव्य होते. आपल्याकडे कागदोपत्री सगळ्या सोयी असतात, पण प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीकरता धावपळच करावी लागते. जोशींना स्वतःलाही हे परावलंबित्व विलक्षण क्लेशदायकच असणार.
 पण या सगळ्या प्रवासात दोन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या.
 एक म्हणजे सर्व सहकाऱ्यांचे जोशींवर असलेले निरतिशय प्रेम. त्यांच्यापैकी कोणालाच आता जोशींकडून काहीही मिळवण्यासारखे असे नव्हते, पण तरीही एखाद्या आज्ञाधारक मुलाने स्वतःच्या वडलांची म्हातारपणी घ्यावी, तशीच सगळे त्यांची काळजी घेत होते. परतताना एक रात्र आमचा रवी काशीकर यांच्या नागपूरच्या घरी मुक्काम होता व त्यावेळीही जोशींना भेटायला माणसांची अगदी रीघ लागली होती. त्यात ज्योतिषी चंद्रशेखर शर्मांपासून पत्रकार सुरेश द्वादशीवारांपर्यंत सगळ्या प्रकारची माणसे होती आणि सगळेच जोशींविषयी अतिशय आदराने बोलत होते. त्यात चमचेगिरीचा भाग जराही दिसत नव्हता, कारण आता 'मधुघटची रिकामे पडती घरी' अशीच जोशींची स्थिती होती; जाणवत होती ती अकृत्रिम आपुलकी. वाटले, सहकाऱ्यांचे हे निरपेक्ष प्रेम ही जोशींची खूप मोठी कमाई आहे.
_  दुसरी मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे जोशींची ऐंशीच्या उंबरठ्यावरही टिकून असलेली कमालीची जिद्द आणि त्या जिद्दीपोटी कुठलीही शारीरिक गैरसोय सहन करायची अपरिमित क्षमता. ह्या वयात ही सगळी दगदग म्हणजे शरीराचे हालच, पण सगळ्या प्रवासात मी एकदाही त्यांच्या तोंडून तक्रारीचा एक शब्दही ऐकला नाही.

 असाच अनुभव आम्ही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात गुणवंत पाटील हंगरगेकर

यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडला गेलो होतो तेव्हा आला. गुणवंतभाऊंनी प्रचंड घाट घातला होता. भव्य शामियाना उभारला होता. त्यांचा जनसंपर्क दांडगा. लांबून लांबून लोक आले होते.


सांजपर्व.४६९