पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नकोस. लहान आहेस तू.' हे त्यांचे शब्द होते. त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यांनी स्वतःच्या हातांनी मला बिल्ला लावला. त्यावेळी त्यांनी पाठीवरून फिरवलेला हात मला जसाच्या तसा आठवतो. ही आमची पहिली भेट.

 आपल्या पहिल्या भेटीतच जोशींनी जोडलेल्या अशा कार्यकर्त्यांची यादी बरीच लांब होईल. राजीव बसर्गेकरांपासून मधु किश्वरपर्यंत अनेकांचा तो अनुभव होता. जोशींच्या व्यक्तिमत्त्वात एक अहंकार जाणवायचा, अशी टीका काही जणांनी केली आहे. ही यादी म्हणजे त्या टीकेला दिलेले एक उत्तर असेल. किंबहुना जोशींचे व्यक्तिमत्त्व हे दुसऱ्याला खिळवून घेणारे होते असे दिसते.


 कार्यकर्त्यांबद्दल लिहिताना कोपरगावचे भास्करराव बोरावके यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. एकेकाळी सव्वा लाख मोसंबीची झाडे असलेली, नऊशे एकरांची त्यांच्या कुटुंबीयांची शंकरबाग ही आशिया खंडातील सर्वांत मोठी मोसंब्याची बाग मानली जाई. पंडित नेहरूंपासून सर विश्वेश्वरय्या अय्यरांपर्यंत अनेक नामवंत मंडळी तिथे येऊन गेली होती. लहानपणापासून ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते होते. गर्भश्रीमंती असूनही सेवादलाच्या संस्कारामुळे त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. आणीबाणीत अनेक भूमिगत नेत्यांनी शंकरबागेत आसरा घेतला होता. पुढे राष्ट्र सेवा दलाचे ते विश्वस्तही झाले. पण 'शेतकरी संघटनेचे काम सोडा, असे सेवा दलाने सांगितले, तर मी सेवा दल सोडेन' हे त्यांचे उद्गार होते. पुढे शेतकरी संघटनेचे ते अध्यक्षही बनले. मितभाषी, मृदू, मनमिळाऊ भास्कररावांच्या शब्दाला संघटनेत सगळे फार मानतात.
 भास्कररावांना सगळे भाऊ म्हणतात. कोपरगाव परिसरात त्यांना मोठा मान आहे. सेवा दलाप्रमाणे शिर्डी येथील प्रसिद्ध साई संस्थानाचेही ते एक विश्वस्त होते. 'वारकरी' साप्ताहिक वाचून त्यांना जोशीविषयी प्रथम माहिती मिळाली. 'लिखित साहित्याचा आपल्याला शेतकरी आंदोलनासाठी फारसा उपयोग होणार नाही' हे जोशींचे पूर्वीचे मत कसे चुकीचे होते हेही ह्यावरून दिसते. कोपरगावला झालेल्या ऊस आंदोलनात भाऊ सामील झाले. त्यांच्यासारखा प्रतिष्ठित शेतकरी त्यात पडल्यामुळे साहजिकच आंदोलनाला मोठीच चालना मिळाली. आंदोलनात अटक झाल्यावर त्यांची रवानगी इसापूर तुरुंगात झाली. त्यावेळी इतरही सात हजार आंदोलक त्याच तुरुंगात अटकेत होते. योगायोग म्हणजे त्यांत बावीस वकीलही होते! आंदोलनाची व्याप्ती किती वाढली होती याची त्यावरून कल्पना येते. तुरुंगात असतानाच सर्व सत्याग्रहींनी आपला नेता म्हणून त्यांची निवड केली होती. पुढे ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बनलेच.

 जोशीपेक्षा भाऊ पाच वर्षांनी मोठे. पुढे ते प्रत्यक्षातही जोशींचे जणू मोठे भाऊच बनले. लीलाताईदेखील त्यांना खूप मानत. पुण्यात भाऊंचे एक घर होतेच. पुण्यात आले की ते तिघेही नाटक-सिनेमा बघायला जात. भाऊंच्या पत्नी माईदेखील खूपदा सोबत असत. दोन्ही कुटुंबांत घरोबा होता. लीलाताई गेल्यावर जोशींनी भाऊंच्या खांद्यावर डोके ठेवूनच अश्रूंना वाट

सहकारी आणि टीकाकार३८१