पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जानेवारी १९८६ रोजी जोशींनी व्याख्यान द्यावे अशी त्यांची इच्छा होती. एक आव्हान म्हणून जोशींनी ते आमंत्रण स्वीकारले. त्यानिमित्ताने त्यांचा ह्या प्रश्नाचा अधिक शास्त्रशुद्ध अभ्यास होणार होता व दुसरे म्हणजे त्यांचे स्त्रियांमधले काम आणि शेतकऱ्यांमधले काम यांच्यातला समान असा जैविक धागा नीट स्पष्ट करायची संधी त्यांना मिळणार होती. संगमनेरचे ते व्याख्यान उत्तम झालेच, पण त्यातूनच पुढे जोशींची महिलाप्रश्न म्हणजे नेमके काय ह्याची मांडणी तयार झाली.

 समाजाच्या सर्वच स्तरांत, विशेषतः ग्रामीण भागात, स्त्रिया या कनिष्ठ व पुरुष हा जात्याच अधिक श्रेष्ठ असा एक गैरसमज स्त्रियांमध्येही आढळतो; तीस-एक वर्षांपूर्वी तो अधिकच मोठ्या प्रमाणावर आढळत असे. तो खोडून काढण्यासाठी व स्त्रिया या पुरुषांपेक्षा कुठल्याही प्रकारे कमी नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी स्त्रीप्रश्नाची आपली मांडणी स्पष्ट करताना जोशी अगदी मनुष्यजन्मापासून सुरुवात करतात. लिंगनिश्चितीचे जीवशास्त्रीय सूत्र ते समजावून देतात. गर्भाच्या बांधणीकरिता जी ४६ गुणसूत्रे एकत्र येतात, त्यांपैकी लिंग ठरवण्यासाठी केवळ एकच गुणसूत्र कामाला येते. म्हणजेच स्त्री-पुरुषांमधील फरक हा जास्तीत जास्त दोन-अडीच टक्क्यांचा आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःला कनिष्ठ समजायची काहीच गरज नाही.
 'पुरुष हा अधिक बलवान असल्यामुळे स्त्रियांवर सत्ता गाजवतो' हे अलीकडच्या पाश्चात्त्य स्त्रीवाद्यांचे म्हणणेही जोशींच्या मते चुकीचे आहे. त्यांच्या मते खरे तर पुरुष हे स्त्रियांपेक्षा अधिक कमजोर आहेत. स्त्रियांना भावी आयुष्यात ज्या विविध भूमिका बजावाव्या लागतात, त्यांची पूर्वतयारी म्हणून निसर्गानेच त्यांना जैविक स्वातंत्र्याच्या अधिक व्यापक अशा कक्षा दिल्या आहेत. शारीरिक ताकदीलाच सामर्थ्य मानणारे जुने तंत्रज्ञान मागे पडून इलेक्ट्रॉनिक्सच्या युगात स्नायूंचे बळ आवश्यक नसणारे तंत्रज्ञान पुढे आले आहे. उदाहरणार्थ, हातगाडी ओढताना शारीरिक बळ अत्यावश्यक होते, पण मोटार चालवताना ते लागत नाही; आणि आताच्या अत्याधुनिक गिअररहित मोटारी चालवताना तर नक्कीच लागत नाही. याउलट स्त्रियांकडे सामान्यतः आढळणारे गुण अधिक कालोचित ठरत आहेत. गुलामगिरीच्या काळात स्त्रियांनी अंगी बाणवून घेतलेले ऋजुता, सौम्यपणा, सोशिकता, नीटनेटकेपणा, टापटीप, चिकाटी, एकाच वेळी अनेक गोष्टींचे भान ठेवण्याचे कसब हेच गुण नव्या युगात पुरुषी दंडेलीपेक्षा अधिक उपयुक्त ठरणारे आहेत.

 स्त्री-पुरुष श्रेष्ठत्वाचा विचार करताना जोशी हे मान्य करतात, की स्त्रीपेक्षा पुरुषाचे हृदय व फुफ्फुसे ही आकाराने मोठी असतात व त्यामुळे सामान्यतः पुरुषाची कार्यशक्ती ही स्त्रीपेक्षा तुलनेने अधिक असते; पण याउलट, भूक सहन करणे, सोशिकता, चिकाटी, रोगाबाबत प्रतिकारशक्ती, शांतपणा या अनेक गुणांत स्त्रिया पुरुषांपेक्षा सरस असतात. हालचालीतील चपळता, कार्यशक्ती, आक्रमकता आणि एक प्रकारची बेफिकिरी यामुळे लढाईत व हिंसाचारात पुरुष पुढे असतात; स्त्रिया मात्र या बाबतीत मागे पडतात - विशेषतः प्रजननाची जबाबदारी पार पडताना. मासिक पाळी, गर्भारपण, बाळंतपण, मुलांची जोपासना या अवस्थांत

किसानांच्या बाया आम्ही....२८५