पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येथे प्रा. वि. म. दांडेकर यांच्या राजकीय अर्थशास्त्र संस्थेतर्फे २२ व २३ डिसेंबर १९७९ रोजी 'देशातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेतून मार्ग कोणता?' या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दांडेकर यांच्याशिवाय लॉ कॉलेजचे प्राचार्य सत्यरंजन साठे, अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य अलू दस्तूर, उद्योगपती नवलमल फिरोदिया, रँग्लर महाजनी, पत्रकार प्रेमशंकर झा वगैरे अनेक नामवंत मंडळी हजर होती. त्या सर्वांनी ढासळत्या नैतिक मूल्यांना प्राप्त परिस्थितीबद्दल सर्वाधिक दोष दिला होता. आपल्या त्या चर्चासत्रातील भाषणात व त्यावर आधारित उपरोक्त लेखात त्यांची मांडणी जोशींनी अगदी शब्दश: खोडून काढली होती. जोशींनी लिहिले होते.

या विद्वानांच्या विचारांत इतका गोंधळ पाहून हसावे का रडावे हे समजेनासे होते. विषय इतका गंभीर आणि देशाच्या भवितव्याशी निगडित नसता तर पोटभर हसून भागले असते. भारतातील अर्थशास्त्र्यांच्या व समाजशास्त्र्यांच्या विद्वत्तेबद्दल आदर बाळगण्यासारखी स्थिती कधीच नव्हती, पण त्यांची अवस्था इतकी दयनीय असेल, असे वाटले नव्हते.<|blockquote>

(प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश, पृष्ठ १९)


  समोरच्याला पूर्ण नेस्तनाबूत करण्याइतकी कठोर टीका करण्याचे काही कारण होते का, हा प्रश्नच आहे. का इतर सर्वांपेक्षा अगदी वेगळे काहीतरी मांडण्याची जोशींची आंतरिक गरज त्यामागे होती? अगदी सुरुवातीच्या काळात जाहीरपणे घेतलेली ही नैतिकतेला दुय्यम महत्त्व देणारी भूमिका आपल्या विशिष्ट स्वभावामुळे नंतर ते बदलू शकले नाहीत असेही झाले नसेल ना? जसे एकेकाळी त्यांनी जाहीर केलेला निर्णय कायम ठेवण्यासाठी कॉमर्सला प्रवेश घेतला होता, तसे? त्यांनी सामाजिक कार्याला इतका विरोध करण्यामागे असेच काही कारण असेल का?

 ओठात एक, मनात एक, असे व्यवहारी वागणे जोशींना कधीच जमले नाही. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा आणि शिवाय त्याजोडीला वागण्यात असलेला एक प्रकारचा उपजत कोरडेपणा ह्या गोष्टीही कदाचित व्यक्तिगत मैत्र जोडण्याच्या आड आल्या असतील.
 कोणाला फार चिकटायचा त्यांचा स्वभाव नव्हता असे म्हणणे ही उनोक्ती ठरावी इतके कधीकधी ते व्रुत्तीने अलिप्त वाटत. 'त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खोली होती. पण रुंदी नव्हती' असे त्यांचे एक जवळचे सहकारी मला म्हणाले होते. "मी माणसे सांभाळणारा नाही असे बरेच लोक म्हणतात. कोणाशी फार सलगी दाखवणे मला कधीच जमले नाही," असे जोशींनी स्वतःही श्रीरंगनाना मोरे यांच्या सत्कारसमारंभात म्हटले होते.

स्वित्झर्लंडमधील त्यांचे सहकारी आणि शेजारी टोनी डेर होवसेपियां यांनी सांगितलेली ती आठवण यावर काही प्रकाश टाकते का - बुद्धिबळ खेळताना प्रथमच एकदा हरल्यानंतर पुन्हा कधीच जोशींनी त्यांच्याबरोबर बुद्धीबळाचा डाव मांडला नाही, ती आठवण? किंवा “He despised those who were intellectually mediocre” हे त्यांचे निरीक्षण?



सांजपर्व - ४८५