पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जोशी सामंत यांना काही शेतकरी मेळाव्यांना घेऊन गेले होते. सामंत तसे पूर्णतः मुंबईकर होते व इतर शहरी मंडळींचे असतात तसेच त्यांचेही शेतकऱ्यांबद्दल अनेक गैरसमज होते. जोशींबरोबर ग्रामीण भागातून फिरताना त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी जवळून पाहिले. “खरंच असे असतात शेतकरी? फाटके कपडे घालणारे, बिनचपलांचे? इतके दरिद्री?" आपले आश्चर्य व्यक्त करताना सामंत म्हणाले होते, “यांच्यापुढे आमचे कंपनी कामगार म्हणजे भांडवलदारच म्हणायचे!" आपण आजवर श्रीमंत कामगारांना अधिक श्रीमंत करण्यासाठी झटलो, पण त्यांच्यापेक्षा अधिक शोषित असे शेतकऱ्यांसारखे इतरही समाजघटक आहेत व त्यांच्यासाठीही आपण काहीतरी करायला हवे अशी त्यांची त्यावेळी तरी प्रामाणिक भावना झाली होती.
 त्यानंतर चार-पाच वर्षांनी घडलेला एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असताना शिवाजीपार्कवर त्यांची एक सभा झाली होती. भावी पंतप्रधान चंद्रशेखर हेही त्या मंचावर होते, जॉर्ज फर्नाडिस होते, तसेच जोशी व सामंतदेखील होते. सभेला गर्दी मात्र अगदी कमी होती. शिवाजीपार्कवरची सभा म्हणजे त्यावेळी शिवसेनेची मक्तेदारीच होती. दुसरे नेते इतरत्र कितीही मोठे असले तरी शिवसेनेच्या तत्कालीन प्रभावापुढे इथे निष्प्रभ ठरायचे. बरेच श्रोते भाषणे चालू असतानाच निघूनही गेले; अगदी मूठभरच माणसे शेवटपर्यंत थांबली होती. सामंतांचे हुकमी समजले जाणारे कामगारही गैरहजर होते. त्या सभेबद्दल जोशींनी नंतर लिहिले आहे. 'एका कामगार चळवळीचा अस्त' या आपल्या शेतकरी संघटक'मधील लेखात. ६ फेब्रुवारी १९९७ रोजी लिहिलेला तो लेख पुढे जोशींच्या अंगारमळा या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. त्यात जोशी लिहितात,

मंचावर डॉक्टरसाहेब माझ्या बाजूलाच बसले होते. ते सारखे चडफडत होते. या xxx कामगारांना मी दोनदोन, तीनतीन हजार रुपये पगारवाढ मिळवून दिली. xxx संपाच्या वेळी माझ्यामागे आणि मिटींगांना शिवसेनेच्या! यांचेच संप आम्ही चालवत राहिलो हीच मोठी चूक झाली. कामगार चळवळीचा फायदा या xxxनी घेतला. स्वतःची घरं भरली. बिचारा खराखुरा कामगार असाच असंघटित राहिला. आमचा सारा हिशेबच चुकला.'


 कुठल्याही समकालीन मोठ्या नेत्याविषयी जोशींनी संपूर्ण लेख असा कधी लिहिल्याचे माझ्यातरी वाचनात नाही; प्रस्तुत लेख म्हणजे एक अपवाद म्हणायला हवा. कुठेतरी त्यांच्या मनात सामंत यांना एक विशेष स्थान असावे असे यावरूनतरी वाटते. असो. कामगार-शेतकरी यांची एक आघाडी व्हावी व ती एक मोठी राजकीय शक्ती बनू शकेल ही अपेक्षा म्हणजे मात्र केवळ मृगजळ ठरले.

 शिवसेनेशीदेखील जुळवून घ्यायचा शेतकरी संघटनेने प्रयत्न केला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आंबेठाणला आले होते, शेतकरी आंदोलनाबद्दल त्यांना आदर होता. पण

३२८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा