पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आजही जे आंबेठाणला अंगारमळ्यात राहतात आणि जे जोशींचे केवळ सारथी नव्हते तर जिवाचे साथी होते, ते बबन शेलार. तोंडाने फटकळ पण मनाने प्रेमळ. यांचे हस्ताक्षरही सुरेख. जोशींचे लेखनिक म्हणूनही ते काही वर्षे काम करत. धुळ्याचे रवी देवांग, शिक्षणाने सिव्हिल इंजिनिअर. शेतकरी संघटनेचे ते अध्यक्ष होते आणि त्याचवेळी विपश्यना या मौनाभोवती गुंफलेल्या तिबेटी अध्यात्मसाधनेचे प्रचारकही. नाशिकचे डॉ. गिरीधर पाटील, जे स्वतंत्र भारत पक्षाचे महासचिव होते व ज्यांना आपला बराचसा ग्रंथसंग्रह जोशींनी भेट दिला. हिंगणघाट तालुक्यातील आर्वी छोटी या गावचे कवी गंगाधर मुटे; शेतकरी संघटनेची वेबसाइट ते सांभाळतात. नाशिकचेच डॉ. श्याम अष्टेकर आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी रत्ना पाटणकर, ज्या अगदी पहिल्यापासून जोशींबरोबर चाकण परिसरात खेडोपाडी रुग्णसेवा द्यायला फिरत असत. जोशींशी अगदी प्रथमपासून जोडले गेलेले हे एक ध्येयवादी जोडपे. इस्लामपूरचे उच्चशिक्षित व झुंजार शेतकरीनेते रघुनाथदादा पाटील, ज्यांनी पुढे स्वतःही वेगळी शेतकरी संघटना काढली. रावेरीच्या सीता मंदिराची जबाबदारी सांभाळणारे इंजिनिअर-शेतकरी बाळासाहेब देशमुख. नागपुरचे विजय जावंधिया; शरद जोशींचे वारसदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहायचो' असे मी काही जणांकडून ऐकले आहे. नागपूरचेच राम नेवले. जोशीच्या हातात घरखर्चासाठी म्हणून काही रक्कम देणारे सांगलीचे जयपालअण्णा फराटे. पुण्याचे मदन दिवाण आणि त्यांच्या पत्नी अलका. दिल्लीतील वास्तव्यात जोशींच्या निकट वावरणारी फारच थोडी कार्यकर्ता मंडळी होती; त्यांतले दिवाण एक प्रमुख. 'अंकुर सीड्स' कंपनीचे रवी काशीकर, यांचे घर म्हणजे संघटनेचे वर्ध्यातील कार्यालयच होते; आणि परिवार म्हणजे संघटनेचे हक्काचे पाईक. संघटनेला आर्थिक मदत करण्यात त्यांना मनापासून आनंद मिळत असे.
 नांदेडचे शंकरअण्णा धोंडगे आणि उत्साही अभियंते गुणवंत पाटील हंगर्गेकर, राजुऱ्याचे वामनराव चटप, वरोऱ्याचे मोरेश्वर टेमुर्डे (जे दोन वेळा आमदार झाले, महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापतीही झाले), लातूरचे पाशा पटेल, धुळ्याचे अनिल गोटे हे सारे अगदी बिनीचे शिलेदार. या साऱ्यांचा विशेषतःराजकीय प्रवासात पुढाकार होता.यांतल्या काहींनी पुढे अन्य पक्षात जाऊन नाव कमावले, पण आपली सुरुवात शेतकरी संघटनेपासून झाली ह्याची जाणीव कायम ठेवली.
 पुणे येथील 'माणूस' साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर, पुण्यातल्याच 'सोबत' साप्ताहिकाचे ग. वा. बेहेरे, नाशिकचे प्रसिद्ध उद्योगपती व 'देशदत' वृत्तपत्रसमूहाचे मालक देवकिसन सारडा, अकोल्याच्या देशोन्नती' दैनिकाचे प्रकाश पोहरे ही पत्रकारितेतील मोजकी मंडळी, ज्यांना जोशींच्या कार्याचे महत्त्व जाणवले व ज्यांनी त्या काळात आपापल्या नियतकालिकांतून संघटनेच्या कार्याविषयी लिहिले.
 संघटनेच्या प्रसारात ज्यांचा मोठा वाटा आहे असे देवकिसन सारडा प्रस्तुत लेखकाला म्हणाले,

 "नाशिकच्या ऊस आंदोलनाला सुरुवात झाली, त्याच सुमारास एक दिवस मी शरद जोशींना मुद्दाम भेटलो. चांगले तीन-चार तास आमची चर्चा झाली. त्यांचे एकूण विचार मला

सहकारी आणि टीकाकार३८३