पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

किलोमीटरवरच्या आंबेठाणहून सकाळी अगदी लौकर ते आपल्या मोटर सायकलवरून निघत व शनिवारपेठेत घाटपांडेकडे मजकूर घेऊन येत. संगणकावर ते उत्तम अक्षरलेखन करतात व बहुतेकदा जवळच्या सीडीवर ते पूर्वीच तयार केलेला मजकूर आणून देत. सर्व चुका सुधारून अंकाला अंतिम मुद्रणपूर्व रूप लाभेपर्यंत दिवसभर तिथेच थांबत. साहजिकच आमच्या तिथे कधीकधी भेटी होत, कामादरम्यानच्या वेळेत थोड्याफार गप्पाही. आपल्या संपादनाच्या व मुद्रितशोधनाच्या कामात म्हात्रे वाकबगार होते. काकदृष्टीने बघणाऱ्यालाही संघटकमध्ये सहसा चुका सापडत नसत. शेतकरी संघटकची जबाबदारी पार पाडताना म्हात्रेना अक्षरजुळणी करणारे हरिश घाटपांडे, मुद्रक गणेश ऑफसेटचे गिरीश दात्ये व बांधणीकार (कै.) मामा व जयंत भोसले यांची मोलाची मदत झाली; केवळ 'धंदा' म्हणून त्यांनी हे काम केले नाही. शरद जोशींचे बरेचसे मराठी व इंग्रजी लेखन म्हात्रे लिहून घेत व नंतर जोशींच्या सल्ल्याने त्याचे संपादनही करत.
 संघटनेत सर्व जण त्यांना म्हात्रेसर म्हणत व आजही म्हणतात. त्यावेळी आजच्यासारखी सरसकट सर्वांना 'सर' म्हणायची पद्धत नव्हती. पण एकेकाळी केलेल्या प्राध्यापकीमुळे व एकूणच वडिलकीच्या भावात ते वावरत असल्यामुळे सगळ्यांचे ते 'सर' बनले. हे संबोधन संघटनेत फक्त त्यांच्याकरिताच राखून ठेवलेले होते. इथे एक नमूद करायला हवे. जोशींना संघटनेत सगळे जण 'जोशीसाहेब' म्हणत; महिलांचे मात्र ते 'शरदभाऊ' असत. त्यांना फक्त 'शरद जोशी' म्हणणारे संघटनेत म्हात्रे एकटेच. म्हात्रे अविवाहित आहेत, कडक आणि शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध आहेत, पण संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांच्या कुटुंबाशी त्यांचे घरच्यासारखेच संबंध आहेत. स्मरणशक्ती दांडगी, सगळी माहिती तोंडावर. संघटनेबद्दल काहीही विचारा; म्हात्रेना ते ठाऊक असते. आणि लगेच नाही सांगता आले तरी ती माहिती नेमकी कुठे असेल हेही त्यांना ठाऊक असते. त्यामुळे काही मिनिटांतच तुमच्यापुढे ती माहिती येते.
 शेतकरी संघटनेच्या माहितीपत्रकांत मध्यवर्ती कार्यालय' (Central Office) म्हणून आंबेठाणचा भारदस्त वाटेल असा पत्ता असतो; पण हे 'मध्यवर्ती कार्यालय' म्हणजे म्हात्रे एकटेच! संघटनेच्या कार्यक्रमात किंवा बैठकीत किंवा जोशी कोणाशी कसली चर्चा करत असताना ते आडबाजूला कुठेतरी बसतील; पण जोशींना कुठचीही माहिती हवी असेल तर ते मागायच्या आधीच त्यांची गरज ओळखून म्हात्रे ती पुरवायला सामोरे येतील. शेवटच्या काही वर्षांत जोशींनी केलेल्या जवळजवळ सर्वच लेखनाचे शब्दांकन म्हात्रेनी केलेले आहे. जोशींचे त्यांच्यावाचून चालणे अवघडच होते, असे मलातरी वाटायचे. इतरही अनेकांचे बहुधा तेच मत होते. कदाचित त्यामुळेच अधूनमधून होणाऱ्या स्वभावसुलभ मतभेदांकडे दुर्लक्ष करत जोशींनी म्हात्रे यांच्याशी कायम जुळवून घेतले होते.

 नर्मदा नदीचे पाणी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतीला मिळावे म्हणून जोशींनी केलेल्या जनआंदोलनात त्यांच्या हाती लागलेले रत्न म्हणजे दर्शिनी भट्टजी ऊर्फ दीदी. त्यांचे वडील जोशींना खुप मानत. 'हे धरण होऊ नये म्हणून मेधा पाटकर जर नर्मदेत जलसमाधी घेणार

सहकारी आणि टीकाकार३८७