पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वगैरे अगदी गरीब कामगार किंवा अनेक बेकार माणसेही तिथे राहत. सुट्टीत आपण त्या झोपडपट्टीत जात असू असे भासवणारे वर्णन जोशींनी त्यावेळी इतर मुलांसमोर केले.उदाहरणार्थ, एक दारुडा नवरा आपल्या बिचाऱ्या बायकोला कसा बेदम मारत होता याचे वर्णन. तसे हे कुठल्याही झोपडपट्टीत नेहमीच दिसणारे दृश्य आहे व ते बघण्यासाठी सुट्टीत तिथे जाणे काही आवश्यक नव्हते. पण जोशींनी ते अगदी रंगवून रंगवून सांगितले; जणू त्यांच्या डोळ्यांसमोरच ते घडत होते! दुसरे एक दृश्य होते खूप भाजलेल्या व त्यामुळे ओगलेवाडीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या एका लहान मुलीचे. ती हॉस्पिटलमध्ये असताना एकसारखी वेदनेने किंचाळत होती; तिथले डॉक्टर तिला म्हणत होते, 'असं किंचाळायचं होतं, तर मग भाजून कशाला घेतलंस?' जणू काही तिने मुद्दाम स्वतःला भाजून घेतले होते! हे सर्व वर्णन काल्पनिकच होते; पण आपण इतर सर्वांपेक्षा किती वेगळे आहोत, अगदी वेगळे असे काहीतरी आपण या सुट्टीत कसे केले हे मित्रांना दाखवण्यासाठी जोशी ते सारे खुलवून सांगत होते. त्यांच्यातल्या लेखकीय प्रतिभेचे हे एक उदाहरण; त्यांच्या व्यक्तित्वाच्या एका अंगावर प्रकाश टाकणारेही.
 'स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यांसाठी जगलास तरच जगलास' अशा वाक्यांचा त्यांच्यावर बराच प्रभाव होता आणि तशा प्रकारच्या भूमिकेतून एक दांभिकपणा कसा आपोआप तयार होत जातो. ते स्पष्ट करण्यासाठी जोशींनी ओगलेवाडीचे उदाहरण दिले होते.
 पुढे याच संदर्भात मॉमची एक गमतीदार छोटी गोष्ट ते नेहमी सांगायचे. दुसऱ्या कोणाचातरी उद्धार करायचा मोह किती जबरदस्त असतो हे दाखवण्यासाठी. एकदा येशू ख्रिस्ताला सैतान भेटतो. ख्रिस्ताने मोहाला बळी पडावे, यासाठी तो अनेक प्रलोभने दाखवतो. सोने-नाणे, पैसाअडका, जमीन-जुमला इत्यादी. पण येशू कशालाच बळी पडत नाही. शेवटी सैतान त्याला म्हणतो, की पृथ्वीवर जाऊन सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी बलिदान करण्याची संधी मी तुला आता देतो. आणि ते प्रलोभन काही ख्रिस्ताला टाळता येत नाही! 'परोपकार ही एक चटकन चढणारी दारू आहे,' असा जोशी यांनी यातून काढलेला निष्कर्ष आहे.
 कॉलेजमध्ये गेल्यावर जोशींचे मराठी वाचन मंदावले; मराठी ललित साहित्याचे वाचन तर फारच कमी झाले. त्यांचा भर नंतरच्या काळात इंग्रजी वाचनावर होता. इंग्रजी ललितसाहित्यात पी. जी. वुडहाउस आणि सॉमरसेट मॉम हे त्यांचे आवडते लेखक. आयन रँड हिच्या कादंबऱ्यांचाही त्यांच्या विचारांवर खूप मोठा पगडा आहे. कॉलेजच्या ग्रंथालयात त्यांनी मुख्यतः आर्थिक विषयांवरील इंग्रजी पुस्तकांचे वाचन केले. या वाचनामुळे त्यांना अर्थशास्त्राची गोडी लागली आणि एकूण मानवी व्यवहारातील अर्थकारणाचे महत्त्वही लक्षात आले. त्यांच्या अर्थवादी विचारसरणीचे मूळ काही प्रमाणात तत्कालीन वाचनातही असू शकेल.

 आपण केलेल्या वाचनाच्या प्रकाशात भोवतालच्या जगाचे निरीक्षण करायची त्यांची सवय होती. उदाहरणार्थ, डॉन क्विहोती (Don Quixote; क्विझोटी हाही उच्चार आपल्याकडे प्रचलित आहे) ही सर्वान्तीस (Cervantes) या जगप्रसिद्ध स्पॅनिश लेखकाची

साहित्य आणि विचार४३३