पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुठल्याही धर्मादायावर जगण्याची गरज नाही. आम्हाला फक्त आमच्या शेतीमालाचा रास्त भाव द्या! शेतकऱ्याजवळ थोडा पैसा साठू द्या! तो स्वतःच्या गावात चांगली शाळा काढून, चांगला शिक्षक नेमून अभिमानानं आपली मुलं तिथं शिकायला पाठवेल! शेतकऱ्याजवळ पैसा आला तर एमबीबीएस झालेले डॉक्टर आपण होऊन गावोगाव दवाखाने काढतील!


 शेतकऱ्यांना पोषक आहार पुरवणाऱ्या समाजसेवी उपक्रमांवरपण जोशी यांचा रोष आहे. ते म्हणतात,

सकस आहार वगैरे द्यायला आम्ही काय जनावरं आहोत का? आमच्या मालाला नीट भाव द्या, आम्ही आमचं काय ते विकत घेऊन खाऊ.


 सामाजिक कार्याविषयीची त्यांची मते खूप बोचरी आहेत, हे खरे पण त्यामागेदेखील कुठेतरी या कार्यात ते कार्यकर्ते 'देणारे' व सामान्य माणसे 'घेणारे' अशी स्वाभिमानाला बोचणारी भूमिका असते असे त्यांना वाटते व ती त्यांना पूर्णतः अस्वीकृत आहे.
  शेतकऱ्यांमध्ये जोशींनी जागवलेला हा स्वाभिमान केवळ अमोल असा होता. परभणी येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाला जेव्हा कवी इंद्रजित भालेराव प्रथम गेले तेव्हाची त्यांची पहिली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. ते म्हणतात,

या अधिवेशनात मनात ठसलेली सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे, हातात नांगर धरलेला शेतकऱ्याचा प्रचंड मोठा कटआउट. तो आम्ही अजूनही विसरलेलो नाही. सार्वजनिक सभेच्या ठिकाणी शेतकऱ्याची एवढ्या मोठ्या सन्मानासह स्थापना झालेली आम्ही प्रथमच पाहत होतो. शेतकऱ्याची पोरं असणाऱ्या आम्हांला ती गोष्ट भावून गेली. शेतकरी संघटनेचा लाल बिल्लाही तेव्हापासूनच मनावर ठसलेला आहे. अजूनही हा बिल्ला कुणाच्या छातीवर पाहिला, की भावुक व्हायला होतं.


 "छातीवर हा लाल बिल्ला लावला, की आम्हाला कुठल्याही सभेत, कुठल्याही नेत्याला, अवघड प्रश्न विचारायचं धाडस कुठूनतरी येतं,” असे शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रस्तुत लेखकाला सांगितले आहे. ह्या धाडसामागे केवळ लाल बिल्ला नव्हता, पुरती मशागत केलेली पक्की विचारसरणीही होती.
 शेतीमालाला वाजवी भाव ही मागणी करण्यामागे त्यांचे अंतिम उद्दिष्ट हेच होते, की शेतकऱ्याच्या हातात चार पैसे यावेत. ते झाले तरच आजचे त्याचे लाचारीचे जिणे संपून तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. तसे झाले तरच त्याचा स्वाभिमान वाढेल. जोशींच्या मते शेतीमालाच्या आंदोलनाचे सर्वांत मोठे फलित हेच आहे- शेतकऱ्याला अधिक स्वतंत्र करणे, त्याचा आत्मसन्मान वाढवणे. त्यासाठीच हवी कर्जमुक्ती, त्यासाठीच हवे बाजारपेठेचे आणि


४६० - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा