पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पातळीवर धरणाला केलेला विरोध, त्याला माध्यमांनी दिलेली अमाप प्रसिद्धी व पुढे प्रकरण कोर्टात गेल्यावर कोर्टाने आणलेली धरणाच्या बांधकामावरील व धरणाचे पाणी तयार असलेल्या कालव्यांत सोडण्यावर घातलेली बंदी. अतिवृष्टीमुळे नर्मदेचे पाणी दुथडी भरून वाहत धरणापर्यंत पोचत होते, पण धरणाच्या भितीची उंची फक्त ८० मीटर, म्हणजे नियोजित उंचीपेक्षा फक्त निम्मीच असल्याने नदीचे बरेचसे पाणी धरणात थांबत नव्हते आणि त्याचवेळी धरणातले पाणी धरणाला लागूनच तयार असलेल्या मुख्य कालव्यात सोडायला बंदी असल्याने, हे पाणी सरळ आसपासच्या परिसरात वाट फुटेल तसे पसरत होते. पुराचे एक मोठे कारण हेही होते. मुख्य कालव्यात ते पाणी सोडले असते, तर तिथून पुढे तयार असलेल्या सगळ्या कालव्यांच्या जाळ्यात ते आपोआप गेले असते व गुजरातच्या कानाकोपऱ्यात पोचले असते. उत्तर गुजरातच्या सुकलेल्या शेतजमिनीला तर ते अमृतच ठरले असते. पण धरणातले पाणी मुख्य कालव्यात सोडायलाच बंदी असल्याने असे काहीच चांगले घडू शकत नव्हते; उलट ते अतिरिक्त पाणी अस्ताव्यस्त इकडेतिकडे जाऊन महापुराचा धुमाकूळ घालत होते. शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली होती.
 आंदोलनात ह्या शेतकऱ्यांची बाजू कोणीच समजून घेत नव्हते. ह्याचा निषेध म्हणून जोशींनी धरणातले साठवलेले पाणी शेजारीच तयार असलेल्या मुख्य कालव्यात कळशीकळशीने सोडायचा निर्धार केला. धरणविरोधाला शेतकऱ्यांच्या असलेल्या विरोधाचे एक प्रतीक म्हणून हे नर्मदा जनआंदोलन करायचे ठरले. आंदोलनाची तारीख ठरली ४ डिसेंबर १९९९. तसे करताना पोलीस आपल्याला पकडणार ह्याची त्यांना खात्री होती पण तरीही हे एक पवित्र काम समजून त्यांनी हा निर्णय घेतला होता. ह्या आंदोलनाला त्यांनी 'कारसेवा' असेच म्हटले होते व त्याची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोचवण्यासाठी २१ नोव्हेंबर १९९९च्या 'शेतकरी संघटक'मध्ये लिहिलेल्या लेखाचे शीर्षक त्यांनी दिले होते, 'तहानलेल्याला पाणी देणे हा गन्हा असेल तर...'

 आंदोलनाचा निर्णय झाल्यावर आदले काही आठवडे जोशींनी कसलीच तमा न बाळगता गुजरातभर हिरिरीने प्रचार केला. बिपीनभाई देसाई व गुणवंतभाई देसाई अर्थातच त्यांच्याबरोबर होते. धरणाला असलेला त्यांचा आधीचा विरोध आता पूर्ण मावळला होता व शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते धरण होणे अत्यावश्यक आहे हे त्यांना पटले होते. ते वर्ष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १२५व्या जयंतीचे वर्ष होते. त्या जयंती महोत्सवाचा प्रारंभ ३१ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमाने झाला. जोशी त्या कार्यक्रमात एक वक्ते होते. 'सरदार सरोवर प्रकल्प' हाच जोशींच्या भाषणाचा विषय होता.

 खरे तर नर्मदा धरणाला जोशींचा फार पाठिंबा होता अशातला भाग नव्हता; मोठ्या धरणांमुळे शेतकऱ्यांचा फारसा फायदा होत नाही, सत्ताधारी व नोकरशहा यांचाच त्यात खरा फायदा असतो, याची कॉलेजात शिकत असल्यापासून जोशींना जाणीव होती. किंबहुना हा त्यांच्या एक विशेष अभ्यासाचा विषय होता. पण यावेळी त्यांचा आग्रह हा होता, की जर

३५८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा