पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवण्यासाठी पुरेसे तुरुंगही जवळपास नसत. अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत महिला आघाडीच्या कार्यकर्त्या पंच म्हणून निवडून आल्या, काही ठिकाणी त्या सरपंचही झाल्या.

 शेतकरी महिला आघाडीच्या वाटचालीतला पढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे लक्ष्मीमुक्ती अभियान. खरे तर केवळ महिला आघाडीच्या नव्हे तर एकूणच शेतकरी संघटनेच्या वाटचालीतला हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे.
 शेतकऱ्याने आपल्या पत्नीच्या नावावर जमिनीचा एक हिस्सा करणे, त्यासाठी सातबाराच्या उताऱ्यावर तिचे नाव मालक म्हणून लावून घेणे, म्हणजे लक्ष्मीमुक्ती. पण इथे लक्ष्मीमुक्ती शब्दाचा अर्थ घरच्या लक्ष्मीची मुक्ती एवढाच नसून, तिच्या वर्षानुवर्षांच्या ऋणातून तिच्या शेतकरी पतीचीही मुक्ती हा आहे, हे नमूद करायला हवे.
 जोशींच्या मते लक्ष्मीमुक्ती अभियान म्हणजे एकूण शेतकरी आंदोलनाचाच एक भाग होता. आपल्या अनेक भाषणांमध्ये ते हा मुद्दा स्पष्ट करून सांगत. त्यांच्या मते, 'शेतकरी तितुका एक एक' आणि 'भीक नको, हवे घामाचे दाम' या शेतकरी संघटनेच्या महत्त्वाच्या दोन घोषणा. या दोन घोषणांच्या संदर्भात विचार केला, तर लक्ष्मीमुक्ती अभियान हे एकूण शेतकरी आंदोलनाचाच एक भाग कसे आहे ते स्पष्ट होते. त्याबाबतीत जोशींची भूमिका साधारण पुढीलप्रमाणे होती :
 शेतकरी मायबहिणी ह्या सर्वार्थाने शेतकरीच आहेत; त्यांना 'शेतकरीण' म्हणणे चूक आहे. कारण, डॉक्टरच्या बायकोला औषधांतले काहीही कळत नसले तरी सर्रास 'डॉक्टरीण' म्हटले जाते, किंवा वकिलाच्या बायकोला कायद्याचे काहीही ज्ञान नसले तरी वकिलीण' म्हटले जाते, त्या अर्थाने जर शेतकऱ्याच्या बायकोला 'शेतकरीण' म्हटले तर तो त्यांच्यावर केलेला मोठा अन्याय होईल. कारण त्या केवळ नावापुरत्या शेतकरी नसतात, आपल्या नवऱ्याबरोबर त्या दिवसरात्र शेतात राबत असतात, त्यांची ओळख केवळ 'शेतकऱ्याची बायको' ही नसते, तर त्या स्वतःही एक 'शेतकरी' असतात व 'शेतकरी तितुका एक एक' या घोषणेनुसार आपापल्या नवऱ्याबरोबर त्याही शेतकरी संघटनेचा अविभाज्य भाग असतात.
 दुसरे म्हणजे, मशागतीची व इतर काही अपवादात्मक जड कामे सोडली, तर पेरणीपासून तयार शेतीमालाची पोती भरण्यापर्यंत असंख्य कष्टाची कामे त्या करत असतात. पुन्हा हे सारे घरसंसार सांभाळून. शेतात काळ्या आईच्या अंगावर घामाचे १०० थेंब पडले, तर त्यांतले साठ-सत्तर थेंब तरी या मायबहिणींच्या घामाचे असतात. 'भीक नको, हवे घामाचे दाम' ह्या घोषणेनुसार त्या घामाचे मोल त्यांना मिळायला हवे. पण प्रत्यक्षात काय दिसते?
 त्या शेतकरी आहेत, पण शेतमालक आहेत का? तर नाहीत. कारण त्यांच्या नावावर जमिनीचा तुकडा नसतो; सात-बाराच्या उताऱ्यावर त्यांचे नाव कधीच नसते.
 त्यांना शेतमजूरही म्हणता येत नाही. कारण त्यांना कुठलीच मजुरी दिली जात नाही: त्यांच्या श्रमांचे काहीच मोल कुठेच पकडले जात नाही.

 याचाच अर्थ त्या गाळत असलेल्या घामाचे दाम त्यांना कुठल्याच स्वरूपात मिळत

किसानांच्या बाया आम्ही...२९७