पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मृणालिनी खैरनार, सुमनताई देवरे व बागलाण तालुक्यातील ४० महिलांनी सलग अकरा दिवस यात्रा केली. शुभांगी बद्रीनाथ देवकर अध्यक्षस्थानी होत्या. संघटनेच्या इतिहासात ह्या दाभाडी मेळाव्याला महत्त्वाचे स्थान आहे, कारण त्याला तब्बल १५,००० महिला हजर होत्या. ही भरघोस उपस्थिती अनपेक्षित व सर्वांचा उत्साह वाढवणारी होती. ह्या मेळाव्याचे आणखी एक महत्त्व म्हणजे ह्याच मेळाव्यात बनावट धाग्यांच्या कपड्यांवर (पढे यांनाच 'राजीवस्त्र' म्हटले गेले) २ ऑक्टोबर १९८५ पासून बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
 संघटनेच्या कामातील महिलांचा सहभाग हा असा बराच व्यापक असला, तरी तो एक शेतकरी महिला म्हणून अधिक व निव्वळ एक महिला म्हणून कमी असा होता. सर्व चर्चा त्या आंदोलनाच्या अनुषंगानेच होई, त्यात व्यक्तिगत असे फारसे काही नसे. पण एका बैठकीत ही कोंडी अचानक फुटली. एका सहभागी स्त्रीने प्रश्न विचारला, "शेतीमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे; पण तो मिळाला म्हणून आमच्या पाठीवरचं गाढवओझं हलकं होणार आहे का? निदान पोरांना सुखाचे चार घास घालता येणार आहे का?" दुसरी एक महिला म्हणाली, "तुमच्या उसाच्या आंदोलनामुळे घरधन्याकडे चार पैसे जास्त आले; पण म्हणून काही माझ्या पोराची फाटकी चड्डी गेली नाही किंवा माझ्या अंगावर धड लुगडं आलं नाही. फक्त घरात बाटलीबाई आली आणि दररोज चार दणके मात्र बसायला लागले." त्या हे सांगत असताना इतर महिलांच्या चेहऱ्यावरही हे खरंच आहे' अशी भावना होती.
 ह्या स्पष्टोक्तीतील तथ्य उघड होते. पंजाब-हरयाणामधला अनुभव तसा संघटनेच्या नेत्यांना परिचयाचा होता. तिथे हरितक्रांतीनंतर उत्पादन वाढले. कर्जही वाढले असले तरी शेतकऱ्याच्या हातात अधिक पैसे खेळू लागले. पण स्वतःच्या शेतात काम करायचे व त्यानिमित्ताने घराबाहेर पडायचे स्वातंत्र्य तेथील महिला गमावून बसल्या. ते शेतकाम बिहार आणि ओरिसातील मजुरांकडे गेले. डोक्यावर भाजीपाला घेऊन बाजारात जायचीही आता महिलांना गरज उरली नाही; ट्रॅक्टरवर शेतीमाल भरून शेतकरी बाजारात तो नेऊ लागला. महिला घरात कोंडली गेली व शेतावरील मजुरांसाठी व घरच्यांसाठी रोट्या भाजायचे काम तेवढे तिच्याकडे आले.

 चळवळीतील सहभागाव्यातिरिक्त एक महिला म्हणून महिलांची काय सुखदुःखे आहेत, हे जाणून घ्यायची आस स्वतः जोशींना लागली होती. त्या दृष्टीने त्यांनी लातूर जिल्ह्यातील हळीहंडरगुळी ह्या गावी १६-१७ डिसेंबर १९८५ला महिलांची एक अनौपचारिक बैठक बोलावली. सकाळी दहाच्या सुमारास एका तात्पुरत्या उभारलेल्या मांडवाखाली सतरंजी घालून त्यावर सगळ्या जणी बसल्या. सगळ्याच शेतकऱ्यांच्या बाया. दिवसभर घराशेतात राबणाऱ्या. नेसत्या वस्त्रानिशी आलेल्या. इथे येण्यासाठीही बऱ्याच जणींनी मैलोनमैल पायपीट केलेली. जोशींच्यासोबत योद्धा शेतकरी'चे लेखक विजय परुळकर व त्यांच्या पत्नी सरोजा

२८२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा