पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१. आपल्या उमेदवारांकडे साधने व पैसे यांची आत्यंतिक उणीव होती.

२. निवडणुकीचे तंत्र त्यांना अवगत नव्हते व ते तंत्र वापरणे साधनशुचितेच्या मर्यादेत बसणारे नव्हते.
३. भ्रष्टाचार-गुंडगिरी करणारी काँग्रेस व जातिधर्माचा प्रचार करणारी शिवसेना-भाजप युती यांना स्वतंत्र भारत पक्ष हा समर्थं पर्याय आहे असे लोकांना वाटले नाही.
४. आपल्या पक्षाचा कार्यक्रम पूर्णपणे आर्थिक होता. या कार्यक्रमाचे महत्त्व लोकांना पटले नाही. त्यात मतदारांना ताबडतोबीने मिळण्याजोगा काही लाभ दिसला नाही.
५. आपल्या पक्षाच्या तीस-कलमी कार्यक्रमाला नोकरशाहीचा प्रचंड विरोध झाला. नवा पक्ष संरक्षणाची हमी काढून घेणार ही धास्ती वाटली.
६. आपल्या उमेदवारांनी स्थानिक व लोकजिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्रचारात स्थान दिले नव्हते. ७. शरद जोशी यांच्या निवडणूकविषयक भूमिकेबाबत जनतेच्या मनात असलेला अविश्वास. 'मत मागायला येणार नाही' असे सांगत स्वीकारलेली उमेदवारी व त्यामुळे निर्माण झालेला गैरसमज.
८. पक्षाचा कार्यक्रम हा फक्त शेतकऱ्यांचा आहे असा झालेला समज व त्यामुळे शहरी भागातून झालेली पीछेहाट.
९. आपल्या धोरणामुळे धान्य महाग होईल हा झालेला प्रचार व त्यातून भूमिहीन मजुरांत निर्माण झालेला दुरावा.
१०.नेहरू घराण्याचे पुतळे पाडण्याची केलेली घोषणा ही अनेकांना न आवडलेली बाब.

११.आपला पक्ष तरुणवर्गाला आकर्षित करू शकला नाही. तरुणांना नोकरीचा प्रश्न विशेष महत्त्वाचा वाटत होता.


 स्वतः जोशी यांनी ह्याबद्दल एक लेख १३ सप्टेंबर २००४ रोजी लिहिला होता. पोशिंद्यांची लोकशाही या पुस्तकात तो समाविष्ट आहे. त्यात ते लिहितात :

लाखालाखांनी शेतकरी माझ्या सभेला जमतात; माझ्या शब्दाखातर हजारोंनी शेतकरी तुरुंगात गेले; पण लोक माझे म्हणणे ऐकतात, समजावून घेतात, या भावनेपोटी उमेदीने जेव्हा मी शेतकऱ्यांच्या प्रेमाचे मतांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रत्येक वेळी मला हार पत्करावी लागली. सत्य परिस्थिती समोर असलीच पाहिजे. शेतकऱ्यांच्या संख्येच्या ताकदीचे मतांमध्ये परिवर्तन करायला आपल्याला जमले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न असले, दुःख असले, की शरद जोशी म्हणजे तारणहार; पण निवडणूक आली म्हणजे 'शरद' नाव चालते, पण 'जोशी'

३४२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा