पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बेशुद्धावस्थेत खाली पडले. कधी नव्हे ते या प्रवासाला ते एकटेच गेले होते; दीदी त्यावेळी त्यांची स्वतःची आई वारल्यामुळे बडोद्याला गेल्या होत्या. कसेबसे त्यांना इंद्रप्रस्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. खरे तर खाली यायला समोरच लिफ्ट उपलब्ध होती, पण तरीही त्यांनी जिना उतरून जायचे का ठरवले, ते त्यांचे त्यांनाही नंतर सांगता आले नाही.
 हा आघात त्यांना शेवटची तीन-चार वर्षे खप त्रासदायक ठरला. मेंदूला मार लागल्याने स्मरणशक्तीवर तसेच विचार व्यक्त करायच्या क्षमतेवर परिणाम झाला व त्यांच्या जवळच्या व्यक्तींना ते जाणवत असे. खांद्याला मोठीच इजा पोचली होती व हाताचा वापर करणेही अवघड झाले. 'आता उर्वरित आयुष्य मला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार,' अशी खंत त्यांनी म्हात्रेपाशी व्यक्त केली होती. दुर्दैवाने ती खरी ठरली.

 त्यांच्याबरोबर केलेल्या एका लांबच्या प्रवासाचा अनुभव सांगण्यासारखा आहे. ३० जुलै २०१२ला केसीसी (Kisan Coordination Committee)ची बांदा येथे बैठक होती. मीही सोबत चलावे अशी त्यांची इच्छा होती. बांदा हे उत्तर प्रदेशातील एक जिल्ह्याचे ठिकाण. ज्याला बुंदेलखंड म्हणतात तो हाच परिसर. राजा छत्रसाल आणि बाजीरावाची मस्तानी इथलीच. इतक्या लांबच्या ठिकाणी जोशी कसे जाणार याचीच त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना काळजी; पण जोशींची फार इच्छा होती.
 आम्हां दोघांशिवाय अनंतराव देशपांडे, बद्रीनाथ देवकर, वामनराव चटप व शैलजा देशपांडे हेही या प्रवासात बरोबर होते.
 डॉ. साहेब लाल शुक्ला हे बुंदेलखंडातले शेतकरीनेते आमचे स्थानिक यजमान. केसीसीची बैठक बांद्याला एकदातरी व्हावी या त्यांच्या आग्रहामुळे ही बैठक इतक्या अडनडी गावी ठरली होती.
  आमच्या आगेमागे इतरही प्रांतांतले काही शेतकरीनेते तिथे हजर झाले. कर्नाटकचे हेमंत कुमार पांचाल, आंध्रचे एस. पी. शंकरा रेड्डी, पंजाबचे भूपिंदर सिंग मान वगैरे. सकाळी दोनअडीच तास बैठक झाली. मग संध्याकाळी जाहीर सभा. केसीसीची ती बैठक मला अगदीच अपेक्षाभंग करणारी वाटली. नंतरची संध्याकाळची जाहीर सभाही. दात काढलेल्या सिंहाप्रमाणे झालेली त्यांची अवस्था आम्हांला कोणालाच बघवत नव्हती. संघटनेत आता दम राहिला नव्हता, हे मला व बरोबरच्या अनेकांना पदोपदी जाणवत होते; पण हे जोशींना जाणवत होते का, हा प्रश्नच आहे.

 हॉटेल सारंग इंटरकॉन्टिनेन्टलमध्ये सगळ्यांची राहायची सोय केली होती. नाव आणि वास्तव यांत जेवढा फरक आपण कल्पू शकतो, तो सगळा इथे होता. लिफ्ट एकदाही चालली नाही. दोन मजले पायीच चढायचे-उतरायचे. पहिल्याच रात्री जोशींना हॉटेलात खूप अस्वस्थ वाटू लागले, सॉर्बिट्रेटची गोळी द्यावी लागली. त्या आडगावी काही झाले तर काय करायचे, ह्या विचाराने त्यांच्या खोलीतच राहणाऱ्या अनंतराव देशपांडे यांचे व आम्हां सगळ्यांच्याच काळजाचे ठोके चुकत होते.


४६८ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा