पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बारा जागा जिंकल्या. मग पवारांना पाठिंबा देण्याऐवजी त्याचवेळी शेतकरी संघटना स्वतःच निवडणुकीच्या आखाड्यात उतरली असती तर? आपल्या उपरोक्त लेखात जोशी म्हणतात,
 " पण त्या वेळी मी पक्षउभारणीचा कार्यक्रम करण्याऐवजी 'कधी तुमच्याकडे मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा' अशा त-हेचा आविर्भाव करून बसलो होतो! त्यातून बाहेर पडण्यासाठी मला बराच वेळ लागला."
 नंतर राजकारणात शिरायचा निर्णय घेतल्यावर त्यांनी तशाही अनेकांच्या शिव्या खाल्ल्याच; त्या जर आधीच खाल्ल्या असत्या व ८५ सालीच निवडणुकीत उडी घेतली असती, तर बरेच काही पदरात पडून गेले असते आणि मग एकूण परिस्थितीच खूप बदलली असती, असे त्यांना वाटते. जोशी म्हणतात,
 "संघटनेने स्वतःच त्या निवडणुका लढवल्या असत्या तर नाशिक जिल्ह्यातल्या त्या सर्वच्या सर्व बारा जागा शेतकरी संघटनेला मिळाल्या असत्या आणि मग शेतकरी संघटनेचे राजकारणातील अपयश हे कोणालाही टोमणा मारायला शिल्लक राहिले नसते."
 दुसरी चूक ते अशी सांगतात -
 “संघटनेचा सगळा भर शेतीमालाच्या विक्रीतून शेतकऱ्याला अधिक पैसे कसे मिळतील यावर होता. पण त्याबरोबर शेतजमिनीची उपलब्धता जसजशी कमी होते, तसतसा शेतजमिनीच्या विक्रीतूनही शेतकऱ्यांच्या हाती अफाट पैसा येतो-जे आज प्रत्यक्ष घडते आहे - हे शेतकरी संघटनेला अचूकपणे हेरता आले नाही. पुढे शेतीच्या विक्रीचा व्यवसाय करणारी 'गुंठामंत्र्यांची जमात तयार झाली. त्यांनी गावागावात जमिनीचे व्यवहार करून प्रचंड उत्पन्न मिळवले. शेतकऱ्यांनाही शेतीमालाऐवजी जमिनीच विकून जन्मात कधी पाहिला नव्हता इतका पैसा मिळाला. त्यांनी मग घरे बांधली, मोटारगाड्या घेतल्या, इतरत्र जमिनी घेतल्या. 'शेतीमालाच्या भावाइतकाच, किंबहुना त्याहून अधिकच पैसा शेतजमिनीच्या खरेदीविक्रीतूनही मिळू शकतो' हे बदललेले वास्तव शेतकरी संघटनेच्या विचारात कुठेच चपखल बसत नव्हते."
 आपली आणखी एक चूक नोंदवताना जोशी म्हणतात,
 "शेतकरी संघटना ही कायमच खेडेगावातील लोकांची संघटना राहिली. खरे तर अण्णा हजारेंच्या खूप आधी भ्रष्टाचाराचा मुद्दा संघटनेने उठवला होता. लातूर जिल्ह्यात 'उसने पैसे परत घेणे' असा भ्रष्टाचारविरोधी प्रयोगही केला होता. म्हणजे नाइलाजाने लाच म्हणून द्यावे लागलेले पैसे त्या-त्या अधिकाऱ्याविरुद्ध निदर्शने करून त्याच्याकडून परत घेणे.' नेतातस्कर, गुंडा-अफसर...' अशी घोषणाही आम्ही दिली होती. परंतु त्याकरिता आवश्यक तितके परिणामकारक व व्यापक आंदोलन शेतकरी संघटनेला उभे करता आले नाही. त्यामुळे 'खेडेगावातील लोकांचे आंदोलन' हे तिचे स्वरूप कायम राहिले. अण्णा हजारे वगैरेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला आताच्या माध्यमयुगाचाही पाठिंबा मिळाल्यामुळे ते आंदोलन पुष्कळ यशस्वी झाले असे दिसते."
 अर्थात हा अप्रसिद्ध लेख त्यांनी आयुष्यात अगदी अखेरच्या काळात लिहिला व त्याचा


सांजपर्व - ४७३