पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शेतकरी संघटनेचे एक पदाधिकारी सोपान कांचन यांचे काका दत्तोबा कांचन हे पवारांचे जवळचे मित्र होते व धुळे अधिवेशनात ठरल्याप्रमाणे ३ फेब्रुवारी १९८५ रोजी संघटनेच्या एक तासाच्या महाराष्ट्रव्यापी रास्ता रोको आंदोलनात उरळी-कांचन येथे कांचन यांच्याबरोबर पवारांनीही भाग घेतला. त्यापूर्वीही संघटनेच्या राहुरी येथील ऊसपरिषदेला अगदी छातीवर संघटनेचा लाल बिल्ला लावून ते हजर राहिले होते.
 पुलोदच्या प्रचारार्थ जोशींनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला; पुलोदच्या स्थानिक उमेदवारासमवेत जागोजागी भाषणेही केली. चंद्रपूरहून मोरेश्वर टेमुर्डे व हिंगणघाटहून डॉ. वसंतराव बोंडे हे संघटनेचे दोन उमेदवार या निवडणुकीत प्रथमच निवडून आले. निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला बहुमत मिळाले व त्यांचे सरकार गादीवर आले; पण तरीही पुलोदचे ५४ आमदार ह्या निवडणुकीत निवडून आले; खास करून नाशिक जिल्ह्यात सर्वच्या सर्व १४ आमदार पुलोदचे निवडून आले व त्या यशात शेतकरी संघटनेचा मोठा वाटा निश्चितच होता.
 पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या इंदिरा काँग्रेसच्या विरोधात पवारांनी बंड पुकारले होते व स्वतःचा वेगळा पक्ष काढला होता, तेच शरद पवार जेमतेम एका वर्षात, १९८६ साली, सर्व मतभेद बाजूला सारून पुन्हा एकदा इंदिरा काँग्रेसला जाऊन मिळाले व स्वतःच जून १९८८ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले! ज्या इंदिरा काँग्रेसला संघटनेने 'शत्रू क्रमांक एक' मानले होते. त्याच इंदिरा काँग्रेसला आता संघटनेने पुरस्कत केलेला नेता जाऊन मिळाला होता! पुलोदच्या प्रचारार्थ राबलेल्या शेतकरी संघटनेच्या सर्वच कार्यकर्त्यांचा हा विश्वासघात होता. इतके होऊनही पुढे एकदा जोशींनी पुन्हा शरद पवारांची 'भारताचे गोर्बाचेव्ह' म्हणून स्तुती केली होती व त्यांच्याबरोबर निवडणुकीत युतीही केली होती. प्रचलित राजकारणातील डावपेच समजण्यात जोशी कसे कमी पडत होते ह्याचे हे एक उदाहरण. लोकसभा निवडणुकीनंतरची ही राजकारणातील त्यांची दुसरी खेळीही चुकीची ठरली होती.


 जोशींचे राजकारणातील नंतरचे साथी डॉ. दत्ता सामंत ठरले. पवारांप्रमाणे सामंतांशीही त्यांचा संबंध खूप पूर्वीच आला होता. चाकण येथील रास्ता रोकोच्या वेळी. त्याचा उल्लेख पूर्वी आलाच आहे.

 सामंतांची कामगार आघाडी ही मूळची मुंबईतील कामगार संघटना. मुंबईत घाटकोपरला राहणाऱ्या डॉक्टर सामंत यांनी जवळच्या चांदिवलीच्या दगडांच्या खाणीतील कामगारांची दुःखे एक डॉक्टर म्हणून काम करत असताना जवळून बघितली होती व त्यांच्यासाठी ते बरीच कामे करत असत; त्यांना यथाशक्ति मदतही करत असत. त्यांच्यातीलच काहींनी सामंतांची ओळख जवळच असलेल्या प्रीमिअर ऑटोमोबाइल, गोदरेज, क्रॉम्प्टन, मुकंद आयर्न अशा मोठ्या कारखान्यांतील कामगारांशी एकेक करत करून दिली आणि एक दिवस सामंत कामगारनेते बनले. कारखानदार खोटे हिशेब तयार करतात, त्या हिशेबांकडे ढुंकूनही न बघता खूप मोठ्या पगारवाढीची मागणी करायची, संप पुकारायचा, आवश्यक वाटल्यास हिंसेचाही वापर करायचा अशी त्यांची 'दे दणादण' कार्यशैली होती. जोशी जसे बघता बघता

३२६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा