पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 करणाऱ्या कलावंतिणींच्या लावण्यांचा पूर आला, संगीताच्या मैफिली झडू लागल्या. पिके लुटून पेठा, शहरे वसवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या, कारकुनांच्या समाजाचे साहित्य तयार झाले. साहित्य असो, संगीत असो, कला असो, त्यात शेतकऱ्याचे असे काहीच नाही.

(आम्ही लटिके ना बोलू, प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश, भाग दोन,

पृष्ठ १०६, २६ जुलै १९८५)

 साहित्याप्रमाणेच प्रत्यक्ष साहित्यिकांविषयीदेखील जोशींचे मत कटूच असल्याचे जाणवते. उपरोक्त लेखातच त्यांनी लिहिले आहे,
 शहरात गेलेली शेतकऱ्यांची पोरे शहरात रमली. त्यात लिहिण्याचे कसब असणाऱ्यांनी गावाविषयी लिहिले; पण शहराला काय पटेल, काय आवडेल याचा विचार करीत लिहिले. 'हरामखोरांनो, तुम्ही माझे गाव लुटले. या पापाचा तुम्हाला झाडा द्यावा लागेल.' असा टाहो कोणी फोडला नाही. उलट आपल्या ग्रामीण जन्मामुळे साहित्यात आपल्याला काही राखीव जागा असावी असा आक्रोश करणारी एक साहित्य आघाडी उभी झाली. शेतकऱ्यांच्या दु:खाचे भांडवल करून त्यावर साहित्यात स्थानाचा जोगवा मंडळी मागू लागली.
 याच संदर्भात पुढे काही वर्षांनी जोशींनी लिहिले आहे,

 डाव्यांच्या चळवळीमध्ये, त्यांच्यामागे शेपाचशे माणसेसुद्धा नसली तरी, त्यांची कवने गाणाऱ्यांचा सुंदर ताफा त्यांच्यापुढे असतो. ज्यांच्या आंदोलनात आंदोलकांची संख्या कमी, पोलिसांची जास्त, त्या आंदोलनात प्रतिभेचा हा झरा खळाळून वाहताना दिसतो आणि प्रचंड आंदोलने करणाऱ्या शेतकरी संघटनेत, काही अपवाद वगळल्यास साहित्य, कला, संगीत, शाहिरी, पोवाडे अशा मार्गांनी प्रतिभा दाखविणारे निपजले नाहीत. असे का झाले?

 एकदा एका कार्यकर्त्याने नानासाहेब गोऱ्यांना प्रश्न विचारला, 'शेतकरी संघटना ही अशी रुक्ष, काव्य नसलेली का झाली?' ते म्हणाले, 'शरद जोशी हा माणूसच गद्य आहे. त्यांनी जो अर्थशास्त्रीय विषय मांडला. तोच रुक्ष आणि गद्य आहे. आंदोलनाचे साहित्य हे कधी अशा गद्य भाषेत तयार होत नाही. आंदोलनात काहीतरी डोक्यात मस्ती चढवणारी, झिंग आणणारी गोष्ट असावी लागते. रामाच्या देवळाचं नाव घ्यावं लागतं, नसलेल्या गोष्टी तयार कराव्या लागतात, सामान्य माणसांचेसुद्धा पुतळे जागोजागी उभे करून त्यांना देवता बनवावं लागतं. समाजाच्या हितसंबंधांबरोबरच काही एक पागलपणा केल्याखेरीज आजकाल खरं आंदोलन बनतच नाही. आणि शरद जोशींना पागलपणा दाखवता येत नाही.'

साहित्य आणि विचार४३७