पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रमाणावर मजुरांवर अवलंबून असतो, आणि मजूरही शेतकऱ्याचे कसे शोषण करू शकतात, याचे हे एक बोलके उदाहरण आहे. ह्या सगळ्याचा मानसिक ताण अनंतरावांना सहन होईना; त्यांना औदासीन्याने घेरले. एकदा तर त्यांनी आत्महत्या करायचा विचार केला.
 पुढे त्यांनी शेती बंद करायचा निर्णय घेतला. जमीन विकून टाकली. पुण्यात भोसरीला फ्लॅट घेतला. मुलांना शिकवले. एक मुलगा नोकरीनिमित्त कोरियाला गेला, दुसऱ्याला पुण्यातच चांगली नोकरी मिळाली.
शेवटची काही वर्षे अनंतराव दिवसभर जोशींबरोबर राहत. औषधे जोशी नेहमीच आपली आपण घेत, त्याबाबतीत ते खूप दक्ष होते. पण अंघोळ करताना, कपडे बदलताना, उठताना, बसताना पुढे पुढे जोशींना सतत आधार लागे. व्हीलचेअरवरून कुठे जायचे म्हटले तरी कोणीतरी लागे. अनंतराव ही सारी कामे विनातक्रार, आपुलकीने व शांतपणे करत असत. जोशींना काही त्रास होत असेल तर रात्रीचा ते तिथेच मुक्कामही करत. 'साहेबांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यांनी आम्हाला जे दिले त्या तुलनेत हे काहीच नाही,' ह्या अत्यंत निरलस भावनेने अनंतरावांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोशींची सेवा केली.

 कोपरगावजवळच्या टाकळी गावचे बद्रीनाथ देवकर ऊस आंदोलनापासून जोशींच्या संपर्कात आले. तीनशेचा भाव मिळेस्तोवर कारखान्याला ऊस घालायचा नाही हा संघटनेचा आदेश होता. कारखान्याची माणसे ऊस तोडायला आली तेव्हा बद्रीनाथांनी बांधावर उभे राहून त्यांना कडवा विरोध केला. त्यावेळी बरीच मारामारीदेखील झाली होती, पण उंचेपुरे बद्रीनाथ डगमगले नाहीत. त्याकाळात कितीही कष्ट केले तरी खर्च भरून निघण्याइतकेही पैसे शेतीत सुटायचे नाहीत; कमाई दूरच. भावंडांचे शिक्षण, बहिणींची लग्ने वगैरे घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावरच. नशिबाला दोष देत दिवस कंठत असताना उसाच्या आंदोलनात त्यांना आशेचा पहिला किरण दिसला आणि सगळे कौटुंबिक पाश तोडून त्यांनी आंदोलनात उडी घेतली. पूर्णवेळ संघटनेचे काम करू लागले. खूपदा असे व्हायचे, की घरची एखादी गाय विकून किंवा असेल नसेल ते दुसरे काही विकून ते अधिवेशनाला जात. ते एकदा मला म्हणाले होते, "वयाच्या चाळिसाव्या वर्षापर्यंत फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय, हेही मला ठाऊक नव्हते."

 संघटनेत बद्रीनाथ यांनी कधीच कुठले पद भूषवले नाही, कधी भाषणही केले नाही, कधी व्यासपीठावर दिसले नाहीत. त्यांचा तो पिंडच नव्हता. पण स्वतः पार्श्वभूमीवर राहन सगळे नियोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या पत्नी शुभांगी म्हणजे श्रीरामपूरच्या प्रसिद्ध शिंदे कुटुंबातल्या. रावसाहेब आणि त्यांचे मोठे बंधू अण्णासाहेब शिंदे ही अगदी जुळ्या भावांप्रमाणे दिसणारी जोडगोळी सगळ्या नगर जिल्ह्यात प्रसिद्ध. दोघेही पूर्वी बेचाळीसच्या आंदोलनात व नंतर साम्यवादी आंदोलनात सामील झाले होते. पुढे दोघेही वकील झाले, रावसाहेब कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहवासात आले. आशिया खंडात सगळ्यांत मोठ्या मानल्या गेलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कामाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. संस्थेचे चेअरमन बनले. अण्णासाहेब पुढे यशवंतरावांच्या सल्ल्याने राजकारणात शिरले.

सहकारी आणि टीकाकार३८५