पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य निर्माण व्हावे म्हणून इंटरनॅशनल मॉनेटरी फंड, वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (आयटीओ) अशा तीन संस्था स्थापन करायचे ठरले. त्यातील मुख्यतः वित्तपुरवठा करणाऱ्या पहिल्या दोन लगेचच अस्तित्वात आल्या आणि अमेरिकन प्रभावाखाली असल्या तरीही चांगल्या प्रकारे कार्यरत झाल्या. तिसरी व्यापारविषयक संस्था ITO ही मात्र अस्तित्वात येऊ शकली नाही. कारण तिच्यामुळे आपले स्वतःचेच सार्वभौमत्त्व धोक्यात येईल व आपल्या महासत्ता म्हणून असलेल्या स्थानाला धक्का बसेल अशी भीती अमेरिकेला वाटली. त्याऐवजी मग वेगवेगळ्या पाश्चात्त्य राष्ट्रांनी एकमेकांत करार केले व त्यातूनच जनरल अॅग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड (GATT) हा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठीचा चर्चामंच ३० ऑक्टोबर १९४७ रोजी जिनिव्हा येथे अस्तित्वात आला. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये परस्परव्यापारावर जी बंधने आहेत, ती कमीत कमी करत आणणे हे मंचाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात अनेक वर्षे त्या दिशेने फारशी काही प्रगती झाली नव्हती; शिवाय मुख्य म्हणजे, तिचे कार्य फक्त वेगवेगळ्या औद्योगिक वस्तूंच्या व्यापारापुरते सीमित राहिले; शेतीमालाचा व्यापार ह्या संस्थेच्या कार्यकक्षेच्या बाहेरच राहिला.
 ह्यात क्रांतिकारक बदल घडायला सुरुवात झाली ती १९८६ साली. त्यावर्षी लॅटिन अमेरिकेतील उरुग्वे देशात भरलेली GATT परिषद ही अगदी वेगळी ठरली. १२३ देश त्या परिषदेत सामील झाले होते. त्या परिषदेत असे ठरले, की उदारीकरणासाठी एक नेमका व सर्वांना सगळे मुद्दे स्पष्ट होतील असा आराखडा तयार करावा, वेगवेगळ्या देशांना तो मान्य होईल, ह्यादृष्टीने त्यांच्याशी चर्चा करावी आणि मग त्याला धोरणाचे अंतिम रूप द्यावे. हे अत्यंत अवघड काम, आर्थर डंकेल या स्विस प्रशासकावर सोपवण्यात आले. डंकेल हे GATT चे १९८० ते १९९३ अशी सलग तेरा वर्षे महासंचालक (Director General) होते व त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता होती.
 त्यांनी अविश्रांत मेहनत घेऊन एक आराखडा तयार केला; त्यात शेतीमालाचाही त्यांनी समावेश केला. डंकेल प्रस्ताव (Dunkel Draft) म्हणतात तो हाच आराखडा. पूर्वी जे वेगवेगळे करार हजारो पानांवर शब्दबद्ध झाले होते, ज्यांच्यात अनेक ठिकाणी परस्परविरोध होता, ज्यांतील वेगवेगळ्या कलमांना वेगवेगळ्या देशांची मान्यता नव्हती, अशा अगणित कागदपत्रांचे अध्ययन करून, सगळ्यांशी सल्लामसलत करून, त्यांतील नेमक्या व सर्वांना न्याय देणाऱ्या बाबींचा समावेश डंकेल यांनी आपल्या फक्त ५०० पानी मसुद्यात केला होता. ही कामगिरी अभूतपूर्व अशीच मानली गेली.

 १९९१मध्ये त्यांनी तो मसुदा चर्चेसाठी जगभर प्रसृत केला व अत्यंत चिकाटीने त्याचा पाठपुरावा सुरू केला. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन शेवटी १९९४मध्ये तो मसुदा संमत झाला व त्यातूनच GATTची जागा घेणारी जागतिक व्यापार संघटना (WTO) ही संस्था अस्तित्वात आली. तो दिवस होता १ जानेवारी १९९५. आंतरराष्ट्रीय व्यापार हा जागतिकीकरणाचा गाभा होता व जागतिकीकरणाला नेमके स्वरूप मिळाले, ते ह्या डंकेल प्रस्तावामुळे; त्यातून निर्माण झालेल्या WTOमुळे. ह्या प्रस्तावाला चर्चेच्या काळात

४१०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा