पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 राजकीय प्रवास म्हणजे जोशींनी घेतलेला एका नव्या हत्याराचा शोध होता. त्यांच्या एकूण विचारांची दिशा कायम होती, पण त्या दिशेने जाण्यासाठी आता वेगळा कुठला रस्ता घेता येईल, हे ते शोधत होते.
 त्यांच्या एकूण प्रकृतीशी हे अगदी सुसंगत असेच होते. “मी सतत नव्याच्या शोधात असतो, शाडूच्या एकासारख्या एक मूर्ती घडवत बसावे, तसे एकच काहीतरी पुनःपुन्हा करत बसावे, ह्यात माझा जीव रमत नाही. प्रत्येक वेळी आपले विचार तपासून घ्यायचे, अनुभवाशी पडताळून बघायचे, पुनर्विचार करायचा आणि आवश्यक वाटल्यास त्यांचा त्याग करून पुन्हा नवा रस्ता पकडायचा, नव्याने शोध सुरू करायचा, हाच माझा स्वभाव आहे," ते एकदा सांगत होते.
 भारतात यावे व शेती सुरू करावी हाही त्यांनी स्वीकारलेला अगदी पूर्णतः नवा असा रस्ता होता. त्यानंतर शेती करता करता आंबेठाण-चाकण परिसरात सामाजिक कामात घेतलेला सहभाग हाही असाच एक नवा रस्ता होता. त्यानंतर शेती आंदोलनाला केलेली सुरुवात हाही एक नवा रस्ता होता. आणि त्यानंतर राजकारणात शिरणे हाही तसाच नवा रस्ता होता.
 ह्यात पूर्वनियोजित असे काही असावे असे प्रस्तुत लेखकाला वाटत नाही. एक रस्ता चोखाळत असतानाच पुढचा रस्ता त्यांच्या डोळ्यापुढे स्पष्ट होता असेही दिसत नाही. कांदा आंदोलनात, ऊस आंदोलनात किंवा नंतरच्या तंबाखू आंदोलनात त्यांच्या मनात राजकारणात शिरावे असा विचार प्रकर्षाने नव्हता; म्हणजे तो विचार त्यांच्या मनात अजिबात येऊन गेला नसेल असे नाही, पण आपले शेतकरी आंदोलन राजकारणमुक्त ठेवावे ही त्यांची तत्कालीन भावना प्रामाणिक होती.
 आपले बहुतेक सारे अनुयायी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यातले काही आणीबाणीच्या विरोधी आंदोलनात तुरुंगातही होते, त्यात उजवे आहेत तसेच डावेही आहेत, त्यामुळे संघटनेने कुठल्याही एका पक्षाची बाजू घेतली तर अन्य पक्षाचे अनुयायी सोडून जातील, हे त्यांना समजत होते. म्हणूनच 'संघटनेच्या मंदिरात येताना आपापले राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवा' असे जे ते म्हणाले होते ते मनापासूनचेच होते. राजकारणाचा विचार हा नंतरचाच आहे.
 'प्रथमपासूनच त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा होती व तिच्या पूर्तीसाठी त्यांनी संसदेचा वापर केला' ह्या काही जणांनी केलेल्या टीकेशी सहमत होणे कठीण आहे.

 लोकसभा निवडणुकांनंतर लगेचच २१ व २२ जानेवारी १९८५ रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका आल्या. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे धुळे येथे अधिवेशन भरले. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावर प्रथमच सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले गेले. सत्तारूढ इंदिरा काँग्रेससोडून अन्य सर्व पक्षांनी आपापले प्रतिनिधी पाठवले. शेतकरी कामगार पक्षाचे एन. डी. पाटील, जनता पक्षाचे पी. के. पाटील, काँग्रेस(शरद पवार गट)चे पद्मसिंह पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे

३२४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा