पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तंत्रज्ञानातील अनेक नवीनतम गोष्टींचा जोशींनी ऊहापोह केला होता. जीएम बियाणांच्या पलीकडे जाणाऱ्या एरोपॉनिक्ससारख्या तंत्रज्ञानाची महती त्यांनी सांगितली होती. लक्ष्मी प्रकटते आहे आपल्या शेतात...' हे या अधिवेशनाचे घोषवाक्य होते.
 ह्या बदलत्या परिस्थितीत एकीकडे राजकीय घडामोडी घडतच होत्या. जोशींचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी आसपास काय चालले आहे ते कळतच होते. त्याच सुमारास काही व्याख्यानांच्या निमित्ताने जोशी यांचा इंडियन लिबरल ग्रुपशी व त्याच्याशी संबंधित असलेल्या स्वतंत्र पक्षाशी संबंध आला होता. भारतातल्या इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा आपल्या विचारांशी सर्वांत जास्त जुळणारा हाच पक्ष आहे, हे त्यांना जाणवले. त्यावेळी जवळपास मृतप्राय झालेल्या त्या पक्षाचे पुनरुज्जीवन करायचे त्यांनी ठरवले. ही साधारण १९९३ सालची घटना. ह्या पक्षाची थोडी पार्श्वभूमी इथे सांगायला हवी.
 ह्या पक्षाचे संस्थापक म्हणजे थोर स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस पक्षाचे दक्षिण भारतातील सर्वांत मोठे नेते, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, प्रथितयश लेखक व विचारवंत, महात्मा गांधी यांचे व्याही आणि निकटचे सहकारी, भारतरत्न पुरस्काराने गौरवले गेलेले पहिले भारतीय अशा अनेक नात्यांनी इतिहासात नोंद झालेले चक्रवर्ती राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी. गांधीजी त्यांना 'माझ्या विवेकबुद्धीचे राखणदार' ('my conscience-keeper') असे म्हणत. समाजवादाला आणि पंडित नेहरू पंतप्रधान म्हणून राबवत असलेल्या धोरणांना राजाजींनीच देशात सर्वप्रथम जाहीर विरोध केला. त्यासाठीच त्यांनी ४ जून १९५९ रोजी मद्रास येथे एका जाहीर सभेत स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्यावेळी त्यांचे वय ८१ होते हे लक्षात घेण्यासारखे आहे.
 नेहरूंची समाजवादी धोरणे भारताला अतिशय हानीकारक आहेत, परंतु त्यांच्या व्यक्तित्वाने भारून गेलेला देश त्यांना पुरेसा विरोधही करत नाहीये, परिणामतः देश दिवाळखोरीच्या दिशेने चालला आहे. चुकीच्या आणि गोंधळात पाडणाऱ्या कायद्यांमळे आणि मोकाट सुटलेल्या नोकरशाहीमुळे सर्वसामान्य व्यक्तीला प्रामाणिकपणे व सन्मानाने जगणे अशक्य होऊन बसले आहे, देशातील गरिबी हटवायची असेल तर त्यासाठी उद्योजकतेला उत्तेजन व वाव मिळायला हवा व त्यासाठी मक्त अर्थव्यवस्थेचा देशाने स्वीकार करावा, अशी राजाजींची भूमिका होती. लायसन्स-परमिट राज ही त्यांचीच प्रसिद्ध शब्दरचना. अनेकदृष्ट्या राजाजींची भूमिका भविष्यासाठी तंतोतंत खरी ठरली आहे.
 राजाजींच्या देशातील उच्च स्थानामुळे पक्षस्थापनेनंतर मिनू मसानी, एन. जी. रंगा, कन्हैयालाल मुन्शी, जनरल करिअप्पा, एच. एम. पटेल, नारायण दांडेकर यांसारखे अनेक कर्तृत्ववान व प्रतिष्ठित भारतीय त्यांच्यासोबत होते. 'हा भांडवलदारांचा आणि संस्थानिकांचा पक्ष आहे' असा खोटा प्रचार त्यांच्याविरुद्ध काँग्रेसतर्फे सतत करण्यात आला. तरीही १९६७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्या पदार्पणातच स्वतंत्र पक्षाने लोकसभेच्या ४५

अंगाराकडून ज्योतीकडे : शोध नव्या दिशांचा - ४२५