पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परुळकरांच्या 'योद्धा शेतकरी'मुळे आंदोलनाचा खूप प्रसार झाला हे त्यांनी नंतर मान्य केले असले, तरी मुळात ती लेखमाला लिहायची व नंतर त्याचे पुस्तक काढायची कल्पना 'माणूस'चे संपादक श्री. ग. माजगावकर व स्वतः लेखक विजय परुळकर यांचीच होती; त्यात जोशींनी त्यांना फार काही उत्तेजन दिले अशातला भाग नव्हता.
 शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती हे सुरेशचंद्र म्हात्रे यांनी शब्दांकित केलेले पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरले हे खरे, पण त्या पुस्तकाचे कामही प्रशिक्षण शिबिराच्या टेप्स नकलून झाल्यानंतर मागेच पडले होते. म्हात्रेनी खूप कष्ट घेऊन ते शब्दांकन पूर्ण केले. पण अशा स्वरूपाच्या शब्दांकनामध्ये नेमकेपणाचा व अचूकतेचा स्वाभाविक अभाव असतो. यासाठी म्हात्रे तयार झालेला मजकुर जोशींकडे तपासण्यासाठी पाठवत, पण कामाच्या रगाड्यात बरेच दिवस त्यासाठी जोशींना वेळ मिळत नसे व त्यामुळे पुस्तकाचे काम अडून राहायचे. खरे सांगायचे तर हे पुस्तक प्रकाशित करण्याबद्दल जोशींचे मन द्विधा होते. “माझे विचार अजून पक्के झालेले नाहीत. अशातच ते छापील स्वरूपात प्रकाशित झाले, तर नंतर मला ते बदलता येणार नाहीत." असे ते म्हणत. पण म्हात्रेनी पाठपुरावा करणे थांबवले नाही.
 शेवटी एकदाचे २३ नोव्हेंबर १९८२ रोजी पुस्तक प्रकाशित झाले. तरीही पहिल्या आवृत्तीवर लेखक म्हणून 'शरद जोशी' असे नाव छापलेले नाही; 'शब्दांकन : सुरेशचंद्र म्हात्रे' एवढेच छापलेले आहे! जोशी या पुस्तकाविषयी शेवटपर्यंत किती साशंक होते हे यावरून दिसते. 'शेतकरी आंदोलनात बळी पडलेल्या हुतात्म्यांना हे पुस्तक अर्पण केलेले आहे. वर्धा व अंबाजोगाई येथील दोन्ही प्रशिक्षण शिबिरांतील विचारांचे शब्दरूप असलेल्या ह्या पुस्तकात एकूण २१४ पाने (अंबाजोगाई १७४ + वर्धा ४०) असून त्याची किंमत अवघी दहा रुपये, म्हणजे त्या काळाचा विचार करताही खूपच कमी आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांमधेही त्याचा प्रसार व्हावा ही भूमिका त्यामागे होती. ह्या प्रकाशनाद्वारे शेतकरी संघटनेचा प्रकाशन विभाग सुरू झाला व पुढे अनेक वर्षे म्हात्रे यांनीच त्या विभागाची धुरा वाहिली.
 कांदा आंदोलनाच्या वेळी १९७९ साली सुरू केलेले वारकरी हा जोशींच्या नियतकालिकांच्या जगातील प्रवेश. एक-दीड वर्षातच आंदोलनाच्या वाढत्या व्यापामुळे ते चालवणे अशक्य झाले. त्याच्याविषयीही पूर्वी विस्ताराने लिहिलेच आहे.
 नंतरचे पाऊल म्हणजे शेतकरी संघटक. हे पाक्षिक संघटनेचे मुखपत्र म्हणून ६ एप्रिल १९८३ रोजी सुरू झाले. सर्वसामान्य मासिकाच्या आकाराची, साध्या न्यूजप्रिंटवर लेटरप्रेसने छापलेली, घडी घातलेली, एकरंगी, चार किंवा जास्तीत जास्त आठ पाने त्यात असत. सलग चार वर्षे ते प्रकाशित झाल्यानंतर ते स्थगित करून ६ एप्रिल १९८७ पासून आठवड्याचा ग्यानबा हे बहुरंगी मुखपृष्ठ व अधिक चटपटीत रूप असलेले, ऑफसेटने छापलेले पाक्षिक सुरू केले गेले. ते नाशिकहून प्रकाशित होत होते. संपादक होते मुरलीधर खैरनार व प्रकाशक मिलिंद मुरुगकर. पण तेही तसे अल्पजीवी ठरले व आधीच्या स्वरूपातील शेतकरी संघटक पुन्हा सुरू केले गेले ते बरीच वर्षे चालले, पण पुढे काळाच्या ओघात तेही बंद पडले.

 सुरुवातीला वारकरी, नंतर आठवड्याचा ग्यानबा व नंतरची सर्वाधिक वर्षे शेतकरी

साहित्य आणि विचार४३५