पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



श्वेतक्रांती त्यांनी स्वित्झर्लंडमधेही पाहिलीच होती. पण का कोण जाणे, आपल्या शेतीच्या प्रयोगांना जोशींनी ह्या श्वेतक्रांतीची जोड दिली नाही. आपल्या आंबेठाणच्या शेतावर सुरुवातीला त्यांनी गोठा बांधून घेतला होता, दोन-तीन म्हशी पाळल्याही होत्या; पण दोनतीन वर्षांतच त्यांनी तो जोडधंदा बंद करून टाकला.
 साताऱ्याचे रमेश आगाशे हायड्रोलॉजिस्ट म्हणून केंद्र सरकारच्या नोकरीत वरिष्ठ पदावर होते. शरद जोशींच्या पंजाब आंदोलनाच्या काळात ते चंडीगढलाच होते. धरण आणि कालवे यांद्वारे होणाऱ्या पाणी वाटपात नदी खोऱ्याच्या खालच्या भागातील शेतकऱ्यांवर किती मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, पाण्याचे न्याय्य असे समवाटप होणे का गरजेचे आहे वगैरे प्रश्नांवर त्यांनी जोशींशी केलेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यात 'पाणी प्रश्नाचे गांभीर्य आपण पुरेसे विचारात घेतले नाही' असे जोशींनी कबूल केले आहे.

इतरही अनेक शेतीविषयक प्रश्नांकडे जोशींचे दुर्लक्ष झाले असे आता मागे वळून बघताना म्हणता येईल. याबाबत जोशींचे स्वतःचे समर्थन असे होते :
 "शेतीमालाला वाजवी दाम मिळायला हवा ह्याच मुद्द्यावर लढण्यात आमची सगळी ताकद लागली होती. त्यामुळे शेतीउत्पादन वाढावं म्हणून काही प्रयत्न करण्यात मला स्वारस्य वाटत नसे. कारण एकदा शेती व्यवसाय तोट्यात आहे म्हटल्यावर जेवढं उत्पादन अधिक, तेवढा तोटा अधिक असा माझा सरळ हिशेब होता. त्यामळे सुरुवातीच्या आठ-दहा वर्षांत तरी इतर कुठल्या गोष्टींकडे मी लक्षच दिलं नाही. त्या वेळच्या परिस्थितीत ते बरोबरच होतं."

 सिंहावलोकन करताना इतरही काही प्रश्न मनात येतात.
 उदाहरणार्थ, ते स्वत:ला एक यात्रिक म्हणवतात, पण या यात्रिकाची यात्रा 'शेतीमालाला रास्त भाव' या एकाच मुक्कामाशी जरा जास्तच तर रेंगाळली नाही ना?
 'शेतीमालाला रास्त भाव' या एकाच सूत्रात आपला सर्व कार्यक्रम गुंफण्याचा जोशींनी प्रयत्न केला. सगळ्या जीवनाला सामावून घेईल अशा एखाद्या सूत्राचा, तत्त्वज्ञानाचा ध्यास त्यांना पूर्वीपासूनच होता. 'योद्धा शेतकरी'मध्ये त्यांनी म्हटले होते, “मार्क्सच्या तत्त्वज्ञानातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे - 'विचारपद्धत' ही कल्पना! आपल्या विचारांची अशी एक पद्धत तयार करता आली पाहिजे, की जिच्यामधील सर्व घटक हे एकमेकांशी तर्कशुद्धरीत्या संबंधित असले पाहिजेत!" हाच सूत्रबद्धतेचा ध्यास ते नंतर विकसित करत गेलेल्या, पण मुळात त्यांच्या विचारसरणीत प्रथमपासूनच अग्रस्थानी असलेल्या, स्वतंत्रतावादाच्या त्यांनी केलेल्या मांडणीतही आढळतो. स्वतःच्या या स्वतंत्रताप्रेमाची सांगड ते शेतकरी आंदोलनाशी घालतच, पण शिवाय थेट आपल्या डोंगर चढण्याच्या आवडीशी आणि अगदी क्लॉस्ट्रोफोबिक (बंदिस्त जागेत गुदमरणाऱ्या) शरीरप्रकृतीशीही घालत. पण मानवी जीवनाची एकूण व्यामिश्रता विचारात घेता सूत्रबद्धतेचा हा हव्यास अडचणीतच आणणारा नव्हता का? देशापुढील सर्वच समस्या सोडवण्यासाठी एकच एक गुरुकिल्ली अशी कधी असू शकते का?

 अर्थात अशा प्रश्नांची उत्तरे सोपी किंवा एकमेव नक्कीच नसणार.


सांजपर्व - ४८३