पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 जोशी स्वतःला महात्मा जोतीराव फुलेंचे पाईक समजायचे. त्यांच्या शेतकऱ्याचा असूड या पुस्तकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुस्तकाचा गुणगौरव करणारे शतकाचा मुजरा नावाचे एक छोटे पुस्तकही जोशींनी शेतकरी संघटनेच्या अगदी सुरुवातीच्या काळात लिहिले होते. महात्मा फुले यांनी फक्त समाजसेवा केली असे नसून ते उत्तम उद्योजकही होते. 'जोडोनिया धन उत्तम वेव्हारें; उदास विचारें वेच करी' ही तुकारामउक्ती जणू त्यांचा आदर्श होती. त्यांची हडपसर-मांजरी परिसरात सुमारे ७५ एकरांची बागायती शेती होती; तिच्यात २५ एकरांवर ऊस होता. त्यांचे उसाचे उत्तम चालणारे गुहाळ होते व त्याकाळी त्यातून हजारो रुपये दरसाल उत्पन्न मिळत असे. बांधकामाची अनेक कंत्राटे त्यांनी घेतली होती व पारही पाडली होती. येरवडा येथील पुलाचे कंत्राट त्यांनी घेतले होते. खडकवासला येथे तलाव बांधला गेला त्यासाठी दगड पुरवायचे कंत्राटही त्यांचेच होते. तसेच कात्रजच्या बोगद्याचेही. अशा अनेक उपक्रमांतून जोतिबांनी चांगला पैसा मिळवला आणि चांगल्या समाजोपयोगी कामासाठी खर्चही केला. त्यांच्यातला हा यशस्वी उद्योजक लोकांना फारसा माहितीच नसतो.
 पण आपल्याला गुरुस्थानी असलेल्या या महात्म्याला त्याच्या व्यावसायिक उपक्रमांत जे यश मिळाले, तसे यश जोशीना मात्र मिळू शकले नाही. ज्या प्रकारच्या उपक्रमात नंतर इतर अनेकांनी घवघवीत यश मिळवले त्याच प्रकारचे हे तिन्ही उपक्रम होते पण जोशी किंवा शेतकरी संघटनेशी संबंधित मंडळी मात्र ते चालवू शकली नाही; खरे तर पुरते उभारूही शकली नाही. खोलात जाऊन तपास केला तर ह्याची नेमकी कारणे कदाचित सापडतीलही, पण तो ह्या चरित्राचा विषय नाही.
 एकंदर विचार करता, व्यावसायिक संस्था उभारण्यात जोशींना कायम अपयश येत गेले असे दिसते.
 "खुलेपणाच्या विचाराचा प्रचार मी शेतकरी संघटनेमार्फत करत राहिलो; स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातूनही मी तो केला; पण खुल्या व्यवस्थेतील एखादी शासननिरपेक्ष संस्था उभी करणे आणि चालवून दाखवणे मला जमले नाही." असे जोशी यांनी एके ठिकाणी कबूलही केले आहे. (अंगारमळा, पृष्ठ ९२)
 वारकरी, आठवड्याचा ग्यानबाही शेतकरी संघटनेची जोशींनी स्वतः पुढाकार घेऊन सुरू केलेली मुखपत्रेही अशीच अल्पायुषी ठरली होती व शेतकरी संघटक केवळ सुरेश म्हात्रे यांनी सर्व जबाबदारी स्वीकारल्यामुळे बरीच वर्षे चालले, पण पुढे तेही बंद पडले याचीही या ठिकाणी आठवण होते.
 आंदोलनाचा आणि राजकीय कामाचा बहर ओसरल्यानंतरच्या काळात शरीर थकले असले तरी जोशी यांचे विचारचक्र चालूच असायचे, नव्या दिशांचा शोध चालूच असायचा. शेतीबाबतच्या जगभरातल्या ताज्या घडामोडींचा ते सतत वेध घेत असत आणि आपले विचार वेगवेगळ्या लेखांतून मांडत असत. आंदोलन एके आंदोलन न करता अधिक विधायक काय
४२२ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा