पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तो नेता बनतो असे नाही, असे काहीतरी त्यांना सांगायचे होते. ते एकदा मला सांगत होते,
  "मी फार चांगले विचार मांडतो म्हणून शेतकरी माझ्याकडे आकर्षित होतात, असे जर कोणी म्हणत असेल, तर ते सपशेल चुकीचे आहे. कारण ज्याने कधीच कुठली वैचारिक मांडणी केलेली नाही, अशा टिकैतसारख्या नेत्याकडेही तेवढ्याच मोठ्या संख्येने शेतकरी आकृष्ट होताना दिसतात. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत समाजच आपल्याला हवा तो नेता निवडतो. आपल्याला हव्या असलेल्या गुणांचे आरोपण तो त्या नेत्यावर करत असतो व त्यातून त्या नेत्याची समाजाला प्रिय अशी प्रतिमा घडत जाते. प्रेमात पडल्यावर समोरची व्यक्ती आपोआपच सुंदर दिसू लागते, तसा हा प्रकार असावा."
 अनेक मोठ्या व्यक्तींमध्ये काहीतरी उणिवा असतात, रोग असतात, आणि त्यांचा उपयोग नेतेपदाकडे वाटचाल करताना त्यांना आपल्या गुणांपेक्षाही अधिक होतो, असेही ते अनेक उदाहरणे देऊन सांगत, महात्म्यांना आपण उगाचच फार महत्त्व देतो, समाजाचे कल्याण महात्म्यांपेक्षा तथाकथित दुरात्म्यांनीच अधिक केले आहे, लुटालूट करणाऱ्या चेंगीज खान आणि नादिर शहा यांनीही देशादेशांतील भिंती उद्ध्वस्त करायचे फार मोठे काम केले आहे व त्यातून जग जवळ आणायला प्रेरणाही दिली आहे असेही ते म्हणाले होते.
 एखाद्याला किती यश मिळणार हे त्याच्या त्याच्या नशिबावर सर्वाधिक अवलंबून असते असेही ते मानत. आपण नेहमी अपयशाचेच धनी होणार, आपल्या कामाचे उचित श्रेय आपल्याला कधीच मिळणार नाही, ही लहानपणापासूनचीच त्यांची भावना होती. त्यांना असलेल्या या श्रेयविहीनतेच्या जाणिवेबद्दल मागे लिहिलेलेच आहे.
 याही कल्पनेचा पुरेसा विस्तार त्यांच्या मनात झाला नसावा. स्वतःच्या जीवनाचे सिंहावलोकन करताना जाणवणाऱ्या काही गोष्टी त्यांना या दुसऱ्या पुस्तकात मांडायच्या होत्या असे वाटते; नेमके सांगणे अवघड आहे, पण हे पुस्तक लिहायचे राहून गेले एवढे मात्र खरे.

 त्यांचे लेखन वाचताना आणखी एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे अनेकदा अगदी आगळ्यावेगळ्या पण मौलिक अशा मुद्द्यांना ते स्पर्श करतात, त्यातून सजग वाचकाचे कुतूहल जागृत होते, पण मग त्या मुद्द्यांचा पुरेसा विस्तार न करता, ते अर्धवटच सोडून जोशींचे निवेदन पुढे सरकते. उदाहरणार्थ, मुसलमान आक्रमकांनी देवळे का लुटली याची त्यांची कारणमीमांसा, किंवा रशियन क्रांती ही कम्युनिस्टांपेक्षा पहिल्या महायुद्धात पराभूत होऊन मॉस्कोला परतणाऱ्या बेधुंद रशियन सैनिकांनी केली हे त्यांचे मत, किंवा इतिहासावर महापुरुषांचा फारसा परिणाम होत नाही हा त्यांचा मुद्दा, अधिकाधिक उत्पादन हे उपभोग वाढवण्यासाठी नसून निवडीसाठी पर्याय वाढावेत म्हणून असते ही त्यांची भूमिका. वाचकांची जिज्ञासा चाळवणाऱ्या, पण पुरती न शमवणाऱ्या, अशा वेधक उल्लेखांची ही यादी पुष्कळ वाढवता येईल.
 या व अशा इतरही अनेक विषयांवर त्यांनी विस्ताराने लिहायला हवे होते. पुरेसा वेळ देऊन व पुरेशा गांभीर्याने लिहायला हवे होते. ते चांगल्याप्रकारे वाचकांपुढे यायला हवे होते.


४५० - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा