पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



इलाबेन भट. विद्यापीठाची मान्यता न घेता उत्तम तांत्रिक शिक्षण देऊन हजारोंना नोकऱ्या मिळवून देणाऱ्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचे मनोहर आपटे, अशा अनेकांचे त्यांना कौतुक होते. तरीही एकूण सामाजिक कार्यावर त्यांनी खूपच टीका केली.
 सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्यांची भारतातली संख्या एक-दोन टक्केसुद्धा नसताना आणि अन्य सारा समाज पूर्णत: स्वार्थाच्या मागेच लागलेला असताना जोशींनी पुन्हा स्वार्थाचा पुरस्कार करावा व सेवावृत्तीचा कठोर उपहास करत राहावे, याचे खूप आश्चर्य वाटते.
 स्वार्थाचा आणि एकूणच मुक्त अर्थव्यवस्थेचा कायम गुणगौरव करणाऱ्या आयन रॅंडच्या युनायटेड स्टेट्समध्येसुद्धा स्वयंसेवी क्षेत्राला प्रचंड जनाधार होता व आहे. असंख्य अमेरिकन अशा सेवाकार्यात सहभागी होत असत व आजही होतात. किंबहुना अमेरिकेचा उल्लेख आजही 'अ नेशन ऑफ जॉइनर्स' असा केला जातो. या साऱ्या पार्श्वभूमीवर जोशींनी स्वयंस्फूर्त कार्याला केलेला प्रखर विरोध असमर्थनीय वाटतो. त्यातून विनाकारण अनेक जण दुरावले.
 'मी केवळ माझ्या आनंदासाठी युएनमधली नोकरी सोडून भारतात परतलो, या कामात पडलो. यात त्याग वगैरे अजिबात नाही, समाजसेवा तर नाहीच नाही' असे त्यांनी वेळोवेळी कितीही ठासून सांगितले, तरी अन्य जगाच्या दृष्टीने त्यांनी जे केले तो त्यागच होता; समाजहितासाठी केलेले समर्पणच होते. पण मग तरीही 'हे मी इतरांसाठी नाही, स्वत:साठीच करतो आहे' ही भूमिका त्यांनी का घ्यावी?
 कदाचित असे तर नसेल, की शेतकरी संघटनेच्या अगदी सुरुवातीच्याच काळात त्यांना काही कटू सत्ये जाणवली होती? "तुम्ही मांजराला मिठाई खायला घालत असला, आणि एवढ्यात त्याला एखादा उंदीर दिसला, तर मिठाई सोडून ते मांजर उंदराच्याच मागे पळत जाईल," असे माधवराव मोरे आपल्याला म्हणाल्याचे त्यांनी एके ठिकाणी लिहिले आहे. तसे काही अनुभव त्यांना आले होते का? आणि मग त्यागी भावनेतून केलेल्या कार्यातूनही जर निराशाच हाती येणार असेल, तर मग आपले कार्य हा त्याग नव्हताच, त्यापासून कुठलेच श्रेय अपेक्षित नव्हते, ते करण्यातला आनंद मिळविणे एवढेच आपले ईप्सित होते, ही भूमिका त्यांना अधिक सुरक्षित वाटली असेल?
 उघड उघड केलेल्या प्रचंड त्यागाचे श्रेय नाकारण्याचा त्याग ही त्यांनी अंतर्मनाच्या गाभ्याचे संरक्षण करण्यासाठी घेतलेली कवचकुंडले होती का?

 काही गैरसमज शरद जोशींबद्दल उगाचच प्रचलित आहेत. एक म्हणजे अर्थवादाच्या मागे लागून त्यांनी चारित्र्यसंवर्धनाला दुय्यम लेखले हा. नैतिकतेला महत्त्व देणाऱ्यांचा त्यांनी केलेला उपहास हाही अनावश्यक होता. खरे तर नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या इतर अनेकांपेक्षा जोशींचे वागणे अधिक नैतिक होते, व्यक्तिगत पातळीवर अधिक प्रामाणिक होते.

 त्यांना वारकरी संप्रदायाचे वावडे होते हा असाच एक गैरसमज. त्यांनी सुरुवातीच्या


सांजपर्व - ४७५