पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्जाचा निकाल लागेपर्यंत नवे व्याज पकडले जात नाही. उद्योगक्षेत्र ह्या तरतुदीचा सतत लाभ उठवत असते. शेतकऱ्यांनीही तो लाभ घ्यायला हवा. त्याचप्रमाणे दरवर्षी शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमळे निदान दहा हजार कोटींचे नुकसान होते. तसे नुकसान जर उद्योगक्षेत्राचे झाले, तर त्यातील बराचसा भाग सरकार वा विमा कंपनी भरून देते. शेतकऱ्यांच्या बाबतीतही हे घडायला हवे. त्याचप्रमाणे कुठल्याही करारनाम्यात करार करणाऱ्यांना नैसर्गिक वा ईश्वरप्रणीत संकटामुळे' ('natural calamity or an act of God') कराराचे पालन करता आले नाही, तर ते त्यांना क्षम्य असते व तशी तरतूद प्रत्येक करारनाम्यात केलेलीच असते. शेतकऱ्यांनाही ही सवलत मिळायला हवी."
 २३ ऑगस्ट १९८९ तारखेच्या 'इंडियन एक्स्प्रेस'मधल्या बातमीनुसार राम जेठमलानी व शरद जोशी यांची त्याच दिवशी पंजाब व हरयाणा हायकोर्ट बार असोसिएशनसमोर भाषणे झाली. त्यात जेठमलानी यांनी कायद्याने दिवाळखोर शेतकऱ्याला काय काय संरक्षण मिळते, ह्याची यादीच वाचून दाखवली. ते म्हणाले,
 "सरकार अशा शेतकऱ्याच्या शेतावर, शेतीत वापरायच्या उपकरणांवर, त्याच्याकडील जनावरांवर जप्ती आणू शकत नाही. त्याच्या शेतीच्या कामात अडथळा येईल असे कुठलेही कृत्य सरकारने केले, तर ते बेकायदेशीर होईल. महाराष्ट्रातील २०,००० शेतकऱ्यांनी शासनाकडे अशा प्रकारची दिवाळखोरी जाहीर करणारा मेमोरंडम सादर केला आहे व तो जर शासनाने मंजूर केला नाही, तर ते सर्व शेतकरी कोर्टात जातील. अशा केसेस मी स्वतः कुठलीही फी न घेता लढवणार आहे आणि पंजाब व हरयाणामधील वकिलांनीदेखील अशा केसेस विनामोबदला लढवाव्यात."
 हा लढा अनेक वर्षे चालला. व्ही. पी. सिंग यांनी ते पंतप्रधान असताना शेतकऱ्यांचे प्रत्येकी दहा हजार रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले होते. खरेतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची त्यांची तयारी होती, पण अर्थमंत्री मधु दंडवते यांनी विरोध केल्यामुळे शेवटी तडजोड म्हणून दहा हजाराची मर्यादा सिंगना मान्य करावी लागली. हा भाग मागील प्रकरणात आलाच आहे.
 या आंदोलनाला असा प्रदीर्घ पूर्वेतिहास असल्यामुळे प्रकृतीची व वयाची साथ नसतानाही ५ एप्रिल २००६ रोजी महाराष्ट्रात येडे मच्छिंद्र येथे झालेल्या कर्जमुक्ती अभियानात जोशींनी भाग घेतला होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे हे जन्मगाव. त्या दिवशी तिथे शेतकऱ्यांचा एक विराट मेळावा भरला होता व त्याचेच पुढे कर्जमुक्ती प्रचारयात्रेत रूपांतर झाले.
 त्याच्या पुढच्या वर्षी भारताचे शेवटचे टोक रामेश्वरम येथे झालेल्या एका आगळ्या कर्जमुक्ती आंदोलनातही त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. देशभरातले काही हजार शेतकरी ३१ डिसेंबर २००७ रोजी रामेश्वरम येथे दुपारी एकत्र जमले, मिरवणुकीने समुद्रावर गेले,

आपापल्या कर्जाचे सर्व कागदपत्र त्यांनी समुद्रात बुडवले आणि 'आम्ही आता कर्जमुक्त झालो आहोत' असे जाहीर केले. (अर्थात त्यामुळे तुम्ही कायद्याने कर्जमुक्त होत नाही; ते कर्ज व वसुलीसाठीचे आनुषंगिक खटले चालूच राहतात.)

३६६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा