पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वैचारिक मतभेद असल्याचे वरकरणी दाखवले गेले, तरी प्रत्यक्षात वैचारिक भेद फारसे नव्हते; असते, तर त्यांच्या वेगळ्या मांडणीच्या स्वरूपात ते समोर आले असते.
 दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अनेक सहकारी सोडून गेले तरीही शेतकरी संघटना कधी दुभंगली नाही. राजू शेट्टी किंवा रघुनाथ पाटील यांनी स्वतःच्या वेगळ्या शेतकरी संघटना अवश्य काढल्या, पण त्यामळे मुळ संघटनेत उभी फूट अशी कधी पडली नाही.
 तिसरी गोष्ट म्हणजे कोणीही शरद जोशी ह्यांच्या वैयक्तिक चारित्र्याबद्दल, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल शंका उपस्थित केली नाही. फार थोड्या भारतीय नेत्यांच्या बाबतीत हे घडताना दिसते. 'आम्हाला फसवून ह्यांनी स्वतः मात्र प्रॉपर्टी केली, मजा मारली' असा आरोप त्यांच्यावर त्यांच्या शत्रुंनीही केलेला नाही. इतकी वर्षे सार्वजनिक क्षेत्रात वावरूनही एखाद्याचे चारित्र्य इतके स्वच्छ राहावे हेही विशेष मानावे लागेल.
 शरद जोशींबरोबर अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्षे राबले. खूप नावे सांगता येतील. यांतल्या काहींना मी कधीच भेटू शकलेलो नाही; पण ऐकले आहे ते असे, की यांतल्या बहुतेकांच्या मनातील जोशींबद्दलचे प्रेम आजही आटलेले नाही.

 'योद्धा शेतकरी'च्या माधवराव मोरे यांना अर्पण केलेल्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत "हरामखोर शेतकरी' असं एक जळजळीत पुस्तक लिहिण्याच्या मनःस्थितीत मी तेव्हा होतो" असे विजय परुळकरांनी लिहिले आहे; पण त्याच अर्पणपत्रिकेतील शेवटचे वाक्य आहे : "शेवटी एकच. शरद जोशींवर मी आणि सरोजा प्रेम करतो – ते अबाधित आहे."
  कोल्हापूर जिल्ह्यातून लोकसभेवर निवडून गेलेले झुंजार शेतकरीनेते राजू शेट्टी यांच्या तोंडून आमच्या भेटीत मी स्वतः ऐकलेले वाक्य होते, "आम्ही साहेबांचे अर्जुन होऊ शकलो नाही, पण आम्ही स्वत:ला त्यांचे एकलव्य जरूर मानतो." हे उद्गार या दृष्टीने खूप बोलके आहेत.

 



सहकारी आणि टीकाकार४०७