पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करावे असा त्यांचा प्रस्ताव होता. त्यावर जोशी म्हणाले,
 "जर आंदोलनच करायचे असेल, तर केवळ रास्ता रोको चालणार नाही. शासन निवडणुकीत व्यत्यय येतो म्हणून तुम्हाला झोडपून काढेल आणि विरोधी पक्षही तुमच्या बाजूने उभे राहणार नाहीत. त्यासाठी मग अधिक भावनात्मक कार्यक्रम हवा. तेव्हा मी स्वतः ११ डिसेंबरपासून २१ दिवसांच्या उपोषणाला बसतो."
 पन्नाशीला येऊन ठेपलेल्या आपल्या या नेत्याने आता पुन्हा एकदा उपोषणाला बसावे ह्या कल्पनेला सर्वांचाच विरोध होता. त्यावर जोशी म्हणाले,
 "माझा जीव धोक्यात घालायला जर परवानगी नसेल, तर आजच्या बिकट परिस्थितीत कोणतेही अन्य आंदोलन छेडून इतर कार्यकर्त्यांचे हकनाक बळी द्यायला मी परवानगी देणार नाही."
 जोशींच्या ह्या काहीशा निर्वाणीच्या विधानानंतर सर्वच उपस्थित क्षणभर स्तंभित झाले. आपला प्राणप्रिय नेता अशाप्रकारे उपोषण करून स्वतःचा जीव धोक्यात घालणार, ह्या शक्यतेचे सर्वांवर खूपच दडपण आले आणि शेवटी सर्वांनी जोशी यांचा प्रस्ताव थोड्याफार नाराजीनेच मान्य केला. सभेत संमत झालेला ठराव पुढीलप्रमाणे होता :

शेतकरी संघटना सर्व कार्यकर्त्यांना आदेश देत आहे, की आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांनी काँग्रेस(आय) पक्षास एकही मत देऊ नये. शेतकऱ्यांच्या १९८४च्या स्वातंत्र्यआंदोलनाचा हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. विरोधी पक्षातील दुहीचा फायदा शेतकऱ्यांच्या प्रमुख शत्रुपक्षास मिळू नये यासाठी लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघातील एका विरोधी उमेदवाराची निवड संघटना करेल. सर्व शेतकऱ्यांनी व लोकशाही जिवंत राहावी अशी इच्छा असणाऱ्या नागरिकांनी आपापला पक्षाभिमान, जातीचा, नात्यागोत्याचा क्षुद्र विचार बाजूला ठेवून देशाला वाचविण्यासाठी संघटनेने घोषित केलेल्या विरोधी उमेदवारास निवडून आणावे.

 ह्या निर्णयामुळे संघटनेत प्रचंड खळबळ माजली व काही सहकाऱ्यांनी त्यानंतर संघटनेपासून फारकतही घेतली. आजही ह्याबाबत अनेक मतभेद आहेतच. १९८४नंतरचे शरद जोशी आम्हाला मान्य नाहीत' असे त्यांचे एकेकाळचे काही समर्थक आजही म्हणतात.

 कुठल्याही परिस्थितीत इंदिरा काँग्रेस सत्तेवर येऊ नये हे जोशींचे ठाम मत होते. कारण स्वातंत्र्योत्तर काळात देशाने जी तथाकथित समाजवादी धोरणे स्वीकारली, त्यातूनच देशाची संभाव्य प्रगती खुंटली असे ते मानत. असे असूनही आपला अभिजनवर्ग आजही नेहरूवादाचे भूत आपल्या मानेवरून उतरवून ठेवायला तयार नाही ह्याचे त्यांना वैषम्य वाटे. जोशी अगदी प्रथमपासूनच खुल्या अर्थव्यवस्थेचे जोरदार समर्थक होते व ही खुली अर्थव्यवस्था देशात येऊ शकत नाही ह्याला त्यांच्या मते दोन कारणे होती. एक, नेहरूघराणेशाही आणि दुसरे, नोकरशाही; त्यातही पहिले कारण अधिक महत्त्वाचे. नेहरूवादावर त्यांनी अतिशय कडवट

राजकारणाच्या पटावर३२१