पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रुपये प्रतिलिटर द्यायला काहीच हरकत नव्हती. इथेनॉलमुळे उसाचा भावही लगेच दुप्पट होणार होता. पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळायचे हा निर्णयदेखील लोकांवर सोडा असे जोशी म्हणत. नाहीतरी भारतात पेट्रोलमध्ये केरोसीन मिसळणे सर्रास चालते, त्यापेक्षा इथेनॉल केव्हाही सुरक्षित. ह्या सगळ्यात काही अडचणी नक्कीच होत्या, पण प्रयत्नान्ती त्या सोडवता येणार होत्या.
 शेततेलाचा प्रसार करण्यासाठी शेतकरी संघटनेने २ व ३ जुलै २००८ रोजी कोल्हापूर येथे ‘इथेनॉल शिबिर' आयोजित केले होते. त्याच्या पुढल्याच दिवशी सांगली येथे भरलेल्या शेतकरी मेळाव्यातही त्यांनी या विषयावर भाषण केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते,

कारखान्यांना इथेनॉल करण्याची परवानगी मिळाली आणि त्या इथेनॉलला फक्त २१ रुपये ५० पैसे भाव मिळाला, तरीसुद्धा उसाला टनामागे १९०० रुपये भाव मिळू शकतो. तेव्हा आता उसासाठी ७००-८०० रुपये भावाकरिताचे भांडण सोडून द्या. वैधानिक किमान किमतीचा वादही सोडून द्या. हे वाद आता कालबाह्य झाले आहेत. शेतकऱ्यांना आता नवीन युगामध्ये घेऊन जायचे असेल, तर त्याकरिता वेगळ्या त-हेची आंदोलने, वेगळ्या त-हेची रणनीती वापरून, वेगळ्या तहेच्या मागण्या कराव्या लागतील.

(शेतकरी संघटक, २१ जुलै २००८)


 भविष्यात ऊसदराचा लढा हा इथेनॉलचा लढा व्हायला हवा. भारतात साखरेचा रोजचा खप माणशी चाळीस ग्रॅम आहे, तर पेट्रोल व डिझेलचा खप माणशी दोन लिटर आहे; म्हणजेच तो साखरेच्या खपाच्या ५० पट आहे. त्यामुळे इतक्या कमी खपाच्या साखरेच्या क्षेत्रात राहण्यापेक्षा इथेनॉलच्या क्षेत्रात आपण लक्ष द्यायला हवे; या शेततेलामुळे शेतकऱ्याच्या जीवनात भविष्यात खूप मोठी क्रांती होऊ शकेल, असे जोशी म्हणत.

 उसाला अधिक भाव मिळू लागल्यानंतर शेतकऱ्याकडे अधिक पैसा आला व त्याचा उपयोग करून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांकडे वळले. पुढे त्यातलेच काही वाइन तयार करू लागले. जोशींच्या मते अशा प्रकारे अधिकाधिक फायदा मिळू शकणाऱ्या उत्पादनाकडे शेतकऱ्याने वळणे हे एक चांगले चिन्ह होते. अशा मूल्यवर्धनाचा (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) त्यांनी कायमच पुरस्कार केला...
 आंदोलने करण्यापलीकडे आपल्या कामाला काही नवे आयाम द्यायचे असे जे प्रयत्न शरद जोशी अनेक वर्षे सातत्याने करत आले, त्याचे एक परिपक्व रूप म्हणजे ८, ९ व १० नोव्हेंबर २००८मध्ये ऐन दिवाळीत नारा उत्तम शेतीचा' अशी घोषणा देत औरंगाबाद येथे झालेले शेतकरी संघटनेचे अकरावे अधिवेशन. साठच्या दशकातील हरित क्रांतीचे असंख्य फायदे शेतीला झाले, पण त्यातून अनेक प्रश्नही निर्माण होत गेले. ही कुठल्याही विकासाची एक स्वाभाविक प्रक्रियाच असते. या अधिवेशनात शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्याव्या अशा

४२४ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा