पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१४


सहकारी आणि टीकाकार



 एखादी व्यक्ती कितीही कर्तृत्ववान असली तरी तिच्या कार्यात अनेकांचा हातभार हा असतोच; त्याशिवाय मोठी कार्ये उभीच राहू शकत नाहीत. शेतकरी संघटना हा एकखांबी तंबू होता असे अनेक जण म्हणाले आहेत, पण प्रत्यक्षात अनेकांची जिवाभावाची साथ शरद जोशींना वेळोवेळी मिळत गेली हेही खरे आहे. अशा अनेक सहकाऱ्यांचा ह्या पुस्तकात वेळोवेळी उल्लेख झालाच आहे; तसा तो सर्वांचाच करणे स्थलाभावी अशक्यच आहे, पण तरीही आणखी काही सहकाऱ्यांविषयी इथे थोडेफार लिहिणे आवश्यक आहे; किंबहुना त्याशिवाय जोशींचे चरित्र अपुरेच राहील.

 मांडववाले गोपाळशेट ऊर्फ गोपाळ मारुती जगनाडे, ऑइल इंजिन दुरुस्त करणारे मधुकर रघुनाथ शेटे, फिटर अप्पासाहेब देशमुख वगैरे त्यांचे अगदी सुरुवातीचे चाकणमधले व्यवसायातून ओळख झालेले सहकारी. चाकणमधलेच पण सामाजिक कामातून जोडले गेलेले सहकारी. मोहनलाल परदेशी ऊर्फ बाबूलाल, शंकरराव वाघ, डॉ. अविनाश अरगडे, श्याम पवार आणि 'चाकणचे साने गुरुजी' मामा शिंदे. बाबूलाल परदेशी व शंकरराव वाघ यांची 'अंगारमळा मध्ये जोशींनी चितारलेली व्यक्तिचित्रे जिव्हाळ्याने ओथंबलेली आहेत. 'शेतकरी संघटक'चे मालक म्हणून मोहन बिहारीलाल परदेशी हे नाव कायम छापले जात होते. शंकरराव आपल्या थट्टेखोर, दिलखुलास बोलण्यामुळे परप्रांतातील शेतकरीनेत्यांतही परिचित होते. श्याम पवार यांनी पुढे आपल्या म्हाळूंगे ह्या गावी एक हॉटेल काढले. जोशी तिथे खूपदा जात असत. आंबेठाणला मुक्काम असला, की खूपदा जोशी गप्पा मारायला अरगडेंकडे येऊन बसत; त्या छोट्या गावात त्यावेळी सुशिक्षित मंडळी थोडीच असत.

 या साऱ्यांशी संपर्क आला तेव्हा जोशी कोणी शेतकरीनेते वगैरे बनलेले नव्हते. खरे म्हणजे तेव्हा, आपल्या आयुष्यात असे काही पुढे घडेल ह्याची त्यांना स्वतःलाही अजिबात कल्पना नव्हती; इतरांना ती असायचे काहीच कारण नव्हते. 'माणूस तसा भला दिसतोय, शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करू पाहतोय,' अशीच इतरांची भावना होती. कांदा आंदोलन सुरू झाल्यावर मग हळूहळू जोशींच्या विचारांची झेप त्यांच्या लक्षात येत गेली. पण सुरुवातीलाच नात्यात निर्माण झालेली एक प्रकारची अनौपचारिकता व सहजता कायम टिकली. पुढे आंदोलनातही ही मंडळी भाग घेत असत, पण पहिल्या रांगेत बसायचा त्यांनी

३७४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा