पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जोशींनी काम केले. सुरुवातीला १२, मीना बाग ह्या बंगल्यात व नंतर ४०, मीना बाग ह्या थोड्या अधिक मोठ्या बंगल्यात त्यांचे वास्तव्य होते. त्याच बंगल्याच्या आउटहाउसमध्ये स्वतंत्र भारत पक्षाचे अधिकृत कार्यालयही होते व तिथे पक्षाच्या एखाद्या पदाधिकाऱ्याची राहायचीही सोय होती. पक्षाचे एक सचिव म्हणून विनय हर्डीकर यांनी काही काळ काम केले व त्या काळात काही महिने त्यांचे वास्तव्य याच कार्यालयात होते. पुढे काही कारणाने हर्डीकर यांनी ते काम सोडले व ते पुण्याला परतले.
 राज्यसभेचे काम करताना येणाऱ्या अडचणींविषयी जोशींनी मोकळेपणे लिहिले आहे. उदाहरणार्थ, संसदेचे सत्र सुरू असते त्या कालावधीत रोज कागदपत्रांचे प्रचंड गठ्ठे सकाळसंध्याकाळ खासदाराकडे येऊन पडतात. आदल्या व येणाऱ्या दिवसातील संसदेतील कामकाजाबद्दल. हे अक्षरशः हजारपाचशे पानांचे गठ्ठे असतात. ते चाळणेही अशक्य असते. सकाळी अकरा वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले, की तर ह्याकडे बघणेही अशक्य असते. इतक्या मर्यादित तयारीनंतर तुम्ही महत्त्वाचे असे काय सभागृहात बोलणार?
 कागदपत्रांचे हे प्रचंड ओझे म्हणजे संसदेतील कामकाजाचा दर्जा घसरण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. अर्थात इतरही कारणे आहेतच. दुर्दैवाने हे सारे बदलावे, म्हणून कोणीच फारसा प्रयत्नही करताना दिसत नाही. खासदार म्हणून काम करताना हे सारे त्यांना प्रत्यक्ष अनुभवताही आले. संसदेतील वातावरणाबद्दल ते लिहितात,

संसद याचा अर्थ जेथे लोक एकत्र जमतात, चर्चा करतात. संसद हा काही आखाडा नाही, की जेथे दोन्ही बाजूच्या पहिलवानांची कुस्ती व्हावी! आज राज्यसभा आणि लोकसभा म्हणजे जबरदस्त नरड्यांच्या पहिलवानांच्या कुस्त्यांचे आखाडे बनले आहेत. ही माणसे फार ताकदीचीही नाहीत, अगदी किरकोळ आहेत; फक्त जबरदस्त नरड्यांची आहेत. तिथे माझ्यासारख्या, काही वैचारिक मांडणी करणाऱ्या लोकांचा आवाज फार तोकडा पडतो.

(पोशिंद्यांची लोकशाही, पृष्ठ २७८)

 जोशींचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक घटक पक्ष होता, पण तरीही आघाडीच्या बैठकांचे आमंत्रणही त्यांना मिळत नसे. हा एकप्रकारे अपमानच होता. त्याबद्दल शेवटी त्यांनी अडवाणी यांच्याकडे तक्रार केल्यावर अडवाणी यांनी दिलगिरी व्यक्त केली व त्यानंतर मात्र जोशींना सर्व बैठकांची आमंत्रणे येऊ लागली. दुर्दैवाने आपल्याकडे सभागृहातील नेत्यांची किंमत संख्याबळावर ठरते व त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेतही खूपदा वामनराव चटप यांच्यासारख्या प्रामाणिक आमदारालाही अनेकदा असले अपमान गिळायला लागले. जोशींचा पक्ष अगदी छोटा; त्यात पक्षाचे ते एकमेव खासदार. त्यामुळे चर्चेच्या वेळी त्यांच्या वाट्याला जेमतेम तीन-चार मिनिटे येत. पण इतक्या कमी वेळातही दोन-तीन महत्त्वाचे मुद्दे मांडायचे कसब त्यांनी अवगत केले. त्यामुळे ते बोलायला उठले, की बाकीचे सदस्य लक्षपूर्वक ऐकत असत.

 जोशींच्या राज्यसभेतील एकूण कामगिरीबद्दल लिहिताना त्यांचे एक सहकारी व आर्थिक

३७०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा