पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुढे रेटला नाही. त्यानंतरही आता संघटना विसर्जित करावी असे त्यांना कधीकधी वाटायचे, पण प्रत्यक्षात मात्र ते तसे करू शकले नाहीत.
 त्यांच्या दोन निकटच्या सहकाऱ्यांची याबद्दलची मते इथे उदधृत करण्याजोगी आहेत. भास्करराव बोरावके लिहितात,

शरद जोशींनी हाक दिली, की घरचे खाऊन स्वखर्चाने कोठेही सहकुटुंब येणारे लाखो कार्यकर्ते कालांतराने शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या थकून गेले. खरे तर इतकी दीर्घ काळ – तीस वर्षे - संघटना टिकून राहिली हेच आश्चर्य. शरद जोशी सतत नवनवीन कार्यक्रम देऊन सर्वांना इतका प्रदीर्घ काळ कार्यमग्न ठेवण्यामध्ये निश्चितच यशस्वी झाले. इतर संघटना पाहिल्या, तर त्या साधारण दहा ते बारा वर्षांचा काळ टिकून राहतात. त्या मानाने ही तर खूप काळ टिकून राहिली.
 (मोहन गुंजाळ स्मृतिग्रंथ, प्रकाशन १० नोव्हेंबर, २०११, पृष्ठ २१९)

 संघटनेला करण्याजोगे आता काही राहिलेले नाही असे संघटनेच्या ह्या माजी अध्यक्षांचेही मत झाले होते हेच ह्यावरून ध्वनित होते.
 ह्याच ग्रंथात पृष्ठ २५७वर संघटनेच्या जन्मापूर्वीपासून, १९७८पासून, जोशींशी संबंध असलेले डॉ. श्याम अष्टेकर लिहितात,

शेतकरी संघटनेची चळवळ आता बहुतांशी ओसरली आहे. कार्यकर्ते वयस्कर झाले, थकले. राजकारणाच्या खडकावर आपटून चळवळी संपतात असे शरद जोशींचेच म्हणणे असते. एरवीही कोणत्याही चळवळीचे आयुष्य एक-दोन दशकांचेच असते. ती पिढी मागे गेली की चळवळी निःशेष होतात. चळवळीचा पक्ष होणे हाही एक प्रकारचा अंतच असतो. अनेक चळवळी पक्षाघाताने संपून जातात किंवा मूळ मागण्या व लढे विसरून जातात.

 एक नक्की, जोशींनी आपल्या एकाही नातेवाइकाला शेतकरी संघटनेच्या जवळपासही आणलेले नसल्याने, संघटनेवर निदान घराणेशाहीचातरी आरोप नक्की करता येणार नाही!
 संघटना दीर्घकाळ उत्तम चालावी या दृष्टीने संघटनेची व्यक्तिनिरपेक्ष व व्यावसायिक उभारणी जोशींनी केली नाही ही परिस्थिती आदर्श होती,असे प्रस्तुत लेखकाला अजिबात सुचवायचे नाही; पण भारतातील संस्थाजीवनाची एकूण परिस्थिती विचारात घेता ती अपरिहार्य अशी वास्तविकता होती असे वाटते.
 जोशींच्या उपरोक्त टीकाकारांच्या संदर्भात तीन गोष्टी मान्य कराव्या लागतील.

 एक म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्यांची साथ सोडली, त्यांनीही कधी शरद जोशीच्या मूलभूत मांडणीला छेद देणारी अशी स्वतःची वेगळी मांडणी केलेली नाही. याचा एक अर्थ असाही होतो, की वेगळे होण्यामागे मतभेदापेक्षा मनभेद हेच खरे कारण होते; वेगळे होण्यामागे

४०६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा