पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ब्रह्मगिरीलाही जायचे होते. आपला २०१५ सालातला वाढदिवस तिथे त्यांना लोकांपासून दूर अशा एखाद्या निवांत जागी एकांतातच घालवायचा होता. अर्थात प्रत्यक्षात यातले काहीच कधी झाले नाही. शेवटी शेवटी असेच एकदा ते जिद्दीने सज्जनगडावरही जाऊन आले. भंडारदऱ्यालाही गेले होते. त्यांना नेणे-आणणे बरोबरच्यांनाही तसे अवघडच असायचे. अर्थात निरपेक्ष बुद्धीने आपल्या नेत्याची सेवा करायचा निर्धार असल्याने कोणी काही तक्रार करायचा प्रश्नच नव्हता.
 ९ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांनी आपले मृत्युपत्र तयार केले होते. मरणोत्तर जेव्हा ते जाहीर झाले तेव्हा कळले, की आपली पुण्यातील राहती सदनिका आपल्या दोन्ही कन्यांना त्यांनी दिली आहे व आंबेठाण येथील उर्वरित सुमारे सहा एकर जमीन तिच्यावरील अंगारमळा या घरासकट त्यांनी ३० सप्टेंबर २०१४ मध्ये नोंदणी झालेल्या शेतकरी संघटना' न्यासाला दिली आहे. न्यास स्थापन केला तेव्हा ते स्वतः मुख्य विश्वस्त होते. त्यांच्या पश्चात रवी काशीकर न्यासाचे प्रमुख असून बद्रीनाथ देवकर, सुरेशचंद्र म्हात्रे, अनंत देशपांडे, गोविंद जोशी, संजय पानसे, भास्करराव बोरावके, रामचंद्रबापू पाटील, वामनराव चटप, मानवेन्द्र काचोळे व अलका दिवाण हे न्यासाचे इतर विश्वस्त आहेत. ठेवीच्या स्वरूपात शिल्लक रक्कम होती तिच्यातून दर्शनी भट्ट, अनंत देशपांडे व सुरेशचंद्र म्हात्रे यांना प्रत्येकी वीस लाख रुपये द्यायची तजवीज त्यांनी केली. म्रुत्युपत्रातही त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे व शेतकरी संघटनेप्रती असलेल्या निष्ठेचे चांगले प्रतिबिंब उमटलेले आहे. शासनाने मरणोत्तर देऊ केलेली पद्मश्रीदेखील जोशी यांच्या कुटुंबियांनी नाकारली होती हे इथे नमूद करायला हरकत नाही.

 सिंहावलोकन करताना केलेल्या विश्लेषणाला तसे मर्यादितच महत्त्व असते; माणूस त्या त्या वेळी योग्य वाटेल तशी पावले उचलत जातो; असे झाले असते तर आणि तसे झाले असते तर, ही चर्चा व्यर्थच असते. पण तरीही जोशींच्या एकूण कार्याच्या संदर्भात मागे वळून पाहताना काय वाटते? स्वतः जोशींनी तसे काही सांगितले आहे का किंवा लिहिले आहे का?
 त्यांचा तसा एक अप्रकाशित लेख वाचनात आला. २०१५ साली एका दिवाळी अंकाने 'आयुष्यात झालेल्या माझ्या चुका' ह्या विषयावर वेगवेगळ्या व्यक्तींकडून लेख मागवले होते. त्यात जोशींचाही लेख मागवला गेला होता. जोशींनी तो लिहिलाही होता, पण प्रकाशनासाठी पाठवला मात्र नाही. त्यांच्या त्या अप्रसिद्ध राहिलेल्या लेखात त्यांनी स्वत:ला जाणवलेल्या आपल्या काही चुका नोंदवलेल्या आहेत.
 आपली पहिली चूक म्हणून त्यांनी राजकारणात शिरायची वेळ चुकल्याचा उल्लेख केला आहे. ऊस आंदोलन जोरात असताना नाशिक जिल्ह्यात सर्वत्र काँग्रेसविरोधी वातावरण होते व शेतकरी संघटनेला प्रचंड जोर होता. त्यानंतर झालेल्या १९८५च्या निवडणुकीत शेतकरी संघटनेने आपले सगळे बळ शरद पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलाच्या मागे उभे केले व मुख्यतः त्याचमुळे पुलोदने त्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व


४७२ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा