पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११



किसानांच्या बाया आम्ही...


 शेतकरी संघटनेची उभारणी हा एक चमत्कार मानला, तर शेतकरी महिला आघाडीची उभारणी हा त्याहूनही मोठा चमत्कार मानावा लागेल.
 महिला आघाडीची औपचारिक स्थापना नोव्हेंबर १९८६मध्ये झाली असली, तरी शेतकरी आंदोलनात महिलांचा सहभाग हा तसा जवळजवळ प्रथमपासूनच होता. आंदोलनाच्या अगदी सुरुवातीला, जानेवारी १९८०मध्ये वांद्रे ते चाकण असा ६४ किलोमीटरचा रस्ता पक्का व्हावा, ह्या मागणीसाठी शरद जोशींनी जो एक मोठा आठ हजार शेतकऱ्यांचा मोर्चा नेला होता, त्यात सुमारे दोन हजार महिलांचाही समावेश होता. या महिला एरव्ही फक्त बाजारापुरत्या कधीमधी चाकणला येत, पण या मोर्च्यात मात्र त्या सर्व संकोच बाजूला सारून 'किसानांच्या बाया आम्ही शेतकरी बाया, नाही आम्ही राहणार आता दीनवाण्या गाया' अशी गाणी म्हणत मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. कांदा आणि ऊस आंदोलनातही महिला होत्याच. त्यानंतर पुढल्याच वर्षी, म्हणजे मार्च-एप्रिल १९८१मध्ये निपाणी येथे झालेल्या तंबाखू आंदोलनात महिलांचा सहभाग साहजिकच अधिक लक्षणीय होता; कारण तंबाखू व विडी व्यवसायात काम करणाऱ्यांमध्ये स्त्रिया बहुसंख्य होत्या. दिवसभरातील कारखान्यातील काम सांभाळून या स्त्रिया सलग २३ दिवस सत्याग्रहाच्या ठिकाणी येऊन जात होत्या. रास्ता रोको करणाऱ्या सुमारे चाळीस हजार सत्याग्रहींना २३ दिवस रोज दुध-पिठले-भाकऱ्या पुरवणाऱ्या या महिलाच होत्या. अक्काबाई कांबळे यांसारख्या महिलानेत्यांनी त्यावेळी व्यासपीठावरून जहाल अशी भाषणेही केली होती.

 'अंगारमळा'मधील एका लेखात जोशींनी एक हृदयस्पर्शी प्रसंग नोंदवला आहे. निपाणी आंदोलनाच्या वेळी रास्ता रोको चालू असताना आंदोलन नगरीतील प्रत्येक गावच्या मांडवाला भेट देत जोशी चालले होते. सकाळची वेळ होती. एक म्हातारी धावतच त्यांच्यापाशी आली. आपल्या आगळ्या शब्दकळेत तिचे वर्णन करताना जोशी लिहितात, "उंच, शिडशिडीत बांधा. जन्मभरचे कष्ट चेहऱ्यावरच्या रेषारेषांच्या जाळ्यांत खोदलेले." ती म्हणाली, "साहेब, तुम्ही गावातल्या माय-बहिणींना सत्याग्रहाला यायला सांगितलं म्हणून आले. नेसूचं धड नव्हतं, म्हणून शेजारणीकडून लुगडं घेऊन आले बघा." जोशींना ती आपल्या आईसारखीच वाटली. तिच्या आग्रहास्तव ते तिच्या घरी गेले. त्यांना द्यायला तिच्या घरी काही नव्हते, म्हणून तिने शेजारणीकडून दूध आणून त्यांना दिले. त्यांना ते पिताना पाहिले, तेव्हाच तिचे समाधान झाले.

किसानांच्या बाया आम्ही...२७९