पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आदल्या रात्री जोशी आपल्या दहा-बारा निवडक सहकाऱ्यांसमवेत केवाडिया कॉलोनीच्या मागच्या बाजूने डोंगराळ भागातून गुपचूप निघाले. जवळजवळ बारा किलोमीटर अंतर त्यांनी पायी कापले. नंतर थोडा वेळ ते घोड्यावरून गेले. नंतर शेवटचे दोन-तीन किलोमीटर पुन्हा पायी गेले. त्यावेळी त्यांचे वय ६४ होते व ते नुकतेच हृदयविकाराच्या झटक्यातून उठले होते हे विचारात घेता हे धाडस अविश्वसनीय वाटावे असेच होते. पहाटेच्या अंधारात पोलिसांची नजर चुकवत चुकवत ही मंडळी कशीबशी आंदोलनस्थळापाशी पोचली. कळशीभर पाणी जोशींनी धरणातून काढले व कालव्यात ओतले. एक अतिशय अवघड अशी, किंबहुना अशक्य वाटणारी कृती, प्रतीकात्मक स्वरूपात का होईना पण, केली.
 ह्या धरणामुळे आज सौराष्ट्र व कच्छ ह्या कायम दुष्काळी भागासह जवळजवळ सर्व गुजरातला पाणी मिळत आहे व गुजरातच्या खूप मोठ्या भागातील शेती आज हिरवीगार झालेली दिसते हा धरणाचा मोठाच फायदा आहे, पण मध्यप्रदेश व महाराष्ट्र ह्या राज्यांनाही धरणामुळे वीज व पाणी ह्या दोन्हीचा कमी-अधिक प्रमाणात लाभ मिळत आहे. ह्या साऱ्या प्रकल्पात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचेदेखील आपल्याला प्रतीकात्मकतरी पाठबळ होते ह्याची जाण परिमल देसाईंसारखे काही जण तरी नक्की ठेवून आहेत.

अन्य प्रांतांतील शेतकरी आंदोलनांशी जोडून घेऊन एक भारतव्यापी शक्तिस्थान निर्माण करायचा प्रयत्न बोट क्लबवरच्या उपरोक्त फसलेल्या मेळाव्यानंतर जोशींनी सोडून दिला. किसान समन्वय समितीच्या बैठका तशा होत राहिल्या, जोशी त्यांना हजरही राहत होते, पण त्यांतले चैतन्य आता आटले होते. 'शेतकरी तितुका एक एक' असे आपण कितीही म्हटले, तरी शेतकऱ्यांना देशव्यापी पातळीवर एकत्र आणणे जवळजवळ अशक्य आहे हे त्यांना मनोमन पटले होते.  याची कारणेही तशी उघड होती. स्थानिक हवामान, जमिनीचा कस, पाण्याची उपलब्धता, शेतातील विशिष्ट मालाला उपलब्ध असणारी बाजारपेठ व मिळू शकणारा भाव, त्या त्या ठिकाणचे एकूण राजकारण, विकासाची तेथील समाजाने गाठलेली पातळी वगैरे अनेक घटक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत फरक पाडत असत. एकाच राज्यातील, किंबहुना एकाच गावातील शेतकऱ्यांनाही एकत्र आणणे जिथे अवघड होते, तिथे वेगवेगळ्या प्रांतांतील शेतकऱ्यांना एकत्र आणणे त्याहून अनेक पट अवघड असणे साहजिक होते. भाषा, जात, धर्म, प्रांत वगैरेमुळे निर्माण होणारे भेदही होतेच. कृष्णेच्या पाण्यावरून आंध्र व महाराष्ट्र यांच्यात वाद होते, कावेरीच्या पाण्यावरून तामिळनाडू व कर्नाटकात वाद होते, सतलजच्या पाण्यावरून पंजाब व हरयाणात वाद होते. असे प्रकार सगळीकडेच होते.

 शेतकरीनेत्यांनाही एकत्र आणणे अवघड व्हायचे. सगळ्यांना सोयीचे दिवस निवडणे एक दिव्य होते. एकत्र बसल्यावर परस्परांमध्ये कुठल्या भाषेत संभाषण करायचे हाही प्रश्नच होता. हिंदी किंवा इंग्रजी यांतली कुठलीच एक भाषा सर्वांना येणारी नव्हती. अनेक नेते फक्त

३६०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा