पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले, तसेच काहीसे सामंत मुंबईतील कामगारांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांच्यामुळे अनेक कारखान्यांतील कामगारांचे पगार दुप्पट झाले. एखाद्या धूमकेतूप्रमाणे सामंत कामगारक्षेत्रात आले आणि दोन-चार वर्षांतच अन्य सगळ्या प्रस्थापित कामगारनेत्यांना निष्प्रभ करून त्यांनी मुंबईतील कामगारक्षेत्र काबीज केले. मुंबईठाण्याबाहेर नाशिक, औरंगाबाद वगैरे ठिकाणीही पुढे त्यांचे हातपाय पसरले. त्यांची असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्कर्स ही एक बलाढ्य कामगारसंघटना बनली. पुढे गिरणी कामगारही त्यांच्याकडे आले. नंतर त्यांनी कामगार आघाडी हा पक्ष स्थापन केला व ते राजकारणातही शिरले. मुंबईत त्यांचा बराच जोर होता. त्यांचे अनेक नगरसेवक व आमदारही निवडून आले होते. ह्या सगळ्या घडामोडी जोशी लांबून पण बारकाईने पाहत होते.
 सामंतांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न जोशींनी सुरू केला. १६ नोव्हेंबर १९८३ रोजी, कार्तिकी एकादशीच्या दिवशी, पंढरपूर येथे 'विठोबाला साकडे' घालायचा एक अभिनव कार्यक्रम करायचे शेतकरी संघटनेने ठरवले. सध्याचा कृषिमूल्य आयोग बरखास्त करावा व त्याऐवजी शेतीतील नेमका उत्पादनखर्च काढणारा वेगळा आयोग नेमावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती व ती विठोबाने पूर्ण करावी म्हणून त्याला साकडे घालायचा. नवव्या प्रकरणात याचा उल्लेख झालाच आहे. हा कार्यक्रम शेतकरी संघटना आणि कामगार आघाडी यांनी संयुक्तरीत्या करावा, दोघांचेही नेते व्यासपीठावर एकत्र असावेत अशी जोशींची इच्छा होती. सुरुवातीला सामंत तयार झाले पण नंतर त्यांनी 'दोन्ही संघटनांचा एक अधिकृत पक्ष वा आघाडी आधी तयार झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. अशा बांधीव स्वरूपाच्या कुठल्याही आघाडीचे अथवा पक्षाचे जोशींना वावडे होते. त्याऐवजी आपण एकत्र कामाला सुरुवात करू, एकत्र काम करता करता एकमेकांचा अधिक परिचय होईल, मने जुळतात की नाही हे स्पष्ट होईल आणि त्यानंतर मग संयुक्त आघाडीचा वा पक्षाचा विचार करता येईल अशी जोशींची भूमिका होती. बरीच चर्चा होऊनही मार्ग निघेना.
 एक दिवस डॉ. सामंत संघटनेच्या पुण्यातल्या कार्यालयात आपल्या सहकाऱ्यांसह आले. 'आपल्या एकत्रीकरणाचा तपशील आधी कागदावर उतरवू या, त्यानंतरच आम्ही पंढरपूर मेळाव्यात सामील व्हायला तयार होऊ,' अशी काहीशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली. जोशींना ती मंजूर नव्हती, शेतकरी संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व त्यांना कायम ठेवायचे होते. बोलण्यासारखे आता काही उरलेच नाही; एक दार बंद झाले.
 पुढे तो मेळावा उत्तम पार पडला, लाखएक माणसे पंढपुरात जमली, पण त्यांत कामगारबांधव नव्हते. जोशींच्या मते सामंतांनी अंग काढून घ्यायचे खरे कारण होते, त्यांची फारशी माणसे पंढरपूरला यायची नाहीत व त्यामुळे शेतकऱ्यांपुढे कामगारांची बाजू तोकडी पडेल ही भीती.

 त्यानंतर पुन्हा एकदा दोघांचा संबंध आला होता राजीवस्त्रविरोधी आंदोलनाचा एक भाग म्हणून. १२ डिसेंबर १९८५ रोजी त्यांच्याबरोबर मुंबईतील शिवाजीपार्क येथे जोशींनी एक संयुक्त मेळावा घेतला त्यावेळी. त्याचे सविस्तर वर्णन मागे आलेच आहे.

राजकारणाच्या पटावर३२७