पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जागोजागी होणाऱ्या राजीवस्त्रांच्या होळीच्या कार्यक्रमात मनापासून सहभागी व्हावे.

५. सर्व महिला संघटनांनी जिल्हा परिषदा व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत फक्त महिला उमेदवारांनाच उभे करावे.

६. घटनेप्रमाणे भारतीय गणराज्य निधर्मी (सेक्युलर) राज्य आहे. याचा अर्थ ते सर्व धर्माविषयी सारखेच उदासीन असलेले गणराज्य आहे. निधर्मी याचा अर्थ सर्वधर्मसमावेशक असा नाही. गणराज्यातील कोणाही नागरिकास किंवा त्याच्या पालकास नागरी कायद्याऐवजी प्रस्थापित धर्मापैकी कोणत्याही एका धर्माची नागरी व्यवस्था आपणास लागू व्हावी असे जाहीर करता येईल. धार्मिक व्यवस्था मानणाऱ्या नागरिकांमधील नागरी तंट्यांची दखल न्यायालयाने घेऊ नये.

चांदवड अधिवेशनाला मृणाल गोरे व प्रमिला दंडवते यांच्यासारख्या नामवंत स्त्रीनेत्याही हजर होत्या. ग्रामीण भागातील स्त्रियांचा तो अफाट जनसागर बघून त्याही थक्क झाल्या होत्या. अधिवेशन चालू असताना जोशींनी ह्या स्त्रीनेत्यांना विचारले, "तुम्ही एवढी स्त्रियांची चळवळ चालवता, लाटणंमोर्चा काढता, स्वतःला 'पाणीवाली बाई' म्हणवता, पण तुमच्या सभांमध्ये कधी एवढा जनसमुदाय आला होता का?" दोघींचा प्रतिसाद फक्त मंदसे हसणे एवढाच होता, पण जोशींच्या प्रश्नातील उपहास कोणालाही कळेल असाच होता. सुरुवातीला प्रभावित झालेले काही मान्यवर नेते पुढे त्यांच्यापासून दुरावले, यामागे असली काही कारणे असतील का? अधिवेशनाचा समारोप सर्व उपस्थितांनी सामुदायिकरीत्या मोठ्या आवाजात उच्चारलेल्या एका धीरगंभीर प्रतिज्ञेने झाला. एका अर्थाने या प्रतिज्ञेत अधिवेशनातील सर्व चर्चेचा सारांशच आला होता. अगदी आज २०१६ सालातही ती सार्थ आहे. ती प्रतिज्ञा अशी होती :

"आम्ही प्रतिज्ञा घेतो की -

• आम्ही यापुढे स्त्रियांना कधीही कनिष्ठ समजणार नाही. विशेषतः गर्भ स्त्री-बालकाचा आहे यास्तव त्याला जन्माचा हक्क नाकारणार नाही;
• मुलगी आहे म्हणून लालनपालन, वात्सल्य, शुश्रूषा आणि शिक्षण यांत कमी करणार नाही;
• स्त्रियांना मालमत्तेमधील त्यांची वाटणी, गुणविकासाला वाव आणि स्वातंत्र्य मिळण्याआड येणार नाही;
• तसेच मुलींचे शिक्षण आणि विवाह यांबद्दलच्या कायद्यांचे पूर्णपणे परिपालन करू;
• सासुरवाशिणींना घरच्या लेकींप्रमाणे वागवू आणि माहेरवाशिणींना आमचा आधार कायम वाटेल अशा वागू. विधवा, घटस्फोटिता व परित्यक्ता आणि विशेषतः अत्याचारांना बळी पडलेल्या स्त्रियांना कमी लेखणार नाही;
• स्त्रियांचे शृंगार-ललित रूपच प्रकाशात आणून त्यांची नटवी, उपभोग्य वस्तू म्हणून हिडीस

प्रतिमा मांडणार नाही आणि मांडू देणार नाही."

किसानांच्या बाया आम्ही...२९३