पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शेतकऱ्यांना उत्पादनखर्चापेक्षा खूप कमी भाव देऊन सरकारने आजवर त्यांची हजारो कोटी रुपयांची लूट केली आहे व त्या तुलनेत बोफोर्सप्रकरणी झालेला ६४ कोटींचा भ्रष्टाचार हा क्षुल्लक आहे; सर्वसामान्य सरकारी अंमलदारसुद्धा रोज हजारो रुपयांची लाच खुलेआम घरी आणत असेल, तर ते माहीत असलेल्या जनतेला भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्त्वाचा वाटणार नाही; कर्जमाफी हा शब्दच चुकीचा आहे. कर्जमुक्ती हा योग्य शब्द होईल वगैरे जोशींची मते सिंग यांना ठाऊक होती.
 पण तरीही आपला प्रामाणिकपणा ही सर्वांत मोठी जमेची बाजू असलेल्या सिंग यांनी आपली भ्रष्टाचारावरची टीका कमी केली नाही व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवून लौकरच ही राष्ट्रीय आघाडी सत्तेवर आली. २ डिसेंबर ८९ रोजी व्ही. पी. सिंग यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

 ३१ डिसेंबर १९८९ रोजी दिल्लीत किसान समन्वय समितीची बैठक भरली होती. त्या बैठकीला नवनिर्वाचित पंतप्रधान सिंग आणि उपपंतप्रधान व कृषिमंत्री देवी लाल हे दोघेही जातीने उपस्थित राहिले. शेतकऱ्यांना नियोजनात प्राधान्य द्यायच्या आपल्या वचनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. किसान समन्वय समितीच्या बैठकीला पंतप्रधान व उपपंतप्रधान हजर राहणे ही अभिमान वाटावा अशीच बाब होती. पूर्वी कधीच असे घडले नव्हते: किसान समन्वय समितीची कुठलीच दखल अगदी एखाद्या राज्यमंत्र्यानेही घेतली नव्हती. जोशींच्या सिंग यांच्यापासूनच्या अपेक्षा यामुळे अधिकच उंचावल्या.
 दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १ जानेवारी १९९० रोजी, जोशी महाराष्ट्रात परतले व संघटनेच्या पूर्वनियोजित विचारयात्रा कार्यक्रमात त्यांनी स्वतःला झोकून दिले. खरे तर त्यावेळी ते नुकतेच हृदयविकाराच्या दुखण्यातून सावरत होते, डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता, पण स्वतःच्या तब्येतीची जराही तमा न बाळगता अठरा-अठरा तास ते काम करत राहिले. आता आपल्या वयाची पंचावन वर्षे उलटली, आयुष्यात जे काही साधायचे त्यासाठी थोडाच अवधी शिल्लक उरला आहे, ही भावनाही कदाचित त्या असीम उत्साहामागे असावी. शेतकरी आंदोलनाचे एक पर्व संपले, आता हे दुसरे पर्व सुरू होत आहे असेही त्यांना वाटत असावे.

 २ जानेवारी ते २६ जानेवारी १९९० या काळात शेतकरी संघटनेतर्फे महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यांमधून फुले-आंबेडकर विचारयात्रा आयोजित करण्यात आली. हे वर्ष म्हणजे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दीची सांगता, तर डॉ आंबेडकर यांच्या जन्मतिथी शताब्दीचा प्रारंभ, हा उल्लेख मागे झालाच आहे. यात्रेची सुरुवात फुले यांचे जन्मगाव कटगुण येथून झाली. या २६ दिवसांत जोशी यांनी शंभराहून अधिक जाहीर सभांमधून भाषणे केली आणि त्याहून अधिक छोट्या छोट्या गटांतून आपले विचार मांडले. एक कार्यक्रम संपला की लगेच दुसरा असा प्रकार महिनाभर चालू होता. या विचारयात्रेचा समारोप २८ जानेवारी रोजी डॉ आंबेडकर यांच्या नागपूर येथील दीक्षाभूमीवर झाला. त्या सांगतासभेला तीन लाख शेतकरी

३३२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा