पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतेच. आजही ईशान्य भारतात अनेक ठिकाणी आपल्याला मातृसत्ताक कुटुंबे आढळतात. तेथील स्त्री अनेकदृष्ट्या स्वतंत्र आहे. काही स्त्री-मुक्तीवाल्या नेत्या मानतात, तसा काही हा स्त्री विरुद्ध पुरुष झगडा नाही, किंवा काही मार्क्सवादी मानतात तसा काही हा स्त्री-पुरुष वर्गसंघर्ष अथवा मालमत्तेच्या मालकीसाठीही झालेला झगडा नाही.
 आज सुदैवाने परिस्थिती बदलते आहे, हेही जोशी आवर्जून मांडतात. अंतराळयान चालवण्यापासून ते शस्त्रक्रिया करण्यापर्यंत आणि संगणक वापरण्यापासून वाहतूक नियंत्रणापर्यंत कुठलेही काम आपण करू शकतो, हे महिलांनी सिद्ध केलेले आहे. विज्ञानामुळे एका नव्या युगाची पहाट होत आहे. आधुनिक पदार्थविज्ञान समजण्यासाठी पुरुषांना उपलब्ध असणाऱ्या मितिज्ञानापेक्षा स्त्रियांना सहजसुलभ असलेल्या प्रतिभेची अधिक गरज आहे. या संधीचा स्त्रियांनी आत्ताच फायदा करून घेतला पाहिजे; उद्या पुन्हा आपल्याभोवती गुलामगिरीच्या बेड्या पडू नयेत, म्हणून आताच जागृत व्हायला पाहिजे. चांदवडचे अधिवेशन हे त्यासाठीच होते.
 जोशी यांची स्त्रीप्रश्नाची एकूण मांडणी ही संक्षेपाने मांडायची, तर साधारण उपरोक्त स्वरूपाची आहे. त्यांनी ती स्त्रियांचा प्रश्न : चांदवडची शिदोरीया पुस्तिकेत अधिक विस्ताराने केली आहे. या अवघ्या ५४ पानी पुस्तिकेत जोशी यांनी स्त्री-प्रश्नाचे जे मूलगामी आणि तरीही अगदी सुलभ शब्दांत असे विश्लेषण केले आहे, ते अपूर्व असे आहे. पहिल्या महिला अधिवेशनाच्या निमित्ताने लिहिल्या गेलेल्या ह्या पुस्तिकेचे लोकार्पण त्या अधिवेशनातच झाले. आजही ही पुस्तिका म्हणजे स्त्रीप्रश्न मोजक्या पण नेमक्या शब्दांत आणि सर्व आवश्यक पार्श्वभूमीसह समजावून सांगणारा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे.
 या साऱ्या मंथनातूनच पढे चांदवड येथे ९ व १० नोव्हेंबर १९८६ रोजी शेतकरी संघटनेचे पहिले महिला अधिवेशन भरवले गेले. हे अधिवेशन म्हणजे जोशी आपल्या आंदोलनाचा एक मोठा मानबिंदू मानत असत.

 सर्वार्थांनी भव्य असे हे चांदवडचे अधिवेशन होते. नेमिनाथ जैन विद्यालयाच्या प्रांगणाबाहेर प्रचंड प्रवेशद्वार उभारलेले होते. नऊ नोव्हेंबरचा कार्यक्रम प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेल्या २५,००० महिलांसाठी होता. त्यांना बसता येईल एवढा मोठा मांडव आत घातला गेला होता. तीन लाख महिला हजर असलेले दहा तारखेचे खुले अधिवेशन बाहेर भरले होते. चांदवडशी असलेले अहिल्याबाई होळकर यांचे नाते स्मरणात ठेवून अधिवेशन परिसराला 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर' असे नाव दिले गेले होते. एका बाजूला उंचच उंच अशा पर्वतरांगा व दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण असे मोकळे माळरान होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच बिहार, मध्यप्रदेश, पंजाब, हरयाणा, गुजरात, आंध्र व कर्नाटक या राज्यांतूनही महिला प्रतिनिधी हजर होत्या. नऊ तारखेला गाड्यांना खूप गर्दी असणार, म्हणून बऱ्याच महिला, विशेषतः लांबून येणाऱ्या. सहा-सात तारखेलाच आपापल्या

किसानांच्या बाया आम्ही...२८९