पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जोशींनी त्यांच्याशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. अनेकदा त्यांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना टिकैत मनातून आवडत नसत, पण जोशी त्यांना प्रत्येक वेळी सांभाळून घेत. आपल्याला जर अखिल भारतीय पातळीवर शेतकऱ्यांमध्ये काम करायचे असेल, तर सध्यातरी टिकैतना पर्याय नाही हे जोशी ओळखून होते. टिकैत यांचा ते गौरवाने उल्लेख करत व आपले सर्वच सहकारी त्यांना योग्य तो मान देतील याची काळजी घेत.टिकैत यांच्या कार्यकर्त्यांसाठी म्हणून जोशींनी हिंदीतुन एक खास प्रशिक्षण शिबिर घेतले होते व त्याने टिकैत स्वतःही खूप प्रभावित झाले होते.
 किसान समन्वय समितीच्या पाच-सहा बैठकांमध्ये जोशींनी त्यांना सामील करून घेतले होते. 'कुठल्याही परिस्थितीत राजकीय नेत्यांना किसान आंदोलनापासून दूर ठेवायचे' हा टिकैत यांचा आग्रह होता. या मुद्द्यावरून ते खूपदा जोशींशी फटकून वागत. दोघांची भेट झाली त्या काळात राजकारणात प्रवेश करायची अपरिहार्यता जोशींना पटली होती; पण तो विवादास्पद मुद्दा नजरेआड करून त्यांनी टिकैत यांच्याशी कायम संपर्क ठेवला होता.
 १२ फेब्रुवारी १९८८ रोजी टिकैत यांनी मीरत येथे शेतकऱ्यांचा एक मोठा मेळावा घेतला होता. त्याला लेखक व पत्रकार आणि त्यावेळी 'म्यानबाचे मुद्रक व प्रकाशक असलेले नाशिकचे प्रा. मिलिंद मुरुगकर हजर होते आणि त्यांनी 'ग्यानबा'मध्ये त्यावर मुखपृष्ठकथाही लिहिली होती. (शेतकरी उभा आहे - हिंमत असेल तर गोळ्या घाला, 'आठवड्याचा ग्यानबा', २२ फेब्रुवारी ते १ मार्च १९८८)
 टिकैत यांचे व्यक्तिमत्त्व दाखवून देणारा एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. १९८७ साली २३ सप्टेंबरला हरयाणातील सुरज कुंड येथे विरोधी पक्ष नेत्यांची एक बैठक भरली होती. व्ही. पी. सिंग यांनी राजीव गांधींविरुद्ध बंद पुकारल्यानंतर लगेचच घडलेली ही घटना. तिला सिंग यांच्याप्रमाणेच देवी लाल, अरुण नेहरू, आरिफ मोहमद खान, हेमवती नंदन बहुगुणा, अटल बिहारी वाजपेयी वगैरे बडे नेते हजर होते. टिकैतनाही आमंत्रण होते. आपल्या मळक्याकळक्या खादीच्या कपड्यांत ते हजर होते. इतरांपेक्षा अगदी वेगळे दिसत होते. सगळ्यांचे त्यांच्याकडे सतत लक्ष लागलेले होते. अधूनमधून ते बोलत होते, पण त्यांची ग्रामीण बोली अनेकांना समजत नव्हती. शेवटी न राहवून वाजपेयी त्यांना म्हणाले, "चौधरी साहब, आपकी बात समझ मे नही आ रही है." टिकैत सटकन म्हणाले, "हम गाव वालों की बात ना समझने के कारण ही देश का ये हाल हुवा है! सगळ्यांना हसू आवरेना. बैठकीचा पूर्वार्ध संपल्यावर जेवायची वेळ झाली. बुफे मांडला होता. सगळे नेते हातात प्लेट घेऊन नेहमीप्रमाणे उभ्याने जेवू लागले. टिकैत यांनी मात्र चक्क जमिनीवर मांड ठोकली व ते हाताने जेवू लागले. इतरांकडे बघून ते मोठ्याने म्हणाले, "अरे बेइमानों, देश को खडे खडे क्यों चबा रहे हो? इसे बैठकर ही खा लो!"

त्यांचा हा फटकळपणा लोकांना आवडत असे. पत्रकारांशीही ते तसे उद्धटपणे बोलत. म्हणत, "तुम आज कल के पढे लिखे लोक समझते बहुत कम हो!" त्यांचे असले बोलणे पत्रकारही मनाला लावून घेत नसत. टिकैत मोठमोठ्या नेत्यांना नावानिशी आपल्या ग्रामीण

३५२ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा