पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोणीच कधी प्रयत्न केला नाही. या साध्याभोळ्या माणसांत जोशीही रमत असत.  माधवराव मोरे, प्रल्हाद कराड पाटील, माधवराव बोरास्ते, बागलाणचे रामचंद्रबापू पाटील हे सारे ऊस आंदोलनातील सहकारी. बोरास्ते तसे अकालीच वारले, पण माधवराव मोरे, प्रल्हाद पाटील व जोशी यांची एक त्रिमूर्तीच बनली होती. चाकणच्या संघापेक्षा हा संघ वेगळा होता. ही सर्व मंडळी तशी पूर्वीपासूनच आपापल्या परीने नेतृत्वगुण असलेली होती; शेतकरी संघटनेलाही त्यांनी नेतृत्व दिलेच.
 विजय व सरोजा परुळकर, निपाणीचे प्रा. सुभाष जोशी हेही निकटचे सहकारी. काळाच्या ओघात पुढे जोशींपासून दूर राहूनही मनातील आदर जपून ठेवलेले.
 या साऱ्यांविषयी पूर्वी लिहिलेच आहे.

 पुण्यापुरता विचार केला तर शशिकांत बोरावके हे जोशींचे तसे पहिले सहकारी म्हणता येतील. 'सकाळ' दैनिकात ते सामाजिक व शेती प्रश्नांबाबत पत्रे लिहीत व ती वाचून जोशींनी स्वतःहूनच त्यांच्याशी संपर्क साधला होता. कोपरगावच्या प्रसिद्ध बागाईतदार बोरावके कुटुंबातील असूनही हे स्वतः अन्य व्यवसाय करत होते. पुण्यात फोटोकॉपीचे दुकान काढण्यापासून वाचनालय चालवण्यापर्यंत अनेक व्यवसाय त्यांनी केले. शेतीतून बाहेर पडायची गरज त्या काळातच त्यांना जाणवली. पुढे त्यांचे काका, भास्करराव बोरावके शेतकरी आंदोलनात मोठे नेते बनले, पण शशिकांत बोरावकेंचा संपर्क हा त्यापूर्वीचा.
 पुण्याला जंगली महाराज रोडवर बालगंधर्व रंगमंदिरासमोर (११८७/६६ शिवाजीनगर) शशिकांत बोरावके यांची जागा होती. त्यांचे वाचनालय चालायचे, त्याच छोट्या खोलीत पुढे शेतकरी संघटनेचे कार्यालय सुरू झाले. ती खोली अवघी आठ बाय सहा फूट होती; पुढे शेजारच्याच १५ बाय २० फुटाच्या मोठ्या खोलीत कार्यालय हलवले गेले. जागा मोक्याची, बाहेरगावाहून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सोयीची अशी होती. सिंध सोसायटीतील बंगला जोशींनी पत्नी वारल्यानंतर कुठल्यातरी कंपनीला भाड्याने दिला होता; त्यामुळे शेतकरी संघटनेला पुण्यात काहीच आसरा उरला नव्हता. अशा परिस्थितीत शशिकांत बोरावके यांनी ती जागा संघटनेला भाडे वगैरे न घेता वापरायला दिली होती ही मोठीच मदत होती.

 पुण्यातील आपल्या अवतीभवतीच्या बहुतेक पांढरपेश्यांना शेतकऱ्यांविषयी फारसे प्रेम नव्हते, ही गोष्ट लौकरच जोशींच्या लक्षात आली. शेतकरी म्हणजे बागाईतदार ऊस शेतकरी; माजलेला आणि धनदांडगा, असाच बहुतेकांचा समज असायचा. एका कोणातरी पुढारी बागाईतदराने आपल्या मुलीच्या लग्नात लक्षभोजन घातले आणि प्यायच्या पाण्याच्या विहिरीत बर्फाच्या लाद्या टाकल्या, ह्या ऐकीव कथेमुळे मध्यमवर्गीय पांढरपेशांच्या लेखी शेतकरी जणू बदनाम झाले होते. प्रत्यक्ष त्या बागाईतदाराची काय बाजू होती, ते जाणून घ्यायचा बहुतेकांनी प्रयत्नच केला नव्हता. स्वतः शेती करायला लागल्यावर जेव्हा तिथल्या विदारक परिस्थितीचे

सहकारी आणि टीकाकार३७५