पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

कार्यकर्ता व नेता ही दरीच आमच्यात कधी निर्माण झाली नाही. साहेबांनी प्रेषित, महात्मा किंवा उद्धारक म्हणून आपली प्रतिमा कधीही होऊ दिली नाही.

(शरद जोशी अमृत महोत्सव स्मरणिका, २०१०, पृष्ठ २३७-८-९)

 आपल्या पत्नीविषयी जोशींनी फारसे लिहिलेले नाही. पण एकूण कार्यात लीलाताईंची साथ खूप मोलाची होती यात शंका नाही. जोशींनी स्वतः पत्नीला, किंवा नात्यातील कुठल्याच अन्य व्यक्तीला, शेतकरी आंदोलनात सहभागी करून घेतले नाही. सुरुवातीच्या काळात लीलाताई पतीबरोबर कार्यक्रमांना उपस्थित असत, पण मागे कुठेतरी श्रोत्यांमधे बसत. संघटनेत कुठलेही पद त्यांनी कधीच भूषवले नाही. जोशींनीही त्यांना पुढे आणायचा कधी प्रयत्न केला नाही. पण तरीही कांदा आंदोलनात ते उपोषण करत असताना लीलाताई स्वयंस्फूर्तीने चाकणला गेल्या आणि काहीशा गांगरून गेलेल्या शेतकऱ्यांसमोर त्यांनी परखड भाषण केले तो आंदोलनातील उत्कर्षबिंदू होता. त्याविषयी पाचव्या प्रकरणात लिहिलेच आहे
.  खूप नंतर, चांदवड येथील महिला अधिवेशनाबद्दलच्या आपल्या एका लेखात पत्नीपासून आपल्याला कशी प्रेरणा मिळाली याविषयी जोशी लिहितात,

ह्या अधिवेशनात त्यावेळी हयात असलेल्या माझ्या पत्नीने, लीलाने, पहिले भाषण केले होते आणि त्या भाषणात शेतकऱ्यांच्या संघटनेबरोबर शेतकरी महिलांचीही संघटना असायला पाहिजे, अशी बाजू मोठ्या परिणामकारकरीत्या मांडली होती. लीला गेल्यानंतर माझ्या मनात एका अपराधी भावनेपोटी, महिलांचे काहीतरी काम घडावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली.


(लोकसत्ता, ६ फेब्रुवारी २०१३)


 आपल्या दोन मुलींविषयी अगदी क्वचित प्रसंगी जोशींनी काही लिहिले आहे. ईटीव्हीवरील संवाद ह्या कार्यक्रमात प्रसिद्ध पत्रकार राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत एक आठवण आहे. जोशी म्हणतात,

 "१९८६मध्ये जेव्हा मी कापूस आंदोलन सुरू केलं - राजीवस्त्रांच्या होळ्या करण्याचं - त्यावेळी माझी धाकटी मुलगी वर्ध्याला मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस करत होती. काही पत्रकार त्या दिवशी तिच्याकडे गेले आणि या दिवशी योगायोगाने तिने ती खूपदा घालायची तसले सिंथेटिक म्हणजे राजीवस्त्राचे कपडे घातलेले होते. एका पत्रकाराने तिला विचारले की, 'तुझे वडील तिकडे राजीवस्त्राच्या होळ्या करतात आणि तू कसे टेरिलिनचे कपडे घालतेस?' त्यावर ती म्हणाली, 'माझ्या वडलांनी मला कधीही मी कसं वागावं, काय वापरावं हे सांगितलं नाही आणि ते मला कधी सांगणारही नाहीत. मला काय चांगलं वाटतं, हा माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.' स्वातंत्र्य हाच माझा मुख्य संदेश आहे, हे तिने बरोबर जाणलं होतं."
 पुढे मोठ्या श्रेयाचे लग्न ६ जून १९८६ रोजी झाले. पुण्यातील एक इंजिनिअर सुनील शहाणे ह्यांच्याशी. वधूवरांनी स्वतःच्या हस्ताक्षरातील सहीने प्रसृत केलेले संध्याकाळच्या स्वागत

३९४ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा