पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याबद्दल जाहीर झालेला पुरस्कार त्यांनी सुदैवाने प्रत्यक्षात स्वीकारलादेखील.
 त्यांच्या एकूण लेखनाचे वेगळेपण म्हणजे अतिशय गुंतागुंतीचा विषयदेखील ते खूप सोप्या शब्दांत मांडतात, ते लेखन कुठेही बोजड होणार नाही ह्याची दक्षता घेतात. पण त्यांच्या लेखनातील या प्रासादिकतेचे एक मोठे कारण म्हणजे मुळातच त्यांना लेखविषयाचे सखोल चिंतन केलेले असते व त्यांचे विचार त्यामळे त्यांच्या स्वतःच्या मनात सुस्पष्ट झालेले असतात. खूपदा लेखकाला स्वतःलाच त्याला नेमके काय म्हणायचे आहे ते नीट उमगले नसते व बऱ्याच साहित्यातील संदिग्धता व विसंगती त्या अपरिपक्व विचारांतून येत असते. जोशींच्या विचारांचे वेगळेपण आणि ते मांडण्यातील भाषाप्रभुत्व, संदर्भबाहुल्य आणि शब्दलाघव वाचकाला खिळवून ठेवतात. लक्षावधींचा जमाव खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत होते; प्रस्तुत चरित्रात वेळोवेळी त्याचा उल्लेख झालेलाच आहे; त्यांच्या या अमोघ वक्तृत्वाचा काही अंश त्यांच्या लेखनातही उतरला आहे.
 बऱ्याच वर्षांनंतर औरंगाबाद येथील जनशक्ती वाचक चळवळ ह्या श्रीकांत उमरीकर यांच्या प्रकाशनसंस्थेने जोशींच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित करायचा संकल्प सोडला व पुढच्या काही वर्षांत एकूण पंधरा पुस्तके प्रसिद्ध केली. (त्यांची यादी शेवटी परिशिष्टात आहे.) श्रीकांत उमरीकर यांचा परिवार शेतकरी संघटनेशी खूप पूर्वीपासून जोडला गेलेला आहे. श्रीकांत औरंगाबाद येथे येऊन प्रकाशन व्यवसायात शिरले. जोशींची अकरा नवी पुस्तके व चार पुनर्मुद्रित पुस्तके ओळीने प्रकाशित करून त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे.
 पण एक नमूद करायला हवे; जोशींची बहुतेक पुस्तके म्हणजे मुख्यत: त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणांचा व लेखांचा संग्रह आहे. हे लेखही बव्हंशी 'शेतकरी संघटक'मध्ये प्रकाशित झालेले आहेत. एक लेखक म्हणून ती पुस्तके वाचताना, स्वतंत्र पुस्तक म्हणूनच त्यांचे लेखन झाले असते, तर ती अधिक चांगली झाली असती असे मला खूपदा वाटले आहे. पुस्तकासाठी लेख निवडताना विशिष्ट आशयसूत्र उमरीकरांनी डोळ्यासमोर ठेवले आहे, पण तरीही एखादे विशिष्ट पुस्तक लिहायचे असा संकल्प सोडून, बैठक मारून जोशींनी हे लेखन केलेले नाही. चळवळीच्या धबडग्यात त्यांना ते जमले नसेल किंवा कदाचित एकूणच मराठी साहित्याविषयीची अप्रीती त्यामागे असेल; पण जर त्यांनी तशी मुळापासूनच 'पुस्तक' या स्वरूपात साहित्यनिर्मिती केली असती, तर त्यातून मराठी साहित्य अधिकच समृद्ध झाले असते.
 'लिखित शब्द मेला आहे' ('The written word is dead') असे संयुक्त राष्ट्रसंघाचे एकेकाळचे अवर महासचिव फिलिप द सेन यांचे वाक्य जोशींनी एक-दोनदा उद्धृत केले आहे. साहित्याला आता भवितव्य नाही, असे बहुधा त्यातून त्यांना सूचित करायचे असे. त्यांनी स्वतः पुस्तकलेखनाकडे फारशा गांभीर्याने का बघितले नाही याचे कदाचित ते एक समर्थनही असू शकेल. 'डंकेल आणि लेखी शब्दाचा मृत्युलेख' या शीर्षकाचा एक लेख त्यांनी 'शेतकरी संघटक'मध्ये लिहिला होता (१७ जून १९९३), प्रत्यक्षात डंकेल प्रस्ताव फारच थोड्या विद्वानांनी वाचला होता, पण ज्यांनी डंकेल प्रस्ताव कधी वाचलाच नव्हता, असेही


                                            साहित्य आणि विचार - ४४५