पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांदवड अधिवेशनानंतर साधारण तीन वर्षांनी अमरावती येथे शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीचे अधिवेशन ८, ९ व १० नोव्हेंबर १९८९ मध्ये भरले. या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षा विमलताई पाटील होत्या. चांदवडमधील चर्चेच्या अनुषंगाने आता प्रत्यक्ष काय कार्यक्रम राबवता येईल याची मुख्यतः ह्या अधिवेशनात चर्चा झाली. चांदवड अधिवेशनात महिला आघाडी उभी राहिली; अमरावती अधिवेशनात तिला प्रत्यक्ष राबवण्यासाठी निश्चित कार्यक्रम मिळाला व त्यासाठी लागणारी आयुधेही मिळाली. चांदवडने आराखडा दिला, अमरावतीने प्रत्यक्ष इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली, असेही म्हणता येईल.
 घराबाहेर कधीही न पडणाऱ्या महिला चांदवडच्या निमित्ताने बाहेर पडल्या. हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय असाच होता. चांदवड अधिवेशनामुळे शेतकरी संघटना ही शेतकरी कुटुंबाची संघटना बनली. शेतकरी महिलांना त्या अधिवेशनाने प्रचंड आत्मविश्वास दिला. जोशी म्हणतात,
 "या तीन वर्षांत महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात एक मोठा अद्भुत बदल घडून आला. शेतीमालाला रास्त भाव या एक-कलमी कार्यक्रमाने आणि संघटनेच्या आंदोलनाने महाराष्ट्रात जेवढा क्रांतिकारक बदल घडून आला, त्याहीपेक्षा चांदवड आणि अमरावती येथील महिला अधिवेशनांच्या दरम्यान घडून आलेला बदल मोठा आहे."

 महिला जागृतीचा एक आविष्कार म्हणजे त्यानंतर महिला आघाडीने राबवलेले दारूदुकानबंदी आंदोलन. शेतीमालाचे भाव वाढवून मिळाले तरी त्यातून महिलांचे दुःख काही फारसे कमी होत नाही, कारण बहुतेक वाढीव पैसा घरातला कर्ता पुरुष दारूत उडवतो, हा अनुभव आपल्या गावोगावच्या प्रवासात जोशींना सर्रास येत गेला. गावोगावी महिला सांगत, "भाऊ, एकवेळ शेतीमालाला भाव कमी मिळाला तरी चालेल, पण मालकांची दारू बंद होईल असं काहीतरी करा, कारण त्याशिवाय आम्हाला कधी सुख मिळणार नाही." अनेक महिला दारूमुळे आपल्या संसाराची कशी धूळधाण उडाली, हे जोशींना अगदी डोळ्यात पाणी आणून सांगत. अनेकदा दारूची दुकाने चालू ठेवण्यात स्थानिक पोलिसांचाही फायदा होता, कारण अशा दुकानांकडून त्यांना नियमित व भरपूर हप्ते मिळत असत. ह्या हप्त्यांचा वाटा अगदी वरपर्यंत जात असे. गावातील बरीचशी गुंडगिरी दारूभोवती गुंफलेली असायची. खरे तर अशा प्रकारची कुठलीही 'बंदी' जोशींना तत्त्वशः मान्य नसायची; त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर अशा 'बंदी'मुळे घाला येत होता. व्यक्तिगत पातळीवर तसा त्यांचा दारूला फारसा विरोधही नव्हता; ते स्वतःही अधूनमधून मद्याचा आस्वाद घेत असत. पण तरीही महिलांकडून होणाऱ्या ह्या दारूबंदीच्या एकूण मागणीचा रेटाच इतका जबरदस्त होता, की जोशींना आपली भूमिका काहीशी बदलावी लागली. पण त्यातही त्यांनी एक सावधगिरी बाळगली; आपल्या आंदोलनाला 'दारूविरोधी' आंदोलन न म्हणता त्यांना दारूदुकानविरोधी' आंदोलन म्हटले.

 ह्या आंदोलनात महिला आघाडीच्या सदस्यांनी प्रचंड उत्साहाने सहभाग घेतला. गावोगावी दारू विकणारी दुकाने त्यांनी मोर्चे काढून बंद करवली. अशा प्रकारे महिलांनी

२९४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा