पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिरीहारी, रात न दिस परायाची ताबेदारी."
 हे मात्र नक्की अगदी मनापासून होते- 'स्त्री जन्म नको देऊस श्रीहरी, रात्रंदिवस दुसऱ्याची गुलामी.'
 स्वातंत्र्याची आस हा शेतकरी संघटनेच्या तत्त्वज्ञानाचा मूलकंद होता आणि नेमकी तीच आस आता अचानक पुढे आली होती. हे उत्तर ऐकून जोशींना आता या खऱ्या बोलक्या झाल्या ह्याचे समाधान वाटले. आत्तापर्यंतचा सगळा प्रसंग अलिप्तपणे पण बारकाईने न्याहाळणाऱ्या विजय परुळकरांना ते लगेच जाणवले. बसल्या बसल्या त्यांनी एक चिठ्ठी खरडली आणि जोशींच्या हाती सोपवली. तिच्यात लिहिले होते – 'मी स्वतःला कम्युनिकेशन एक्सपर्ट समजतो, पण तुम्हाला माझा साक्षात दंडवत!' (पुढे अनेक वर्षे जोशींनी ती चिठ्ठी जपून ठेवली होती.)
 दुसऱ्या दिवशी मात्र महिलांची भीड पुरती चेपली होती. बैठक सुरू होताहोताच एक बाई सांगू लागली,
 भाऊ, तुम्ही कालपासून आम्हाला बोलायला सांगताहात. कोणाची हिंमत होत नाही. पण मी ठरवलं आहे. पूर्वी माझं माहेर होतं तेव्हा माहेरी गेलं, की हातचं राखून न ठेवता सगळं काही भावाला सांगायची. आता तुम्हीच माझे भाऊ, तुमच्यापासून काय लपवून ठेवायचं? मी आज आता सगळं काही सांगणार आहे."
 मग तिने तिची कहाणी ऐकवली. दारुडा नवरा, नशिबी येणारी मारपीट वगैरे. ते सारे वास्तव महत्त्वाचे होतेच, पण आणखी एक विशेष म्हणजे ती जोशींना 'भाऊ' म्हणाली होती. शेतकरी महिला आघाडीच्या स्त्रिया आणि जोशी यांच्यात एक नवेच नाते त्याक्षणी जन्माला आले. बैठकीतल्या इतरही बायांनी मग त्यांना 'भाऊ' म्हणून संबोधायला सुरुवात केली. शेतकरी पुरुष त्यांना 'साहेब' म्हणायचे आणि शेवटपर्यंत 'साहेब'च म्हणत राहिले, पण शेतकरी महिला मात्र त्यांना त्यानंतर 'भाऊ'च म्हणत राहिल्या.
 अशा आणखी चार बैठका मग त्याच महिन्यात जोशींनी वेगवेगळ्या गावांतून घेतल्या - परभणी जिल्ह्यात सेलू येथे (१८-१९ डिसेंबर), अकोला जिल्ह्यात वाशीम येथे (२१-२२ डिसेंबर), नागपूर जिल्ह्यात काटोल येथे (२३-२४ डिसेंबर) आणि अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव येथे (२६-२७ डिसेंबर). त्यांना अपेक्षित होता तो अनौपचारिक मोकळेपणा हळूहळू गप्पांमधून वाढत गेला.

 नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे केवळ शेतकरी महिलांचे असे एक स्वतंत्र अधिवेशन घ्यावे, अशी कल्पना ह्याच गप्पांतून पुढे आली. आधी ते फेब्रुवारी १९८६ मध्ये घ्यायचे ठरले होते, पण त्यापूर्वी थोडेच दिवस, २३ जानेवारी १९८६ रोजी, जोशींना हृदयविकाराचा पहिला झटका आला व त्यामुळे ते पुढे ढकलले गेले. डॉक्टरांनी सांगितलेली नंतरची सक्तीची विश्रांती म्हणजे एक इष्टापत्तीच ठरली; स्त्रीप्रश्नाची अधिक चर्चा करायला, वाचन करायला व त्यावर विचार करायला जोशींना पुरेसा अवधी मिळाला. यापूर्वी डॉ. रावसाहेब कसबे आंबेठाणला त्यांना भेटायला आले होते. ते शिकवत त्या संगमनेरच्या महाविद्यालयात १७

२८४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा