पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीच्या मार्गाने जातील.' देबेश रॉय यांच्या लेखनातलं हे द्रष्टेपण मराठीतल्या एकाही कादंबरीकाराने आपल्या लेखनातून अजून तरी दाखवलेलं नाही.

  इंद्रजित भालेराव, शेषराव मोहिते, अरविंद वामन कुळकर्णी व श्रीकांत उमरीकर यांनी जोशींच्या साहित्याबद्दल लिहिलेले थोडेफार माझ्या वाचनात आले आहे, पण अन्य कोणी प्रस्थापित समीक्षकांनी त्यांची लेखक म्हणून घेतलेली दखल माझ्यातरी वाचनात आलेली नाही. इतकी पुस्तके लिहुनहीं मला कोणी साहित्यिक मानत नाही ही खंत जोशींनी एका जाहीर भाषणात व्यक्तही केली होती. ते लिहितात,

मी आत्तापर्यंत अठरा-वीस पुस्तके लिहिली आहेत. मराठीबरोबर इंग्रजीतही लिहिली आहेत. माझ्या काही पुस्तकांची इतर भाषांतही भाषांतरे झाली आहेत. आमच्या शेतकरी संघटनेच्या कामामध्ये अक्षरशः लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतात. शेतकरी आंदोलनात जितकी माणसे तुरुंगात गेली, तितकी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यआंदोलनातही गेली नव्हती. असे असूनही मराठी साहित्यामध्ये शेतकरी आंदोलनाला काहीही स्थान मिळालेले नाही.

                    (समाजसेवेची दुकानदारी नको!, अंतर्नाद, फेब्रुवारी २००७) 
 चळवळ ऐन भरात असताना जोशींनी संघटनेच्या मुखपत्रापलीकडे फारसे कुठे लेखन केलेच नाही. पुढे उतारवयात त्यांनी लेखनाकडे फार नाही, पण निदान पूर्वीपेक्षा जरा अधिक गांभीर्याने बघायला सुरुवात केली. पण तेव्हाही कुठल्या संपादकाने आपणहून मागितले, तरच लिहायचे अशी त्यांची वृत्ती होती.

 लेखनाला बऱ्याच उशिरा, उमेदीचे वय ओसरल्यावर सुरुवात केल्यामुळेही हे झाले असेल. स्वतःहून काही लिहिणे, त्यासाठी चांगला प्रकाशक शोधणे, आपल्या पुस्तकांची विस्तृत परीक्षणे योग्य त्या ठिकाणी छापून आणणे, त्यांना पुरस्कार मिळावेत व ते लेखन चांगल्या वाचकांपर्यंत पोचावे म्हणून स्वतः काही प्रयत्न करणे वगैरे गोष्टी दुर्दैवाने आपल्याकडे स्वतः लेखकाला कराव्या लागतात. विशिष्ट वयानंतर स्वतःला 'प्रोजेक्ट' करण्यासाठी हे सारे करणे कोणालाही अवघडच जाणार. शिवाय तसले काही करणे हा जोशींचा पिंडच नव्हता. संपादकांच्या मागणीनुसार थोडेफार इंग्रजी वृत्तपत्रीय लेखनदेखील त्यांनी केले, पण अगदी कमी. चेन्नई येथून प्रकाशित होणाऱ्या 'हिंदू'च्या बिझिनेस लाइन ह्या आर्थिक वृत्तपत्रात त्यांनी पंधरा दिवसांनी एक असे सदरलेखन काही काळ केले. त्याचे Down to Earth हे संकलन दिल्लीच्या एका प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केले आहे; पण त्याचीही फारशी दाखल घेतली गेलेली नाही. लोकसत्ता लोकमत ह्या मराठी वृत्तपत्रांतून त्यांनी अधुनमधुन सदरलेखन केले; पण एकूण मराठी किंवा इंग्रजी साहित्यक्षेत्रात त्यांचा लेखक म्हणून फारसा कुठे उल्लेख झालेला नाही.


४४० - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा